Android app on Google Play

 

पार्श्वभूमी

 

प्राचीन काळात सुर, असुर, देव, दानव, दैत्य, रक्ष, यक्ष, दक्ष, किन्नर, निषाद, वानर, गंधर्व, नाग इत्यादी जमाती होत्या. राक्षसांना आधी 'रक्ष' म्हटले जाई. 'रक्ष' चा अर्थ जो समाजाचे रक्षण करतो. राक्षस लोकांची नियुक्ती आधी रक्षण करण्यासाठी झाली होती, परंतु नंतर त्यांची प्रवृत्ती बदलत गेल्यामुळे ते आपल्या कर्मांनी बदनाम होत गेले आणि आजच्या संदर्भात त्यांना असुर आणि दानवांच्या प्रमाणेच मानले जाते.
देवतांची उत्पत्ती अदिती पासून, असुरांची दिती पासून, दानवांची दनु पासून, नागाची कद्रू पासून मानली जाते. पुराणांनुसार कश्यपच्या सुरसा नावाच्या राणीपासून यातुधान (राक्षस) उत्पन्न झाले, परंतु एका कथेनुसार प्रजापिता ब्रम्हाने समुद्रगत आणि प्राण्यांच्या रक्षणार्थ अनेक प्रकारचे प्राणी निर्माण केले. त्यापैकी काही प्राण्यांनी रक्षणाची जबाबदारी स्वीकारली त्यांना राक्षस म्हटले गेले ज्यांनी यक्षण (पूजन) करणे स्वीकारले त्यांना यक्ष म्हटले गेले. पाण्याचे रक्षण करण्याचे महत्वपूर्ण कार्य सांभाळण्यासाठी ही प्रजाती पवित्र मानली जात असे.
राक्षसांचे प्रतिनिधित्व 'हेति' आणि 'प्रहेति' या दोन लोकांकडे सोपवण्यात आले. हे दोघे बंधू होते. हे दोघेही दैत्यांचे प्रतिनिधी मधु आणि कैटभ यांच्यासारखेच बलवान आणि पराक्रमी होते. प्रहेति धर्मात्मा होता तर हेतिला राज्यकारभार आणि राजकारणात जास्त रुची होती.
रामायण काळात जिथे विचित्र प्रकारचे मानव आणि पशु-पक्षी होते त्याच काळात राक्षसांचा आतंक (दहशत) खूपच जास्त वाढला होता. राक्षसांकडे मायावी शक्ती होत्या. ते आपल्या शक्तीने देव आणि मानव यांच्यात दहशत पसरवत होते. रामायण काळात संपूर्ण दक्षिण भारत आणि दंडकारण्य क्षेत्र (मध्यप्रदेश, छत्तीसगढ) मध्ये राक्षसांची दहशत होती. दंड नावाच्या राक्षसामुळेच या क्षेत्राचे नाव दंडकारण्य पडले होते. चला पाहूयात रामाच्या काळातील ते १० राक्षस ज्यांच्या नावाचा डंका वाजत असे.

पहिले राक्षस 'हेति' आणि 'प्रहेति' : राक्षसांचे प्रतिनिधित्व 'हेति' आणि 'प्रहेति' या दोन लोकांकडे सोपवण्यात आले. हे दोघे बंधू होते. हेतिने आपल्या साम्राज्याच्या विस्तारासाठी काळाची कन्या 'भया' हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून त्याला विद्युत्केश नावाचा एक पुत्र झाला. त्याचा विवाह संध्याची कन्या 'सालकटंकटा'शी झाला. असे मानले जाते की ही 'सालकटंकटा' व्यभिचारी होती. त्यामुळे जेव्हा तिला पुत्र झाला तेव्हा त्याला वाऱ्यावर सोडून देण्यात आले. विद्युत्केशने देखील तो कोणाचा पुत्र आहे हे माहिती नाही, असे म्हणून त्याची काहीही पर्वा केली नाही. आणि इथूनच राक्षस प्रजातीत बदल घडून यायला सुरुवात झाली. भगवान शंकर आणि माता पार्वती यांनी तो अनाथ बालक पाहिला आणि त्याला संरक्षण दिले. त्या अजाणत्या बालकाला असे वाऱ्यावर सोडून दिलेलं पाहून माता पार्वतीने शाप दिला की आतापासून राक्षस प्रजातीच्या स्त्रिया लवकर गर्भ धारण करतील आणि त्यांच्या बालकाचा जन्म झाल्यावर तत्काळ ते बालक मोठे होऊन मातेसारखे रूप धारण करेल. या शापामुळे राक्षसांमध्ये शारीरिक आकर्षण कमी आणि विक्राळपणा जास्त राहिला. शिव आणि पार्वतीने त्या अनाथ बालकाचे नाव 'सुकेश' ठेवले. शंकराच्या वरदानामुळे तो 'निर्भय' होता. तो निर्भय राहून कुठेही विहार करू शकत होता. शंकराने त्याला एक दिवस विमान देखील दिले.

सुकेशचे ३ पुत्र : सुकेश ने गन्धर्वकन्या देववती सोबत विवाह केला. तिच्यापासून त्याला ३ पुत्र झाले - १. माल्यवान, २. सुमाली आणि ३. माली. या तिघांमुळे राक्षस प्रजातीला विस्तार आणि प्रसिद्धी प्राप्त झाली.
या तिघा भावांनी शक्ती आणि ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी ब्रम्हदेवाची कठीण तपश्चर्या केली. ब्रम्हदेवाने त्यांना शत्रूवर विजय प्राप्त करण्याचे आणि तिन्ही भावांमध्ये एकता आणि प्रेम कायम राहण्याचे वरदान दिले. वरदनमुळे हे तीन भाऊ अहंकारी बनले.
तिन्ही भावांनी मिळून विश्वकर्माकडून त्रिकुट पर्वताच्या निकट समुद्र तटावर लंका निर्माण करून घेतली आणि तिला आपले शासन केंद्र बनवले. अशा प्रकारे त्यांनी राक्षसांना एकत्र करून त्यांचे आधिपत्य स्थापन केले आणि लंकेला राक्षस प्रजातीचे केंद्र बनवले.
लंकेला त्यांनी धन आणि वैभवाची भूमी बनवले आणि इथे तिन्ही भावांनी राक्षस संस्कृतीसाठी विश्व विजयाची कामना केली. त्यांचा अहंकार वाढतच गेला आणि त्यांनी यक्ष आणि देवतांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली ज्यामुळे संपूर्ण धरतीवर दहशतीचे राज्य पसरले.
याच तीन भावांच्या वंशात पुढे राक्षस प्रजातीचा विकास झाला. त्यांच्या वंशजांमध्ये माल्यवान चे वज्र, मुष्टि, धिरूपार्श्व, दुर्मख, सप्तवहन, यज्ञकोप, मत्त, उन्मत्त नामक पुत्र आणि अनला नामक कन्या झाली.
सुमालीचे प्रहस्त, अकन्पन, विकट, कालिकामुख, धूम्राश, दण्ड, सुपार्श्व, सहादि, प्रधस, भास्कण नामक पुत्र आणि रांका, पुण्डपोत्कटा, कैकसी, कुभीनशी नामक कन्या झाल्या. यापैकी कैकसी रावणाची माता होती. माली रावणाचे आजोबा होते. रावणाने त्यांच्याच बळावर राक्षस साम्राज्याचा विस्तार केला आणि शक्ती वाढवल्या.
मालीचे अनल, अनिल, हर आणि संपात्ति नामक ४ पुत्र झाले. हे चारही पुत्र रावणाच्या मृत्युनंतर बिभीषणाचे मंत्री झाले होते. रावण राक्षस प्रजातीचा नव्हता, त्याची माता राक्षस प्रजातीची होती परंतु त्याचे वडील यक्ष प्रजातीचे ब्राम्हण होते.