बकरीने पाळलेले मेंढरू
एका बकरीने एक मेंढराचे पोर पाळले होते. ते एके दिवशी त्या बकरीबरोबर चरत असता, एक लांडगा त्या वाटेने जात होता. तो त्या मेंढरास म्हणाला, 'मुला, ही बकरी तुझी खरी आई नाही तुझी आई ती पहा त्या कळपात चरते आहे.' त्यावर त्या मेंढराने उत्तर दिले, 'बाबा, तू म्हणतो आहेस ते खरं आहे, पण जिने मला काही महिने केवळ निरुपाय म्हणून आपल्या पोटात बाळगलं नि जन्म दिल्यावर तिथेच टाकून दिलं. तिला मी आई कसं म्हणू ? मी तर ह्या बकरीलाच माझी आई समजतो, कारण माझं अनाथाचं पालन करून तिने मला संरक्षण दिलं.' तरीही लांडगा पुन्हा म्हणाला, 'अरे, जिने जन्म दिला, ती तुला अधिक पूज्य वाटायला हवी !' मेंढरू म्हणाले, 'मी काळा आहे की गोरा आहे, हे पाहण्यासाठी न थांबता जी जन्माल्याबरोबर टाकून गेली, तिला मी काही आई म्हणणार नाही.'
तात्पर्य
- मुलांना जन्म देणारे आईवडील सगळेच असतात पण जे मुलाचे पालनपोषण करतात, शिक्षण देतात, तेच खरे आईवडील होत.