Android app on Google Play

 

तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल

 

मंगेश विठ्ठल कोळी
मो. ९०२८७१३८२०

"आजच्या तरूण पिढीला काहीही समजत नाही" असे वाक्य सर्वच ठिकाणी ऐकावयास मिळते. माझ्या लक्षात आले, अनेक उत्तम कामे सोप्या आणि वक्तशिरपणे करण्याच्या धडपडीमध्ये सर्वात पुढे तर हिच तरूण पिढी आहे. 'चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील, तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही'  हे आजच्या तरूणांनी ओळखले आहे. तरुण पिढीकडे असणारा स्वाभिमान आणि आत्मविश्वास याच्या जोरावर अनेक स्वप्न साकार करण्यासाठी मेहनतीच्या रुपात किंमत मोजण्याची तयारी ही या पिढीकडे आहे. हाताळत असलेले काम कोणालाही न सांगता स्वत: पूर्ण केले जावू शकते. त्याचा गाजावाजा करण्याची गरज नाही हे या पिढीच्या लक्षात आले आहे. "जर तुमचा विश्वास देवावर असेल तर जे नशीबात लिहिलय ते नक्किच मिळणार, परंतु जर विश्वास स्वत:वर असेल तर देव सुध्दा तेच देतो जे तुम्हाला हवं आहे."

कितीतरी माणसं आपलं आयुष्य त्यांना फसवल जाऊ शकतं या गैरसमजूतीमध्ये व्यतीत करतात. परंतु माणसाला स्वत:शिवाय दुसऱ्या कोणाकडून फसवलं जाणं अशक्य आहे. जस एखादी गोष्ट एकाच वेळेस असावी की नसावी हे सुध्दा ठरविता आले पाहिजे. आत्मविश्वास बाळगणारी व्यक्ती नेहमी स्वत:च्या मेहनतीने यशाचे शिखर गाठण्यासाठी निर्विवाद योग्यता प्रत्येकाजवळ आहे. यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट काही असूच शकत नाही. आत्मविश्वास बाळगणाऱ्या व्यक्तीची चिकाटीची जगात कोणतीच गोष्ट घेऊ शकत नाही. कोणतीच प्रतिभा, कोणतीच बुध्दीमत्ता, कोणतीच विव्दत्ता, कोणतीच नाही चिकाटीसमोर कोणीच उभा राहू शकत नाही. स्वाभिमानी व्यक्ती धाडस किंवा हिंम्मतीने कार्य करते, भीती हा गुण माणसाच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे. फक्त भीतीवर नियंत्रण ठेवून भीती वाटत असतानाही जे कृती करतात त्यांनाच जग धाडसी व्यक्ती म्हणून ओळखते हे लक्षात ठेवा.

आत्मविश्वासू व्यक्ती कोणत्याही गोष्टीला किंवा घटनेला महत्व तेवढेच देते जेवढे प्राप्त होते. एखाद्या घटनेचा कसा अर्थ लावता, त्यावर तुमची प्रतिक्रिया अवलंबून असते. स्वत:चा बघण्याचा दृष्टिकोन निवडल्या नंतर एखाद्या घटनेचा परिणाम काय व्हावा हे घटना ठरवत नाही तर स्वत: ठरवतो. माणसाला जिंकायचे असेल तर केवळ माणुसकी, प्रेमळ स्वभाव, स्वाभिमान आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देत नाही. जोपर्यंत तुम्ही पाऊल उचलणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच जागेवर राहाल. जे करायच आहे ते लगेच करायच आहे, तुम्ही काही करणार नाही तोपर्यंत तुमची स्थिती सुधारणार नाही.

"काहीच नसण्यापेक्षा काही तरी असणं, हे केव्हाही चांगलं असतं." अपयश येईल या भीतीने मुर्ख माणूस कामाचा आरंभच करीत नाही. एखाद्या कामात थोडासा अडथळा निर्माण झाला की, सामान्य माणूस निराशेपोटी ते काम अर्धवट सोडून देतो. परंतु आत्मविश्वासू व्यक्ती मात्र कितीही संकटे आली, अपयश मिळाले तरी यश मिळेपर्यंत थांबत नाही. आत्मविश्वास असलेल्या मनुष्यासोबत काम करण्यात आनंद वाटतो कारण तो नेहमी इतरांशी मिळून मिसळून वागतो. आत्मविश्वास कमी असणाऱ्या व्यक्तींना थोड्या प्रेरणेची, प्रोत्साहनाची आवश्यकता असते. त्यांच्यामधील शक्तीची त्यांना कोणीतरी जाणीव करुन देताच ती सुप्त शक्ती तात्काळ प्रकट होते आणि ते विस्मयकारक कार्य पार पाडू शकतात.

नवीन आव्हाने आणि जबाबदाऱ्या स्वीकारण्यास अजिबात घाबरु नका, मला शक्य होणार नाही असे कधीच म्हणू नका. चालून येत असलेल्या संधीचे व्दार स्वत:च्या हातांनीच बंद करू नका, इतरांना जमू शकत असेल तर मला का जमणार नाही, नक्कीच जमेल असा आत्मविश्वास अंगी बाळगा. "एखादी गोष्ट करु शकतो हा विश्वास निर्माण करण्याचा खात्रीचा मार्ग म्हणजे, एकदा ती गोष्ट करुन पाहणे होय." एकदा काही करण्यात यशस्वी झालो की, पुन्हा यशस्वी होऊ शकतो हा विश्वास आपोआप वाढीस लागतो. 'वाट पाहू नका सुरवात करा', सुरवात करण्यासाठी तुम्हाला अगदी हवी तशी वेळ कधीच येणार नाही. जिथे तुम्ही आहात तिथून जी साधने तुमच्याकडे आहेत त्यांना घेऊन सुरवात करा आणि तिही आत्ताच. वेळ ही जीवनात कधीच परत येत नाही. कोणतेही कार्य करत असताना ते स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने करा. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल.