कुत्रा आणि सिंह
एकदा एक कुत्रा एका सिंहाला म्हणाला, 'अरे, तुझं जीवन किती दुःखी आहे. सगळा दिवस उपाशीपोटी भक्ष्य शोधत हिंडावं आणि ते मिळालं नाही तर प्रेतासारखं पडून रहावं. मला तर तुझी कीवच येते. त्यापेक्षा मी बघ कसा धष्टपुष्ट आहे, सुखी आहे.'
यावर सिंहाने उत्तर दिले, 'मित्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. तुला वेळच्या वेळी व्यवस्थित खायला मिळतं हे अगदी खरं आहे. पण त्याचबरोबर तुला गळ्यात साखळीही सतत बाळगावी लागते. माझं तसं नाही. मला खाणं मिळालं नाही तरी मी स्वतंत्र आहे. गुलामगिरीतल्या चैनीपेक्षा स्वतंत्रतेत भुकेनं मरण आलेलं परवडलं !'