वलय - प्रकरण १९
बस ड्राइवरने अचानक जोरात ब्रेक दाबल्याने राजेशची तंद्री भंग पावली. बसमध्ये बाजूच्या सीटवरचा रा. म. मालवणकर यांचे "जीवनाचे शिल्पवृक्ष" हे पुस्तक वाचणारा आधीच्या स्टँडवर केव्हाच उतरून गेला होता. धर्मापूरला जाऊन तो जे करणार होता त्याद्वारे त्याच्या प्रतिशोधाच्या शोधार्थ एक पाऊल तो टाकणार होता.
धर्मापूरच्या "धर्म वार्ता" या वृत्तपत्र कार्यालयात तो पोहोचला. तेथील संपादक त्याचे मित्रच झाले होते. धर्मापूरच्या समस्यांवर संवादात्मक पद्धतीने लिखाणातून भाष्य करून त्याने जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यानंतर कालांतराने त्याने चित्रपट परीक्षण लिहायला सुरुवात केली होती.
के. के. सुमनचे चित्रपट आले की त्याबद्दल तो मानधन न घेता आवर्जून आणि हटकून परीक्षण लिहायचा आणि त्याच्या चित्रपटाला फक्त अर्धा किंवा एकच स्टार रेटिंग द्यायचा. त्याच्या ब्लॉगवर सुद्धा त्याने के के सुमनच्या चित्रपटांची लिहून लिहून वाट लावली होती.
त्या वृत्तपत्राच्या संपादकाना भेटून त्याने खाली दिलेली विशेष जाहिरात छापायला दिली आणि त्यांचा निरोप घेऊन तो निघाला. संपादकांनी ती जाहिरात तो म्हणेल तितके दिवस आणि तेही विनामूल्य छापायचे ठरवले. त्यामागची राजेशची काय भावना आणि उद्देश्य आहे हे पूर्णपणे नाही तरी थोडीफार कल्पना त्याना आली होती. राजेशला बेस्ट लक देऊन त्यांनी गप्पा मारल्या आणि त्याला निरोप दिला. ते संपादक कलेची कदर करणारे होते.
ती जाहिरात अशी होती: "संसार संभाळून पार्ट टाईम मनोरंजन क्षेत्रात काम करू इच्छिणारे हौशी छंदिष्ट, सृजनशील, आणि कलाप्रेमींनी (स्त्री पुरुष) यांनी खालील पत्त्यावर भेटावे. एका अभिनव मोहिमेसाठी काम करण्याची सुवर्णसंधी! मोबदल्यात जास्त पैसे मिळणार नाहीत (आधीच सांगून ठेवतो) पण कलेच्या अभिव्यक्तीचे मानसिक समाधान जरूर मिळेल आणि आपण एका महत्वाच्या मोहिमेत आजीवन सहभागी झालो आहोत याचा गर्व आणि अभिमान वाटल्याशिवाय रहाणार नाही. तुमच्यात कोणतीही कला असो - लेखनकला, चित्रकला, संवादकला, टीका करण्याचे कसब, वाईट गोष्टी चांगल्या कामांसाठी वापरण्याची कला या प्रकारे काहीही असो, तुमचे येथे स्वागत आहे! पुढे नंतर मनायोग्य व्यासपीठ मिळू शकते त्यानंतर मात्र तुम्हाला अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता नाकारता नाही! मला प्रथम कॉल करा आणि मग भेटायची वेळ ठरवू! तुमचा बायोडटा माझ्या ईमेल आयडीवर पाठवा. मोहिमेसाठी तुमच्या सृजनशील कल्पनांच्या प्रतीक्षेत! तुम्ही माझी मोहीम यशस्वी करा, मी तुमची स्वप्ने पूर्ण करीन! प्रॉमिस!"
त्यानंतर चार पाच दिवस असेच गेले. गोडंबे काका आणि सुनंदा यांचे येणेसुद्धा लांबले. तसा त्याच्या आईला फोन आला होता. तेवढा सुटकेचा निश्वास राजेशने टाकला. जाहिरात देऊन आठ दिवस झाले होते पण अजून एकही फोन आला नव्हता. दोन कॉल्स आले खरे पण राजेशने उचलले नाहीत. ते जितेंद्र करमरकरचे कॉल्स होते. पण जितेंद्रने सहज कॉल केला असेल म्हणून राजेशने दुर्लक्ष केले. जितेंद्रनेही पुन्हा त्याला कॉल केला नाही. राजेशला कल्पना नव्हती की सुप्रियाने ती सिरीयल सोडली. कळले असते तरी तो तिला थांबवू शकला असता का? त्याचा कॉल तिने घेतला असता का?
बरोबर दहा दिवसानंतर तो फोन आला, "तुमची जाहिरात वाचली मी. तुम्हाला भेटायचे आहे. कुठे भेटायचे?"
ह्या एका बहुप्रतीक्षित फोन कॉल नंतर मग एकसारखे फोन कॉल्स सुरु झाले. साधारण दहा जणांचा कॉल आल्यानंतर त्याने सगळ्यांच्या सोयीनुसार एक दिवस आणि वेळ ठरवली. भेटायचे ठिकाण राजेशने निवडले होते ते म्हणजे - शाळेतली टीचर्स रूम, जेथे त्याने लिहिलेले लहानपणी त्याचे नाटक त्याच्या शिक्षकांकडे सुपूर्त केले होते. त्याला मिळालेल्या पहिल्या विश्वासघाताची खूण होती ते ठिकाण म्हणजे! शाळेतल्या ओळखीमुळे त्याला ती रूम शाळा सुटल्यानंतर पर्सनल वापरासाठी मिळाली कारण आज सकाळची शाळा होती. मात्र तेथे आता टीचर्स रूम नसून स्पोर्ट्स साहित्य ठेवण्याची ती खोली बनली होती आणि तिला बाहेरून वेगळा प्रवेश होता. त्याचे नाटक चोरून स्वतःच्या नावावर खपवणारे ते शिक्षक मात्र आता त्या शाळेत नव्हते. त्यांची बदली झाल्याचे त्याने नंतर ऐकले होते. मात्र कोणत्या गावाला हे त्याला कळले नाही.
संध्याकाळी चार वाजेपासून तर सात वाजेपर्यंत त्यांच्यातील चर्चा चालली. राजेशचे समजावून सांगण्याचे कसब जबरदस्त होते. कथेत तो जशी संवादातून योग्य शब्दयोजना करीत असे तसेच प्रत्यक्ष जीवनात संवाद कौशल्यात सुद्धा तो योग्य शब्दयोजना करे आणि समोरच्यावर प्रभाव टाके. त्याला अपेक्षित असलेले असे ते सगळे जण होते. त्यापैकी चारजण (दोन पुरुष दोन महिला) विवाहित तर इतर सहाजण (सगळे पुरुष) अविवाहित होते. त्यांना राजेशने व्यवस्थित मोहीम समजावून सांगितली. काहींना सुरुवातीला शंका आली पण नंतर त्यांना विश्वास बसला.
राजेशने मोहिमेचे सगळेच पत्ते सुरुवातीला त्यांच्यासमोर उघड केले नाहीत. त्या टीम मधला एक लीडर त्याने नेमला - सारंग सोमय्या.
रात्रीचे डिनर राजेशतर्फे हॉटेलमध्ये केल्यावर ते सगळे आपापल्या गावी निघाले. घरी गेल्यावर घरच्यांना तोंड कसे द्यायचे तो त्यांचा प्रश्न होता. मोहिमेतले किती आणि काय कोणाकोणाला सांगायचे किंवा नाही याबद्दल राजेशने नियम आखून दिले होते. ते सगळ्यांना पाळायचे होते. सगळ्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी राजेशने घेतले. काहींचा बायोडाटा आधीच राजेशला ईमेलने मिळाला होता, ज्यांचा मिळाला नाही त्यांचा त्याने आता मागून घेतला किंवा नंतर इमेलवर पाठवायला सांगितला. प्रत्येकाचे मनोरंजन क्षेत्रातील पॅशन, इच्छा आणि स्वप्न काय काय आहेत ते त्याने जाणून घेतले. सगळे लिहून घेतले. आता ते सगळेजण वेळोवेळी राजेशच्या आदेशाची वाट बघणार होते. मुद्रेवर एक विजयी भाव ठेऊन तो घरी परतला. कामानिमित्त बाहेर गेलो होतो एवढेच त्याने आईला सांगितले होते. कारण सांगितले असते तरी तिला त्यातले जास्त काही कळलेच नसते.
त्यानंतर दोन दिवस गेले आणि गोडंबे काकांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा राजेशच्या आईला फोन आला. घडलेली घटना अकस्मात आणि दुर्दैवी होती. कुठलाही घातपात नव्हता. जे घडले ते सगळे अचानक योगायोगाने घडले याबद्दल सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती. राजेश आणि त्याची आई तातडीने ‘धोरणा’ या गावाला गेले. सुनंदाला भाऊ नव्हता. सुनंदा पुरती कोलमडली होती. शोकाकुल वातावरणात आठ दिवस गेले. सगळे अंतिम संस्कार पार पडल्यानंतर गोडंबे काकूंनी राजेशच्या आईला वचनाची आठवण करून दिली. राजेशच्या आईने सुनंदासाठी फिल्डिंग रचलेली होती पण ही एक घटना राजेशला अचानक क्लीन बोल्ड करून गेली. महिनाभरातच साखरपुडा आणि लग्न करायचे ठरले. तशी गोडंबे काकांचीच इच्छा होती म्हणे! सुनंदाच्या वडिलांचा बंगला आणि इतर बरीच संपत्ती तिच्या आणि राजेशच्या नावावर झाली होती. राजेशच्या आईचे सुनंदाचा तगादा मागे लावण्याचे हे सुद्धा एक सबळ कारण होते.
लहानपणापासून ओळखत असलेल्या परंतु एकमेकांचा "त्या" अर्थाने पूर्ण परिचय नसलेल्या अशा दोन जीवांचे लग्न झाले. राजेशचा मुक्काम दोन महिने लांबला. पहिली रात्र काय आणि दुसरी तिसरी काय त्या दोघांनी अजून अनुभवलीच नव्हती कारण सुनंदा सतत वडिलांच्या जाण्याच्या दु:खात बुडालेली आणि दडपणाखाली होती. लग्नानंतरचे बहुतेक दिवस ती माहेरीच होती. आता शहरात गेल्यावरच जो काय त्यांचा संसार होता तो सुरु होणार होता! काही नाती जपली जातात तर काही जपावी लागतात, तसेच काही नाती जोडावी लागतात तर काही जोडली जातात. आता जे जोडलं गेलेलं नातं टिकेल की टिकवावं लागेल हे काळच ठरवणार होता!!