बैल व बेडूक
एक बैल कुरणात चरत असता तेथे काही लहान बेडूक खेळत होते. त्यातील एक बेडूक बैलाच्या पायाखाली चेंगरून मरण पावला. ती हकीगत इतर बेडकांनी घरी जाऊन आपल्या आईस सांगितली. ते म्हणाले, 'आई, इतका मोठा प्राणी आम्ही कधी पाहिला नव्हता.' ते ऐकून बेडकीने आपले पोट फुगविले आणि म्हटले, 'काय, तो इतका मोठा होता का?' त्यावर तिची मुले म्हणाली, 'नाही आई, याहून मोठा.' पुन्हा आणखी पोट फुगवून बेडकीने विचारले, 'काय रे, तो इतका मोठा होता का?' त्यावर पिले म्हणाली, 'आई, तू जरी आपलं पोट फुटेपर्यंत फुगवलंस तरी तुझं मोठेपण त्या प्राण्याच्या पासंगालाही पुरणार नाही.' हे ऐकून बेडकी मोठ्या गर्वाने आणखी फुगू लागली व त्याच वेळी तिचे पोट फुटले व ती तेथेच मरण पावली.
तात्पर्य
- ज्याच्याशी आपली बरोबरी होणार नाही, त्याच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणा होय.