वलय - प्रकरण ३०
रागीनीची ही बातमी इटलीत सुप्रिया दुपारी टीव्हीवर बघत होती. तिला आश्चर्य वाटले आणि जुन्या होस्टेलच्या आठवणी जाग्या झाल्या. मेडिया आता सेलिब्रिटींच्या खासगी जीवनात जरा जास्तच शिरायला लागलीय असे तिला वाटले. सेलिब्रिटीजना एक हवेहवेसे सोशल "वलय" प्राप्त तर होते पण ते "वलय" आपल्यासोबत अनेक दुःखदायक आणि नकोशा गोष्टी घेऊन येते हे नक्की! असा विचार सुप्रियाच्या मनात आला.
ती एव्हाना चांगलीच इटालियन बोलू शकत होती. तिने जवळच्या शहरातील एका एफएम रेडिओ स्टेशनवर दिवसातील चार तास रेडिओ जॉकी म्हणून जॉब पत्करला होता. आसपासच्या शहरातील एशियन लोकांसाठी चार तास एशियन गाण्यांचा प्रोग्रॅम त्या रेडियोवर आठवड्यातून तीन दिवस लागायचा. त्यासाठी त्यांना थोडे इंग्लिश, इटालियन आणि हिंदी भाषा येत असणारी एशियन वूमन हवी होती. लोकल न्यूजपेपर मध्ये तशी ऍड आली होती. सुबोधने ती ऍड सुप्रियला दाखवली आणि तिने एप्लाय केले. इंटरव्ह्यू झाला आणि तिला निवडण्यात आले. इंटरव्ह्यू साठी जास्त स्त्रिया आल्या नव्हत्या आणि ज्याही दोन पाच आल्या होत्या त्यात सुप्रियाच सगळ्यात उजवी ठरली. मध्यंतरी तिचे आईवडील आणि सुबोधची आई येऊन त्यांचेकडे चार आठवडे राहून गेले होते. एकंदरीत दोघांचं बरं चाललंय हे पाहून समाधानाने ते इंडियात परत गेले होते...
एकदा रात्री सुबोध लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत होता. घरातली कामं आटोपली होती. सुप्रियाने सहज म्हणून एक न्यूज चॅनेल लावले असता तिला एक फिल्मस्वर आधारित प्रोग्रॅम दिसला. त्याचा दुसरा भाग सुरु होता. राजेश त्या कार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार आणि अँकर होता. समोर ऑडिएन्स बसली होती आणि स्टेजवर अनेक प्रोड्युसर आणि डायरेकटर मंडळी बसली होती. ऑडिएन्स मध्ये बरीचशी मंडळी ही राजेशने बनवलेल्या टीम मधली होती. अर्थात हे फक्त त्यांना आणि राजेशला माहिती होते. प्रथम टीव्ही बंद करायला तिचा हात वळला पण स्वत:च्या मनाविरुद्ध उत्सुकतेने ती सरसावून बसली आणि उशी मांडीवर घेऊन प्रोग्रॅम बघू लागली.
राजेशने माईक हातात धरून म्हटले, "आपल्या पहिल्या भागात आपण भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास पहिला. दादासाहेब फाळके यांचे अविस्मरणीय कार्य यानिमिताने आपण बघितले. भारतीय चित्रपट कसा बदलत गेला याचा इतिहास आपण बघितला. पहिला भाग आवडल्याबद्दल अनेकांचे ईमेल, ट्विट्स आणि फ्रेंडबुक वर प्रतिक्रिया आल्यात. आपण सोशल मीडिया आणि फोनद्वारे या कार्यक्रमात सिनेरसिकांच्या थेट प्रतिक्रिया आणि प्रश्न या कार्यक्रमात लाईव्ह समाविष्ट केल्या त्यामुळे हा कार्यक्रम लोकांना आपलासा वाटला. आजच्या भागासह यापुढचेही भाग प्रेक्षकांना जागतिक मनोरंजन क्षेत्राबद्दल असेच मनोरंजनपूर्ण ज्ञान आणि ज्ञानपूर्ण मनोरंजन पुरवत राहतील अशी मी खात्री देतो. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला!"
स्टुडिओत आलेले प्रेक्षक, व्यासपीठावरचे प्रोड्युसर, डिरेक्टर्स वगैरे सगळे सरसावून बसले.
राजेश म्हणाला, "तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे- "सिनेमा आणि लेखक!" आपणास माहिती आहेच की कार्यक्रमाची सुरुवात आपण एका प्रश्नाने करतो. तर आजचा प्रश्न आहे- "सिनेमाला सशक्त कथा, पटकथा आणि संवाद असावेत असे आजकाल अनेक निर्माते दिग्दर्शकांना का वाटत नाही?" किंवा दुसऱ्या अर्थाने विचारायचे झाल्यास "निर्माते दिग्दर्शकांना स्वतःच लेखन करावेसे का वाटते?"
थोडा वेगळाच प्रश्न होता. अनेक निर्माते, दिगदर्शकांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये अस्वस्थ चुळबूळ सुरु झाली.
रामरत्नम नावाचे निर्माते म्हणाले, "मिस्टर! तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. निर्माते आणि दिगदर्शक हेच खऱ्या अर्थाने चित्रपटाला अंतिम रूप देतात. त्या दोघांच्या अनुभवी नजरेशिवाय कितीही सशक्त कथा लेखकाने लिहिली तरीही ती पडद्यावर साकारता येत नाही. दिग्दर्शकाच्या व्हिजनची सर लेखकाच्या व्हिजनला येऊच शकत नाही आणि दिग्दर्शकाच्या व्हिजनला पैशांच्या वेसणात बांधून शेवटी पडद्यावर येते ते चित्रपटाचे फायनल रूप!"
प्रेक्षकांतील काहीजणांनी टाळ्या वाजवल्या. एका खुर्चीवर बसलेला कथाचोर के. के. सुमनपण मनोमन सुखावला. टाळ्या शांत झाल्यावर हळूच राजेश म्हणाला, "पण मला सांगा की आडातच नाही तर पोहोऱ्यात कोठून येणार हो? म्हणजे मला म्हणायचे आहे की लेखकाने कथाच लिहिली नाही तर त्याला पैशांच्या वेसणात बांधणारे आणि पडद्यावर साकारण्याचे व्हिजन येणार कोठून? मुळात एखादी मूर्ती बनवून झाल्यावरच तिला मूर्तिकार किंवा इतर कुणीतरी फायनल टच किंवा रंग देऊ शकतो! आधी मूर्तीला फायनल टच आणि रंग देऊन घ्यायचा आणि मग मूर्ती बनवायला सुरुवात करायची असं कोण करतं का, सांगा बरं मला प्रेक्षकांनो?"
हे बोलून संपताच दुप्पट टाळ्या वाजू लागल्या. टाळ्या संपल्यावर रामरत्नम् काही बोलू इच्छित होते पण त्यांना नेमके शब्दच सापडेनासे झालेत आणि जवळपास ते निरुत्तर झाले.
ही संधी साधून राजेश पुढे म्हणाला, "आणि आता आजकाल तर हद्द झालीये. बरेच निर्माते, दिग्दर्शक तर लेखकांच्या कथा तोंडी ऐकून घेतात किंवा त्याचे कथा वाचन किंवा स्क्रिप्ट ऐकून घेतात, लेखकांना कथा न आवडल्याचे सांगून हाकलून लावतात आणि कालांतराने तीच कथा स्वतःच्या नावाने खपवतात!"
के. के. सुमन आणि काहींच्या चेहेऱ्यावर घाम आला आणि प्रेक्षकांमध्ये चलबिचल सुरु झाली.
"व्ही. शामसुंदर" नावाचे दिग्दर्शक उभे राहिले, "राजेश, काही ठिकाणी असे होत असेलही पण सगळेच जण असे करत नाहीत. मी असा दिग्दर्शक आहे की जो लेखकाला त्याचे पूर्ण मानधन निर्मात्यांकडून द्यायला लावतो आणि त्याच्या कथेशी कुठे तडजोड करत नाही!"
राजेश म्हणाला, "मान्य आहे! मान्य आहे. पण असे चित्र फार दुर्मिळ आहे. आजही लेखकांना हवा तेव्हढा मान, मानधन आणि प्रसिद्धी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दिली जात नाही. अवार्ड्स फंक्शन मध्ये सुद्धा चित्रपटाच्या लेखनासंबंधी फारसे अवार्डस् नाहीये. लेखकाला त्याचा सन्मान मिळालाच पाहिजे. आणि प्रत्येक निर्मात्याने एका सशक्त कथेचा आग्रह धरलाच पाहिजे! लक्षात ठेवा लेखक हा पुरातन काळापासून आहे आणि कथा लिहून तो शतकानुशतके वाचकांचे मनोरंजन करत आहे. सिनेमा नंतर आला. लेखक फार पूर्वीपासून अस्तित्वात होते! प्रसिद्ध इंग्रजी लेखक केतन सहानी यांच्या पहिल्या कादंबरीवर आधारित चित्रपट चार चतुर खूप चालला पण केतनला त्याचे श्रेय दिले गेले नाही पण त्याची वाचकसंख्या खूप असल्याने नंतर सोशल मेडीयातून निर्मात्यावर दबाव येऊन त्यांना केतनची माफी मागणे भाग पडले, नंतर त्याच्या आणखी एका कथेवर चित्रपट बनला तेव्हा त्याचे योग्य ते क्रेडीट केतनला मिळाले, पण सगळ्याच आणि नवोदित लेखकांसोबत मात्र असे होत नाही!"
पुन्हा टाळ्या....
पण एक प्रोड्युसर "सी. आर. छब्बीसिया" म्हणाला, "पण राजेश! मी अनेक चित्रपट बनवलेत की ज्यात मी कुणाच लेखकाची मदत घेतली नाही. माझ्याजवळ फॉर्मुले आहेत! त्यात थोडा तिखट मीठ मसाला टाकला की झाला चित्रपट तयार! कशाला हवेत लेखक अन बिखक! रोमँटिक चित्रपटांचे अनेक फॉर्मुले, थ्रिलरचे, सस्पेन्सचे, इमोशनल, कॉमेडी असे प्रत्येक प्रकारच्या सिनेमाचे विविध फॉर्मुले असतात!"
या प्रोड्यूसरला दे दणादण बदडून काढण्याचा प्लॅन राजेशच्या मनात आला पण त्याने स्वतःला कंट्रोल केले कारण त्याच्या टीमचा एक प्यादा त्याला ठरल्याप्रमाणे मदत करणार आहेच हे त्याला माहित होते...
त्याऐवजी राजेश त्याला एवढेच म्हणाला, "येथे बसलेल्या आणि देशभरातील करोडो सिनेरसिकांना तुमचा एखादा फॉर्म्युला सांगाल का?!"
"हे बघा! सामान्य माणूस तिकीट काढून पैसे खर्च करून दोन अडीच तास चित्रपट पाहण्यासाठी येतो ते दोन घटका मनोरंजन करायला! सॉरी मी दोन अडीच तास म्हणालो कारण आजकाल चित्रपट पूर्वीसारखे तीन साडेतीन तासांचे राहिले नाहीयेत! आणि आजच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात तर एका तिकिटाला दोनशे ते पाचशे रुपये पडतात. एवढे पैसे खर्च करून फक्त दोन तासांचा सिनेमा असतो, त्यातही जर समोर पडद्यावर डोक्याला जड असे काहीतरी बघायला मिळाले तर प्रेक्षक शिव्या देईल! चित्रपट प्रेक्षकाला दोन घटका करमणूक देण्यासाठी असतो आणि मसाला फॉर्म्युला त्यासाठी पुरेसा आहे. त्यासाठी लेखकाची गरज नाही. मला तरी नाहीच नाही!"
राजेश म्हणाला, "अहो तुम्ही फॉर्म्युला सांगणार होतात ना! सांगा ना एखादा फॉर्म्युला आम्हाला!"
छब्बीसिया सांगू लागला, "समजा रोमँटिक मुव्ही घेऊ! एक हिरो घ्यायचा एक हिरोईन घ्यायची! मग त्यांची भेट एखाद्या परदेशातल्या एका सुंदर नयनरम्य ठिकाणी घडवायची. चार पाच नाचगाणी. रुसवे फुगवे. तिथल्या एखाद्या पब, डिस्को किंवा क्लबमध्ये एकादे सेक्सी आयटम सॉंग टाकायचे. वर आम्ही सेन्सॉरला असे म्हणायला मोकळे की हे अंगप्रदर्शन किंवा सेक्सी नंगा नाच जास्त वाटत असला तरी ते परदेशात घडतंय, आपल्या भारतात थोडंच घडतंय! आणि मग हिरोईनचे वडील तिच्या मर्जीविरुद्ध लग्न लावून देतात. मग त्या नियोजित वराच्या ओढून ताणून वाईट सवयी दाखवायच्या आणि मग हिरो ते उघडकीस आणतो आणि मग थोडी मारामारी आणि मग हॅपी एंडिंग! माझा पिक्चर "दुल्हन हमारी हिंदुस्तानी" बघितला ना तुम्ही??"
काही जणांनी टाळ्या वाजवल्या. दरम्यान राजेशने त्याच्या टीम मधल्या गावाकडील एका मेम्बरला एसेमेस केला आणि प्रोग्रॅम मध्ये कॉल करायला सांगितले. तो मेम्बर काय ते बरोबर समजला.
छब्बीसिया पुढे म्हणाला, "हा होता रोमँटिक चित्रपटाचा एक फॉर्म्युला. तसेच ऍक्शन चित्रपटाचाही माझा एक फॉर्म्युला आहे. मी जवळपास सत्तर ऐशी मोडक्या तोडक्या गाड्या गैरेज मधून विकत घेतो आणि चित्रपटभर त्या गाड्या बॉम्बने उडवत राहातो! गाड्यांचे पाठलाग, ऍक्सिडेंट करत राहातो, गाड्या तोडतो फोडतो. प्रेक्षकांना आवडतं! मी लहानपणी माझ्या स्वतःच्या आणि मित्रांच्या खेळण्यातल्या कार तोडून टाकायचो, दिवाळीत गाड्या सुतळी बॉम्बला बांधून त्यांना फोडून ब्लास्ट करून टाकायचो तेव्हाच माझे एक बॉलिवूडमधले काका बोलले होते की हा मोठा झाल्यावर नक्की एक मोठ्ठा ऍक्शन डायरेक्टर किंवा प्रोड्युसर होणार! खि खि खि!"
पब्लिकपण हसायला लागली. राजेश त्याला म्हणाला, "वा! तुमचे फॉर्मुले आणि तुमचा सेन्स ऑफ ह्युमर छानच आहे की! तुम्ही आता एखादा कॉमेडी मुव्हीपण बनवायला हवा! मग त्याचाही फोर्मुला बनवायला हवा! मी तुमच्या या मताशी सहमत आहे की प्रेक्षकाला दोन घटका करमणूक हवी असते पण मी या मुद्द्याशी सहमत नाही की लेखकाची गरजच नसते. मुळात तुमचे हे जे फॉर्मुले आहेत ते कोठून आलेत? ते तुमचे स्वतःचे नाहीत. एखाद्या लेखकाची एखादी कादंबरी हिट होते त्यावर पिक्चर बनतो आणि मग त्याची कॉपी करून तसे अनेक पिक्चर बनतात आणि मग त्याचा फॉर्म्युला होतो. म्हणजे त्याचे श्रेय लेखकालाच जाते शेवटी! अर्थात असेही असेल की एखादा दिग्दर्शक मुळातच एक प्रतिभावान लेखक किंवा संवाद लेखक असू शकतो. असा योग म्हणजे दुग्धशर्करा योग्य किंवा सोने पे सुहागा म्हणावा लागेल! पण विजय शेवटी लेखकाचाच!"
तेवढ्यात फोन वाजला.
"आपल्याला भारतातील एका प्रेक्षकाकडून फोन आलाय. आपण तो फोन घेऊया, हॅलो?"
"हॅलो, मी एक सामान्य सिनेमा रसिक बोलतोय. माझे नाव जय भोसले! मी केव्हापासून तुमची चर्चा बघतोय, ऐकतोय. मला काहीतरी सांगायचं आहे. मी जे सांगणार ते माझं आणि माझ्या अनेक मित्राचं मत आहे!"
"सांगा जय आपले मत! आम्ही सगळे ऐकायला उत्सुक आहोत!"
"तर मी काय म्हणत होतो की छब्बीसिया साहेबांची गाड्यांची तोडफोड आम्हाला आवडत नाही. आपल्या देशात लय गरिबी आहे. नुसत्या मनोरंजनासाठी गाड्या तोडफोड कशापायी करायच्या? त्यापेक्षा गरिबाला एकवेळ भाकर दिली तर तो दुवा देईल. आणि आमाला लेखकाशिवाय पिक्चर सहन होत नाही. पिक्चरला लेखक पायजेलच पायजेल! आणि एखादाच फॉर्म्युला एकदाच फक्त हिट होतो पण नंतर फ्लॉप होतात. त्या के. के. सुमनवर आम्हाला लय डाऊट येतो राव! इतके सगळे पिक्चर तो स्वतःच लिहितो आणि डायरेक्ट पण करतो? शक्य वाटत नाही राव. सुमन एवढाss हुशार आहे हे त्याच्या एकंदरीत अवतारावरून वाटत नाय!" आणि फोन कट झाला. प्रेक्षकांत एकच हशा पिकला आणि सुमन अस्वस्थ झाला. राजेश मनातून आनंदला....
सगळी चर्चा सॉलिड इंटरेस्टिंग होत चालली होती पण डोळ्यांवर आता झोपेचा अंमल येत चालला होता त्यामुळे सुप्रियाने टीव्ही बंद करून टाकला मात्र सुबोधकडे बेडरूमकडे जातांना तिच्या मनात थोड्या वेळाकरता राजेशबद्दल विचार येऊन गेले, "राजेशच्या मनात काहीतरी नक्की वेगळे आहे. काहीतरी आहे ज्यासाठी तो धडपडतोय! राजेशचे इतर प्रोग्राम सुद्धा बघितले पाहिजेत. तो नक्की काहीतरी वेगळे करेल असं एकंदरीत वाटतंय! अगदी राजेशच्या पुन्हा प्रेमात पडावेसे वाटते आहे! छे! सुप्रिया! काय हे!" असे म्हणून तिने सुबोधला मागून येऊन मिठी मारली...
yyyy