Android app on Google Play

 

या ६ जणांच्या शापामुळे झाला होता रावणाचा सर्वनाश

 


आपणा सर्वांनाच हे माहिती आहे की रावण हा अतिशय पराक्रमी योद्ध होता. त्याने आपल्या आयुष्यात अनेक युद्ध केली. धर्म ग्रंथांत लिहिल्याप्रमाणे तर त्याने आपल्या आयुष्यातील कित्येक युद्ध ही एकट्यानेच जिंकली होती. एवढा महान पराक्रमी असून देखील त्याचा सर्वनाश कसा झाला? अर्थात रावणाच्या मृत्यूचे कारण प्रभू श्रीरामांची शक्ती होतीच, पण त्या बरोबरच काही लोकांचे शाप देखील होते, ज्यांना रावणाने कधी न कधी दुःख दिले होते. त्यांच्यावर अन्याय केला होता. धर्म ग्रंथांनुसार रावणाला त्याच्या आयुष्यात मुख्यत्वे करून ६ लोकांकडून शाप मिळाले होते. हेच शाप त्याच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरले आणि त्याच्या वंशाचा समूळ विनाश झाला. आता बघुयात कोणी कोणी रावणाला काय काय शाप दिले होते -१. रघुवंशात (प्रभू श्रीरामांचा वंश) एक परम प्रतापी राजा होऊन गेला. त्याचे नाव अनरण्य होते. जेव्हा रावण विश्वविजय करण्यासाठी निघाला तेव्हा राजा अनरण्य बरोबर त्याचे घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात राजा अनरण्य चा मृत्यू झाला, परंतु मरणापूर्वी त्याने रावणाला शाप दिला की माझ्याच कुळात जन्माला आलेला एक युवक तुझ्या मृत्युचे कारण बनेल.

२. एकदा रावण भगवान शंकरांना भेटायला कैलासात गेला. तिथे त्याने नंदीला पाहून त्याच्या रुपाची खिल्ली उडवली आणि त्याला माकडासारख्या तोंडाचा म्हटले. तेव्हा नंदीने रावणाला शाप दिला की माकडांच्या कारणानेच तुझा सर्वनाश होईल.

३. रावणाने आपल्या पत्नीची मोठी बहीण माया हिच्याशीही कपट केले. वैजयंतपुरचा शंभर राजा मायाचा पती होता. एक दिवस रावण शंभर कडे गेला. त्याने मायाला आपल्या बोलण्याने फसवले. ही गोष्ट समजताच शंभरने रावणाला बंदी बनवले. त्याच वेळी राजा दशरथाने शंभरावर आक्रमण केले. या युद्धात शंभर मारला गेला. जेव्हा माया सती जात होती तेव्हा रावणाने तिला आपल्या सोबत येण्यास सांगितले. तेव्हा मायाने सांगितले की तू वासानायुक्त मनाने माझे सतीत्व भंग करण्याचा प्रयत्न केलास म्हणून माझ्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हा तू देखील स्त्री वासनेमुळेच मारला जाशील.

४. एकदा रावण आपल्या पुष्पक विमानाने जात होता. तेव्हा त्याला एक सुंदर स्त्री दिसली, जी भगवान विष्णूला आपल्या पतीच्या रुपात मिळवण्यासाठी तपश्चर्या करत होती. रावणाने तिचे केस पकडून तिला आपल्या सोबत चलण्यास सांगितले. त्या तपस्वीनीने त्याच वेळी देहत्याग केला, आणि रावणाला शाप दिला की तुझा मृत्यू देखील एका स्त्रीमुळे होईल.

५. विश्वविजय करण्यासाठी जेव्हा रावण स्वर्गात गेला, तेव्हा त्याला तिथे रंभा नावाची एक अप्सरा दिसली. आपली वासना शमवण्यासाठी रावणाने तिला पकडले. तेव्हा त्या अप्सरेने रावणाला सांगितले की मला अशा प्रकारे स्पर्श करू नका. मी तुमचा मोठा भाऊ कुबेर, यांचा मुलगा नलकुबेर याच्यासाठी आरक्षित आहे, म्हणूनच मी तुमच्या सुनेच्या समान आहे. परंतु रावणाने तिचे ऐकले नाही आणि तिच्याशी गैरप्रकार केला. ही गोष्ट जेव्हा नलकुबेराला समजली, तेव्हा त्याने रावणाला शाप दिला की यापुढे जर रावणाने कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श केला तर रावणाच्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील.

६. रावणाची बहिण शुर्पणखेच्या पतीचे नाव विद्युतजिव्हा होते. तो कालकेय नावाच्या राजाचा सेनापती होता. जेव्हा रावण विश्वयुद्धावर निघाला तेव्हा कालकेयाशी त्याचे युद्ध झाले. त्या युद्धात रावणाने विद्युतजिव्हाचा वध केला. तेव्हा शुर्पणखेने मनातल्या मनात त्याला शाप दिला की तुझा सर्वनाश माझ्यामुळेच होईल.