Android app on Google Play

 

मृत्युसमयी रावणाने लक्ष्मणाला या ३ महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या

 


रावण जेव्हा युद्धभूमीवर जखमी, मरणासन्न अवस्थेत होता, तेव्हा प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितले की या जगातून नीती, राजनीती आणि शक्ती यांचा महान पंडित निघून चालला आहे. तू त्याच्याजवळ जा आणि त्याच्याकडून जीवनातील काही असे धडे घे जे दुसरा कोणीही देऊ शकत नाही. रामाचे ऐकून लक्ष्मण मरणासन्न अवस्थेतील रावणाच्या डोक्याजवळ जाऊन उभा राहिला.रावण काहीही बोलला नाही. लक्ष्मण परत रामाजवळ आला. तेव्हा प्रभूनी सांगितले की जर कोणाकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्याच्या चरणाशी उभे राहावे, डोक्याकडे नाही. हे ऐकून लक्ष्मण परत गेला व यावेळी रावणाच्या पायांपाशी उभा राहिला. त्या वेळी महापंडित रावणाने लक्ष्मणाला ३ गोष्टी सांगितल्या, ज्या जीवनात सफलतेच्या किल्ल्या आहेत -

१. पहिली गोष्ट जी रावणाने लक्ष्मणाला सांगितली ती म्हणजे शुभस्य शीघ्रम! म्हणजे शुभ कार्य जेवढ्या लवकर होत असेल करून टाकावे आणि अशुभ कार्य जितके टाळता येईल तेवढे टाळावे. रावण म्हणाला, मी श्रीरामांना ओळखू शकलो नाही आणि त्यांना शरण येण्यात मी खूप उशीर केला, त्यामुळेच आज माझी ही अवस्था झाली.

२. दुसरी गोष्ट म्हणजे आपला प्रतिस्पर्धी, आपल्या शत्रूला कधीही आपल्यापेक्षा कमी लेखू नये. मी आज हीच चूक केली. मी ज्यांना सामान्य वानर आणि अस्वल समजलो, त्यांनीच माझ्या संपूर्ण सेनेचा नाश केला. मी जेव्हा ब्रम्हदेवाकडून अमरतेचं वरदान मागितलं तेव्हा वानर आणि मनुष्य यांच्या व्यतिरिक्त कोणीही माझा वध करू शकणार नाही अशी मागणी केली होती, कारण मी वानर आणि मनुष्य यांना तुच्छ समजत होतो. माझ्याकडून चूक झाली.

३. रावणाने लक्ष्मणाला तिसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे, आपल्या जीवनात जर कोणते रहस्य असेल तर ते कधीच कोणालाही सांगू नये. इथेही मी चूक केली. बिभीषणाला माझ्या मृत्यूचे रहस्य माहिती होते. ही माझ्या आयुष्यातली सर्वांत मोठी चूक होती.