स्वागत नव्या पुस्तकांचे १
कवितासागर प्रकाशन
भाषासु मुख्या मधुरा, दिव्यागीर्वाणभारती ।
ततो पि काव्यं मधुरम्, सर्वादपि सुभाषितम् ।।
सर्व भाषांमध्ये प्रमुख (जननी) असलेली अत्यंत मधुर असलेली ही देव भाषा आहे. त्यातील काव्य, नाट्य, शास्त्र इत्यादी साहित्य नितांत सुंदर आहे. 'सुभाषित' हे वैशिष्ट्य असलेली ही भाषा आहे.
सुभाषित याचा अर्थ चांगल्या, सोप्या अशा आकलनीय भाषेमध्ये चांगले विचार देणारे श्लोक असा होईल. डॉ. बी. ए. शिखरे यांनी अशी निवडक सुभाषिते (श्लोक) "संस्कृत सुधा" या पुस्तकामध्ये घेवून त्यांचे गोष्टीसह विवेचन केले आहे. आजकाल दूरदर्शन आणि मोबाईलच्या जमान्यात आजी आजोबांच्या गोष्टी कुठेतरी हरवल्या सारख्या वाटत आहेत. डॉ. बी. ए. शिखरे यांचे हे पुस्तक ही उणीव भरून काढणारे आहे.
मुलांसाठी कशा प्रकारची सुभाषिते निवडावीत याचे अचूक ज्ञान डॉ. बी. ए. शिखरे यांना असल्यामुळे या पुस्तकाचा उद्देश निश्चितच सफल होईल. डॉ. बी. ए. शिखरे यांनी सुभाषितांचा अर्थ सोप्या भाषेत सांगून रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.
आदर्श विद्यार्थी, शिक्षक कसा असावा? ज्ञान, गुरु, दान यांचे महत्त्व काय? क्रोधा सारख्या षड् रिपुंचा त्याग करण्याचे महत्त्व कसे आहे? या सर्वांचे प्रबोधन त्यांनी मुलांना समजेल अशा भाषेत केले आहे. ते रंजक झाल्याने उपदेशाचे 'डोस' वाटत नाहीत तर त्याचे मर्म अंत:करणापर्यंत भिडते. आदर्श जीवनाचा पाया घालण्याच्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंत आवश्यक आहे. ते वाचनीय, श्रवणीय तर आहेच पण आकलनीयही आहे. मुलांसाठी ही छानशी 'भेट' ठरावी असा या पुस्तकात गोडवाही आहे.
सर्वच कथा आदर्श आणि रंजकता साधना-या आहेत. डॉ. बी. ए. शिखरे हे व्यवसायाने डॉक्टर असल्याने त्याने मुलांच्या मानसिकतेच्या जडणघडणीसाठी हे उत्तम टॉनिक तयार केले आहे. त्यांच्याकडून अशाच सुंदर साहित्याची निर्मिती व्हावी यासाठी शुभेच्छा!
- डॉ. व्यंकटेश जंबगी (सांगली)
B.A. M.S., M.A. (संस्कृत) P.G.D.H.A.
संपर्क: ७७६९००५६०५, ९९७५६००८८७
----------
• बालसाहित्य - संस्कृत सुधा
• ISBN 978-93-87127-01-2
• लेखक - डॉ. बी. ए. शिखरे
• मूल्य - 140/-
• पृष्ठे - 88 (कव्हरसह)
• प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील
• प्रकाशन - कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर
• संपर्क - 02322 225500, 9975873569, 8484986064