अहिरावण
अहिरावण एक असुर होता. तो रावणाचा मित्र होता ज्याने रावणाच्या सांगण्यावरून युद्धाच्या वेळी आकाशमार्गाने रामाच्या शिबिरात उतरून राम आणि लक्ष्मणाचे अपहरण केले होते. जेव्हा अहिरावण राम आणि लक्ष्मणाला देवीच्या समोर बळी देण्यासाठी म्हणून बिभीषणाच्या वेशात त्यांच्या शिबिरात घुसून आपल्या मायाजालाच्या बळावर त्यांना पाताळात घेऊन आला होता, तेव्हा राम आणि लक्ष्मण यांना मुक्त करण्यासाठी हनुमान पाताळ लोकात गेला होता. तिथे त्याची भेट त्याचाच पुत्र मकरध्वज याच्याशी झाली. त्याला मकरध्वज सोबत युद्ध करावे लागले कारण मकरध्वज अहिरावणाचा द्वारपाल होता. मकरध्वजाने सांगितले की अहिरावणाला मारायचे असल्यास हे पाचही दिवे एकाच वेळी विझवावे लागतील. हे रहस्य कळल्यावर हनुमानाने पंचमुखी हनुमानाचे रूप घेतले. उत्तर दिशेला वराह मुख, दक्षिणेला नरसिंह मुख, पश्चिमेला गरुड मुख, आकाशाच्या दिशेला हयग्रीव मुख आणि पूर्वेला हनुमान मुख. ही ५ मुखे धारण करून त्याने एकाच वेळी पाच दिवे विझवले आणि अहिरावणाचा अंत करून राम लक्ष्मण यांना मुक्त केले. हनुमानाने राम - लक्ष्मणाला मुक्त करून मकरध्वजला पाताळ लोकाचा राजा नियुक्त केले आणि त्याला धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.