दोरीवरचा नाच
एक मुलगा गुरूजवळ दोरीवर उभे राहून नाचण्याचा खेळ शिकत होता. शिकत असताना तोल संभाळण्यासाठी त्याला हातात एक काठी घ्यावी लागत असे.
त्या मुलास नेहमी असे वाटे की, ह्या काठीची आपणास काही जरुरी नाही. शेवटी एके दिवशी तो आपल्या गुरूस म्हणाला, 'गुरुजी, या लांबलचक काठीचा उपयोग काय ? या काठीची मदत न घेता मी दोरीवर सहज कसरत करू शकेन. ह्या जड काठीमुळे मला अडचण होते. मी सशक्त व चपळ असल्याने काठी न घेता सुद्धा दोरीवर कसरत करू शकेन मी आताच तुम्हाला तसे करून दाखवतो.'
आणि लगेचच त्याने हातातील काठी खाली टाकली. काठी खाली टाकताच त्याचा तोल चुकला व तो दोरीवरून खाली पडला.
त्यावेळी त्याचे गुरू त्याला म्हणाले, 'मूर्ख मुला ! भोग आपल्या कर्माची फळं. मनात येईल तसं वागण्याच्या हट्टी स्वभावामुळं तू आपली हाडं मोडून घेतलीस. तू जी कला शिकतो आहेस त्याचं मुख्य साधन काठी. माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा जर तू ती टाकून देशील तर हाच अनुभव तुला पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही.'
तात्पर्य
- पूर्ण माहिती नसलेल्या शिष्याने गुरूच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू नये.