अध्याय ३५
श्रीगणेशाय नमः ॥
माझे ह्रदय दिव्य कमळ ॥ जे तेजोमय परम निर्मळ ॥ अष्टकर्णिका अतिकोमळ ॥ मध्ये घननीळ विराजे ॥१॥
ह्रत्पद्म मध्ये गंभीररेखा ॥ श्रीरंग नांदे भक्तसखा ॥ अष्टकर्णिकांवरी अष्टनायिका ॥ त्याही स्थापू निजध्यानी ॥२॥
रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा ॥ कालिंदी मित्रविंदा मनोरमा ॥ याज्ञजिती लक्ष्मणा पूर्णकामा ॥ मद्रावती आठवी ॥३॥
मध्यभागी श्रीकरधर ॥ कर्णिकांवरी नायिका सुकुमार ॥ ऐसा ह्रदयकमळी यादवेंद्र ॥ सर्वदाही पूजावा ॥४॥
चौतिसावे अध्यायी कथा जाणा ॥ धर्मै अग्रपूजा दिधली कृष्णा ॥ तेणे क्षोभ आला दुर्जना ॥ शिशुपाळादिकांसी ॥५॥
चैद्य आणि कौरव ॥ एके सभेसी बैसले सर्व ॥ क्षुद्रदृष्टी लक्षिती माधव ॥ परम द्वेषी दुरात्मे ॥६॥
शिवलिंग देखता दृष्टी ॥ शिवद्वेषी होती जेवी कष्टी ॥ की विष्णुप्रतिमा पाहता पोटी ॥ दुःख कपाळी जंगमा ॥७॥
की देखता साधूंचे पूजन ॥ परम क्षोभती जैसे कुजन ॥ की पतिव्रतेची राहटी पाहोन ॥ जारिणी जेवी निंदिती ॥८॥
की दृष्टी देखता राजहंस ॥ कावळियांसी उपजे त्रास ॥ की पंचानना देखूनि सावकाश ॥ जंबुकासी आनंद वाटेना ॥९॥
की सभेत देखोनि पंडित ॥ मूर्ख मतिमंद संतापत ॥ की दृष्टी देखता समीरसुत ॥ वाटे अनर्थ रजनीचरा ॥१०॥
की ऐकता हरिनामघोष ॥ भूतप्रेतांसी उपजे त्रास ॥ तैसे पूजिता श्रीरंगास ॥ दुर्जन परम संतापले ॥११॥
अंतरीच कष्टी कौरव संपूर्ण ॥ परी चैद्यांमाजी दमघोषनंदन ॥ परम दुखावला दुर्जन ॥ काळसर्प ज्यापरी ॥१२॥
भीष्मासी म्हणे कुंतीनंदन ॥ आता कोणाचे करू पूजन ॥ गंगात्मज बोले वचन ॥ तो शिशुपाळ जल्पे भलतेचि ॥१३॥
म्हणे रे धर्मा ऐक वचन ॥ तुम्ही नीच मूर्ख अवघेजण ॥ गोरक्षक आधी पूजन ॥ अपेश माथा घेतले ॥१४॥
योग्यायोग्य विचार ॥ मूढा तुज न कळे साचार ॥ अग्रपूजेसी अधिकारी जार ॥ करिता पामर पांडव तुम्ही ॥१५॥
दोघे जनक त्या गोरक्षाते ॥ पंच तात तुम्हां पांडवांते ॥ यालागी दोघांची चित्ते ॥ एक जाहली परस्परे ॥१६॥
परम मूर्ख युधिष्ठिर ॥ बुद्धिभ्रष्ट जाहला गंगाकुमर ॥ पूजेसी अधिकारी तस्कर ॥ केला साचार यज्ञमंडपी ॥१७॥
ऋत्विज सांडूनि सत्यवतीकुमर ॥ कपिल याज्ञवल्क्य वसिष्ठ ब्रह्मपुत्र ॥ द्रोण कृपाचार्य गुरुवर ॥ टाकूनि जार पूजिला ॥१८॥
धृतराष्ट्र सांडूनि वृद्ध ॥ सोयरा सांडूनि द्रुपद ॥ कोण्या विचारे बुद्धिमंद ॥ हा गोविंद पूजिला ॥१९॥
अश्वत्थामा गुरुनंदन ॥ पूजावा होता सूर्यसुत कर्ण ॥ पृथ्वीपति सुयोधन ॥ सांडूनि कृष्ण पूजिला ॥२०॥
भीमक वाल्हीक वृद्ध थोर ॥ शल्य एकलव्य भगदत्त वीर ॥ जयद्रथ शकुनि महावीर ॥ सांडूनि तस्कर पूजिला ॥२१॥
पूज्य अपमानूनि थोर थोर ॥ अपूज्यासी पूजिले साचार ॥ येणे तुमचे यश कीर्ति पुण्य समग्र ॥ बुडोनि भ्रष्ट जाहले ॥२२॥
येणे कोणते केले अनुष्ठान ॥ की केले जप तप व्रत साधन ॥ किंवा येणे केले वेदपठन ॥ म्हणोनि आधी पूजिला ॥२३॥
यासी म्हणावे रायासमान ॥ तरी नाही छत्रसिंहासन ॥ आचार्य नव्हे हा ब्राह्मण ॥ भ्रष्टपूजन व्यर्थ केले ॥२४॥
आम्ही बैसलो नृपवर ॥ आधी पूजिला गोपाळकुमर ॥ आमुचे घ्राण छेदिले समग्र ॥ परम अपवित्र पांडव तुम्ही ॥२५॥
पूजणे होते जरी गोवळा ॥ तुवा कुष्ठपुत्रा अमंगळा ॥ आम्हांसी का आणिले खळा ॥ यज्ञ गेला वृथा तुझा ॥२६॥
म्या तुज दिधला करभार ॥ की दुर्बळा हा कुष्ठपुत्र ॥ धर्मकृत्यासी साह्य करावे साचार ॥ विवेकी नर बोलती ॥२७॥
अपमानिले भूपाळा ॥ येथे थोर केला गोवळा ॥ इतुकेनि आम्हा नीचत्व सकळा ॥ सर्वथाही नव्हेचि ॥२८॥
यज्ञपुरोडाश अरण्यांत पडिला ॥ तो एका जंबुकासी लाधला ॥ तितुकेने काय तो श्रेष्ठ झाला ॥ मृगेंद्राहूनि थोर पै ॥२९॥
जैसी राजकन्या परम सुंदर ॥ षंढाप्रति दिधली साचार ॥ हिंसकासी गोदान निर्धार ॥ दिधले तुवा पंडुपुत्रा ॥३०॥
जन्मांधासी दर्पण दाविला ॥ सूकर सिंहासनी बैसविला ॥ येणे जरासंध कपटे मारिला ॥ कोणता केला पुरुषार्थ ॥३१॥
ऐसे बोलोनि पापमती ॥ खड्ग गवसवूनि आपुले हाती ॥ म्हणे उठा रे आमुचे सांगाती ॥ जे असाल तितुकेही ॥३२॥
ऐसे बोलता शिशुपाळ ॥ तात्काळ उठिले अवघे खळ ॥ कृष्णद्वेषी परम चांडाळ ॥ अति कोल्हाळ करिती ते ॥३३॥
धर्मे धांवोनि तत्काळ ॥ ह्रदयी कवळिला शिशुपाळ ॥ म्हणे तू आमुचा बंधु केवळ ॥ यज्ञ हा सकळ तुझा असे ॥३४॥
ऋषि तपस्वी वृद्ध राजेंद्र ॥ कृष्ण पूजिता त्यांसी आनंद थोर॥ तूही कृष्णभजनी सादर ॥ अनन्य होई शिशुपाळा ॥३५॥
परम जाणता गंगानंदन ॥ वृद्ध वडील सर्वमान्य ॥ त्याचे आज्ञेने म्या केले पूजन ॥ तू का दूषण ठेविसी ॥३६॥
तुजहूनि जाणते पंडित ॥ कृष्णपूजने ते आनंदत ॥ तुझे ह्रदयी हा अनर्थ ॥ काय म्हणोनि प्रवेशला ॥३७॥
तंव भीष्म यथार्थ बोले वचन ॥ परम नष्ट हा दमघोषनंदन ॥ त्याचे कासया करिसी शांतवन ॥ त्यासी मरण जवळी असे ॥३८॥
का याचे करिसी समाधान ॥ कदा न मानी तुझे वचन ॥ जैसी वस्त्रे भूषणे प्रेतासी पूर्ण ॥ काय लेववून सार्थक ॥३९॥
मतिमंदापुढे ठेविले शास्त्र ॥ षंढाहाती दिधले शस्त्र ॥ मसणी मंडप विचित्र ॥ व्यर्थ जैसे उभारिले ॥४०॥
वायसासी अमृतफळे ॥ की उष्ट्रासी समर्पिले केळे ॥ की रासभाच्या अंगासी लिंपिले ॥ भृगमदाचे उटणे हो ॥४१॥
द्राक्षफळे अर्पिली सूकरा ॥ आदर्श दाविला जन्मांध नरा ॥ की कृमियांसी समर्पिली शर्करा ॥ तैसा या पामरा काय बोध ॥४२॥
भग्नपात्री जीवन ॥ का श्रमावे व्यर्थचि घालून ॥ दुग्धामाजी हरळ रांधून ॥ काय व्यर्थचि जाण पा ॥४३॥
उकिरडां ओतिले सुधारसा ॥ सुमनशेजेवरी निजविली म्हैसा ॥ दुग्धे न्हाणिले वायसा ॥ शुभ्र नव्हे कदापि ॥४४॥
तैसा हा सुबुद्धि न धरी पामर ॥ जैसा तस्कर विटे देखोनि निशाकर ॥ हिंसकासी धर्मशास्त्र साचार ॥ कदा नावडे जाण पा ॥४५॥
आम्ही ज्याचे केले पूजन ॥ त्यासी ह्रदयी ध्यान ईशान ॥ जलजोद्भव सहस्त्रनयन ॥ अनन्यशरण जयासी ॥४६॥
जो जगद्गुरु इंदिरावर ॥ जो प्रतापमित्र समरधीर ॥ ऐसा कोण असे पामर ॥ जो पूजा इच्छी त्याआधी ॥४७॥
जो भवगजविदारक पंचानन ॥ सनकदिक ज्यासी शरण ॥ त्यासी आधि पूजिता पूर्ण ॥ का हा दुर्जन दुखावला ॥४८॥
जो अनंतब्रह्मांडनायक ॥ भोगींद्र जाहला ज्याचा तल्पक ॥ तो पुराणपुरुष निष्कलंक ॥ जगद्वंद्य अनादि जो ॥४९॥
हा एवढी आगळीक बोलत ॥ कोठे याने केला पुरुषार्थ ॥ महागज देखता भुंकत ॥ श्वान जेवी अनिवार ॥५०॥
ऐसे बोलता शंतनुकुमर ॥ तो सहदेवासी आवेश दाटला थोर ॥ जैसा का गजांत मृगेंद्र ॥ उभा राहोनि बोले ते वेळी ॥५१॥
आम्ही सभास्थानी निश्चित ॥ यथार्थ पूजिला वैकुंठनाथ ॥ असह्य मानी त्याचे पूर्वज समस्त ॥ चरणातळी माझिया ॥५२॥
जो कृष्णासी निंदी दुर्जन ॥ त्याची जिव्हा घ्राण छेदीन ॥ रासभावरी बैसवून ॥ पिटीन जाण दिगंतरी ॥५३॥
ऐसे सहदेव बोलता आगळे ॥ जयजयकारे देव गर्जले ॥ पुष्पांजुळी वोपिते झाले ॥ माद्रीपुत्रावरी तेधवा ॥५४॥
आकाशी देववाणी गर्जत ॥ धन्य धन्य सहदेव भक्त ॥ नारद म्हणे ऐका समस्त ॥ मोठा अनर्थ होईल आता ॥५५॥
जेणे निंदिला द्वारकानाथ ॥ त्याजवळी आला रे अनर्थ ॥ तो प्रेतप्राय निश्चित ॥ जननी व्यर्थ प्रसवली ॥५६॥
ऐसे ऐकोनि ते वेळा ॥ शिशुपाळ अत्यंत क्षोभला ॥ घेऊनि दुर्जनांचा मेळा ॥ उभा ठाकला संग्रामा ॥५७॥
म्हणे या वेळे पांडव भीम ॥ कृष्णासमवेत करीन भस्म ॥ अवघे खळ निघोनि परम ॥ कोल्हाळ करिती तेधवा ॥५८॥
जैसा दृष्टी देखता राजहंस ॥ एकदांचि कोल्हाळ करिती वायस ॥ युधिष्ठिर म्हणे भीष्मास ॥ कैसे आता करणे जी ॥५९॥
मग बोले गंगाकुमर ॥ तू स्वस्थ राही न सांडी धीर ॥ कैसा तरेन मी सागर ॥ कुंभोद्भवे विचार करावा का ॥६०॥
निद्रिस्थ श्रीकृष्णपंचानन ॥ तववरीच हे जंबुक करिती गर्जन ॥ हा धडधडित कृशान ॥ दुर्जनकानन जाळील पै ॥६१॥
श्रीकृष्णवडवानळावरी एक वेळे ॥ चैद्य उठले तृणाचे पुतळे ॥ शिशुपाळ कर्पूर बळे ॥ पुढे धावतो विझवावया ॥६२॥
याचा परिवार जो सकळी ॥ ही मेणाची जैसी बाहुली ॥ श्रीरंग हा ज्वाळामाळी ॥ भस्म करील क्षणार्धे ॥६३॥
ऐसे ऐकता शिशुपाळ ॥ क्रोधे खवळला जैसा व्याळ ॥ कुशब्द तेचि टाकी गरळ ॥ भीष्मासी समोर लक्षूनिया ॥६४॥
म्हणे रे भीष्मा दुष्टा वृद्धा ॥ परम हीना बुद्धिमंदा ॥ कपटिया आमुची करतोसी निंदा ॥ तुझी जिव्हा का झडेना ॥६५॥
कोणता कृष्णे केला पुरुषार्थ ॥ म्हणोनि जल्पसी सभेआत ॥ पूतना वृद्ध स्त्री मारिली सत्य ॥ म्हणोनि वाढीव बोलसी ॥६६॥
केशी अश्व मारिला देख ॥ काळिया अघासुर दंदशूक ॥ बकासुर पक्षी एक ॥ मारूनि पुरुषार्थी जाहला ॥६७॥
गोवर्धन तरी एक वल्मीक ॥ कपटी म्हणोनि गिळिला पावक ॥ कपटेचि कंस काळयवनादिक ॥ मारिले येणे गोवळे ॥६८॥
तस्करामाजी अतिश्रेष्ठ ॥ जारांमाजी परम वरिष्ठ ॥ कपटी नाटकी परम नष्ट ॥ स्वधर्मभ्रष्ट गोवळा ॥६९॥
अरे भीष्मा तु परम दुर्जन ॥ काशीपतीच्या कन्या नेल्या हिरून ॥ त्यात एके स्त्रीने दिधला प्राण ॥ तुजवरी नपुंसका ॥७०॥
लोकांसी निरोपिसी धर्म ॥ मूढा तूचि करिसी अधर्म ॥ ऐसी निंदा ऐकता भीम ॥ गदा सावरोनि सरसावला ॥७१॥
जैसा केवळ खदिरांगार ॥ तैसे आरक्त दिसती नेत्र ॥ म्हणे हे दुर्जन अपवित्र ॥ चूर्ण करीन गदाघाये ॥७२॥
भीष्मे धरूनि भीमाचा हात ॥ म्हणे क्षण एक राहे तू स्वस्थ ॥ याचे आयुष्य उरले किंचित ॥ जवळी अनर्थ पातला ॥७३॥
शिशुपाळ भीष्मासी म्हणे अवधारी ॥ सोडी भीम येऊ दे मजवरी ॥ जातवेद पतंगासी भस्म करी ॥ तैसे करीन निर्धारे ॥७४॥
कृष्ण भीम अर्जुन ॥ तिघे येऊ दे एकदांचि शस्त्र घेऊन ॥ विलंब करिता षंढ पूर्ण ॥ नाम तुझे निर्धारी ॥७५॥
ऐसी दुष्टोत्तरे बोलत ॥ ती क्षमा करूनि गंगासुत ॥ भीमासी म्हणे ऐक वृत्तांत ॥ पूर्वीचा तुज सांगतो ॥७६॥
दमघोषाची पत्नी सात्वती ॥ ते वसुदेवाची भगिनी होय निश्चिती ॥ तिचे उदरी हा पापमती ॥ शिशुपाळ जन्मला ॥७७॥
उपजतांचि बाळ पाहे नयनी ॥ भुजांवरी भुजा दोन्ही ॥ कपाळी नेत्र अवगुणी ॥ हा पापखाणी उपजला ॥७८॥
लोक म्हणती अवचिन्ह ॥ माता म्हणे टाका बाहेरी नेऊन ॥ तो आकाशी बोले देववाणी वचन ॥ न टाकी बाळ सर्वथा ॥७९॥
हा होईल महाभूपती ॥ शिशुपाळ नाम ठेवी याप्रती ॥ माता विस्मित जाहली चित्ती ॥ काय पुढती बोलत ॥८०॥
कोणाचे हाते याचा मृत्य ॥ हे देवदूता वदे निश्चित ॥ तो आणिक प्रतिध्वनि होत ॥ माय ऐकत सादरे ॥८१॥
ज्या पुरुषाचे दृष्टीकरून ॥ दोन भुजा आणि तिजा नयन ॥ खाली पडेल गळोन ॥ यासी मरण त्या हाती ॥८२॥
ऐसी बोलोनि आकाश वाणी ॥ गुप्त राहिली तेचि क्षणी ॥ मग बाळ घेती जाहली जननी ॥ विरूप रूपे चतुर्बाहू ॥८३॥
देशोदेशींचे भूपती ॥ बाळ पाहावयालागी येती ॥ प्रचीत विलोकावया सात्वती ॥ शिशुपाळ देत त्यांपुढे ॥८४॥
बळिभद्र आणि घननीळ ॥ तेही पाहावया आले बाळ ॥ बंधुपुत्र देखता तुंबळ ॥ आनंद झाला सात्वतीते ॥८५॥
शिशुपाळ आणि वक्रदंत ॥ दोघे कृष्णापुढे आले रांगत ॥ कृष्ण दृष्टी पडता अकस्मात ॥ भुजा गळोनि पडियेल्या ॥८६॥
कपाळींचा तिजा नयन ॥ तत्काळचि गेला जिरोन ॥ मातेसी चिंता दारुण ॥ प्राप्त जाहली तेधवा ॥८७॥
मग हरीपुढे पदर पसरून ॥ पितृभगिनी मागे पुत्रदान ॥ म्हणे यासी तू न मारी म्हणोन ॥ भाष देई मजलागी ॥८८॥
श्रीकृष्ण बोले साच वचन ॥ शत अपराध क्षमा करीन ॥ अधिक जाहलिया बोळवीन ॥ मोक्षसदना निर्धारे ॥८९॥
ऐसे बोलता गोविंद ॥ मातेसी जाहला आनंद ॥ म्हणे कासया करील शत अपराध ॥ मग राममुकुंद बोळविले ॥९०॥
यालागी ऐक भीमा निश्चित ॥ त्या शत अपराधांचे होय गणित ॥ यालागी श्रीकृष्ण निवांत ॥ वाट पहात समयाची ॥९१॥
हे शिशुपाळ वक्रदंत ॥ पूर्वीचे दैत्य उन्मत्त ॥ रावण कुंभकर्ण निश्चित ॥ रामावतारी वधिले जे ॥९२॥
येणे पूर्वी येऊनि मिथिलेसी ॥ धावला वरावया सीतेसी ॥ भार्गवचाप नुचले मानसी ॥ परम खेद पावला ॥९३॥
तोचि शिशुपाल पापखाणी ॥ वरावया धावला रुक्मिणी ॥ तेणे पराजय पावला रणी ॥ जरासंधासमवेत ॥९४॥
तो द्वेष धरूनि मनांत ॥ दुर्जन कृष्णनिंदा करीत ॥ तरी शत अपराध आले भरत ॥ जवळी अनर्थ यासी आला ॥९५॥
ऐकता भीष्माचे वचन ॥ क्रोधे धडकला दमघोषनंदन ॥ जैसा स्नेहे शिंपिता कृशान ॥ अधिक अधिक प्रज्वळे ॥९६॥
म्हणे रे बंदीजना नपुंसका ॥ किती रे वाखाणिसी त्या गोरक्षका ॥ जे जे येथे स्तवनासी योग्य देखा ॥ न वाखाणिसी तयांसी ॥९७॥
चोर जार कपटी केवळ ॥ बहुत माजला हा गोपाळ ॥ गोकुळ चौढाळिले सकळ ॥ कपटी अमंगळ नष्ट हा ॥९८॥
जालंधराची पत्नी वृंदा सती ॥ येणे ते भगिनी मानिली होती ॥ तिशींच रतला निश्चिती ॥ न भी चित्ती पापाते ॥९९॥
परदारागमनी आणि कपटी ॥ यासमान दुजा नाही सृष्टी ॥ ऐसियाची काय वाखाणिसी गोष्टी ॥ वारंवार मूढा तू ॥१००॥
मग म्हणे उठा अवघेजण ॥ आधी घेऊ या भीष्माचा प्राण ॥ तिलप्राय कुटके करून ॥ येथेंचि याचे टाकावे ॥१॥
याज्ञिक मिळोनि भोवते ॥ यज्ञपशु वधिती मुष्टिघाते ॥ तैसे वधावे या वृद्धाते ॥ येणे आम्हांते निंदिले ॥२॥
तैल तप्त कढईत तावूनि उत्तम ॥ हा जितचि आत घालावा भीष्म ॥ की शस्त्रे तावूनि परम ॥ खंडे याची करावी ॥३॥
मग बोले गंगासुत ॥ बोलिले जो न करी सत्य ॥ त्याचे पूर्वज समस्त ॥ महानरकी पचतील ॥४॥
तुझिया माथ्याचा मुकुट ॥ तो म्यां पदघाते केला पिष्ट ॥ जरी बोलिले वचन स्पष्ट ॥ खरे करूनि दावीसना ॥५॥
भीष्मसिंहापुढे जंबुक समस्त ॥ करिता युद्धाची तुम्ही मात ॥ वज्रधारा धगधगित ॥ तृणेकरूनि खंडे केवी ॥६॥
अजा जयाची जननी ॥ तो सिंहाशी भिडो पाहे रणी ॥ पिपीलिका म्हणे थडक हाणोनी ॥ दिग्गज खाली पाडीन ॥७॥
बळे उडोनि आळिका ॥ विदारूनि मारीन म्हणे विनायका ॥ मशक म्हणे हाणोनि धडका ॥ मेरुमांदार डोलवीन ॥८॥
घुंगरुडाइसे वदन ॥ म्हणे पर्वत सगळा ग्रासीन ॥ पतंग अग्नीसी म्हणे गिळीन ॥ सूड घेईन खांडववनाचा ॥९॥
स्वतंतुसूत्रेकरूनी ॥ ऊर्णनाभि झाकीन म्हणे धरणी ॥ वृश्चिक अभिमान वाहे मनी ॥ ताडूनि फोडीन वज्राते ॥११०॥
की रासभे ब्रीद बांधोन ॥ नारदापुढे मांडिले गायन ॥ की मूषक टवकारून ॥ वासुकी धरू पातला ॥११॥
की सज्ञान पंडितापुढे ॥ बोलावया आली मूढे ॥ की जंबुक आपुले पवाडे ॥ व्याघ्रापुढे दावीत ॥१२॥
मजपुढे काय आदित्य ॥ म्हणवूनि निंदा करी खद्योत ॥ मरणकाळी होय सन्निपात ॥ तैसे तुज जाहले रे ॥१३॥
काळमृत्यूची छाया पडली ॥ मृत्यूवेळ जवळी आली ॥ ऐकोनि शिशुपाळ ते वेळी ॥ अधिकचि आवेशला ॥१४॥
शस्त्र काढूनि वेगेसी ॥ म्हणे कृष्णा ऊठ रे झुंज मजसी ॥ नपुंसका काय बैसलासी ॥ लाज कैसी नुपजे तूते ॥१५॥
तुझे रुसणे समजणे दोन्ही ॥ मी शिशुपाळ तृणप्राय मानी ॥ गोरक्षा तुज अझूनी ॥ लज्जा का रे न वाटे ॥१६॥
उपजोनिया तुवा गोवळा ॥ वृष्णिकुळासी डाग लाविला ॥ तुवा चोरूनि नेली रुक्मिणी वेल्हाळा ॥ ते नवरी माझी निर्धारे ॥१७॥
रुक्मिणी आधी अर्पिली माते ॥ म्या मनींच भोगिले तीते ॥ मग ते प्राप्त जाहली तूते ॥ माझे उच्छिष्ट गुराखिया ॥१८॥
जैसे भोगिले वस्त्र बहुत ॥ ते भाटासी देती भाग्यवंत ॥ तैसी रुक्मिणी म्या भोगिली निश्चित ॥ तुज जे प्राप्त जाहली ॥१९॥
पुष्पहार भोगूनि टाकिला ॥ तो भणगे जैसा उचलूनि नेला ॥ की रावणे चोरूनि नेली जनकबाळा ॥ तैसी रुक्मिणी तुवा नेली ॥१२०॥
शाल्व पवित्र तुजपरीस ॥ कदा नातळे अंबेस ॥ नवरी जे नेमिली आणिकास ॥ ते सर्वथा न पर्णावी ॥२१॥
ज्याचे नावे जे पात्र वाढिले ॥ आणिका नेता ते उच्छिष्ट जाहले ॥ हे धर्माधर्म शास्त्री बोलिले ॥ तुज न कळती कर्मभ्रष्टा ॥२२॥
श्रीकृष्ण म्हणे रे दुर्जना ॥ महानिंदका दुष्टा मलिना ॥ तू अग्रपूजा इच्छितोसी हीना ॥ तरी आतांचि घेई निर्धारे ॥२३॥
ऐसे बोलोनि क्षीराब्धिजारमण ॥ केले सुदर्शनाचे स्मरण ॥ तव अकस्मात येऊन ॥ कृष्णहस्तकी संचरले ॥२४॥
जैसा कल्पांतीचा आदित्य ॥ तैसे सुदर्शन धगधगीत ॥ शिशुपालावरी सोडिले अकस्मात ॥ वैकुंठनाथे तेधवा ॥२५॥
तत्काळ शिशुपाळाचे छेदिले शिर ॥ निराळपंथे उडाले सत्वर ॥ मुखे गर्जना करी थोर ॥ म्या यदुवीर जिंकिला ॥२६॥
शिर मागुते उतरले ॥ ते श्रीकृष्णचरणाजवळी पडिले ॥ अंतर्ज्योति निघाली ते वेळी ॥ कृष्णरूपी प्रवेशली ॥२७॥
बाळसूर्यासारखे तेज अद्भुत ॥ ज्योति श्रीकृष्णह्रदयी प्रवेशत ॥ जैसे लवण जळी विरत ॥ की गगनांत नाद जैसा ॥२८॥
सांडुनि जीवदशा संपूर्ण ॥ शिशुपाळ जाहला कृष्ण ॥ त्वपद तत्पदी जाय हारपोन ॥ तैसा लीन जाहला ॥२९॥
की पूर्ण जळी जळबिंदु पडिला ॥ तो माघारा नाही परतला ॥ तैसा शिशुपाळ गोवळा जाहला ॥ नाही उरले वेगळेपण ॥१३०॥
हे वैकुंठीचे द्वारपाळ ॥ जय विजय निर्मळ ॥ सनकादिकी शापिता तत्काळ ॥ दैत्ययोनीत अवतरले ॥३१॥
हेचि हिरण्याक्ष हिरण्यकश्यप जाण ॥ हेचि जाहले रावण कुंभकर्ण ॥ तेचि हे शिशुपाळ वक्रदंत पूर्ण ॥ कृष्णावतारी जन्मले ॥३२॥
परम भक्त शिशुपाळ ॥ बळेंचि हरिरूप जाहला तत्काळ ॥ हातींची वस्त आसडूनि नेत बाळ ॥ तैसेचि केले यथार्थ ॥३३॥
तिसरे जन्मी निश्चिती ॥ कृष्णे दिधली अक्षय मुक्ती ॥ ह्रदयी ठेविली अंतर्ज्योती ॥ महाभक्त म्हणोनि ॥३४॥
असो जाहला जयजयकार ॥ पुष्पवृष्टि वर्षती संभार ॥ दुष्ट पळाले समग्र ॥ वक्रदंतासहित पै ॥३५॥
कौरव अंतरी चिंताक्रांत ॥ म्हणती आमुचे उणे पडिले बहुत ॥ एक आनंदे टाळिया वाजवीत ॥ बरे जाहले म्हणोनिया ॥३६॥
ऐसा शिशुपाळ पावला निजधाम ॥ पार्थाप्रति निरोपी धर्म ॥ म्हणे याचे प्रेत करा भस्म ॥ जातवेदामाझारी ॥३७॥
मग शिशुपाळाचे राज्य होते ॥ ते दिधले त्याच्या पुत्राते ॥ धर्मराजे समस्त रायाते ॥ वस्त्रे अलंकार समर्पिले ॥३८॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ अवघियांसी गौरवी युधिष्ठिर ॥ पूजामान पावोनि समग्र ॥ गेले नगरा आपुलाले ॥३९॥
अवभृथस्नान केले ॥ तेथे सकळ लोक सुस्नात जाहले ॥ सहपरिवारेंसी ते वेळे ॥ श्रीकृष्ण निघाले द्वारकेसी ॥१४०॥
धर्मासी म्हणे कमलोद्भवपिता ॥ आम्हांसी निरोप देई आता ॥ धर्मे चरणी ठेविला माथा ॥ कंठ जाहला सद्गदित ॥४१॥
धर्मराज प्रेमे स्फुंदत ॥ जा ऐसे न म्हणेचि सत्य ॥ पुढती लौकरी यावे म्हणत ॥ धन्य भक्त धर्मराज ॥४२॥
भीम अर्जुन नकुळ सहदेव ॥ तयांसी पुसत वासुदेव ॥ कुंती द्रौपदी सुभद्रेप्रति माधव ॥ स्नेहआज्ञा मागतसे ॥४३॥
तव ते म्हणती श्रीपती ॥ जेथे पद तुझे उमटती ॥ तेथे आमुचे मस्तक असो निश्चिती ॥ ऐसेचि करी रमावरा ॥४४॥
ह्रदयांतूनि आमुच्या श्रीपती ॥ परता जाऊ नको निश्चिती ॥ ज्या जया भूताकृति भासती ॥ तुझे स्वरूप भासो ते ॥४५॥
श्रीकृष्णासी बोळवूनी ॥ पांडव आले परतोनि सदनी ॥ जागृतिसुषुप्तिस्वप्नी ॥ श्रीकृष्णचिंतनी सादर ॥४६॥
राजसूययज्ञ जाहला समाप्त ॥ द्वारकेसी पावला वैकुंठनाथ ॥ तो पौंड्रक आणि वक्रदंत ॥ वेढा घालिती नगराते ॥४७॥
शिवे दिधले वरविमान ॥ त्यांत वक्रदंत सेनेसहित बैसून ॥ द्वारकेवरी येऊन ॥ युद्ध करिती शस्त्रास्त्री ॥४८॥
तो इतुकियांत पावला जगज्जीवन ॥ तत्काळ सोडिले सुदर्शन ॥ वक्रदंताचे शिर छेदून ॥ आकाश पंथे उडविले ॥४९॥
पौंड्रक सेनेसमवेत ॥ हरीने संहारिला तेथ ॥ ऐसा प्रताप करूनि अद्भुत ॥ कृष्णे शस्त्रे ठेविली ॥१५०॥
मुख्य वधिले शिशुपाळ वक्रदंत ॥ इतुकानि आमुचे मनोगत ॥ अवतारकृत्य जाहले यथार्थ ॥ या दोघांसी मारिता ॥५१॥
आम्हांसी शस्त्र धरणे नाही आता ॥ उरले ते दैत्य तत्त्वता ॥ ते सारथ्य करूनि पार्था ॥ त्याहाती पुढे वधावे ॥५२॥
जनमेजयासी सांगे वैशंपायन ॥ धन्य धन्य अवतार श्रीकृष्ण ॥ गोकुळी अपार दैत्य मारून ॥ कंस वधिला मथुरेसी ॥५३॥
जरासंध सतरा वेळा त्रासिला ॥ द्वारका वसविली अवलीला ॥ नरकासुर मारूनि सहस्त्र सोळा ॥ गोपी आणिल्या घरासी ॥५४॥
आता श्रोती व्हावे सावचित्त ॥ पुढे छत्तिसावा अध्याय गोड बहुत ॥ छत्तिसाव्यापासून हरिविजयग्रंथ ॥ संपूर्ण यथार्थ जाहला ॥५५॥
जैसा मुकुटावरी मणी ॥ तैसा छत्तिसाव ऐका श्रवणी ॥ हरिविजय हिरियांची खाणी ॥ सज्जन जोहरी येथींचे ॥५६॥
श्रीधरवरदा जगन्निवासा ॥ ब्रह्मानंदा पंढरीशा ॥ भक्तमानसराजहंसा ॥ पुराणपुरुषा जगद्वंद्य ॥५७॥
इति श्रीहरिविजय ग्रंथ ॥संमत हरिवंशभागवत ॥ चतुर परिसोत प्रेमळ पंडित ॥ पंचत्रिशत्तमाध्याय गोड हा ॥१५८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३५॥ ओव्या ॥१५८॥