Get it on Google Play
Download on the App Store

वलय - प्रकरण ४७

रिताशा युरोपच्या टूरवर सगळ्या टीम सोबत खूश होती. सोनी भारतात डान्स शोच्या जज्जच्या भूमिकेत खूश होती आणि त्यात ती तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन पण करत होती. इकडे भूषण ग्रोवर लग्न, हनिमून आणि करीयर मार्गी लागल्या बद्दल खूश होता पण रिताशाच्या मनात काय चालले आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. आता तर अशी स्थिती होती की जवळपास युरोप टूरची अघोषित सिरियल डायरेक्टर तीच झाली होती. डिपी सिंग सुध्दा खूश होते कारण त्यांच्या मागचे काम कमी झाले होते आणि त्यांचे करीयर पुन्हा मार्गी लागले होते.

आयर्लंड सरकारची परवानगी घेऊन त्यांच्या टीमचा मुक्काम सध्या मॉलवरिन या भूत बाधित कॅसलच्या जवळ असलेल्या हॉटेल मध्ये होता. आसपासचे लोकं सांगायचे की या किल्ल्यात एका पहारेकरीला त्याच्या राजाच्या पत्नीसोबत संबंध ठेवल्याच्या खोट्या आरोपाखाली मृत्यूदंड दिला गेला होता पण फाशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि प्राण जाई जाई पर्यंत तो म्हणे ओरडत होता की तो निर्दोष आहे. त्याची आरोळी त्यावेळेस फाशी देताना ज्या लोकांनी ऐकली होती त्यापैकी काही जण वेडे झाले, काहीजण पाच दिवसात मेले तर काहीजण म्हणे बेपत्ता झाले. आजही म्हणे तेथे तसा त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो की मी निर्दोष आहे.

संध्याकाळी पाच नंतर तेथे जायला बंदी असते. त्यांची टीम सगळी शूटिंग दिवसा करायची आणि नंतर स्पेशल इफेक्ट द्वारे दिवसाचे सिन रात्रीचे वाटतील असे त्यात बदल करायचे.

त्या दिवशी शूटिंग अर्ध्या दिवसात संपली होती. सहज म्हणून जवळपास फिरण्यासाठी रिताशाने भूषणला विनंती केली. तो तयार झाला. थोड्याच वेळात पाऊस येईल अशा प्रकारे मोबाईलवर हवामानाचा अंदाज पाहिल्यावर तिने मुद्दाम त्याला फिरायला चालण्याची विनंती केली. नंतर ती म्हणाली, "चल भूषण, जरा सिटी फिरून येऊ! परवा आपल्याला येथून निघायचे आहे, आज वेळ मिळाला आहे तर जवळपास जाण्यापेक्षा सिटी मध्ये मिड टाऊन मॉलमध्ये फिरून येऊ!"

भूषण हो म्हणाला कारण त्यालाही हॉटेलच्या रूमवर बसून बोअर होणार होते आणि मिड टाऊन मॉल मधून सोनीसाठी काहीतरी विकत घेता येईल असा विचार करून तो तिच्यासोबत निघाला. भूषणने सोनीला कॉल लावला पण ती शूटिंग मध्ये व्यस्त असल्याने फोनवर उपलब्ध नव्हती.

काही अंतर मॉलमध्ये चालल्यानंतर अचानक एक मोठा आवाज आला आणि पळापळ सुरु झाली. त्यामुळे ती संधी साधून दचकल्यासारखे करून रिताशाने भूषणच्या थोडे जवळ सरकत त्याचा तळहात धरला आणि तिची पाचही बोटे त्याच्या हाताच्या बोटात लॉक केली. भूषण थोडा अवघडला पण सोबतच्या एका लेडीची भीतीने अशी होणारी प्रतिक्रिया साहजिक आहे असे समजून त्याने तिला विरोध केला नाही. तसे पाहता सिरियल मध्ये शूटिंगच्या वेळेस तिच्या शरीराचा स्पर्श त्याला कित्येक वेळा झाला पण ते सगळे लोकांसमोर आणि मुद्दाम केले असल्याने त्याची अनुभूती वेगळी आणि आताच्या स्पर्शाची अनुभूती कित्येक पटीने वेगळी होती.

नंतर घोषणा झाली आणि कळाले की ती पळापळी म्हणजे मॉल मधले "मॉक ड्रील" होते म्हणजे एखादा दहशतवादी हल्ला झाला तर काय करायचे याची ती रंगीत तालीम होती.

पण तोपर्यंत त्या गोंधळात मार्ग काढतांना घाबरून रिताशा बराच वेळ भूषणच्या अंगाला अंग घासून चालत होती. आज कोणत्याही परिस्थितीत डाव साधायचा कारण युरोपला येऊन बरेच दिवस झाले होते पण हवी तशी संधी मिळत नव्हती, जी आज नक्की मिळेल असे तिला आज सकाळपासून खूप मनापासून वाटत होते. त्या दृष्टिकोनातून पाहिले पाऊल योग्य संधी साधून तिने टाकले होते.

रिताशाने त्याच्या हातात तिचा हात जेव्हा दिला तेव्हा भूषणला तिच्या हाताची लांबसडक बोटे प्रकर्षाने दिसली. जाणवली!  ती बोटे त्याला खूपच आवडली. हातात हात घालून तो अनेकदा सोनीसोबत फिरला होता पण रिताशाच्या बोटांच्या स्पर्शाने त्याला जी अनुभूती मिळाली ती आयुष्यात प्रथमच त्याने अनुभवली होती, अगदी सोनीच्या हातांच्या स्पर्शात सुद्धा ती जादू नव्हती!

नंतर ते दोघे अनेक दुकानं फिरले. सोनीकरता भूषण जी वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा त्याबद्दल तो रिताशाचे मत विचारायचा कारण एक महिला दुसऱ्या महिलेला काय आवडेल हे ठामपणे सांगू शकते ज्याद्वारे सोनीला त्याने घेतलेले गिफ्ट आवडण्याचे चान्सेस वाढणार होते. पण रिताशा भूषणने निवडलेल्या प्रत्येक आयटेम मध्ये काहीतरी खोट काढून त्याला गोंधळून टाकायला लागली. शेवटी भूषण तिच्या बोलण्यात येऊन कोणतीच वस्तू नीट निवडू शकला नाही.

नाही म्हटले तरी त्या रात्री भूषणच्या मनात तिच्या हाताच्या घट्ट स्पर्शाबद्दल एक वेगळेच आकर्षण घर करून राहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी –

सकाळी पाच वाजताच रिताशाने भूषणच्या रुमच्या दरवाज्यावर टक टक केले. रात्रीचा वन पीस गाऊन तसाच अंगावर ठेऊन ती आली होती.

"अरे बापरे, रिताशा एवढ्या सकाळी?"

"सकाळी अकरा वाजता शूटिंग चालू होते आहे. वेळ कमी आहे. म्हणून लवकर उठले आज. म्हटलं रिव्हर साईडला फिरून येऊ. तुझ्या पेक्षा कुणी डीसेंट आणि सिंपल माणूस कंपनी द्यायला मला आपल्या पूर्ण टीम मध्ये दिसत नाही म्हणून तुला विचारले. असा आश्चर्यजनक चेहरा काय केलास? तू म्हणशील तर जाते मी परत...!"

सकाळी सकाळी अचानक उठवल्याने त्याचा चेहरा आश्चर्य दर्शवत होता आणि त्याने काही बोलण्याच्या आतच तिने बडबड चालू केली.

"रिटा, तसे नाही, ये बैस. अचानक पणे तू सकाळी सकाळी आलीस म्हणून बाकी काही नाही", त्याची नजर तिच्या गाऊन मधून दिसणाऱ्या शरीरावरून हट म्हणता हटत नव्हती," बैस! मी पटकन ब्रश करून येतो!"

ती त्याच्या बेडवर बसली आणि तो ब्रश करायला वॉशरूम मधील बेसिनकडे गेला तेव्हा ती त्याच्या बेडवर आडवी झाली. एखाद्या परपुरुषाच्या रुममध्ये आपण सकाळी सकाळी आलो आहोत याची तमा न बाळगता एक आळस देऊन ती बेडवर पहुडली.

दहा मिनिटांनी वॉशरूम मधून ब्रश करून बाहेर आल्यावर बेडवर नजर टाकताच त्याचा अनपेक्षित दृश्याने आ वासला गेला. नजर बेडवर खिळली.

रिताशा बेडवर पूर्ण नग्नावस्थेत होती आणि रूमचा दरवाजा, पडदे, खिडक्या सगळे लावलेले होते. तिच्या नजरेतून आणि शरीरातून एक मादक आव्हान झळकत होते. त्याच्या हातातून रुमाल आणि ब्रश खाली पडला...

मग त्या दिवसानंतर एक दिवसाआड रिताशा त्याला उद्युक्त करायची आणि मग दिवसा किंवा संध्याकाळी किंवा रात्री वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगच्या ब्रेक मध्ये आडोसा शोधत कुठेही ते बिनधास्तपणे प्रेम करायला लागले अर्थात त्यांच्या टीमपासून हे लपवण्याची खबरदारी घेण्यात ते चुकत नव्हते.

खरेतर भूषण हा रिताशा सोबत प्रथम शारीरिक पातळीवर गुंतला होता आणि नंतर रिताशा त्याची आवड निवड छोट्या छोट्या प्रसंगाद्वारे सांभाळायला लागली तेव्हा मात्र तो हळूहळू तिच्यात स्वतःच्या नकळत भावनिक पातळीवर सुध्दा गुंतत गेला.

युरोपमधून परत आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा बदललेला भूषण सोनीला जाणवला. सोनीसोबत प्रेम करतांना त्याला रिताशा आठवायला लागली कारण सोनी भूषण ज्या खेळात अजून नवशिके होते त्यात रिताशा खूप अनुभवी होती आणि तिचा तो वेगवेगळा अनुभव त्याने अनुभवल्यानंतर त्याला साधा मिळमिळीत अनुभव नकोसा वाटायला लागला. सोनीला अजूनही कळत नव्हते नेमके काय झाले ते! आणि भारतात आल्यानंतर फोनवर आणि शूटिंगच्या दरम्यान फ्री वेळ जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा भूषण वेड्यासारखा तिच्यात गुंतत चालला होता. सोनीला काही काळानंतर थोडा थोडा संशय आला पण तिला एखादा ठोस पुरावा मिळेल असे काही अजून मिळत नव्हते.

yyyy

वलय (कादंबरी)

Nimish Navneet Sonar
Chapters
लेखकाचे मनोगत सिद्धेश प्रभूगांवकर यांची प्रस्तावना वलय - प्रकरण १ वलय - प्रकरण २ वलय - प्रकरण ३ वलय - प्रकरण ४ वलय - प्रकरण ५ वलय - प्रकरण ६ वलय - प्रकरण ७ वलय - प्रकरण ८ वलय - प्रकरण ९ वलय - प्रकरण १० वलय - प्रकरण ११ वलय - प्रकरण १२ वलय - प्रकरण १३ वलय - प्रकरण १४ वलय - प्रकरण १५ वलय - प्रकरण १६ वलय - प्रकरण १७ वलय - प्रकरण १८ वलय - प्रकरण १९ वलय - प्रकरण २० वलय - प्रकरण २१ वलय - प्रकरण २२/२३ वलय - प्रकरण २४ वलय - प्रकरण २५ वलय - प्रकरण २६ वलय - प्रकरण २७ वलय - प्रकरण २८ वलय - प्रकरण २९ वलय - प्रकरण ३० वलय - प्रकरण ३१ वलय - प्रकरण ३२ वलय - प्रकरण ३३ वलय - प्रकरण ३४ वलय - प्रकरण ३५ वलय - प्रकरण ३६ वलय - प्रकरण ३७ वलय - प्रकरण ३८ वलय - प्रकरण ३९ वलय - प्रकरण ४० वलय - प्रकरण ४१ वलय - प्रकरण ४२ वलय - प्रकरण ४३ वलय - प्रकरण ४४ वलय - प्रकरण ४५ वलय - प्रकरण ४६ वलय - प्रकरण ४७ वलय - प्रकरण ४८ वलय - प्रकरण ४९ वलय - प्रकरण ५० वलय - प्रकरण ५१ वलय - प्रकरण शेवटचे (५२) लेखकाची साहित्यिक ओळख