आयुर्वेद आणि योग
आयुर्वेद मानव जातीच्या माहितीतील पहिली वैद्यकीय शाखा आहे, तर योग हा धर्माचा स्पष्ट आणि निःपक्ष मार्ग आहे. योग ही अशी विद्या आहे ज्यामध्ये भौतिक, मानसिक आणि अध्यात्मिक इत्यादी सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान आठ अंगांमध्ये सामावण्यात आलेले आहे. योगाच्या बाहेर अध्यात्म आणि धर्माची कल्पना देखील करता येणार नाही. आयुर्वेदाचा अविष्कार देखील अगोदर ऋषी मुनींनी आपल्या मोक्ष मार्गात येणारे अडथळे, येणाऱ्या बाधा दूर करण्यासाठीच केला होता, परंतु नंतर त्याने एका वैद्यकीय पद्धतीचे रूप घेतले. आयुर्वेद निसर्गाला अनुसरून जीवन जगण्याचा सल्ला देतो. निरोगी आणि आरोग्यसंपन्न राहून मोक्ष प्राप्त करणे हाच भारतीय ऋषी मुनींचा उद्देश राहिला आहे.
योग आणि आयुर्वेद या भारताच्या विश्वाला सर्वांत मोठ्या देणग्या आहेत. आधुनिक मनुष्य आणि विज्ञान दोघांनाही याचे महत्त्व पटलेले आहे म्हणूनच संपूर्ण युरोप आणि अमेरिका आयुर्वेद आणि योग यांना शरण आले आहेत. आयुर्वेदाला व्यवस्थित स्वरूप देण्याचे श्रेय धन्वंतरी, चरक, च्यवन आणि सुश्रुत यांना जाते. चरक ऋषींनी इ.स.पू. ३०० - २०० दरम्याने आयुर्वेदातील अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ "चरक संहिता" लिहिला. त्यांना त्वचा चिकित्सक देखील मानले जाते. आठव्या शतकात चरक संहितेचे अरबी भाषेत भाषांतर झाले आणि हे शास्त्र पाश्चिमात्य देशांपर्यंत पोचले. चरक आणि च्यवन ऋषींच्या ज्ञावावर आधारितच युनानी चिकित्सेचा विकास झाला.