कर्ण आणि कृष्ण
कर्मयोगाचे आणखी एक उदाहरण. जेव्हा युद्धभूमीवर अर्जुन आणि कर्ण समोरासमोर आले, तेव्हा कृष्णाने धरणी मातेला आदेश दिला की तिने कर्णाच्या रथाचे चाक पकडून ठेवावे. कर्णाने आपल्या रथाचे चाक सोडवण्यासाठी जादुई मंत्रोच्चार करायला सुरुवात केली, परंतु परशुरामाच्या शापाच्या प्रभावामुळे तो ते मंत्र विसरला.
त्यामुळे हैराण होऊन त्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि रथातून खाली उतरून रुतलेले चाक सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. कृष्णाने लगेचच अर्जुनाला कर्णावर बाण चालवायला सांगितले. अर्जुन म्हणाला की तो निःशस्त्र असताना मी वार कसा करू? यावर कृष्णाने त्याला आठवण करून दिली की जेव्हा कौरवांनी वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा द्रौपदी सुद्धा अशीच असहाय्य होती. त्याने असे सांगितल्यावर मात्र अर्जुनाने कोणतीही दयामाया न दाखवता कर्णाला मारले, तो असहाय्य असताना.
परंतु असे का झाले? कृष्ण मागील जन्मी राम होता. रामाने सूर्यपुत्र सुग्रीवाची साथ करत इंद्रपुत्र वालीला धोक्याने मारले होते. आता परतफेडीची वेळ होती. या वेळी कृष्णाने इंद्रपुत्र अर्जुनाची साथ केली आणि सूर्यपुत्र कर्णाला धोक्याने मरण देवविले.