माणूस व मुंगूस
एका माणसाने एक मुंगूस पकडले व तो त्याला मारणार तोच मुंगूस गयावया करून त्याला म्हणाले, 'अरे, इतका निर्दय होऊ नकोस. जो प्राणी तुझ्या घरातले उंदीर मारून तुझ्या धान्याचं, कपड्यालत्याचं रक्षण करतो, त्याचा जीव घेण्याचं पाप तू करू नकोस.' माणूस त्यावर म्हणाला, 'तू जे उंदीर मारतोस ते माझ्यासाठी नाही; आपलं पोट भरावं म्हणून मारतोस. शिवाय सगळ्या घरात बिळं करून नि जमीन उकरून तू माझं नुकसानच करतोस. तेव्हा तुझी खोटी अन् मूर्खपणाची सबब ऐकून तुला मी सोडीन, अशी तू आशाही करू नकोस.' इतके बोलून त्याने त्या मुंगसाचा प्राण घेतला.
तात्पर्य - जी गोष्ट आपण स्वार्थासाठी करतो, तिचे उपकार दुसर्यावर लादून संकटातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणे बरे नाही.