Android app on Google Play

 

स्वागत नव्या पुस्तकांचे २

 


'आपली नाती'

मानवी नाती आणि त्या प्रत्येक नात्यांवर कविता हा एक अफलातून विषय आहे. कवी आबासाहेब सूर्यवंशी हे नवीन - नवीन कल्पना करण्यात नेहमीच तरबेज असतात. मी त्यांना जवळ - जवळ पंचवीस वर्षापासून जवळून ओळखतो. शिक्षण खात्यात अधिकारी पदावर काम करतांना, रुक्ष अशा विषयात ही त्यांनी गोडवा आणून तो शिक्षकांना पटवून दिला. आम्ही, म्हणजेच मी स्वतः, श्री. सर्जेराव जाधव - सध्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) व श्री आबासाहेब सूर्यवंशी - तत्कालीन अधिव्याख्याता, डायट सिंधुदुर्ग असे सिंधुदुर्ग जिल्हयात कसाल या ठिकाणी एका खोलीत एकत्र रहायचो. त्यामुळे एकमेकांमधील गुण दोषासह आमचे मैत्रीत रुपांतर झाले. आबासाहेब सूर्यवंशी हे संगीत क्षेत्रात व साहित्य क्षेत्रात निपुण असलेचे आम्हांला त्याचवेळी जाणवले होते. कष्टाळू व नम्र असा स्वभाव असलेले हे कवी मनाचे अधिकारी म्हणजे आमच्या डायट (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) चे एक प्रकारचे हलते बोलते झाड होते. हार्मोनियम वादन व गायन त्यांना अवगत असलेने डी. एड. च्या विद्यार्थ्यांमध्ये ते आवडते अधिकारी होते.

 'आपली नाती' हा त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे एक अभिनव अशी नवकल्पना आहे. प्रत्येक माणूस नात्यांच्या बंधनात असल्यानेच एक सुजान नागरिक, सुसंस्कृत माणूस म्हणून कुटुंबात, समाजात स्वतःला सादर करतो. कर्तव्य करायला भाग पाडणारी आई-वडिलांची नाती, लहान मोठयांची जाणीव करून देणारी भावा-बहिणींची नाती, मजा, करमणूक, चेष्टा जोपासणारी मेव्हणा-मेव्हणीची नाती असे किती तरी कंगोरे या नात्यांना आहेत. प्रत्येक नात्यांची एकमेकांविषयीची कर्तव्ये ही थोडीफार भिन्न स्वरुपाची असली तरी 'प्रेम' हे सर्वसमान कर्तव्य प्रत्येक नात्याला जखडून ठेवते.

आबासाहेब सूर्यवंशी हे एक भावनाप्रधान व्यक्तिमत्व असलेने कदाचित 'आपली नाती' हा कौटुंबिक व भावपूर्ण विषय त्यांना सुचला असावा. त्यांचा हा काव्यसंग्रह अनेक वाचकांच्या हाती पडून सर्वांनी सर्व कविता वाचून समाजात नात्याविषयीचा आदर भाव वाढेल अशी मनोकामना करून मी कवी आबासाहेब सूर्यवंशी यांच्या 'आपली नाती' या काव्यसंग्रहासाठीची प्रस्तावना थांबवितो. धन्यवाद!

- महावीर माने
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

शुभेच्छा संदेश…

माझे सन्माननीय सन्मित्र श्री. आबासाहेब सूर्यवंशी, निवृत्त शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांना त्यांच्या 'आपली नाती' या प्रथम काव्यसंग्रहाला शब्दरुपी पुष्पांचा शुभेच्छा गुच्छ देतांना मला मनस्वी आनंद वाटत आहे.

'जे देखे कवी ते न देखे रवी' या उक्ती प्रमाणे कविता, काव्य, काव्यसंग्रह हा साहित्य रसिकांचा खास प्रांत आहे. या प्रांतात उदंड साहित्य निर्मिती झाली आहे. केवळ एकेका काव्यपंक्तीमुळे, एकेका वाक्यामुळे वा एकेका काव्यसंग्रहामुळे अनेक कवी अजरामर होवून साहित्य प्रांतात ध्रुवाप्रमाणे अढळपद मिळवून बसले आहेत. पण या सर्व काव्याहून एक वेगळाच विषय प्रस्तुतच्या कवींनी हाताळला आहे. म्हणून ते सर्वांच्याच अभिनंदनास पात्र ठरले आहेत.

सर्वच जण मान्य करतील की, एकाच काव्य संग्रहात एवढ्या जवळ जवळ कौटुंबिक सर्व नात्यांचा उहापोह एकत्रितरित्या माझ्या माहितीप्रमाणे आजवर झालेला नाही व पुढेही होईल की नाही या बद्दल बोलता येणार नाही. म्हणजे आपण अगदी खात्रीलायकरित्या ठामपणे म्हणू शकतो की, विषय निवडीच्या बाबतीत हा कवितासंग्रह अजोड आहे. असा विषय गेल्या, शतकात नव्हे तर केव्हाच हाताळला गेलेलाच नाही असे मला वाटते. यावरून या कवितासंग्रहाचे महत्व काव्य रसिकांच्या निश्चितच लक्षात येईल.

या काव्यसंग्रहास आपली नाती असे नांव कवीने दिले आहे. पण मला असे वाटते त्या पेक्षा 'उत्सव नात्यांचा' हे शीर्षक अधिक शोभून दिसले असते. माझ्या या विचारामागे 'भारतीय संस्कृती' चा मोठा डौलदार फुललेला पिसारा दृष्टीसमोर येतो.

भारतीय कुटुंब व्यवस्था हा भारतात अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून; याचा विचार व अभ्यास जगभरच्या तत्वचिंतकांना, विचारवंताना, समाजधुरीणांना, राजकारण्यांना व या अनुषंगाने साहित्यीकांना व कलावंताना  भविष्यात करावा लागणार आहे.  कारण मानवी जीवन मानवाच्या सानिध्यात फळतं, फुलतं व बहराला येतं. साधू संतानी, धर्माच्या अभ्यासकांनी दान, त्याग, परोपकार, सत्य, अहिंसा इत्यादी अनेक मानवी मूल्यांचा अकटोविकटो प्रचार केला तरी ही सर्व मूल्ये जन्मतः पाळावीच लागतात, नव्हे काही विशिष्ट व्यक्ती समूहात या नीती मूल्यांना डावलून मानव चालूच शकत नाही व जगूच शकत नाही. म्हणजेच या मानवी समूहात ही सर्व नितीमूल्ये निसर्गतःच वा आपोआपच जोपासली जातात आणि हा मानवी समूह नात्यांच्या समूह होय. माणूस जास्तीत जास्त आनंदी असतो, बनतो तो या मानवी समुहातच. अर्थातच या नाते संबंधातच. या सर्व नाते संबंधास एक फार चांगला शब्द आहे आणि तो म्हणजे 'गोतावळा'.

गोतावळ्यात म्हणजेच नात्यांच्या गोफात माणूस जास्तीत जास्त रमतो, सुखावतो नव्हे नात्याविना माणसाच्या जीवनात अर्थच राहणार नाही.

नात्याप्रमाणेच जीवन, मृत्यू, देश, गुरु, शेजार इत्यादी बरोबर सुद्धा मानवाचे अतूट नाते असते.  त्या दृष्टीने भाग २ मधील कविता फारच बहारदार व अर्थपूर्ण झाल्या आहेत. आणि प्रेमाशिवाय तर माणूस जगूच शकत नाही. प्रेम नात्यांच्या कविता तीनच आहेत पण 'घागर मे सागर' ही उक्ती या तीनच कवितांच्या मधून प्रत्यास येते.

वरील सर्व गोष्टी पाहता श्री. आबासाहेब सूर्यवंशी यांचा 'आपली नाती' हा पहिला काव्यसंग्रह असला तरी अभिनंदनीय आहे. या काव्य संग्रहास खूप खूप शुभेच्छा!

-    बी. बी. गुरव, सेवा निवृत्त प्राचार्य
एम. जी. शहा विद्यामंदिर, बाहुबली
02322 - 224161, 9421287107

दर्पण

डॉ. सुनील पाटील, कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्याकडून एक छोटासा कवितासंग्रह माझ्याकडे आला. कवी संजय अशोक तकडे यांचा तो 'काव्यांजली' नावाचा कवितासंग्रह होता. या संग्रहासाठी मी प्रस्तावना लिहावी अशी अपेक्षा होती. मला आनंद वाटला. खरं सांगायचं झालं तर मला, म्हणजे मनोहर भोसले याला एक लेखक, कवी, नाटककार म्हणून खरी ओळख ही संपादक - प्रकाशक डॉ. सुनील पाटील आणि त्यांच्या कवितासागर या प्रकाशन संस्थेने मिळवून दिली. आज महाराष्ट्रातील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारे हजारो - लाखो विद्यार्थी आपल्या बालभारतीमधील 'कठीण समय येता...' या पाठाचे लेखक म्हणून मला ओळखतात. याचे संपूर्ण श्रेय डॉ. सुनील पाटील यांचे आहे. चांगल्या माणसांच्या संगतीत राहिल्यानंतर निश्चितच कल्याण होत असते. आता कवी संजय अशोक तकडे यांचे कल्याण होण्याची वेळ आली आहे. याची खात्री, संजय अशोक तकडे यांच्या कविता वाचल्यानंतर मला झाली.

'काव्यांजली' हा कवितासंग्रह अगदी छोटासा वाटतो. पण त्यामधले विचार एखाद्या प्रतिभावंताला सुद्धा क्षणभर विचार करायला भाग पाडतात. कविता ह्या सहजा सहजी कळत नसतात. म्हणूनच कवितेचे वाचक कमी आढळतात. कविता वाचायला जरी सोप्या वाटत असल्या तरी त्याचा मर्म हा अपार असतो. कधी कधी कवी सांगतो एक आणि त्याचा अर्थ मात्र दुसराच असतो. कवी संजय तकडे हे एक धाडसी, आत्मविश्वासी आणि आशावादी कवी आहेत. समजामधील दिन, दुबळे, दु:खी, कष्टी लोक त्यांची खरी प्रेरणा आहे. हे त्यांच्याच किती... कसे... या कवितेमधून स्पष्ट आढळून येते. कवी स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी नव्या दिशा शोधणारे आहेत. त्यांच्या काय काय करतात? या कवितेमधून ते म्हणतात...

मळकटलेल्या वाटेने जाणा-यांची धूळच होणार आहे
न उमेदपणे जगणा-यांचे नाव काय राहणार आहे?

यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते हे कवीला चांगलेच ठाऊक आहे आणि यासाठी तो संकटांचा सामना करण्यास तयार ही आहे. स्वतःच्या चांगल्या कर्मातून स्वतःला घडवून तो इतरांनाही घडवण्याचा उदात्त हेतू बाळगून आहे. हे त्यांच्या हिशोब या कवितेमधून दिसून येते.

बदल घडवण्या फोडेन संकटांना
विश्वास असावा बुद्धीच्या विचारांना
घडवतील कर्म बोलिले करांना
स्वतः घडवुनी घडवावे इतरांना

स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणारा हा कवी कधीही खचत नाही. संपत्तीचा, धन दौलतीचा गर्व करणा-या लोकांच्या तुलनेत तो आपले ज्ञान ठेवतो आणि ते श्रेष्ठ असल्यांचेही सांगतो. झेप ही कविता खरोखरच श्रेष्ठ आहे. पैसा, धन, दौलत असे पर्यंतच लोक सोबत असतात हेही कवी लढाई या कवितेतून सांगायला विसरला नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये आई आणि गुरूंचे असाधारण महत्व आहे. ते गुरु, आई या कवितेतून  व्यक्त झाले आहे.

आई बनवितसे योग्यते समान
योग्यतेचे गुरूच देत असे प्रमाण

असे म्हणत सागराची शाई करून असमंताचा कागद केला तरी तो अपुरा पडेल असा विश्वास कवी व्यक्त करतो. निरागस या कवितेमधून स्त्रीभ्रूण हत्येसारखा गंभीर विषय हाताळला आहे. तर सहयोगी कवितेमधून अपार कष्ट करणारा शेतकरी जीवन व्यक्त झाले आहे. धरती कवितेमधून पर्यावरण, मुक्ती कवितेमधून भक्ती व्यक्त झालेली आहे. कवी संजय तकडे यांनी आपल्या कवितांमधून विविध विषय हाताळले आहेत. त्यांची भाषाशैली, शब्द रचना सुंदर आहे. काही कविता तर लयबद्ध आहेत. त्यांना सहज एखादी चाल लावता येईल असे वाटते. कवी संजय तकडे यांच्या कविता मला खरोखर खूप आवडल्या. वाचकांनाही 'काव्यांजली' हा कवितासंग्रह नक्कीच आवडेल असं मला विश्वास वाटतो.

'काव्यांजली' कवितासंग्रह निश्चितच एखाद्या चांगल्या पुरस्काराने सन्मानित होईल अशी मला खात्री आहे. कवी संजय अशोक तकडे यांना सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा आणि त्यांच्या सर्व भावी उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा!

- मनोहर महादेव भोसले (9767044509)
(लेखक-कवी-संपादक-समीक्षक-नाटककार)  
अध्यक्ष - सैनिक टाकळी साहित्य परिषद, सैनिक टाकळी