शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील जनतेला विजापूरच्या आदिलशाही हुकुमशाहीपासून मुक्त करण्यासाठी कंबर कसली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. १६७४ मध्ये त्यांनी स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना केली. रायगड ही या राज्याची राजधानी होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले.
शिवाजी महाराजांनी लहान पण शिस्तबद्ध आणि शूर सेना आणि नियंत्रित प्रशासकीय संघटनेच्या माध्यमातून एका सक्षम आणि पुरोगामी नागरी व्यवस्थेची स्थापना केली. त्यांनी युद्धाच्या पद्धतीत बदल घडवून आणत भौगोलिक स्थिती, चपळता यांचा पुरेपूर फायदा घेत गनिमी काव्याचा वापर करून आपल्यापेक्षा प्रचंड बलाढ्य शत्रूला नेहमीच धूळ चारली. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २००० सैनिकांच्या सेनेचे आपल्या कर्तृत्वाने त्यांनी १ लाखाच्या सैन्यात रुपांतर केले. संपूर्ण राज्यकारभार पाहताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी मराठी आणि संस्कृत च्या वापरावर जोर दिला.