Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक १६ ते २०

कर-आहतिध्वस्त-सिन्धुसलिल: पूषदन्तभित्‌ ।
उमाङ्क-केलि-कुतुकी मुक्तिद: कुलपालन: ॥१६॥
८२) कराहतिध्वस्तसिन्धुसलिल---ज्याने आपल्या सोंडेच्या आघाताने समुद्रजलाचा नाश केला तो. किंवा कर म्हणजे सोंड. आहति: म्हणजे आघात. सिन्धुसलिल म्हणजे भवसागर. भवसागराचा विध्वंस करणारा.
८३) पूषदन्तभिद्‌---दक्षयज्ञप्रसंगी वीरभद्ररूपात पूषा देवतेचे दात पाडणारा.
८४) उमाङ्ककेलिकुतुकी---उमादेवीच्या मांडीवर खेळण्याचे औत्सुक्य ज्याला असे, असा.
८५) मुक्तिद---संसारबंधनातून मुक्ती देणारा.
८६) कुलपालन---धर्मनिष्ठ कुळांचे पालन करणारा. कौलतंत्रासारख्या तंत्रमार्गाचेही पालन करणारा. ‘कु’ म्हणजे पृथ्वीतत्त्व. ते ज्याच्या ठिकाणी लीन होते, ते आधारचक्र म्हणजे ‘कुल’ होय. या कुलासंबंधीचे शास्त्र ते ‘कौल’ होय. ‘कुल’ म्हणजे शक्ती आणि ‘अकुल’ म्हणजे शिव. शिवावाचून शक्ती व शक्तीवाचून शिव हे कार्यक्षम होत नाही. असे या कौलतंत्रमार्गात म्हटले आहे.
किरीटी कुण्डली हारी वनमाली मनोमय: ।
वैमुख्य-हत-दैत्यश्री: पादाहति-जितक्षिति: ॥१७॥
८७) किरीटी---मस्तकावर मुकुट धारण करणारा किंवा अर्जुनरूप धारण करणारा.
८८) कुण्डली---कानात कुंडले धारण करणारा.
८९) हारी--- गळ्यात मोत्यांच्या वा रत्नांच्या माळा घालणारा. भक्तांचे मन हरण करणारा मनोहारी. भक्तांचा विघ्न-हारी.
९०) वनमाली---पायांपर्यंत रूळणारी वनमाला घालणारा.
९१) मनोमय---आपल्या मनाने जन्म घेणारा. आत्म्याच्या पाच कोशांपैकी (अन्नमय-प्राणमय-मनोमय-विज्ञानमय आणि आनंदमय) साक्षात्‌ मनोमयकोश जो आहे तो.
९२) वैमुख्यहतदैत्यश्री---नाराज होऊन दैत्यांचे वैभव नष्ट करणारा.
९३) पादाहतिजितक्षिति---आपल्या पायाच्या आघाताने सूंपर्ण पृथ्वीला नमविणारा किंवा व्यापणारा.
सद्योजात-स्वर्ण-मुञ्ञमेखली दुर्निमित्तहृत्‌ ।
दुःस्वप्नहृत्‌ प्रसहन: गुणी नादप्रतिष्ठित: ॥१८॥
९४) सद्योजातस्वर्णमुञ्ञमेखली---कोवळ्या सुवर्ण मुंजा गवताची मेखला धारण करणारा.
९५) दुर्निमित्तहृत्‌---अपशकुन नाहीसे करणारा.
९६) दुःस्वप्नहृत्‌---वाईट स्वप्नांचा नाश करणारा.
९७) प्रसहन---भक्तांचे अपराध सहन करणारा. क्षमा करणारा.
९८) गुणी---सकल सद्‌गुणांचा परम आधार असणारा.
९९) नादप्रतिष्ठित---ॐ काराच्या अ उ म्‌ नादात निवास करणारा.
सुरूप: सर्वनेत्र-अधिवासो वीरासन-आश्रय: ।
पीताम्बर: खण्डरद: खण्ड-इन्दुकृत-शेखर: ॥१९॥
१००) सुरूप---सुंदर रूप असलेला.
१०१) सर्वनेत्राधिवास---तेजतत्त्वरूपाने सर्वांच्या नेत्रात वास करणारा.
१०२) वीरासनाश्रय---परमतृप्तीचे आसन जे वीरासन त्या आसनात बसलेला. डावा पाय गुडघ्याजवळ मोडून त्याची टाच कमरेखाली आणून, पायाच्या बोटांवर बसणे म्हणजे वीरासन.
१०३) पीताम्बर---पीतवस्त्र धारण करणारा; आकाशासही गिळून टाकणारा.
१०४) खण्डरद---ज्याचा (डावा) दात तुटलेला आहे. डावा दात म्हणजे मायेची सत्ता. मायेची सत्ता जिथे खंडित होते तो.
१०५) खण्डेन्दुकृतशेखर---खण्डेन्दु म्हणजे चंद्रकोर. मस्तकावर चंद्रकोर धारण करणारा.
चित्राङ्क-श्यामदशन: भालचन्द्र: चतुर्भुज: ।
योगाधिप: तारकस्थ: पुरुष: गजकर्णक: ॥२०॥
१०६) चित्राङ्कश्यामदशन---दशन म्हणजे दात. हत्ती वयोवृद्ध झाला की त्याचे दात मलीन होत सावळे होतात. गणेश आद्यतम अस्तित्व. म्हणून त्याचे दात श्याम आहेत व त्यावर सुंदर चित्रकारी केली आहे. चित्रकारी केल्याने ज्याचे दात मलिन वाटतात. दात रत्नमंडित केले आहेत असा.
१०७) भालचन्द्र---भालप्रदेशावर चंद्र धारण केलेला. सर्व देवांमध्ये अत्यंत रूपवान्‌ म्हणून प्रसिद्ध असलेला चन्द्र दैवयोगाने दुर्बुद्धियुक्त होऊन गणेशाचे गजवक्त्रयुक्त स्वरूप पाहून उपहासबुद्धीने हसू लागला. त्या उपहासाचा परिणाम लागलीच त्याच्या प्रत्ययास आला. अत्यंत क्रुद्ध गणेशाने तत्काळ त्याला शाप दिला. ‘अरे दुरभिमानी चंद्रा ! यापुढे तुझे तेज नष्ट होईल. तू कुरूप होशील अन्‌ तुला जे पाहतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल.’ चंद्राचे तेज नष्ट झाले. तो कुरूप झाला. इतरांना तोंड दाखविण्याची त्याला लाज वाटू लागली. समुद्रकिनार्‍यावरच्या वाळूत तोंड खुपसून तो बसला. तोंड काळे करून जीवन कंठण्याचा त्याला कंटाळा आला. त्याची पत्नी रोहिणी हिच्या सांगण्यावरून त्याने ओंकारगणेशाची आराधना सुरू केली. ओंकारगणेश प्रसन्न झाले. चंद्राच्या याचनेवरून ‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी लोक माझी प्रतिष्ठापना करतील मात्र रात्री जे तुझ्याकडे पाहतील त्यांच्यावर संकटे येतील. त्यांच्यावर मात्र चोरीचा आळ येईल. आणि एरव्ही दरमहा शुक्ल द्वितीयेला जे तुझे दर्शन घेतील त्यांची संकटे दूर होतील. शिवाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझ्या पूजेची सांगता तुला अर्घ्य देण्याने व तुझ्या पूजनाने होईल व तुझ्या दर्शनानंतर जे उपवास सोडतील त्यांनाच या व्रताचे फळ मिळेल’ असा वर दिला. गणेशाच्या भाली द्वितीयेची चंद्रकोर असते म्हणून तो ‘भालचन्द्र’!
गोदावरीच्या तीरावर भालचंद्र गणेशाचे गंगामासले हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. मनमाड-काचीगुडा या रेल्वेमार्गावर सेलू नावाच्या स्टेशनपासून सुमारे बावीस कि. मी. अंतरावर हे गणेशक्षेत्र असून एकवीस पुराणोक्त गणपतीपैकी हे एक स्थान आहे.
१०८) चतुर्भुज---चार हात असणारा. सामान्य जीवांपेक्षा अधिक क्षमता, शक्ती असणारा. पाशांकुश व परशू धारण करणारे दोन हात दुष्टनिर्दालन करणारे तर मोदक व वरदहस्त सज्जनांना संतोष देणारे.द्वापर युगात भगवंतांनी गजाननावतार धारण केला तेव्हा गणेश चतुर्भुज होता. चार पदार्थांची स्थापना करणारा. म्हणजे स्वर्गामध्ये देवांनी राहावे. मृत्युलोकात मनुष्यांनी राहावे व पाताळात दैत्यादिकांनी राहावे अशी मर्यादा ठरविणारा, अर्थात्‌ त्यांचा स्थापक आणि या मर्यादेप्रमाणे वागणारांचे रक्षण करून विरुद्ध वागणारांना शिक्षा करणारा अशा अर्थी समग्र विश्वाधार अशा तत्त्वाची स्थितिस्थापना करणारा म्हणून चतुर्विधत्व स्थापक अशी विशेष सत्ता प्रकाशित करणारा एक अवतार. दैत्यांची माता जी दिती, तिने तपोबलाने प्रसन्न करून घेऊन वरदान मागितल्यावरून श्रीगणराजप्रभूंनी तिच्या घरी अवतार धारण केला. तोच ‘चतुर्भुज’ नामा गणेशाचा अवतार !
एकदा विष्णु आदी देवांनी दैत्यांना जिंकले. विश्वातील समस्त दैत्यांचा नाश करावयाचा या निश्चयाने देवांनी त्यांचा संहार चालू केला. तेव्हा ती सर्व दैत्यमंडळी दितीला शरण गेली. दिती अत्यंत दुःखी झाली. विश्वमर्यादेचा भंग व दितीची दुःखाकुलता यांमुळे तिचा पुत्र प्रभु चतुर्भुज गणेश क्रुद्ध झाला. त्याने देवांच्या नाशासाठी आपला परशू सोडून दिला. त्या दिव्य शस्त्राच्या अमोघ तेजामुळे समस्त देव अगदी होरपळून गेले तेव्हा सर्व देव चतुर्भुजास शरण आले व नानाप्रकारे स्तवन करून क्षमा मागू लागले. तेव्हा परशू शांत झाला. गणेश प्रसन्न झाले. सर्वांना आपापल्या स्थानी राहून. आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची मर्यादा ठरवून देणारा हा ‘चतुर्भुज’ अवतार.
१०९) योगाधिप---योगाच्या आरंभी व अंती ज्याची सत्ता चालते तो. योगारंभी मूलाधारचक्रात तर अंती सहस्रार चक्रातही गणेशज्ञान होते. गाणपत्य सांप्रदयात श्रीगणेशवर्णन - ‘सहस्रारे पद्मे हिमशशिनिभे कर्णिकामध्यदेशे’ असेच येते. अठ्ठावीस योगाचार्यरूप. (श्वेत, सुतार, मदन, सुहोत्र, कंकण, लोगाक्षी, जैगीषव्य, दधिवादन. ऋषभ, मुनी, उग्र, अत्री, सुबलाक, गौतम, वेदशीर्ष, गोकर्ण, गुप्तपासी, शिखंडभृत, जटामाली, अट्टहास, दारुक, लांगली, महाकायमुनी, शूली, मुंडीश्वर, सहिष्णू, सोमशर्मा आणि नकुलीश हे २८ योगाचार्य होत.) (शिवमहापुराण वायवीय संहिता)
११०) तारकस्थ---तारक असलेल्या प्रणव मन्त्रात विद्यमान असणारा. तेजतत्त्वाने तारकांमध्ये असणारा.
१११) पुरुष---पुर म्हणजे शरीर. समस्त शरीरात साक्षित्वाने राहणारा.
११२) गजकर्णक---ज्याचे कान हत्तीच्या कानासारखे विशाल आहेत असा. गज म्हणजे निर्गुण. निर्गुणस्तुतीचे जो श्रवण करतो तो.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५