अध्याय ५
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय जगदंकुरकंदा ॥ सत्यज्ञाना श्रीब्रह्मानंदमूर्ति ॥ सच्चिदानंदमूर्ति अभेदा ॥ जगद्वंद्या श्रीहरे ॥१॥
जय जय गलितभेद अखिला ॥ परमपुरुषा अतिनिर्मळा ॥ अनंतकोटिब्रह्मांडपाळा ॥ तुझी लीला अगम्य ॥२॥
नमो अनंगदहनप्रिया अनंगा ॥ सकलांगांगचालका श्रीरंगा ॥ निर्विकारा निर्द्वंद्वा अभंगा ॥ अक्षय अव्यंगा जगद्गुरो ॥३॥
नमो महामायाआदिकारणा ॥ जय वेदनिलया वेदरक्षणा ॥ अविनाश तूं वैकुंठराणा ॥ विष पिऊनि अक्षय ॥४॥
चौथा अध्याय संपतां तेथें ॥ पूतना शोषिली जगन्नाथें ॥ यशोदा कडे घेऊनि कृष्णातें ॥ सद्गद जाहली सप्रेम ॥५॥
म्हणे थोर अरिष्ट टळलें ॥ भगवंतें बाळ वांचविलें ॥ माझें पूर्वपुण्य फळासी आलें ॥ विघ्न टळलें तरीच हें ॥६॥
नंद तेव्हां नव्हता गोकुळीं ॥ घेऊनि संगें श्रेष्ठ श्रेष्ठ गौळी ॥ राज्यद्रव्य द्यावया ते वेळीं ॥ मथुरेसी गेला होता तो ॥७॥
असो पूतनेचें प्रेत पडिलें ॥ असंभाव्य कोणासही न ढळे ॥ गौळी बहुत मिळाले ॥ परी न उचले कोणासी ॥८॥
विशाळ प्रेत घोर थोर ॥ न निघे मंदिराबाहेर ॥ मग आणूनि तीक्ष्ण कुठार ॥ खंडें केली तियेचीं ॥९॥
वृक्ष शाखा तोडिती बळें ॥ तैसे हस्तचरण केलें वेगळें ॥ गांवाबाहेर सरण रचिलें ॥ बहुत काष्ठें आणूनि ॥१०॥
चेतविला वैश्वानर ॥ माजी घातलें प्रेत थोर ॥ अग्निशिखा प्रचंड तीव्र ॥ अंबर कवळूं धांवती ॥११॥
गौळी पाहती ते वेळां ॥ अग्निसंगें सुवास सुटला ॥ जनघ्राणदेवता सकळा ॥ तटस्थ जाहल्या सुवासें ॥१२॥
येवढा सुवास अद्भुत ॥ कासयाचा असंभावित ॥ तरी पूतनेच्या हृदयीं जगन्नाथ ॥ क्रीडला अतिप्रीतीनें ॥१३॥
हरि सच्चिदानंदतनु ॥ जो मायातीत निर्गुण अतनु ॥ जो निर्विकार पुरातनु ॥ सकळ तनूंचा साक्षी पैं ॥१४॥
जो अयोनिसंभव श्रीहरी ॥ जगन्निवास लीलावतारी ॥ तो पूतनेच्या हृदयमंदिरीं ॥ अंतर्बाह्य पूर्ण भरला ॥१५॥
म्हणोनि अग्निसंगें सुवास येत ॥ गोकुळीं जन जाहले तटस्थ ॥ नंद आला अकस्मात ॥ मथुरेहुनि ते वेळां ॥१६॥
लोकीं वर्तमान सांगितलें ॥ बाळ पूर्वभाग्यें वांचलें ॥ नंद आला ते वेळे ॥ सकळ गौळियांसमवेत ॥१७॥
तों यशोदा बैसली कृष्ण घेऊन ॥ सद्गदकंठ सजलनयन ॥ नंद जवळी गेला धांवोन ॥ हरीस उचलोन आलिंगी ॥१८॥
वदन सर्वानंदसदन ॥ नंद पाहे अवलोकून ॥ म्हणे विघ्न चुकलें दारुण ॥ उत्साह पूर्ण मांडिला ॥१९॥
मंडप द्वारींउभवोन ॥ मेळवून सकळ ब्राह्मण ॥ गोभूहिरण्यअन्नदान ॥ उत्साह संपूर्ण नंद करी ॥२०॥
नंदास कैसें वाटलें ॥ कीं जहाज बुडतां कडे लागलें ॥ सकळ ब्राह्मण ॥ गोभूहिरण्यअन्नदान ॥उत्साह संपूर्ण नंद करी ॥२०॥
नंदास कैसें वाटलें ॥ कीं जहाज बुडतां कडे लागलें ॥ कीं अमृतमेघ वर्षले ॥ आपणावरी निजभाग्यें ॥२१॥
मरणकाळीं सुधारस जोडला ॥ कीं आनंदाचा ध्वज उभारिला ॥ नंद ब्रह्मानंदें घाला ॥ तो सोहळा न वर्णवे ॥२२॥
कळलें कंसास वर्तमान ॥ पूतना पावली मोक्षसाधन ॥ दचकलें कंसाचें मन ॥ भयेकरुनि व्यापिला ॥२३॥
मनीं म्हणे काय करुं विचार ॥ वैरी होतो हळू हळू थोर ॥ पेटत चालिला वैश्वानर ॥ मग नाटोपे विझवितां ॥२४॥
वाटे क्षयरोग लागला ॥ काळसर्प गिळतो मला ॥ आयुष्यवृक्ष कडाडिला ॥ उन्मळोनि पडे आतां ॥२५॥
वाटे महाविषें अंग करपलें ॥ गमें काळें बोलावूं धाडिलें ॥ माझ्या बळसिंधूचें जळ शोषिलें ॥ निस्तेज झालें सर्वांग ॥२६॥
असो गोकुळीं नंदमंदिरीं ॥ हरि निजविला माजघरीं ॥ तो कलथला सव्य अंगावरी ॥ आरंभ करी रांगावया ॥२७॥
एका अंगावरी कलथला ॥ नंदें उत्साह थोर केला ॥ वस्त्रें भूषणें द्विजंकुळा ॥ वांटितां जाहला नंद पैं ॥२८॥
एके दिवशीं प्रातःकाळीं ॥ सूर्यदर्शन करविलें वनमाळी ॥ अंगणीं निजविला ते वेळीं ॥ मायादेवीनें प्रीतीनें ॥२९॥
चिमणाच घातला तल्पक ॥ वरी पहुडविला वैकुंठनायक ॥ उदरावरी सुरेख ॥ वस्त्र झांकी यशोदा ॥३०॥
जगाचें कवच जगज्जीवन ॥ माया त्यासी घाली पांघरुण ॥ ऐसा कृष्ण आंगणीं निजवून ॥ माया गेली घरांत ॥३१॥
नंदही गेला बाहेरी ॥ आंगणीं एकलाच श्रीहरी ॥ तों शकटासुर दुराचारी ॥ कंस तया पाठवीत ॥३२॥
कंसासी म्हणे शकटासुर ॥ मी तुझा शत्रु वधीन साचार ॥ मी गाडा होऊनि दुर्धर ॥ जाईन नंदआंगणीं ॥३३॥
कृष्ण आंगणीं क्रीडतां ॥ वरी लोटेन अवचितां ॥ कंसाऐसें ऐकतां ॥ गौरविला दुरात्मा ॥३४॥
तो आंगणीं गुप्तरुपें येऊनी ॥ जपत होता पापखाणी ॥ एकांत देखोनि ते क्षणीं ॥ कृष्णावरीं लोटला ॥३५॥
सरसावोनि बळें सवेग ॥ रगडूं पाहें हरीचें अंग ॥ जवळी येतां श्रीरंग ॥ चरण झाडी अवळीला ॥३६॥
नगमस्तकीं पडतां वज्र ॥ चूर होवोनि जाय समग्र ॥ तैसा चरणघातें शकटासुर ॥ पिष्ट केला हरीनें ॥३७॥
लागतां हरीचा चरणप्रहार ॥ प्राण सोडी शकटासुर ॥ उद्धरीला दैत्य दुराचार ॥ चरणस्पर्शें भगवंतें ॥३८॥
पूर्वीं केला अहल्योद्धार ॥ आतां चरणीं उद्धरिला शकटासुर ॥ गाड्याचा झाला चूर ॥ तों माया बाहेर पातली ॥३९॥
नंद आला बाहेरुन ॥ तों गाडयाचें झालेंसें चूर्ण ॥ मिळाले सकळ गौळीजन ॥ आश्चर्य करिती तेधवां ॥४०॥
म्हणती कैंचा गाडा कोणें आणिला ॥ बाळासमीप चूर्ण जाहला ॥ जरी असता वरी लोटला ॥ तरी उरी कांहीं न उरती॥४१॥
नंद म्हणे यशोदे सुंदरी ॥ विघ्नें येतात कृष्णावरी ॥ तूं यांस न विसंबे अहोरात्रीं ॥ हृदयीं धरीं सर्वदा ॥४२॥
आसनीं शयनीं भोजनीं ॥ विसंबूं नको चक्रपाणी ॥ जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ॥ विसरुं नको हरीतें ॥४३॥
दळितां कांडितां घुसळितां ॥ विसरुं नको कृष्णनाथा ॥ यशोदेसी तें ऐकतां ॥ परम सुख वाटलें ॥४४॥
परी गाडा कोणी चूर केला ॥ कोणास न कळे हरिलीला ॥ असो आंगणीं सांवळा ॥ रांगूं लागला हळू हळू ॥४५॥
चिखली रांगें वनमाळी ॥ दाटूनि लोळे आंगणीं धुळी ॥ बळिरामही आला जवळी ॥ खेळावया पाठिराखा ॥४६॥।
साक्षात् शेषनारायण ॥ ते हे यादववंशीं बळिरामकृष्ण ॥ गोष्ठांगणीं दोघेजण ॥ रांगताती कौतुकें ॥४७॥
एक गौर एक श्यामवर्ण ॥ कीं एक विष्णु एक मदनदहन ॥ तैसे रांगती दोघेजण ॥ चरणीं नेपुरें रुणझुणती ॥४८॥
दोघे लोळती नंदांगणीं ॥ जैसे उडुपति आणि दिनमणी ॥ दोघेही धुळी घेऊनी ॥ जावळामाजी घालिती ॥४९॥
धुळीनें भरलें अंग वदन ॥ हांसती एकाकडे एक पाहोन ॥ झळकती लघु लघु दशन ॥ आकर्णनयन दोघांचे ॥५०॥
कीं ते बाळ दिगंबर ॥ दोघेही डोलती सुकुमार ॥ कीं ते तपस्वी निर्विकार ॥ नंदांगणीं शोभले ॥५१॥
यशोदा आणि रोहिणी ॥ येऊनि पाहती जों आंगणीं ॥ तों दोघे दोहींकडे धांवोनी ॥ हांसतचि पातले ॥५२॥
मातेचें जें जानुयुगुळ ॥ तेथें मिठी घालूनि घननीळ ॥ वरी करुनि मुखकमळ ॥ गदागदां हांसतसे ॥५३॥
धुळीनें भरलें निजांग ॥ मातेनें उचलिला सवेग ॥ पूर्णब्रह्मानंद श्रीरंग ॥ हृदयीं दृढ धरिला ॥५४॥
पदरें पुसिली अंगींची धुळी ॥ मातेचें वदन विलोकी वनमाळी ॥ धन्य ते यशोदा वेल्हाळी ॥ चुंबन देत हरीतें ॥५५॥
शेषनारायण उचलिले ॥ दोघे गृहांत नेऊनि सोडिले ॥ तों गौळणी पातल्या ते वेळे ॥ खेळवावया कृष्णातें ॥५६॥
तों श्रीरंग दुडदुडां धांवत ॥ रांगत बैसोनि पिरंगत ॥ सवेंचि बळरामाकडे पाहात ॥ गदागदां हांसती दोघेही ॥५७॥
आकर्णनेत्र कर्णीं कुंडलें ॥ कंठीं वाघनखपदक शोभलें ॥ वांकी मणगटया बिंदलीं सुढाळें ॥ झळकताती मुद्रिका ॥५८॥
कटीं झळके कटिसूत्र ॥ क्षुद्रघंटा किणकिणित सुस्वर ॥ जैशा वेदश्रुती गंभीर ॥ सूक्ष्म अर्थ बोलती ॥५९॥
नेपुरें रुणझुणती साजिरीं ॥ मातेनें कृष्ण धरुनि करीं ॥ पाचबंदभूमीवरी ॥ हळू हळू चालवीत ॥६०॥
मंद मंद चाले गोविंद ॥ हळूच नेपुरें करिती शब्द ॥ तों जवळी पातला नंद ॥ हस्त धरीत हरीचा ॥६१॥
नंदहस्ताश्रयेंकरुन ॥ चाले वैकुंठींचें निधान ॥ सवेंचि पडतो अडखळोन ॥ नंद सांवरोन धरीतसे ॥६२॥
बळिराम आणि जगज्जीवन ॥ एक एकाचा आश्रय करुन ॥ कांपत कांपत दोघेजण ॥ उठोनि उभे राहती ॥६३॥
सवेंचि आदळती धरणीं ॥ गदागदां हांसे चक्रपाणी ॥ सवेंचि उभे राहोनी ॥ दुडदुडां नाचताती ॥६४॥
नंद आणि यशोदा जननी ॥ भोंवत्या मिळाल्या नितंबिनी ॥ शेष आणि चक्रपाणी ॥ नाचती दोघे पाहती तें ॥६५॥
लास्य आणि तांडव ॥ दोन्ही नृत्यांचे भाव ॥ लास्यकळा माधव ॥ दावीतसे तेधवां ॥६६॥
करटाळिया नितंबिनी ॥ वाजविती कौतुकेंकरुनी ॥ म्हणती नाच नाच रे चक्रपाणी ॥ नंद नयनीं पाहात ॥६७॥
हस्तसंकेत दावी भगवंत ॥ नृत्य करी डोलत डोलत ॥ भोंवत्या गौळिणी हांसत ॥ हरि पाहात त्यांकडे ॥६८॥
वेष्टित गौळिणी सुकुमार ॥ त्याच कमळकर्णिका सुंदर ॥ मध्यें श्रीरंग भ्रमर ॥ नीळवर्ण रुणझुणे ॥६९॥
सूर्याभोंवतीं जैसीं किरणें ॥ कीं शशिवेष्टित तारागणें ॥ कीं मुगुटाभोंवतीं रत्नें ॥ तैशा कामिनी विलसती ॥७०॥
कीं देवीं वेष्टिला सहस्त्रनयन ॥ कीं प्रेमळ भक्तीं उमारमण ॥ कीं ऋषिवेष्टित कमळासन ॥ जगज्जीवन तेवी शोभे ॥७१॥
नृत्य करी जगज्जीवन ॥ मंद मंद हांसे उदारवदन ॥ ते नृत्यकाळ देखोन ॥ सकळा गौळिणी विस्मित ॥७२॥
विचित्र कळा दावी माधव ॥ दशावतारींचा हावभाव ॥ देखतां सद्गद सर्व ॥ गौळिणी तेव्हां जाहल्या ॥७३॥
नंद यशोदा गौळिणी ॥ नाचती तेव्हां प्रेमेंकरोनी ॥ तों आकाश आणि धरणी ॥ नाचूं लागलीं तेधवां ॥७४॥
तेज वायु जळ ॥ नाचों लागती सुखर सकळ ॥ नाचे कैलासीं जाश्वनीळ भवानीसहित आदरें ॥७५॥
नाचे वैकुंठ सत्यलोक ॥ चंद्र सूर्य शचीनायक ॥ गण गंधर्व वसु अष्टक ॥ ऋषिमंडळ नाचतसे ॥७६॥
स्वर्ग मृत्यु पाताळ ॥ नाचती चतुर्दश लोक सकळ ॥ नाचती पृथ्वीचे नृपाळ ॥ परीवारेंसीं तेघवां ॥७७॥
नव खंडें सप्त द्वीपें ॥ नाचताती हरिप्रतापें ॥ छप्पन्न देश अनुतापें ॥ नाचताती तेधवां ॥७८॥
मेरु पर्वत थोर थोर ॥ वनस्पती नाचती अठरा भार ॥ वेद शास्त्रें पुराणें समग्र ॥ कृष्णच्छंदें नाचती ॥७९॥
नाचती गोकुळींचीं मंदिरें ॥ नाचती उतरंडीं देव्हारें ॥ धातुमूर्ति एकसरें ॥ नाचताचि त्या येती ॥८०॥
उखळें जांतीं मुसळें ॥ पदार्थमात्र एकेचि वेळे ॥ नाचों लागलीं घननीळें ॥ कौतुक भक्तां दाखविलें ॥८१॥
नंद धांवोनि जवळी आला ॥ म्हणे सुकुमार माझा भागला ॥ हृदयीं धरुनि आलिंगिला ॥ चुंबन दिधलें तेधवां ॥८२॥
नंदें अनंत जन्में तप केलें ॥ तें एकदांचि फळा आलें ॥ कीं यशोदेचें सुकृत प्रगटलें ॥ एकदांचि ये वेळे ॥८३॥
त्या दोघीं मातापितरीं ॥ वाटे तप केलें हिमकेदारीं ॥ तरीच मांडीवरी श्रीहरी ॥ रात्रंदिवस खेळतसे ॥८४॥
कीं शरीर कर्वतीं घालून ॥ टाकिलें प्रयागीं त्रिवेणीं ॥ तरीच हरिमुख चुंबूनी ॥ वारंवार पाहती ॥८५॥
कीं साधिले पंचाग्निसाधन ॥ कीं निराहार तृणशेजे शयन ॥ तरीच त्यास पुढें घेऊन ॥ यशोदा नंद निजताती ॥८६॥
कीं महाक्रतु केलें थोर ॥ विपुल हस्तें पूजिले धरामर ॥ तरीच सांगाते घेऊनि सर्वेश्वर ॥ नंद यशोदा जेवीत ॥८७॥
कीं सप्रेम केलें हरिकीर्तन ॥ कीं केलें संतांचें अर्चन ॥ तरीच नवपंकजदलनयन ॥ मिठी घाली निजगळां ॥८८॥
जो ब्रह्मानंद परात्पर ॥ तो जाहला नंदाचा कुमार ॥ कीं गौळियांचे तपतरुबर ॥ उंचावले ब्रह्मांडीं ॥८९॥
जो नाकळे वेदश्रुती ॥ त्यास गौळिणी बोलूं शिकविती ॥ बोबडें बोलूनि श्रीपती ॥ मन मोही तयांचें ॥९०॥
जो बोल बोले हृषीकेशी ॥ अर्थ न कळे ब्रह्मादिकांसी ॥ गौळिणी म्हणती कृष्णासी ॥ गूढ बोलणें न कळे तुझें ॥९१॥
शेष आणि नारायण ॥ आंगणीं धांवती दोघेजण ॥ यशोदेच्या गळां येऊन ॥ मिठी घालिती साक्षेपें ॥९२॥
एक गौर एक सांवळे ॥ यशोदेसी दृढ धरिले ॥ बळिभद्र म्हणे ते वेळे ॥ माझी माय यशोदा ॥९३॥
कृष्ण म्हणे माझी माय ॥ बळिभद्र म्हणे माझी होय ॥ कृष्ण गे माय ॥ बळिभद्रासी सांग कांहीं ॥९४॥
तंव तो बळिभद्र उगा न राहे ॥ मागुती म्हणे माझी माय ॥ कृष्णे लोळणी लवलाहें ॥ घातली तेव्हां रडतचि ॥९५॥
यशोदा हरीस हृदयीं धरुन ॥ म्हणे मी जननी तुझीच पूर्ण ॥ मागुती खेळावया दोघेजण ॥ गृहाबाहेर चालिले ॥९६॥
भलतीकडे दोघे धांवती ॥ गारी कंटक न पाहती ॥ एकामागें एक पळती ॥ अडखळती वाटेसी ॥९७॥
मागुती दोघे उठोन ॥ भलतीकडे जाती धांवोन ॥ बळिरामासी म्हणे जगज्जीवन ॥ पक्षी धरुनि नेऊं चला ॥९८॥
रावे काग साळिया ॥ दोघे धांवई धरावया ॥ तों पक्षी जाती उडोनियां ॥ क्षणमात्र नलगतां ॥९९॥
मग ऊर्ध्व वदनें करोनी ॥ तटस्थ विलोकिती नयनीं ॥ कृष्ण म्हणे उडोनी ॥ पक्षी आणीन अवघेचि ॥१००॥
हरि म्हणे मी आकाशीं उडेन ॥ येरु म्हणे मी पृथ्वी उचलीन ॥ ऐसे ते शेषजगज्जीवन ॥ बाळलीला दाविती ॥१॥
सोडिती तान्हीं वांसरें ॥ तीं उडती नानाविकारें ॥ वात्सांसारिख्या उडया निर्धारें ॥ दोघे घेती एकदांचि ॥२॥
वांसरें हुंबरती नाना गती ॥ आपणही तैसेंच करिती ॥ वत्सें कौतुकें नाचती ॥ थै थै म्हणती दोघेजण ॥३॥
आळोआळीं पिटिती वांसरें ॥ धांवतां धापा टाकिती त्वरें ॥ तों एक बाळ बोले चांचरें ॥ त्यास तैसेंच वेडाविती ॥४॥
धाकुटे मेळवूनि गोपाळ ॥ मध्यें शोभतो वैकुंठपाळ ॥ खेळतसे नाना खेळ ॥ बाळलीला करोनियां ॥५॥
इकडे मथुरेस कंस चिंताक्रांत ॥ म्हणे वैरी वाढतो गोकुळांत ॥ आतां कोण जाऊनि अकस्मात ॥ वधूनि येईल तयातें॥६॥
तों तृणावर्त म्हणे कंसातें ॥ मी वधीन तुझ्या अरीतें ॥ वायुरुपें गगनपंथें ॥ अकस्मात आणीन मी ॥७॥
जैसा पक्षी आमिष उचलीत ॥ तैसा उडवीन अकस्मात ॥ कीं सुधारसघट त्वरित ॥ उरगरिपु नेत जैसा ॥८॥
तैसा अकस्मात शत्रूसी ॥ उचलूनि आणीन तुजपासीं ॥ तृणावर्त बोलतां मानसीं ॥ कंसरावो संतोषला ॥९॥
वस्त्रें भूषणें देऊनि गौरविला ॥ तृणावर्त वायुरुपें चालिला ॥ गोकुळासमीप पातला ॥ वात सुटला अद्भुत ॥११०॥
इकडे यशोदा आपलें आंगणीं ॥ कडे घेऊनि चक्रपाणी ॥ उभी ठाकली ते क्षणीं ॥ गौळिणींस बोलत ॥११॥
जगदात्मा मनमोहन ॥ तृणावर्त येतो जाणोन ॥ काय करी जगज्जीवन ॥ जड बहुत जाहला ॥१२॥
जड बहुत हरि वाटला ॥ यशोदेनें खालीं उतरिला ॥ हरि दुडदुडां बाहेर गेला ॥ तों सुटला वात प्रचंड ॥१३॥
सुटला हो प्रलयसमीर ॥ धुळीनें भरलें अंबर ॥ त्यामाजी गोकुळ समग्र ॥ दिसेनासें जाहलें ॥१४॥
एक मुहूर्तपर्यंत ॥ हलकल्लोळ गोकुळीं होत ॥ वृक्ष उन्मळोनि जात ॥ आकाशमार्गें द्विज जैसे ॥१५॥
न दिसे कोणी कोणातें ॥ माता नोळखे बाळकांतें ॥ नेत्र झांकोनि निजहस्तें ॥ जन जाहले मूर्च्छित पैं ॥१६॥
वाटे पृथ्वी जाते रसातळांत ॥ कीं गोकुळ उडालें आकाशपंथें ॥ कीं गगन आलें खालतें ॥ अवनी वरी गेली पैं ॥१७॥
चहूंकडे वृक्ष उडोन ॥ पडती गोकुळावरी कडकडोन ॥ मंदिरें जाती मोडून ॥ विदारती प्रळयवातें ॥१८॥
तृणावर्त हरीस उचलोन ॥ निराळमार्गें गेला घेऊन ॥ तें जाणोनि मनमोहन ॥ स्वरुप अदभुत प्रकटवी ॥१९॥
ग्रीवेसी धरिला तृणावर्त ॥ श्रीहरीचें बळ अदभुत ॥ शिरकमळ अकस्मात ॥ पिळूनि खुडिलें केशवें ॥१२०॥
गोकुळप्रदेशीं अरण्याम्त ॥ पडिलें तृणवर्ताचें प्रेत ॥ मागुती कमलदलाक्ष गोकुळांत ॥ प्रवेशला तेधवां ॥२१॥
वायु राहिला अद्भुत ॥ लोक झाले सावचित ॥ यशोदा म्हणे कृष्णनाथ ॥ काय जाहला येथूनि ॥२२॥
यशोदा चहूंकडे धांवत ॥ आळो आळीं कृष्ण पाहत ॥ धबधबां वक्षःस्थळ बडवीत ॥ थोर आकांत जाहला ॥२३॥
नंद धांवे बिदोबिदीं ॥ गौळी हुडकिती सांदोसांदीं ॥ यशोदेभोंवतीं मांदी ॥ गौळिणींची मिळाली हो ॥२४॥
गोकुळींचे जन समस्त ॥ बुडाले शोकसमुद्रांत ॥ तों दुडदुडां धांवत ॥ कृष्ण येतां देखिला ॥२५॥
मायेनें धांवोनि उचलिला ॥ सप्रेम हृदयीं आलिंगिला ॥ नंद गौळी ते वेळां ॥ परमानंदें धांवती ॥२६॥
नंदें हरि कडे घेतला ॥ म्हणे कोठें गेला होतासी बाळा ॥ इंदिरावर मंदिरीं आणिला ॥ मोठा सोहळा नंद करी ॥२७॥
गोभूहरिण्यरत्नदानें ॥ द्विजांसी दिधलीं नंदानें ॥ मग यशोदेसी नंद म्हणे ॥ न विसंबें कृष्णासी ॥२८॥
असो कंसासी कळला वृत्तांत ॥ प्राणासी मुकला तृणावर्त ॥ कंस परम चिंताक्रांत ॥ धगधगीत मनामाजी ॥२९॥
गात्रें जाहलीं विकळें ॥ जैसा सर्प वणव्यानें आहाळे ॥ कीं महाव्याघ्र आरंबळे ॥ कपाळशूळेंकरुनियां ॥१३०॥
कीं पंकगर्तेमाजी वारण ॥ कीं कूपीं अडकला पंचानन ॥ कीं इंद्राजित पडलियावरी रावण ॥ चिंताक्रांत जैसा पैं ॥३१॥
असो इकडे गोकुळीं ॥ वोसंगी घेऊनि वनमाळी ॥ स्तनपान करवी वेल्हाळी ॥ यशोदादेवी एकदां ॥३२॥
पिंपळपान नीट केलें ॥ जावळ मागें सरसाविलें ॥ तों जांभई दिधली ते वेळे ॥ मुख विकासलें हरीचें ॥३३॥
कानामागील मळी ॥ काढीत यशोदा वेल्हाळी ॥ जांभई देतां ते वेळीं ॥ मुखामाजी विलोकीत ॥३४॥
तों ब्रह्मांडरचना समस्त ॥ मुखामाजी तेव्हां दिसत ॥ असंख्य कृष्णमूर्ति तेथ ॥ घवघवीत दिसती हो ॥३५॥
द्वीपें खंडें शैल सागर ॥ सप्त पाताळ उरगेंद्र ॥ गंगा काननें मनोहर ॥ मुखामाजी दिसती पैं ॥३६॥
वैकुंठ कैलास क्षीरसागर ॥ अनंतशायी सर्वेश्वर ॥ दिसती असंख्य हरीचे अवतार ॥ दिसती भार ऋषींचे ॥३७॥
इंद्र अग्नि यम नैऋत्यपती ॥ वरुण समीर कुबेर उमापती ॥ लोकसमवेत निश्चितीं ॥ मुखीं दिसती हरीच्या ॥३८॥
गोकुळ गोपाळ यशोदा नंद ॥ मुखामाजी दिसती विशद ॥ तेथे स्तनपान करी गोविंद ॥ मायेपुढें दिसतसे ॥३९॥
तेथेंही जांभई जगज्जीवन ॥ देतसे मुख पसरुन ॥ त्यांत दुसरें ब्रह्मांड पूर्ण ॥ यशोदा तें पाहतसे ॥१४०॥
अनंतब्रह्मांडनाथ ॥ लीला त्याची परमाद्भुत ॥ यशोदा झाली तटस्थ ॥ बोलों चालों विसरली ॥४१॥
अनंत यशोदा अनंत कृष्ण ॥ अनंत नामें अनंत गुण ॥ पाहतां यशोदेचें मन ॥ झालें उन्मन ब्रह्मानंदीं ॥४२॥
सवेंचि घातलें मायाजाळ ॥ जैसें सूर्याआड जलदपटळ ॥ मागुती स्तनपान गोपाळ ॥ पूर्ववत करीतसे ॥४३॥
मुखीं दाविलें विश्वरुप ॥ धन्य धन्य जननीचें तप ॥ ब्रह्मानंद तो अरुप ॥ मायेनें पुढें घेतलासे ॥४४॥
जो लावण्यामृतसागर ॥ जो आदिमायेचा प्रियकर ॥ जो भक्तमंदिरांगणमांदार ॥ जलजोद्भवजनक जो ॥४५॥
जो भक्तमानसचकोरचंद्र ॥ अज्ञानतिमिरच्छेदक दिवाकर ॥ जो षड्गुणैश्वर्यसमुद्र ॥ लीला दावी भक्तांतें ॥४६॥
यशोदेनें उचलिला ॥ रत्नजडित पालखीं निजविला ॥ गीत गातसे वेल्हाळा ॥ यशोदादेवी तेधवां ॥४७॥
श्रीरामचरित्र चांगलें ॥ यशोदेनें तेव्हां गाइलें ॥ ऐकतां जें सकळें ॥ कलिकिल्मिषें न होती ॥४८॥
पाळणां सावध कृष्णनाथ ॥ आपुली पूर्वलीला कौतुकें ऐकत ॥ यशोदा स्वानंदें डुल्लत ॥ पालखा हालवीत हरीच्या ॥४९॥
जो कमळिणीमित्रकुळभूषण ॥ अनंगदहनहृदयजीवन ॥ विद्वज्जनमानसमांदुसरत्न ॥ तो रघुनंदन साजिरा ॥१५०॥
जो ब्रह्मानंद निर्मळ ॥ तो झाला दशरथाचा बाळ ॥ लीलावतारी तमालनीळ ॥ अयोध्येमाजी अवतरला ॥५१॥
जो जलजनाभ जलदवर्ण ॥ जलधिशायी जलजलोचन ॥ भवजलतारक जलजवदन ॥ जगत्प्राण जगद्गुरु ॥५२॥
जो कमलोद्भवाचा गुरु पूर्ण ॥ तो वसिष्ठासी रिघाला शरण ॥ गुरुमुखें निजज्ञान ॥ रघुनंदन श्रवण करी ॥५३॥
दशरथासीं मागे विश्वामित्र ॥ म्हणे दे तुझा राम राजीवनेत्र ॥ पिशिताशन अपवित्र ॥ क्रतु माझा भगिती ॥५४॥
सौमित्रासमवेत स्मरारिमित्र ॥ घेऊनि चालिला गाधिपुत्र ॥ वाटेसी ताटिका दुर्धर ॥ राक्षसी उभी ठाकली ॥५५॥
दशसहस्त्र कुंजरांचें बळ ॥ येवढी ताटिका सबळ ॥ गाई ब्राह्मण देखतां तत्काळ ॥ दाढे घालूनि रगडीत ॥५६॥
ऐसियाताटिकेसी राजीवनयनें ॥ निर्दाळिलें एकेचि बाणें ॥ पुढें सिध्दाश्रमीं रघुनंदनें ॥ कीर्ति केली अगाध ॥५७॥
वीस कोटी सेनेसहित सुबाहु ॥ तत्काळ मारी आजानुबाहु ॥ पिशिताशनांचे समूहु ॥ राजीवनेत्रें भंगिले ॥५८॥
मिथिलेसी येतां रघुनंदन ॥ वेष्टित समागमें विद्वज्जन ॥ जैसा श्रुतिवेष्टित वेदोनारायण ॥ तैसा रघुनंदन जातसे ॥५९॥
कीं निर्जरांसमवेत सहस्त्राक्ष ॥ कीं तापसवेष्टित विरुपाक्ष ॥ तैसा राम कमलपत्राक्ष ॥ धरामरीं वेष्टिला ॥१६०॥
तो पद्मजातकन्यका सुंदरी ॥ पद्माक्षीवर वाटेस उद्धरी ॥ चरणरजें ते पद्मनेत्री ॥ पावन झाली तेधवां ॥६१॥
जे गौतमाची प्रिय ललना ॥ ते नमस्कारुनि रविकुळभूषणा ॥ म्हणे सजलजलदवर्णा ॥ उद्धरिलें मजलागीं ॥६२॥
पुढें त्र्यंबकधनु भंगूनि रघुवीरें ॥ जानकी पर्णिली प्रतापशूरें ॥ पुढें भार्गव जिंकोनि त्वरें ॥ अयोध्येसी राम आले ॥६३॥
कैकेयीवरदानानिमित्त ॥ वन चालला रघुनाथ ॥ सीतासौमित्रांसमवेत ॥ राम जात तपोवना ॥६४॥
वनासी गेलिया रघुनंदन ॥ मागें द्शरथ पावला मरण ॥ चौदा वर्षें महा अरण्य ॥ कौसल्यात्मजें सेविलें ॥६५॥
श्रीराम आला पंचवटीं ॥ सौमित्रासमवेत गोरटी ॥ रणरंगधीर जगजेठी ॥ राहिला तटीं गौतमीच्या ॥६६॥
तेथें कपटें येऊनि रावण ॥ करी जानकीचें हरण ॥ तों श्रीकृष्णें पाळण्यांतून ॥ गर्जोनि हांक फोडिली ॥६७॥
पाळण्याखालीं उडी टाकून ॥ हातीं घेऊनि धनुष्यबान ॥ सुंदर निमासुर वदन ॥ रघुनंदन उभा तेथें ॥६८॥
आरक्त दिसती राजीवनयन ॥ चाप ओढिलेंसे आकर्ण ॥ म्हणे कोठें दावीं तो रावण ॥ टाकीन छेदून क्षणार्धें ॥६९॥
कोठें नल नीळ सौमित्र ॥ कोठें निराळोद्भवपुत्र ॥ कोठें जांबुवंत तरणिकुमर ॥ वालिसुत कोठें आहे ॥१७०॥
पाषाणीं झांका रे समुद्र ॥ सुवेळेसी जाऊं द्या दळभार ॥ लंकेसी अग्नि लावा सत्वर ॥ रजनीचर संहारा ॥७१॥
बाहेर रावण आणा रे त्वरें ॥ छेदितों आतां दाही शिरें ॥ हांक दिधली आवेशें थोरें ॥ पंकजनेत्रें तेधवाम ॥७२॥
यशोदा भयभीत तटस्थ ॥ म्हणे काय मांडिला कल्पांत ॥ एकाएकीं रघुनाथ ॥ अकस्मात प्रकटला ॥७३॥
ऐसें कौतुक यादवरायें ॥ दाविलें आपुले जननीये ॥ सवेंचि यशोदा पाळण्यांत पाहे ॥ तों रडत आहे स्वच्छंदें ॥७४॥
यशोदेसी नवल वाटलें ॥ म्हणे मीं काय स्वप्न देखिलें ॥ अद्भुत हरिलीला न कळे ॥ भवविरिंचींसी पाहतां ॥७५॥
कृष्ण म्हणे वो जननीये ॥ मज घेईं वेगें कडिये ॥ अंगणीं तूं उभी राहें ॥ मी खेळेन क्षणभरी ॥७६॥
धन्य धन्य तें नंदाचें आंगण ॥ जेथें क्रीडे मनमोहन ॥ तों नीलबंदभूमीवरी जगज्जीवन ॥ सहज जाऊनि बैसला ॥७७॥
कृष्ण केवळ घननीळ ॥ नीलबंदभूमिका सुढाळ ॥ दोहींचें एकरुप निर्मळ ॥ दुसरेपण दिसेना ॥७८॥
जवळी असोनि घननीळ ॥ माय म्हणे काय जाहला बाळ ॥ घाबरली यशोदा वेल्हाळ ॥ मंदिरामाजी पाहात ॥७९॥
मागुती धांवे आंगणीं ॥ म्हणे कोठें गेला चक्रपाणी ॥ आळोआळीं नंदराणी ॥ धुंडीत हिंडे हरीतें ॥१८०॥
हिंडली संपूर्ण गोकुळ ॥ परी ठायीं न पडे घननीळ ॥ गोपी धांवल्या सकळ ॥ नंदमंदिरीं तेधवां ॥८१॥
यशोदा परतोनि आली मंदिरीं ॥ हृदय पिटीत दोहीं करीं ॥ म्हणे मी आतां कडेवरी ॥ घेतला होता श्रीकृष्ण ॥८२॥
पृथ्वीमाजी अदृश्य जाहला ॥ कीं गधर्वीं उचलोनि नेला ॥ म्हणोनि यशोदा वेल्हाळा ॥ शोक करीत अद्भुत ॥८३॥
आंगणीं असोनि श्रीहरी ॥ परी न दिसे तिच्या नेंत्रीं ॥ जन भुलले याचपरी ॥ नाना साधनें भजती हो ॥८४॥
जवळी असोन जगज्जीवन ॥ कां सेविती थोर विपिन ॥ निराहार पंचाग्निसाधन ॥ नाना यज्ञ करिती एक ॥८५॥
एक घेती वायुआहार ॥ एक नग्न मौनी जटाधर ॥ एक हिंडती दिगंबर ॥ परी श्रीधर न सांपडे ॥८६॥
शम दम अष्टांगसाधन ॥ नानाव्रताचरण तीर्थाटन ॥ एक वेदाभ्यासीं शास्त्रीं निपुण ॥ परी तें निधान न सांपडे ॥८७॥
ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम ॥ वानप्रस्थ चतुर्थाश्रम ॥ परी ठायीं न पडे मेघश्याम ॥ व्यर्थ श्रम पावती ते ॥८८॥
न करितां सारासारविचार ॥ टांगून घेती पिती धूर ॥ संतास न पुसती पामर ॥ व्यर्थ गिरिकंदर सेविती ॥८९॥
अभ्यासिल्या चतुर्दश विद्या ॥ परी नेणती त्या जगद्वंद्या ॥ तरी विद्या तेचि अविद्या ॥ ब्रह्मविद्या जया नाहीं ॥१९०॥
हरिप्राप्तीविण कोरडें ज्ञान ॥ तयाचें नांव अज्ञान ॥ भगवत्प्राप्तीविण दावी भजन ॥ तें सोंग जाण नटाचें ॥९१॥
कृष्णप्राप्तीविण कर्म ॥ तो तयासी पडिला भ्रम ॥ हरिप्राप्तीविण धर्म ॥ तोच अधर्म जाणावा ॥९२॥
हरिप्राप्तीविण कीर्तन ॥ वाउगेंच काय करुन ॥ कोल्हाटी शस्त्र दावी झळकावून ॥ परी रणपंडित नव्हे तो ॥९३॥
जैसी मैंदाची शांति जाण ॥ कीं बकाचें जैसें ध्यान ॥ कीं पारध्याचें गायन ॥ कीं मुखमंडण वेश्येचें ॥९४॥
कीं बेगडीचे केले नग ॥ कीं पतंगाचा क्षणिक रंग ॥ तैसी कृपा न करितां श्रीरंग ॥ सर्व साधनें व्यर्थचि ॥९५॥
आंगणीं असोन जगज्जीवन ॥ व्यर्थ गोपी गेल्या भुलोन ॥ मृगनाभीं कस्तूरी असोन ॥ तया ज्ञान नव्हे तें ॥९६॥
नाकीचें मोतीं सुढाळ ॥ गळां घाली एक वेल्हाळ ॥ तें विसरुनि तत्काळ ॥ घरीं केर शोधीतसे ॥९७॥
तैसी यशोदा म्हणे सकळ सदनें॥ शोधिलीं म्यां हरिकारणें ॥ स्थूल लिंग कारण महाकारणें ॥ शोधोनियां पाहिलीं ॥९८॥
अवस्था भोग गुणखाणी ॥ चारी अभिमान चारी वाणी ॥ पिंडब्रह्मांडींचीं तत्त्वें शोधूनी ॥ हरीलागीं पाहिलीं म्यां ॥९९॥
वेदशास्त्रें पुराणें ॥ नाना ग्रंथ नाना साधनें ॥ उपरमाडिया हरीकारणें ॥ षट्चक्रांच्या शोधिल्या ॥२००॥
यशोदा म्हणे करुं काय ॥ कैसी मज हरिप्राप्ती होय ॥ कोणाचे गे धरुं पाय ॥ कृष्णप्राप्तीकारणें ॥१॥
नंद आला आंगणांत ॥ तों यशोदा करीतसे आकांत ॥ भोंवत्या गौळणी रडत ॥ कृष्णनाथ पाहातसे ॥२॥
मग म्हणे जगज्जीवन ॥ माया तत्काळ सोडील प्राण ॥ नीलबंदभूमीवरुन ॥ दुडदुडां हरि धांविन्नला ॥३॥
तों नंदें देखिला अकस्मात ॥ धांवोनि सप्रेम हृदयीं धरीत ॥ यशोदा गौळिणी समस्त ॥ जवळी धांवती तेधवां ॥४॥
मायेसी फुटला प्रेमपान्हा ॥ आडवें घेतलें राजीवनयना ॥ म्हणे बापा जगज्जीवना ॥ कोठें गेला होतासी ॥५॥
कृष्ण म्हणे वो जननी ॥ मी येथेंच होतों आंगणीं ॥ यशोदेचें निजमनीं ॥ ब्रह्मानंद उचंबळला ॥६॥
घरांत घेऊन गेली कृष्णा ॥ पहुडविला हृदयपाळणां ॥ शुक म्हणे कुरुभूषणा ॥ हरिलीला अद्भुत ॥७॥
जनमेजयासी म्हणे वैशंपायन ॥ आगाध गौळियांचें पूर्वपुण्य ॥ अवतरला इंदिराजीवन ॥ पावन केलें समस्तां ॥८॥
श्रीकृष्णकथा रत्नखाणी ॥ उघडली पूर्वपुण्येंकरुनी ॥ येथींचे जोहारी संतज्ञानी ॥ निजनयनीं पाहती ते ॥९॥
नाना दृष्टांत साहित्यरचना ॥ हीं रत्नें अमोलिक जाणा ॥ सभाग्य पाहोनि नयनां ॥ निजहृदयीं संग्रहित ॥२१०॥
जे अभाविक अभाग्य अत्यंत ॥ त्यांस नावडे हरिविजयग्रंथ ॥ ग्रंथरुपें यथार्थ ॥ भीमरथी केवळ हे ॥११॥
हरिविजय ग्रंथ पूर्ण ॥ चंद्रभागा मध्यें निजजीवन ॥ तो हा पंचमाध्याय जाण ॥ येथें स्नान भक्त करिती ॥१२॥
या तीर्थीं करितां स्नान ॥ प्रत्यक्ष होय पांडुरंगदर्शन ॥ उभा कटीं कर ठेवून ॥ स्वामी माझा तिष्ठतसे ॥१३॥
भीमातीरीं दिगंबरा ॥ श्रीब्रह्मानंद विश्वंभरा ॥ जगद्वंद्या श्रीधरवरा ॥ निर्विकारा अभंगा ॥१४॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ चतुर श्रोते परिसोत संत ॥ पंचमाध्याय गोड हा ॥२१५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥अध्याय॥५॥ ॥ओंव्या॥२१५॥