Get it on Google Play
Download on the App Store

उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४

३२९३

शहाणा तो जाण रे । उद्धवा आत्मत्वें पाहें रे । नेणता तो जाण रे । उद्धवा देहबुद्धीस वाहे रे ॥१॥

उद्धव म्हणे कान्होबा सांग रे । गोडा गोडा गोष्टी स्वभाव रे । निज गोडा गोष्टी ऐकतां । चित्त चैतन्य फांवे रे ॥२॥

सज्ञान तोची रे उद्धवा । ज्याची जाणीव विरे । अज्ञान तोची रे उद्धवा । ज्ञानग्र्वें हुंबरे ॥३॥

साधु तोची रे उद्धवा । जो सद्वस्तुतें दावी । असाधु तोची रे उद्धवा । देही प्रपंची गोवी ॥४॥

धर्मिष्ठ तोची रे उद्धवा । जो जन्ममरण निवारी । अधर्मीं तोची रे उद्धवा । लोभ दंभ शरीरीं ॥५॥

सुख तें जाण रे उद्धवा । जेथें मी तुं पण नुरे । दुःख ते जाण रे उद्धवा । काम सुखासी झुरे ॥६॥

शम तो जाण रे उद्धवा । ज्याची आत्मत्वें बुद्धीं । दम तो जाण रे उद्धवा । तो त्यागी उपाधी ॥७॥

धृतीची धारणा रे उद्धवा । जिव्हा उपस्थ जिंके । सोलीव करंटा तोचि रे उद्धवा । जिव्हा उपस्थी आटके ॥८॥

तप तें जाणरे उद्धवा । नित्य नामस्मरण । अभागी तोची रे उद्धवा । नामीं विन्मुखपण ॥९॥

बळिया बलिष्ठ तोची रे उद्धवा । निज मानसीं जिंकणें । नपुंसक तोची रे उद्धवा । मनामागें धांवणें ॥१०॥

लाभ तो जाण रे उद्धवा । नित्य भगवद्भक्ती । अलाभ तो जाण रे उद्भवा । सम ब्रह्मा देखणें ॥११॥

सत्य तें जाण रे उद्धवा । सम ब्रह्मा देखणें । असत्य तेंची रे उद्धवा । जो देह मी म्हणे ॥१२॥

वाचा सत्य अनुवादणें । तें लोक सत्य । सम ब्रह्मा न देखणें । तें अलक्ष्य निर्धूत ॥१३॥

उत्तम धर्म तोची रे उद्धवा । निज धर्म ज्या गांठीं । अधर्म तोची रे उद्धवा । धनलोभीया दृष्टी ॥१४॥

पावन यज्ञ तोची रे उद्धवा । द्विजमुखीं अर्पें । अधम यज्ञ तो उद्धवा । लोभावरी समर्पे ॥१५॥

वरिष्ठ लक्ष्मी ती जाण रे उद्धवा । सर्वभावीं निरास । अलक्ष्मी ते रे उद्धवा । ज्यासी आशापाश ॥१६॥

भाग्य तें जाण रे उद्धवा । वैराग्य बाणें । अभाग्य तेंची रे उद्धवा । जो देहीं मी म्हणे ॥१७॥

ईश्वर तोची रे उद्धवा । ज्यासी सर्व सत्ता । अनीश्वर तोचि रे उद्धवा । ज्यासी स्त्री आधीन जीविता ॥१८॥

पवित्र तोची रे उद्धवा । कर्मीं ब्रह्मा प्रीती । अपवित्र तोचि रे उद्धवा । कर्मीं बद्धप्राप्ती ॥१९॥

पंदित तोची रे उद्धवा । जो देह अहंता छेदी । मूर्ख तोचि रे उद्धवा । देह अभिमानी बुद्धी ॥२०॥

संन्यासी तोची रे उद्धवा । सर्व संकल्प त्यागी । परगृहीं तोची रे उद्धवा । मोह ममता अंगीं ॥२१॥

स्वर्ग तो जण रे उद्धवा । नित्य संग संतीं । नरक तो तो जाण रे उद्धवा । नित्य अधर्मीं वृत्ती ॥२२॥

सखा तो जाण रे उद्धवा । स्वयें सदगुरुराव । वैरी तो जाण रे उद्धवा । देहीं अहंभाव ॥२३॥

दरिद्री तो जाण रे उद्धवा । ज्यासी लोलुप चित्तीं । कृपण तोची रे उद्धवा । द्रव्यदारा आसक्ती ॥२४॥

एका जनार्दनीं कवित्य । चित्तीं चैतन्य गोड । एकीं एकहीं धरितां । पुर्व सर्वहीं कोड ॥२५॥

३२९४

भावें जनार्दन बोले उद्धवासी । बारे तूं परीयेसी गुह्मा गोष्टी ॥१॥

गुह्मा गोष्ट तुज सांगतों निभ्रांत । हृदयें फुटत आनंदेंसी ॥२॥

आनंदाचा रस न संडी प्रसंग । होसी जीवलग म्हणोनियां ॥३॥

म्हणोनी उद्धवा तुजसी बोलतां । भेदाचीये वार्ता नाहीं मज ॥४॥

मज तुज कांहीं नाहीं भिन्न भेद । कैवल्याचा सिद्ध तूंची एक ॥५॥

तूंची एक भक्तमाजीं शिरोमणी । आवडसी मनीं सर्वकाळ ॥६॥

सर्वकाळ तुज ध्याई अहर्निशीं । आनंद मानसीं समाधान ॥७॥

समाधीं विश्रांतीं मंडण ज्ञानाचा । नाहीं प्रपंचाचा लेश कांहीं ॥८॥

कांहीं एक क्रृष्णमुखीं गोष्टीलागीं । उद्धव सर्वांगी श्रवणार्थ ॥९॥

श्रवणीं सादर हरिमुख न्याहाळीं । सुखाचें कल्लोळीं प्रेमयुक्त ॥१०॥

प्रेमयुक्त पाहे सांवळें रूपडें । तेज चहूंकडे फांकतसे ॥११॥

फांकतसे तेज कुंडलाचे दाटी । वैजयंती कंठीं वनमाळा ॥१२॥

वनमाळा मुद्रिका चिद्रानें मुगुटा । कासेसी गोमटा पीतांबर ॥१३॥

पीतांबरधारी श्रीमुख सुंदर । चरणीं तोडर गर्जतसे ॥१४॥

गर्जती नेपुरें आरुणें रंगीला । टिळक रेखिला केशराचा ॥१५॥

केशराचा टिळक कुंकमाचीं पदें । उद्धव स्वानंदें लोळतसे ॥१६॥

लोळतां देखिला भक्त वेळाइते । आलिंगन देत उद्धवासी ॥१७॥

उद्धवा मज चाड नाही तपसाधनीं । नामसंकीर्तनीं प्रीत सदा ॥१८॥

सदा माझें नाम गाती जे भावेंसी । त्यासी मी मानसीं न विसंबें ॥१९॥

न विसंबें भक्ता नाम जया मुखीं । सरतां तिहीं लोकीं होय जाणा ॥२०॥

जाण नामासरी न पवे ब्रह्माज्ञान । तीर्थादि भ्रमण व्यर्थ पाहीं ॥२१॥

पाहे पां प्रल्हाद आसनीं शयनीं । नामाही वांचोनीं दुजें नेणें ॥२२॥

दुजें नेणें एक द्रौपदीं बहीणुली । हर्षें ते वेल्हाळी नाम स्मरे ॥२३॥

नाम स्मरतां गजेंद्रा तुटले बंधन । पतितपावन नाम श्रेष्ठ ॥२४॥

नाम सुखानंदें भवानीशंकर । जपे निरंतर नाम माझें ॥२५॥

माझ्या नामरंगीं गोपाळ गजरीं । घालती घुमरी आल्हादेंसी ॥२६॥

आल्हादें नाचती प्राण माझे ठायीं । सर्वांसी मी पाहीं त्यासारिखा ॥२७॥

सारिखाची होय थोरा आणि साना । जैसी हे वासना जनार्दनीं ॥२८॥

जनार्दना गातां धाक यमदूतां । येणें जाणें वार्ता तेथें कैंची ॥२९॥

कैंचा कळिकाळा पळे दशदिशा । माझ्या नामसरिता न राहेची तो ॥३०॥

चित्त मनें शुद्ध गाती माझें नाम । त्याचे दासीकाम करीन सत्य ॥३१॥

सत्य वोळंगणें भक्तांचें रंगणीं । वंदी पायवणी निजभावें ॥३२॥

भावाचा मी भोक्ता नावडेची कांहीं । नामालागीं पाही अंकीत मी ॥३३॥

अंकीत मी होय श्रवणीं संतुष्ट । तयासी वकुंठ आइतेंची ॥३४॥

आइताची ठेवी जीव तयावरी । निबलोण करी वेळोवेळां ॥३५॥

वेळोवेळां त्याचे द्वारींच तिष्ठत । नाहींच पाहत मानामान ॥३६॥

मानामान सर्व सांडिले उद्धवा । भक्तिप्रेमभावा लागोनियां ॥३७॥

लागवेग मज सप्रेम कीर्तनीं । लक्ष्मीं डावलोनि नामप्रेम ॥३८॥

प्रेम नाहीं मज योगी हृदयकमळीं । सवितां मंडळी स्थिर नव्हे ॥३९॥

नव्हे मी संतुष्ट महा यज्ञदानीं । पंचाग्नि साधनीं चाड नाहीं ॥४०॥

चाड असे तेथें हरिनाम गाती । त्याच्या पुण्या मिती ब्रह्मा नेणें ॥४१॥

ब्रह्मायाचा सुत नारद विख्यात । स्वबोधें डुल्लत नामबळें ॥४२॥

नामबळें देखा तरला चांडाळ । नेला आजामेळ मुक्तिपंथा ॥४३॥

मुक्तिपंथें नेलो नाम घेतां वाणी । तात्काळ कुंटणी तारियेली ॥४४॥

तारिल्या गोकुळीं गोपिकां सुंदरी । तयाचें शरीरीं मीच वसें ॥४५॥

वसे घरोघरीं प्राण माझे ठायीं । न विसंबती पाही क्षण मज ॥४६॥

मज आठविती उठतां बैसतां । दळितां कांडितां नाम माझें ॥४७॥

मज आठविती चालतां बोलतां । गाइते दुहिता नाम माझें ॥४८॥

माझिये स्मरणीं सुखाचे शेजारीं । प्रीति पडिभरी चित्त त्यांचें ॥४९॥

चिताचा चोरटा ज्यासी जैसा भाव । त्यासी मी वासुदेव तैसा होय ॥५०॥

ज्यासी माझे भजनीं संभ्रम । त्यासी मी आत्माराम प्रियकर ॥५१॥

प्रियकर आत्मा म्हणोनियां जाण । केलें निरूपण भक्तराया ॥५२॥

भक्तासी उपाव नामींच विस्तार । नाहीं आन थोर नामेंविण ॥५३॥

नाम सारासार ओंविया चौपन्न । करिती पठण निजभावें ॥५४॥

भावें उच्चारीं होय पाप धुणी । एका जनार्दनीं संकीर्तन ॥५५॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा

Shivam
Chapters
कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३ वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८ ब्राह्मण - अभंग २६०९ ते २६१३ विद्यावंत - अभंग २६१४ वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८ पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५ संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५ जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१ योगी - अभंग २६४२ तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४ महंत - २६४६ ते २६४६ मुक्त - अभंग २६४७ वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४ गोसावी - अभंग २६५५ ते २६६० गुरु - अभंग २६६१ ते २६६५ मानभाव - अभंग २६६६ ते २६६७ फकीर - अभंग २६६८ अर्थी - अभंग २६६९ आशाबद्ध - अभंग २६७० संत - अभंग २६७१ ते २६७२ फडकरी - अभंग २६७३ भजनी - अभंग २६७४ ते २६७५ पुजारी - अभंग २६७६ कथेकरी - अभंग २६७७ ते २७०० कथेकरी - अभंग २७०१ ते २७२० कथेकरी - अभंग २७२१ ते २७४० कथेकरी - अभंग २७४१ ते २७६० कथेकरी - अभंग २७६१ ते २७८० कथेकरी - अभंग २७८१ ते २८०८ समाधि योग - अभंग २८०९ ते २८२० समाधि योग - अभंग २८२१ ते २८४० समाधि योग - अभंग २८४१ ते २८६० समाधि योग - अभंग २८६१ ते २८८६ देह - अभंग २८८७ ते २९१० देह - अभंग २९११ ते २९३० देह - अभंग २९३१ ते २९५० देह - अभंग २९५१ ते २९७० देह - अभंग २९७१ ते २९९० देह - अभंग २९९१ ते ३०१२ स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५ स्त्री - अभंग ३०२६ ते ३०४१ धन - अभंग ३०४२ ते ३०५१ विषय - अभंग ३०५२ ते ३०७५ विषय - अभंग ३०७६ ते ३०८२ संसार - अभंग ३०८३ ते ३१०० संसार - अभंग ३१०१ ते ३१२० संसार - अभंग ३१२१ ते ३१४० संसार - अभंग ३१४१ ते ३१७७ मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२०० मुमुक्षूंस उपदेश - ३२०१ ते ३२२० मुमुक्षूंस उपदेश - ३२२१ ते ३२४० मुमुक्षूंस उपदेश - ३२४१ ते ३२६० मुमुक्षूंस उपदेश - ३२६१ ते ३२८० मुमुक्षूंस उपदेश - ३२८१ ते ३२९२ उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४ मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३१० मनास उपदेश - अभंग ३३११ ते ३३३० मनास उपदेश - अभंग ३३३१ ते ३३४३