Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ९१ ते ९५

झलझ्झल-उल्लसद्‌-दान-झङकारि-भ्रमर-आकुल: ।
टंकारस्फारसंराव: टंकार-मणिनूपुर: ॥९१॥
४९१) झलझ्झलोल्लसद्दानझङ्कारिभ्रमराकुल---झुळझुळ वाहणार्‍या मदाकरिता ‘झं’ असा झंकार शब्द करणार्‍या भ्रमरांनी व्याकूळ झालेला, व्याप्त झालेला.
४९२) टंकारस्फारसंराव---काशाच्या झांजांप्रमाणे ज्याच्या आभूषणांचा झणत्कार होत आहे असा. किंवा धनुष्याच्या टणत्काराप्रमाणे ज्याचा आवाज मोठा आहे असा.
४९३) टंकारमणिनूपुर---पायातील वाळे, पैंजण, तोडे. रत्नजडित नुपूरांचा आवाज करणारा.
ठद्वयी-पल्लवान्तस्थ-सर्व-मन्त्रैक-सिद्धिद: ।
डिण्डिमुण्ड: डाकिनीश: डामर: डिण्डिमप्रिय: ॥९२॥
४९४) ठद्वयीपल्लवान्तस्थसर्वमन्त्रैकसिद्धिद---स्वाहान्त मन्त्रांचा एकमेव दिद्धिदाता.
४९५) डिण्डिमुण्ड---डिंडि म्हणजे नगारा. मुण्ड म्हणजे डोके. पालथ्या ठेवलेल्या नगार्‍याप्रमाणे मस्तक असलेला.
४९६) डाकिनीश---डाकिनी (एक तांत्रिक देवता. श्रीविद्यार्णवतंत्रानुसार डाकिनी ही १६ पाकळ्यांच्या विशुद्धचक्रावर बसलेली, रक्तवर्णा, त्रिनेत्रा, एकवस्त्रा, चतुर्भुजा आणि ४ हातात खटवांग, त्रिशूळ. पात्र आणि चर्म ही आयुधे धारण करणारी अशी असते. ती पायसान्न भक्षण करीत असते.) योगिनींचा अधिपती.
४९७) डामर---डामरतन्त्रस्वरूप. (एक शिवप्रोक्ततंत्र. योग-शिव-दुर्गा-सारस्वत-ब्रह्म व गंधर्व अशी सहा डामर तंत्रे आहेत).
४९८) डिण्डिमप्रिय---डिण्डिमवाद्याचा आवाज प्रिय असलेला. डिंडिम म्हणजे नगारा किंवा नौबत. तिचा आवाज ज्याला प्रिय आहे असा.
ढक्कानिनाद-मुदित: ढौक: ढुण्ढिविनायक: ।
तत्त्वानां परमं तत्त्वं तत्त्वंपदनिरूपित: ॥९३॥
४९९) ढक्कानिनादमुदित---ढोलाच्या नादाने प्रसन्न होणारा.
५००) ढौक---सर्वंगत, सर्वज्ञ, सर्वगामी. ढौक्‌ = जाणे (गत्यर्थक धातू)
५०१) ढुण्ढिविनायक---ढुण्ढि म्हणजे शोध घेणे. ढुण्ढी या नावाने विशिष्ट नायक रूपात अन्वेषणीय. भस्मासुराचा पुत्र दुरासद. याने तप करून प्रसन्न झालेल्या शिवाकडून ‘आपणास कुणाकडूनही कधीही मरण येऊ नये’ असा वर मिळविला. बापाप्रमाणेच तो उन्मत्त बनला. त्याच्या जुलमामुळे त्रिभुवनवासी जन जीव मुठीत धरून जीवन कंठू लागले. त्रिभुवन जिंकले तरी शिवाची कशी त्याच्या ताब्यात नव्ह्ती. त्याने काशीत हाहाकार माजवला. दुरासदाच्या नाशासाठी सादिशक्तीला पुत्र निर्माण करण्याची जरूरी असल्याचा नारदांनी सल्ला दिला. मग आदिशक्ती मनाने ॐ काराला धुंडू लागली. स्वर्ग-पृथ्वी-पाताळ-विष्णुलोक-गणेशलोक-कैलास-वैकुंठ कुठेही तिला ॐ काराचा ठावठिकाणा लागेना तेव्हा मनाने ॐ काराला धुंड्ण्यापेक्षा तू तुझ्या आत्म्यातून ॐ ॐ असा नाद काढ असा नारदांनी तिला सल्ला दिला. तिने आपल्या आपल्या आत्म्यातून ॐ ॐ असा नाद काढायला सुरुवाल केली. तो नाद तिच्या नासिकेतून बाहेर पडू लागताच तिच्यापुढे एक बालक उभा राहिला. त्याला सुंदरशी सोंड होती. त्याच्या एका हातात मोदक, दुसर्‍या हातात कमळ, तिसर्‍या हातात परशू आणि चवथ्या हातात काहीही नव्हते. आदिशक्ती पार्वती माता म्हणाली. ‘अरे बाळा, किती वेळ मी तुला धुंडीत होते. माझ्या धुंडिराजा, तू ताबडतोब काशीनगरीत जा. तेथे दुरासदाने हाहाकार माजवला आहे. त्याला आधी नष्ट करून टाक.’ मातेची आज्ञा ऐकताच धुंडिराज सिंहावर आरूढ होऊन मोठया सैन्यानिशी  काशीनगरीत आले. दुरासदाचे सारे सैनिक मारले गेले पण दुरासद मरेना. तेव्हा धुंडिराजाने त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडले आणि त्याला पकडून जमिनीवर पाडले. त्याच्या मस्तकावर आपला एक पाय ठेवून त्याला भूमीत गाडले. तेव्हा. दुरासदाला आनंद वाटला. तो म्हणाला -‘हे प्रभो, माझ्या मस्तकावर तुमचा पाय ठेवून असे आता कायमचेच उभे राहा. यापेक्षा आणखी सद्‌भाग्य ते कुठले?’ तेव्हापासून धुंडिराज तेथेच वास्तव्य करून आहेत.
या अवताराचे मुख्य स्मारक काशी क्षेत्राधीश शंकरावर अनुग्रह करण्याकरिता हा अवतार झाला. याचे सूचक म्हणून शिवांनी स्वत: धुंडिराजाची स्थापना केली. या नावाचे रहस्यही साक्षादात्मत्वबोधकच आहे. बुद्धिस्थ आत्मा ज्ञाननिष्ठादी साधनबलांनी शोधूनच मिळवावयाचा असतो. ज्याला सगळेच शोधतात पण जो कोणास शोधीत नाही तो धुंडिराज परमात्मा होय. षडंगांसह चारही वेद, बहात्तर पुराणे, पंचविध इतिहास, मीमांसादी शास्त्रे, शिवादी परमेश्वर, यथाशास्त्र नाना प्रकारची साधने करणारे, योगीश्वर, देव, मानव, नाग, असुरादी जंतुमात्र इतकेच काय पण समग्र निर्गुणाभेद अशा ब्रह्मस्थितीतसुद्धा ज्याला शोधीत असतात. म्हणजे ज्याचा साक्षात्कार मिळविण्याची खटपट करीत असतात व तो मिळवून अंतिम स्वरूप ब्रह्मभावसिद्धीला प्राप्त होतात त्याला, ब्रह्मणस्पतीस्वरूप गणेशाला ‘ढुंढिविनायक’ म्हणतात.
उत्तरप्रदेशातील काशी, हिलाच वाराणशी म्हणतात. याच जागी शिवाने गंडकी नदीतील पाषाणाची ढुंढिराजाची मूर्ती करून आणून तिची प्रतिष्ठापना केली. काशीला जाणारे यात्रिक काशीविश्वनाथाच्या दर्शनाइतकेच ढुंढिराजाच्या दर्शनालाही महत्त्व देतात.
शोधणे या अर्थीचा मराठी धातू धुंडणे असा आहे. त्या धातुवरून गणेशाचे नाव धुंडिराज धुंडिविनायक असे होते. शोधणे या अर्थाचा हिंदी धातू ढूँढना असा आहे. त्यावरून पडलेले हिंदी नाव ढूंढिराज ढूँढिविनायक असे आहे. यामधील कोणते नाव स्वीकारावे हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे.
५०२) तत्त्वानां परमं तत्त्वम्‌---सर्व तत्त्वांमध्ये श्रेष्ठ तत्त्वस्वरूप. २५ तत्त्वांच्याही (प्रकृती-पुरुष-महत्‌तत्त्व-अहंकार आणि मन-पंच ज्ञानेन्द्रिये-पंच तन्मात्रा म्हणजे पंच महाभूतांचे सूक्ष्म अंश-शब्द तन्मात्रा-स्पर्श तन्मात्रा-रूप तन्मात्रा-गंध-तन्मात्रा) पलीकडचा. आणि पंचमहाभूते या २५ तत्त्वांवर सृष्टीची उभारणी आहे असे सांख्यशास्त्र मानते. या २५ तत्त्वांचे ज्ञान होईल, त्या पुरुषाला तो ब्रह्मचारी, गृहस्थ वा संन्यासी असो, तो सर्व दुःखांपासून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही.
५०३) तत्त्वंपदनिरूपित---तत्‌त्वमसि या वाक्यात तत्‌ आणि त्वम्‌ या पदांनी निरूपित.
तारकान्तर-संस्थान: तारक: तारकान्तक: ।
स्थाणु: स्थाणुप्रिय: स्थाता स्थावरं जङ्गमं जगत्‌ ॥९४॥
५०४) तारकान्तरसंस्थान---तारक म्हणजे बुबुळ. बुबुळात राहणारा. ज्याच्यामुळे डोळ्यांनी दिसते तो.
५०५) तारक---भवसागरातून तारून नेणारा.
५०६) तारकान्तक---तारकासुराचा संहार करणारा.
५०७) स्थाणु---सुस्थिर. सर्वथा अकम्पित. अढळ. कल्पान्ती. अग्नी-पाणी-वायू यांच्यामुळेही न डळमळणारा. अत्यंत स्थिर. दृढ.
५०८) स्थाणुप्रिय---शिवपुत्र. शिवाला प्रिय असणारा पुत्र. (स्थाणु: = शिव)
५०९) स्थाता---सर्व अस्तित्वांच्या आत स्थिर असणारे मूलतत्त्व. युद्धात, कल्पांतीही दृढतापूर्वक स्थित राहणारा.
५१०) स्थावरंजङ्गमंजगत्‌---स्थावर, जङ्गम जगताचा आधार. चराचर जगत्स्वरूप.
दक्षयज्ञप्रमथन: दाता दानवमोहन: ।
दयावान्‌ दिव्यविभव: दण्डभृत्‌ दण्डनायक: ॥९५॥
५११) दक्षयज्ञप्रमथन---दक्षयज्ञाचा शिवरूपात विध्वंस करणारा.
५१२) दाता---दानी, परमानंद देणारा, मोक्ष देणारा.
५१३) दानवमोहन--- दानवांना तत्त्वविमुख करणारा. दानवांना मोहात टाकणारा.
५१४) दयावान्‌---दयाळू
५१५) दिव्यविभव---दिव्य म्हणजेच स्वर्गीय वैभवाने संपन्न. दिव्य हेच ज्याचे दिव्य वैभव आहे.
५१६) दण्डभृत्‌---द्ण्ड धारण करणारा. दण्ड नीतीचा पालक.
५१७) दण्डनायक---सकल सत्तांचाही सत्ताधीश. यम. इन्द्र वगैरे दण्डांचा नेता.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५