दोन वाटसरू
दोन वाटसरू रस्त्याने बरोबर चालले असता, त्यापैकी एकाला रस्त्यावर पडलेली एक पैशाची पिशवी सापडली. ती उचलून घेऊन तो आपल्या सोबत्याला म्हणाला, 'अरे, ही पहा मला पैशांची पिशवी सापडली.' त्यावर सोबती म्हणाला, 'अरे, 'मला सापडली' असं का म्हणतोस ? 'आपल्याला सापडली' असं म्हण. आपण दोघं बरोबर चाललो आहोत, तेव्हा लाभ किंवा हानी जे काय होईल ते दोघांचं.' हे ऐकून पिशवी सापडलेला वाटसरु म्हणाला, 'हो तर ! मला सापडलेल्या धनाचा वाटा मी तुला काय म्हणून देऊ?' मग ते दोघे काहीसे पुढे गेले. तोच ज्याची पिशवी हरवली होती तो माणूस सरकारचे शिपाई घेउन त्यांच्यामागून शोध करीत आला. त्याला पाहून पिशवी सापडलेला वाटसरू आपल्या सोबत्यास म्हणाला, 'मित्रा, आपण फार वाईट गोष्ट केली.' सोबत्याने लगेच उत्तर दिले, बाबा रे आता आपण फार वाईट गोष्ट केली.' असं का म्हणतोस ? 'मी फार वाईट गोष्ट केली' असं म्हण. जर तू मला तुझ्या सुखाचा वाटेकरी केलं असतंस तर मीही तुझ्या दुःखाचा वाटेकरी झालो असतो.'
तात्पर्य
- सुखाच्या वेळी कोणाला विचारणार नाही, पण संकटाच्या वेळी मात्र लोकांनी मदत केली पाहिजे अशी समजूत असणे मूर्खपणाचे होय.