स्वस्थिति
धांव घाली विठु आतां चालू नको मंद । बडवे मज मारिती ऐसा कांहीं तरी अपराध ॥१॥
विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला । शिव्या देती महारा म्हणती देव बाटविला ॥२॥
अहोजी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा । नकाजी मोकलू चक्रपाणी जिमेदारा ॥३॥
जोडूनिया कर चोखा विनवितो देवा । बोलिलों उत्तरें परि राग नसावा ॥४॥