Get it on Google Play
Download on the App Store

नामस्मरण - सप्टेंबर २७

गुरुने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे , आणि तो करतो हीही गोष्ट तितकीच सत्य आहे . पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पाहावे . देहातीत व्हायला , गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? ‘ मी देही नाही ’ असे म्हणत राहिलो तर केव्हातरी देहातीत होईन . दुसरा मार्ग म्हणजे ‘ भगवंत माझा ’ म्हणावे , म्हणजे देहाचा विसर पडतो . समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतिधर्म सांभाळा , आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरु नका . ‘ मी जे जे करतो ते ते भगवंताकरिता करतो ’ असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय . कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते . भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे . भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय . तोच काळ सुखात जातो की जो भगवत्स्मरणात जातो . खरोखर , स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे . भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय , आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय . वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे . आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते . विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते ; पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे . हे करणे अगदीच सोपे नाही ; परंतु ते फार कठीण देखील नाही . ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे .

भगवंताची भक्ती ही सहजसाध्य आहे . ती अनुसंधानाने साध्य होते . अनुसंधान समजून केले पाहिजे ; तिथे अनुभव लवकर येईल . पहार्‍यावर शिपाई जसा जागृत राहतो , त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील . चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून , अनुसंधान चुकू देऊ नये . ताप आला की तोंड कडू होते , मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही . त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे . एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला . परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता . परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला , ‘ आता मी मोकळा झालो बाबा ! ’ नंतर चार दिवस तो मजेत मुंबईत हिंडला , त्याप्रमाणे , आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे , आणि मग मजेने संसार करावा ; आपल्याला अगदी आनंदच मिळेल . उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो , त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे ; त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल . प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते , याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे होय .

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

स्तोत्रे
Chapters
नामस्मरण - सप्टेंबर १ नामस्मरण - सप्टेंबर २ नामस्मरण - सप्टेंबर ३ नामस्मरण - सप्टेंबर ४ नामस्मरण - सप्टेंबर ५ नामस्मरण - सप्टेंबर ६ नामस्मरण - सप्टेंबर ७ नामस्मरण - सप्टेंबर ८ नामस्मरण - सप्टेंबर ९ नामस्मरण - सप्टेंबर १० नामस्मरण - सप्टेंबर ११ नामस्मरण - सप्टेंबर १२ नामस्मरण - सप्टेंबर १३ नामस्मरण - सप्टेंबर १४ नामस्मरण - सप्टेंबर १५ नामस्मरण - सप्टेंबर १६ नामस्मरण - सप्टेंबर १७ नामस्मरण - सप्टेंबर १८ नामस्मरण - सप्टेंबर १९ नामस्मरण - सप्टेंबर २० नामस्मरण - सप्टेंबर २१ नामस्मरण - सप्टेंबर २२ नामस्मरण - सप्टेंबर २३ नामस्मरण - सप्टेंबर २४ नामस्मरण - सप्टेंबर २५ नामस्मरण - सप्टेंबर २६ नामस्मरण - सप्टेंबर २७ नामस्मरण - सप्टेंबर २८ नामस्मरण - सप्टेंबर २९ नामस्मरण - सप्टेंबर ३०