Get it on Google Play
Download on the App Store

स्त्री - अभंग ३०२६ ते ३०४१

३०२६

बाइलेआधीन होय ज्याचें जिणें । तया अधमा नरकीं पेणें ॥१॥

बाईल मनोगतें ऐसा चाले । नावडती कोणाचे तया बोल ॥२॥

बाईल देवाचाही देव । ऐसा ज्याचा दृढ भाव ॥३॥

एका जनार्दनीं म्हणे मूढाला । बाइलेनें भुलविला ॥४॥

३०२७

रात्रंदिवस भार वाहे खरा । बाइलेंचें उदर भरितसे ॥१॥

नेणे दानधर्म व्रत आचरण । अतिथी पूजन स्वप्नी नाहीं ॥२॥

नेणे श्राद्ध पक्ष आपुला आचार । सदा दुराचारी कर्में करी ॥३॥

पत्‍नी गृहीं सदा वसवसे मन । न वेंची काहीं धन कवडी धन ॥४॥

एका जनार्दनीं ऐसा हीनभागी । जोडीतसे अभागी नरकवास ॥५॥

३०२८

निर्धन पुरुषाची देखा । स्त्री बोले अतिशय ऐका ॥१॥

दिवसा पोराची ताडातोडी । रात्रीं तुमची वोढावोढी ॥२॥

नाहीं घरीं खावया अन्न । संततीनें भरलें सदन ॥३॥

एका जनार्दनीं देवा । ऐसा स्त्रीचा हेलावा ॥४॥

३०२९

सदा सर्वकाळ बाइलेचा दास । होउनी कामास श्वान जैसा ॥१॥

नेणे भीड कधीं मर्यादा स्वजनीं । बाइलेचे कानीं गुज सांगें ॥२॥

बैसतां राउळीं बाइले एकान्त । देवापाशीं चित्त न बैसेचि ॥३॥

एका जनार्दनीं ऐसा तो पतित । अघोर भोगीत कल्पकोडी ॥४॥

३०३०

स्त्री पुत्र दारा धन । देखोनियां नाचे श्वान ॥१॥

जातां बळें कीर्तनीं । बका ऐसा बैसे ध्वनीं ॥२॥

लक्ष ठेउनी बाहेरी । वरवर डोले दुराचारी ॥३॥

एका जनार्दनीं म्हणे। श्वानापरि त्याचें जिणें ॥४॥

३०३१

स्त्रियांचें सगतीं । नोहें परमार्थ निश्चिती ॥१॥

स्वप्नीं होतां दरुशन । तेथेंच गुंततसे मन ॥२॥

पहा स्त्रियांच्या अंगसंगे । भुलविला ऋषिश्रृंग ॥३॥

विश्वामित्र तपिया खाणी । कुत्रा करूनी हिंडे वनीं ॥४॥

ऐसे भुलले थोर थोर । तेथें जीव किती पामर ॥५॥

एका जनार्दनीं भुलले । वायां स्त्रीसंगीं गुंतलें ॥६॥

३०३२

प्रपंचाचा कठिण लाग । नाशासी मूळ स्त्रीसंग ॥१॥

भोगाचे जें जें सुख । तें तें प्रत्यक्ष घेतो विख ॥२॥

दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥३॥

पुढील निमाले देखती । पाहुनी पुढे उडी घालिती ॥४॥

ऐसे भुलले तया संगीं । एका जनार्दनीं जगीं ॥५॥

३०३३

कन्येचा करी जो नर विकरा । चांडाळ तो खरा अधमची ॥१॥

तयाचिया मुखा श्वानाची ते विष्ठा । पातकी वरिष्ठा सर्वाहुनीं ॥२॥

पंचमहापातकी विश्वासघातकी । यापरता दोष का तया अंगीं ॥३॥

एका जनार्दनीं त्याचें नाम घेतां । सचैल सर्वथा स्नान कीजे ॥४॥

३०३४

गौ आणि कन्या कथेचा विकरा । चांडाळ निर्धार पापराशी ॥१॥

तयाचें तें मुख न पाहती जन । अपवित्र दुर्जन पातकी तो ॥२॥

एका जनार्दनीं दोषां न परिहार । भोगिती अघोर कल्पकोटीं ॥३॥

३०३५

व्याही जांवयांच्या कोडी । पोषितसे अति आवडी ॥१॥

देहसुखाचिया चाडा । अवघे मेळविले वोढा ॥२॥

देहीं वाढवी अतिप्रीती । पुत्र दारा माझे म्हणती ॥३॥

जैसा जोंधळा कणा चढे कणभारे क्षितीं पडें ॥४॥

वृक्षा फळे येती अपारें । फळभारें वृक्ष लवें ॥५॥

ऐसा भुलला स्वजनासी । एका जनार्दनीं सायासी ॥६॥

३०३६

कन्या पुत्रादिक धन । हें तो जाण भ्रमवत् ॥१॥

मागील अनुभव घेउनी कसवटी । पडलीसे तुटी रामनामीं ॥२॥

नाथिले याचा काय तो धिवसा । कवण तो आकाशा कुंपण घाली ॥३॥

अभ्रींची छाया मृगजळ पाणी । काय तें रांजणीं भरतां येतें ॥४॥

एका जनार्दनीं सारीमारीचेंक वचन । काय तें प्रमाण आयुष्याविण ॥५॥

३०३७

लेंकुरातें बाप खेळवी साचें । बाईल देखतां ती पुढें नाचे ॥१॥

माझां बाप माझी आई । बाईल देखतां नाचतो पायीं ॥२॥

धडसेनी तोंडे बोबडें बोले । आवडीनें म्हणे पाहे बाइले ॥३॥

सासू सासरा पहाती साला । नाचतो जांवई घेउनी मुला ॥४॥

यापरी ममता नाचवी जन । देवद्वारीं आलीया धरी अभिमान ॥५॥

एका जनार्दनीं सांडोनी अभिमान । संतापुढें नाचें धरूनियां कान ॥६॥

३०३८

गुंतलासी मायापाशी । कोण सोडवील तुजसी । धाये मोकलेनि रडसी । न ये करूणा कवणातें ॥१॥

वाचे सदा नाम गाय । तेणें चुकती अपाय । सहजची सोय । नाम मुखीं वदतां ॥२॥

बंधनाची तुटेल बेडी । होईल कैवल्याची सहज जोडी । एका जनार्दनीं आवडी । रामनामीं धरितां ॥३॥

३०३९

वेद गुरु माता पिता । ऐसा भाव जया चित्ता ॥१॥

नाहीं दुजा आठव कांहीं । चित्त जडलें चौघांपायीं ॥२॥

एका जनार्दनीं साचें । ऐसें मनीं नित्य ज्याचे ॥३॥

३०४०

माता पिता देव गुरु । ऐसा ज्याचा । एक विचारु ॥१॥

धन्य धन्य तयाचें शरीर । नर नोहे तो ईश्वर ॥२॥

चारी दैवतें समान मानी । शरण एका जनार्दनीं ॥३॥

३०४१

मातापितयांसी जो करी नमन । धन्य त्याचें पुण्य इह जगीं ॥१॥

मातापितयांचें करी जो पूजन । धन्य तयाचें पुण्य इहलोकीं ॥२॥

मातापितयांची करीत जो सेवा । एका जनार्दनीं देवा वरिष्ठ तो ॥३॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा

Shivam
Chapters
कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३ वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८ ब्राह्मण - अभंग २६०९ ते २६१३ विद्यावंत - अभंग २६१४ वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८ पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५ संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५ जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१ योगी - अभंग २६४२ तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४ महंत - २६४६ ते २६४६ मुक्त - अभंग २६४७ वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४ गोसावी - अभंग २६५५ ते २६६० गुरु - अभंग २६६१ ते २६६५ मानभाव - अभंग २६६६ ते २६६७ फकीर - अभंग २६६८ अर्थी - अभंग २६६९ आशाबद्ध - अभंग २६७० संत - अभंग २६७१ ते २६७२ फडकरी - अभंग २६७३ भजनी - अभंग २६७४ ते २६७५ पुजारी - अभंग २६७६ कथेकरी - अभंग २६७७ ते २७०० कथेकरी - अभंग २७०१ ते २७२० कथेकरी - अभंग २७२१ ते २७४० कथेकरी - अभंग २७४१ ते २७६० कथेकरी - अभंग २७६१ ते २७८० कथेकरी - अभंग २७८१ ते २८०८ समाधि योग - अभंग २८०९ ते २८२० समाधि योग - अभंग २८२१ ते २८४० समाधि योग - अभंग २८४१ ते २८६० समाधि योग - अभंग २८६१ ते २८८६ देह - अभंग २८८७ ते २९१० देह - अभंग २९११ ते २९३० देह - अभंग २९३१ ते २९५० देह - अभंग २९५१ ते २९७० देह - अभंग २९७१ ते २९९० देह - अभंग २९९१ ते ३०१२ स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५ स्त्री - अभंग ३०२६ ते ३०४१ धन - अभंग ३०४२ ते ३०५१ विषय - अभंग ३०५२ ते ३०७५ विषय - अभंग ३०७६ ते ३०८२ संसार - अभंग ३०८३ ते ३१०० संसार - अभंग ३१०१ ते ३१२० संसार - अभंग ३१२१ ते ३१४० संसार - अभंग ३१४१ ते ३१७७ मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२०० मुमुक्षूंस उपदेश - ३२०१ ते ३२२० मुमुक्षूंस उपदेश - ३२२१ ते ३२४० मुमुक्षूंस उपदेश - ३२४१ ते ३२६० मुमुक्षूंस उपदेश - ३२६१ ते ३२८० मुमुक्षूंस उपदेश - ३२८१ ते ३२९२ उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४ मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३१० मनास उपदेश - अभंग ३३११ ते ३३३० मनास उपदेश - अभंग ३३३१ ते ३३४३