गोठ्यातील सांबर
एका सांबराला पारध्याच्या कुत्र्यांनी झाडीतून हुसकावले तेव्हा ते पळत पळत एका खेड्यातील गुरांच्या गोठ्यात शिरले व कडब्याच्या गंजीत लपून राहिले. तेव्हा गोठ्यातील एक बैल त्याला म्हणाला, 'अरे, तू येथे येऊन काय करायचं ठरविलं आहेस ? तू ज्या मरणाला भिऊन इथे लपतो आहेस, ते मरण इथेच तुला फार लवकर येईल.' त्यावर सांबर त्याला म्हणाले, 'मित्रा, जर तुम्हीसर्व कृपा करून गप्प रहाल तर माझा निभाव लागेल, संधी साधून मी लवकरच इथून बाहेर पडेन.'
संध्याकाळपर्यंत ते सांबर तेथेच राहिले. संध्याकाळ होताच प्रथम कडब्याच्या पेंड्या घेऊन गुराखी गोठ्यात आला. त्याच्या दृष्टीस ते पडले नाही. त्यानंतर वाड्यातील कारभारी आला. त्याचेही लक्ष त्याकडे गेले नाही.
आपल्याकडे कोणाचेही लक्ष नाही या गोष्टीचा सांबराला फार आनंद झाला. ते बैलास म्हणू लागले, 'मित्रा, आज मी वाचलो, तो तुमच्यामुळेच. तुमच्याइतके परोपकारी कोणीही नसेल.' हे ऐकून त्यातील एक बैल त्याला म्हणाला, 'आता तू येथे न थांबता आपल्या घरी निघून जावंस हे बरं ! देव करो अन् तू आहेस तोवर या वाड्याचा मालक येऊ नये, कारण त्याच्या तीक्ष्ण दृष्टीपुढे तुला या गंजीआड लपता येणार नाही.' असे बोलत असतानाच त्या वाड्याचा मालक तेथे आला व नोकरांवर ओरडाआरडा करीत रागारागाने इकडे तिकडे फिरू लागला. तोच त्याला गंजीआड लपलेले सांबर दिसले. ते पाहताच तो ओरडू लागला, 'सांबर ! सांबर ! धावा रे, धावा !'
मालकाचे ओरडणे ऐकून चार नोकर काठ्या घेऊन धावत आले व त्या सांबरास त्यांनी ठार मारले.
तात्पर्य
- ज्या ठिकाणी भीती आहे, त्या ठिकाणी दैवयोगानं एक दोन वेळा बचाव झाला असता, तसा कायम होईल असे समजू नये.