Android app on Google Play

 

रावणाच्या पुर्वाजान्मांची कहाणी

 

रावण आपल्या पूर्वजन्मात भगवान विष्णूंचा द्वारपाल होता. परंतु एका शापाचा परिणाम म्हणून त्याला ३ जन्मापर्यंत राक्षस कुळात जन्म घ्यावा लागला. आज या लेखात आपण रावणाचे दोन पूर्वजन्म आणि एक नंतरचा जन्म यांची माहिती घेणार आहोत.एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी सनक, सनंदन आणि ऋषी वैकुंठाला गेले, परंतु विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय यांनी त्यांना रोखले आणि आत जाण्यास प्रवेश नाकारला. ऋषीगण अप्रसन्न झाले आणि त्यांनी जय आणि विजय यांना शाप दिला की तुम्ही राक्षस व्हाल. जय - विजय यांनी प्रार्थना केली आणि आपल्या अपराधाची क्षमा मागितली. भगवान विष्णूनी ऋषींना त्या दोघांना माफ करण्यास सांगितले. तेव्हा मग ऋषींनी आपल्या शापाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यांना उश्श्याप दिला आणि सांगितले की तीन जन्मान्पर्यंत तुम्हाला राक्षस योनीत राहावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा या पदावर विराजित होऊ शकाल. याच्या सोबत आणखी एक अट घातली की भगवान विष्णू किंवा त्यांच्या कोण्या अवताराच्या हातून तुमचा मृत्यू होणे अनिवार्य आहे.

हा शाप राक्षसराज, लंकापती, दशानन रावणाच्या जन्माची पार्श्वभूमी तथा आदिगाथा आहे. भगवान विष्णूचे हे द्वारपाल पहिल्या जन्मात हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या राक्षसांच्या रूपाने जन्माला आले. हिरण्याक्ष राक्षस प्रचंड शक्तिशाली होता आणि त्याने पृथ्वी उचलून पाताळ लोकांत नेली. पृथ्वीच्या पवित्रतेचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंना वराह अवतार धारण करावा लागला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून पृथ्वी मुक्त केली होती. हिरण्यकश्यपू देखील प्रचंड शक्तिशाली राक्षस होता आणि त्याने वरदान प्राप्त करून अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. भगवान विष्णूंनी आपला भाऊ हिरण्याक्ष याला मारल्यामुळे तो विष्णू विरोधी होता आणि आपला विष्णूभक्त पुत्र प्रल्हाद याला मारण्यासाठी त्याने प्रयत्नांमध्ये कोणतीही कसूर केली नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. खांबातून नृसिंह भगवान प्रकट होणे हे ईश्वराच्या शाश्वत, सर्वव्यापी उपस्थितीचेच प्रमाण आहे.

त्रेता युगात हे दोन्ही भाऊ रावण आणि कुंभकर्ण या रुपात जन्माला आले आणि विष्णूचा अवतार प्रभू श्रीरामाच्या हातून मारले गेले. तिसरा जन्म म्हणजे जेव्हा भगवान विष्णूंनी द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रुपात अवतार घेतला, तेव्हा हे दोन भाऊ शिशुपाल आणि दंतवक्र नावाचे अत्याचारी म्हणून जन्माला आले. या दोघांचा वध देखील श्रीकृष्णांच्या हातून झाला.