Get it on Google Play
Download on the App Store

वलय - प्रकरण २

आता संध्याकाळ झाली होती. स्टुडीओतील सर्वांनी सर्वांनी एकमेकांना निरोप दिला आणि जायला निघाले. सीरियल मधील सून म्हणजे सुप्रिया सोंगाटे आणि त्या सीरियलचा लेखक तसेच टीव्ही आणि फिल्म्स पत्रकार राजेश पारंबे हे दोघेसुद्धा घरी जायला निघाले.

राजेश टीव्ही सिरियल्ससाठी संपूर्ण ब्रॉड (विस्तारित) कथा लिहायचा. मग प्रत्येक एपिसोड्स साठी कथेनुसार स्वतंत्रपणे पुन्हा स्क्रीप्ट लिहायचा. तसेच तो फ्री लान्स फिल्म जर्नालीस्ट म्हणून सुद्धा काम करत होता. त्याने जर्नालिझमचा डिप्लोमा आणि सिनेमा लेखनासंदर्भात कोर्स केला होता. पण लेखनाची उर्मी आणि कला त्याच्या अंगी उपजतच होती. अगदी लहानपणापासून त्याने स्वतःमधली ही प्रतिभा ओळखली होती, पण एक दोनदा विश्वासघाताचे धक्के पचवून!  

त्याचा टीव्ही आणि फिल्म जगतावरचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत असलेला ब्लॉग ("फिल्मी फायर") वाचणारे लाखो लोक होते. तो ब्लॉगवर जास्त करून फिल्म रिव्ह्यू (चित्रपट परिक्षण) लिहायचा. त्याचा रिव्ह्यू वाचून मगच चित्रपट बघायला जायचे की नाही हे ठरवणारी पब्लिक लाखोंमध्ये होती. त्याला टिव्ही सोबतच बॉलीवूड मध्ये ही लेखन करायची इच्छा होती. जमल्यास हॉलीवूड सुद्धा! मोठी स्वप्नं बघायला काय हरकत आहे असे त्याने मनाशी ठरवले होते. अजून बरीच मजल गाठायची बाकी होती. इतके काम करूनही ही तर अजून एका अर्थाने फक्त सुरुवातच होती. या क्षेत्रातल्या लेखकांसाठी आणि पत्रकारांसाठी काहीतरी भरीव काम आणि मदत करायची हे त्याने ठरवले होते आणि अर्थातच त्याच्या या महत्वाकांक्षेच्या मागे त्याचे एक महत्वाचे व्यक्तिगत कारणही जबाबदार होते!

राजेशने आज सुप्रियाच्या आवडीचा 'लाईट ग्रीन' तर सुप्रियाने राजेशच्या आवडीचा 'व्हाईट' पोशाख केला होता. पांढऱ्याशुभ्र कपड्यांत सुप्रिया राजेशला आवडायची आणि हिरवट कपड्यांत राजेश तिला आवडायचा. राजेश उजव्या हाताच्या मनगटात एक कडे घालायचा आणि उजव्या हातांच्या तर्जनीत डायमंड्सची व्हाईट अंगठी घालायचा. त्याची अंगकाठी साधारण पण आकर्षक होती. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही! राजेश बारीक मिशी ठेवत असे. त्याचे केस कुरळे होते. हसतांना राजेशच्या गालावर नेहमी खळी पडायची. त्याच्या चेहऱ्यावर सतत असणाऱ्या स्मितहास्याची आणि गालावरील खळीची सुप्रिया जणू दिवाणीच झाली होती!

सुप्रियाचा चेहरा गोल होता आणि केस लांब होते. हसली की तिच्यासुद्धा गालावर खळी पडत असे. तिचा चेहरा भारतीय परंपरेनुसार रूढ असलेल्या अर्थाने सुंदर होता आणि शरीर पूर्णपणे प्रमाणबद्ध होते. पण एकूणच तिचे व्यक्तिमत्त्व असे होते की तिला सोज्वळ किंवा घरेलू सून, आज्ञाधारक मुलगी किंवा साडीतली पत्नी अशाच भूमिका सीरियल मध्ये मिळायच्या. सध्या ती हीच एक मराठी सीरियल करत होती. बाकी दोन सिरियल्स संपल्या होत्या. पूर्वी तिने पुण्यात "सनम तू माझा" या नाटकात काम केले होते. ते नाटक  चांगले यशस्वी झाले होते. त्यानंतर तिच्या वडिलांनी खुश होऊन तिला कार घेऊन दिली होती. तिचे वडील पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलरी व्यापारी होते. त्यांनी तिला तिच्या आवडीचे करियर करायला मोकळीक दिलेली होती. मग तिला पुढे मराठी चित्रपटात छोटे रोल्स आणि मग मराठी सिरियल्स मिळाल्या. मुंबईतील प्रसिद्ध "मॅडम अॅकॅडमी" मध्ये ती रीतसर कोर्सेस सुद्धा करत होतीच आणि आता तिचे हे शेवटचे वर्ष होते.

सुप्रिया राजेशवर प्रेम करत होती. तसे तिने त्याला बोलून दाखवले नव्हते पण तिला मनातून विश्वास होता की राजेशचेही तिच्यावर प्रेम आहेच आणि वेळ आली की ते ती व्यक्त करणार होतीच! राजेशबद्दल तिने घरच्यांना कल्पना दिली होती, पण एक मित्र म्हणून! दोघांना एकमेकांना भेटल्याशिवाय किंवा फोनवर बोलल्याशिवाय करमत नव्हते हे मात्र खरे! त्यापलीकडे ते अजून गेले नव्हते! सध्या तरी ते दोघे करियरवर लक्ष केंद्रित करत होते! सुप्रियाची राजेशशी या सीरियलच्या निमित्ताने ओळख झाली होती आणि नंतर अगदी कमी वेळेत त्याचे एका गाढ मैत्रीत रुपांतर झाले होते! सुप्रिया आणि राजेश बोरिवलीला राहत होते. राजेश एका अपार्टमेंट मध्ये भाड्याच्या रूमवर तर सुप्रिया हॉस्टेलवर!

सुप्रिया, "राजेश तू कसा जाणार घरी? मी सोडू का तुला साटमनगरला?"

राजेश, "नको, मला ड्राॅप केल्यावर तुला पुन्हा बरेच मागे सिद्धिविनायकनगरला यावे लागेल! मी जाईन आपला बसने नाहीतर टॅक्सीने!"

सुप्रिया, "नाही रे. चल. सोडते तुला. चल बस गाडीत!"

पाठीवरची सॅक मागच्या सीटवर टाकत राजेश सुप्रियाच्या बाजूला पुढे बसला. सुप्रियाने गाडी स्टार्ट केली. आता त्यांची गाडी ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावर आली.

सुप्रिया, "तुला सहन कसं होतं रे हे सगळं? तू पूर्णपणे शांत बसून होतास सगळे एपिसोड बघताना! तू लिहितोस एक आणि ते त्यात बदल करून दाखवतात काहितरी दुसरेच?"

राजेश वैतागून म्हणाला, "नाही सहन होत हे सगळं मला! हे डेली सोप च्या नावाने हे जे चाल्लंय ना, ते नाही सहन होत, सुप्रिया! पण तरीही त्या सीरियलसाठी लेखन करतोय मी! मन मारून! कारण, या इंडस्ट्रीत लेखक म्हणून तसे पहिले तर ही माझी फक्त सुरुवात आहे असे मी मानतो कारण मला आजून बरीच मजल गाठायची आहे! आणि काही वेळेस मला चाॅईस नसणार आहे हे मला माहीत आहे. जे मिळेल त्यासाठी लेखन करावं लागणार आहे."

सुप्रिया, "हां. तेही खरंच आहे म्हणा. तुला सांगते आणि मी तरी काय करतेय? तेच करतेय! तेच नेहमीचे सुनेचे रोल! सुरुवातीला तडजोड करावीच लागते या क्षेत्रात. कोण कशाची आणि कशाशी तडजोड करेल हे मात्र सांगता येत नाही. नाही का?"

राजेश, "हां, पण एक नक्की! मी जी महत्त्वाकांक्षा बाळगून आहे, ती मी नक्की पूर्ण करणार. पण अजून वेळ लागेल त्याला हे मला माहिती आहे. येणारा काळच सांगेल ते! त्या महत्वाकांक्षेसाठी मी काहीही करायला तयार आहे!"

बराच वेळ ते बोलत होते. सुप्रियाच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. तो नेमक्या कोणत्या महत्वाकांक्षेबद्द्ल बोलतोय हे सुप्रियाला नक्की माहित नव्हतं.

ती विचार करत होती, "याच्या मनात मी असेन का? हा माझ्यावर प्रेम करत असेल का?"

साटमनगर आल्यावर सुप्रिया म्हणाली, "आलं तुझं साटम नगर. चल बाय! काळजी घे."

सॅक पाठीवर घेऊन राजेश कारमधून उतरला. सुप्रियाला थँक्स म्हणून तो जायला निघाला. ती पुन्हा माघारी वळली.

राजेश त्याच्या "गीता अपार्टमेंट" जवळ पोचला आणि त्याने लेटर बाॅक्स चेक केला. त्यात काहीही नव्हते! मग लिफ्टचे बटण दाबले. लिफ्ट आली! त्यात ओळखीचे दोन जण होते. त्यांच्याशी 'हाय हॅलो' झाले. तो तिसऱ्या मजल्यावर राहत होता. एकटा. भाड्याने! तिसरा मजला आला. तो लिफ्ट मधून बाहेर आला. त्याचा फ्लॅट नं 309 चाबी ने उघडला. आत जाऊन फ्रेश झाला. मग सोफ्यावर बसला. बसल्या बसल्या त्याला थकव्याने झोप लागली!

त्याला रात्री नऊ वाजता जाग आली. त्याने फ्लॅटचा दरवाजा उघडून बाहेर बघितले. जेवणाचा डबा आलेला होता. डबा उचलून तो दार बंद करून आतमध्ये आला. टेबलावर पेपर आंथरून त्यावर त्याने डबा उघडला. भाजणीचे थालीपीठ, दही, रस्सा, कैरीचे लोणचे आणि खिचडी असा त्याचा आवडीचा मेनू त्याने मुद्दाम आज फोन करून बनवायला सांगितला होता. पाण्याची बाटली जवळ ठेवून तो थालीपीठ खाऊ लागला. फक्त रात्रीचा टिफिन त्याने लावला होता. दिवसा इतर ठिकाणी तो जेवण करून घ्यायचा. जेवण सुरू करता करता रिमोटने त्याने टीव्ही सुरु केला.

"बूम" या टीव्ही चॅनेलवर बॉलीवूड न्यूज सुरू होत्या!  प्रसिद्ध इंग्रजी लेखक "केतन सहानी" यांची कथा असलेल्या "चार चतुर" या सुपरहिट हिंदी चित्रपटाच्या यशाची पार्टी सुरू होती. मात्र त्यात डायरेक्टर आणि लेखक यांची वादावादी सुरू झाली कारण, डायरेक्टरने लेखकाच्या कादंबरीवर चित्रपट बनवून सुद्धा त्याचे श्रेय लेखकाला चित्रपटातल्या श्रेयनामावलीत बिलकूल दिले नव्हते. उलट, लेखक म्हणून डायरेक्टरने स्वत:चे नाव दिले होते. दोन तीन वेळा फोनवर दाद न दिल्याने त्या लेखकाने पार्टीतच लोकांसमोर आणि पत्रकारांसमोर डायरेक्टरवर अचानक आरोप करण्याची संधी साधली. त्याच्या कादंबरीवर हा पहिलाच चित्रपट होता. जरी या डायरेक्टरने केतनला प्रथमच ब्रेक दिला होता याचा अर्थ त्याचे लेखनाचे क्रेडिट स्वत:कडे घेण्याची मुभा थोडेच त्याला प्राप्त झाली होती? पण कोणत्याही क्षेत्रातील प्रस्थापितांविरोधात नवोदितांना लढा देतांना खूप त्रास होतोच! राजेशने टीव्ही बंद केला. त्याचा मूड खराब झाला होता.

त्याच्या रुममध्ये त्याचे पुस्तकांचे एक मोठे कपाट होते. त्याला वाचनाची खूप आवड होती. त्या कपाटात राजेशचे लिखाण असलेली एक लाल रंगाची फाईल मुद्दाम सहज दिसेल अशी ठेवलेली होती.  त्याकडे बघत तो विचार करू लागला - "या टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत लेखकांचे शोषण कधी थांबणार? मी यासाठी संघर्ष करणार आहे. नाकी नऊ आणणार मी सगळ्यांच्या! पण, थांबा लेकांनो! अजून योग्य वेळ आली नाही. एक दिवस माझा येईल आणि सगळ्या लेखकांचा सुद्धा! माझी गावाकडे जाण्याची वेळ पण लवकरच येईल असे दिसते आहे!"

वलय (कादंबरी)

Nimish Navneet Sonar
Chapters
लेखकाचे मनोगत सिद्धेश प्रभूगांवकर यांची प्रस्तावना वलय - प्रकरण १ वलय - प्रकरण २ वलय - प्रकरण ३ वलय - प्रकरण ४ वलय - प्रकरण ५ वलय - प्रकरण ६ वलय - प्रकरण ७ वलय - प्रकरण ८ वलय - प्रकरण ९ वलय - प्रकरण १० वलय - प्रकरण ११ वलय - प्रकरण १२ वलय - प्रकरण १३ वलय - प्रकरण १४ वलय - प्रकरण १५ वलय - प्रकरण १६ वलय - प्रकरण १७ वलय - प्रकरण १८ वलय - प्रकरण १९ वलय - प्रकरण २० वलय - प्रकरण २१ वलय - प्रकरण २२/२३ वलय - प्रकरण २४ वलय - प्रकरण २५ वलय - प्रकरण २६ वलय - प्रकरण २७ वलय - प्रकरण २८ वलय - प्रकरण २९ वलय - प्रकरण ३० वलय - प्रकरण ३१ वलय - प्रकरण ३२ वलय - प्रकरण ३३ वलय - प्रकरण ३४ वलय - प्रकरण ३५ वलय - प्रकरण ३६ वलय - प्रकरण ३७ वलय - प्रकरण ३८ वलय - प्रकरण ३९ वलय - प्रकरण ४० वलय - प्रकरण ४१ वलय - प्रकरण ४२ वलय - प्रकरण ४३ वलय - प्रकरण ४४ वलय - प्रकरण ४५ वलय - प्रकरण ४६ वलय - प्रकरण ४७ वलय - प्रकरण ४८ वलय - प्रकरण ४९ वलय - प्रकरण ५० वलय - प्रकरण ५१ वलय - प्रकरण शेवटचे (५२) लेखकाची साहित्यिक ओळख