Android app on Google Play

 

संपादकीय

 

नमस्कार,

'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...' ही प्रतिज्ञा माझ्या लहानपणी प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर असायची आणि ती आम्ही शाळेत गेल्यावर दररोज म्हणत असू. बऱ्याचदा प्रतिज्ञा म्हणत असताना गमतीजमती देखील होत. शाळेत असताना प्रत्येकजण आवडीने ही प्रतिज्ञा म्हणत असे. अगदी साधी सोपी आणि मनात आणलं तर जास्त काही न करता सहज प्रत्यक्षात आणता येण्यासारखी ही प्रतिज्ञा आहे. आपल्याला लहानपणी प्रतिज्ञेचं गांभीर्य कळत नव्हतं, पण आपण ती रोज म्हणायचो आणि आता कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य समजावं एवढी समज आली असताना प्रतिज्ञा मात्र विसरलो.

प्रतिज्ञेबाबत मी बोलत आहे कारण, नव्या वर्षात जातीवरून झालेल्या दुर्घटनेने आपण खरंच सलोख्याने राहतो का, हे दाखवून दिले. नंतर महाराष्ट्र बंद झाला हा त्या घटनेचा पडसाद होता. मुळात ही घटना घडायला नको होती. तरीही अशा घटना घडतात, दररोज घडतात. कधी जातीवरून तर कधी धर्मावरून, कधी रंगावरून तर कधी प्रांतावरून. तर हे असे वाद आणि विविध संस्कृती सांभाळत देश एकत्र पुढे न्यायचा म्हणजे महाकठीण काम आहे. तरीही अनेकांनी हे काम लीलया पेलले आणि आज आपला देश जसा दिसतो तसा आहे. तरीही आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे.

अगदी साध्या सोप्या गोष्टी आपण स्वतः या देशाचा नागरिक म्हणून समजून घ्यायला हव्यात. चालत असताना अगदी सहजच कोणीतरी रस्त्यावर थुंकत, आईवडील स्वतः आपल्या मुलांसमोर बाहेर कचरा टाकतात, परोपकाराचा आणि दानशुरत्वाचा वारसा लाभलेले आपण इतर कुणाचाही विचार न करता स्वार्थीपणे विचार करू लागलो आहोत. ट्रेनमध्ये एखादा मुसलमान बांधव पारंपारिक वेशामध्ये दिसल्यास आजदेखील अनेक इतर धर्मीय त्याच्याकडे कुत्सितपणे बघतात किंवा नजर चुकवतात, बौध्द बांधवांच्या लग्नसमारंभात जाणे टाळणारे मी आजदेखील पाहतो. हिंदूंमध्ये तर पोटजातींमध्येच खूप वाद आहेत. (हे लिहिताना खरंच वाईट वाटत आहे. मी सर्वांना समान मानतो, पण वस्तुस्थिती काय चालू आहे हे दाखवण्यासाठी मला असं वर्गीकरण करावं लागतंय.)

तर, मी आज तुम्हाला विचारतो, आपण खरंच बांधव आहोत का? तुम्हाला काय वाटतं? फक्त जात, धर्म, राज्य, प्रांत किंवा रंग या गोष्टी गोष्टींवरून आपण स्वतःला समाजापासून वेगळं करायचं? कि सर्वांनी एकत्र येऊन बलशाली भारत बनवायचा? निर्णय तुमचाच...

लोभ असावा.

अभिषेक ज्ञा. ठमके
संपादक