अध्याय ६
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय निजजनमानसमराळा ॥ अनंतवेषा त्रैलोक्यपाळा ॥ भक्तजनांसी अगाध लीला ॥ गोकुळामाजी दाविसी ॥१॥
जय जय पूतनाप्राणशोषका ॥ तृणावर्तशकटांतका ॥ जांभई देतां रमानायका ॥ विश्वरुपा दाविलें ॥२॥
जय कृष्णा निगमागमसारा ॥ अनंतरुपा नंदकुमारा ॥ जय पयोब्धिहृदयविहारा ॥ दिगंबरा बाळवेषा ॥३॥
घननीळा नीळबंधभूमीसी ॥ जवळी असोनि न दिससी ॥ जरी तूंच कृपावंत होसी ॥ तरीच येसी प्रत्यया ॥४॥
असो पंचमाध्यायाचे अंतीं ॥ नीळबंधभूमीवरी श्रीपती ॥ खेळोनि लीला विलासरीतीं ॥ मायेप्रती दाविली ॥५॥
एके दिवशीं प्रातःकाळीं ॥ कृष्ण घेऊनि बैसला आळी ॥ मातेस म्हणे वनमाळी ॥ सूर्य आणीं खेळावया ॥६॥
बरा वर्तुळ दिसतो तारणी ॥ कंदुक करुनि दे मज जननी ॥ म्हणवोनि लोळणी धरणीं ॥ धराधरशयन घालीतसे ॥७॥
यशोदा म्हणे माझे आई ॥ सूर्य कैसा देऊं गे कान्हाई ॥ म्हणवोनि कडेवरी लवलाहीं ॥ यशोदेनें घेतला ॥८॥
माता म्हणे सखया ॥ आणिक मागें खेळावया ॥ तरी चंद्रबिंब लवलाह्या ॥ काढूनि देईं रांजणींचें ॥९॥
तों माता म्हणे कृष्णातें ॥ तें कैसें मी देऊं तूतें ॥ तरी डेरियामाजी घुमतें ॥ तेंच काढूनि देईं कां ॥१०॥
नलगे रवि दंड डेरा ॥ काढूनि दे आंतील घुमारा ॥ माता म्हणे रे सुकुमारा ॥ काढितां न ये सर्वथा ॥११॥
तरी पर्वत उचलोनि आणवीं ॥ देव देव्हारींचे बोलवीं ॥ समीराच्या दाखवीं ॥ झुळुका मज नयनीं वो ॥१२॥
दे नयनांतील बाहुली ॥ तूं जाईं ठेवूनि सांउली ॥ आरशांतील मुख ये वेळीं ॥ काढूनि देईं जननीये ॥१३॥
काढूनि दे मुक्तांचा ढाळ ॥ वेगळी करीं रत्नांची कीळ ॥ आकाश जें घटांतील ॥ काढूनियां मज दावी ॥१४॥
पुढती लोळण घाली घननीळ ॥ माता म्हणे आला रे बागुल ॥ महाभ्यासुर विक्राळ ॥ पांच तोंडें तयासी ॥१५॥
माथां जटांचे भार ॥ तृतीयनयनींवैश्वानर ॥ शिरीं झुळझुळ वाहे नीर ॥ भयंकर महाजोगी ॥१६॥
चंद्रकळा तयाचें शिरीं ॥ नीळकंठ खट्वांग करीं ॥ भस्म चर्चिलें शरीरीं ॥ गजचर्म पांघुरला ॥१७॥
नेसलासे व्याघ्रांबर ॥ गळां मनुष्यरुंडांचे हार ॥ सर्वांगीं वेष्टिले फणिवर ॥ दश भुजा मिरवती ॥१८॥
त्यास देखतांचि सळिजे ॥ कां उठोनि तत्काळ पळिजे ॥ कृष्णा तूं उगाचि निजें ॥ जोगी बाहेर उभा असे ॥१९॥
जोगी तो काळाचाही काळ ॥ क्रोधी जैसा वडवानळ ॥ मुष्टींत हें ब्रह्मांड सकळ ॥ धरुनियाम रगडी पैं ॥२०॥
हरि म्हणे वो जननी ॥ मी रडतों त्याचलागोनी ॥ ऐसा तो जोगी नयनीं ॥ मज आतांचि दाखवीं ॥२१॥
जो क्षीराब्धिवासी शेषशायीं ॥ तो गडबडां लोळे ते समयीं ॥ माय हरीस धरी हृदयीं ॥ समजावीत सप्रेम ॥२२॥
परी न राहे सर्वथा ॥ म्हणे मज जोगी दावीं आतां ॥ मग म्हणे यशोदा माता ॥ कैसें यास करावें ॥२३॥
मग तळघरीं अंधारीं ॥ त्यामाजी गुंफा ओवरी ॥ श्रीकृष्णासी झडकरी ॥ नेलें तेथें मायेनेम ॥२४॥
माता म्हणे जोगी आहे तेथें ॥ हरि म्हणें त्यापासी नेईं मातें ॥ यशोदा म्हणे तेथें भयभीत होसी तूं ॥२५॥
मग म्हणे कमलोद्भवपिता ॥ मी न भीं माते सर्वथा ॥ परी मज जोगी आतां ॥ कैसा आहे दाखवीं ॥२६॥
मातेनें हरीस आंत नेलें ॥ तों ब्रह्मांड अवघें उजळलें ॥ कैंचा अंधार प्रकाशलें ॥ कृष्णरुप चहूंकडे ॥२७॥
गृहस्तंभ उथाळीं भिंती ॥ पाहतां मायेसी न दिसती ॥ जगन्निवासें निश्चितीं ॥ चहुंकडे व्यापिलें ॥२८॥
पृथ्वी आप अंबर ॥ अग्नि समीर समुद्र ॥ नाना जीवजातिविकार ॥ कृष्णरुप दिसताती ॥२९॥
आपआपणासी यशोदा विसरे ॥ सर्वही व्यापिलें यादवेंद्रें ॥ तळघरा बाहेर त्वरें ॥ माय आली तेधवां ॥३०॥
मायेवरी माया घातली ॥ अद्भुत महिमा ते विसरली ॥ मग म्हणे रे वनमाळी ॥ नसती आळी घेऊं नको ॥३१॥
पुढें दिधलें खेळवणें ॥ कृष्ण म्हणे न घें चालवणें ॥ मज तो जोगी दाखवणें ॥ पंचवदन विरुपाक्ष ॥३२॥
तों बळिभद्र पातला ॥ श्रीरंगास म्हणे ते वेळां ॥ चाल बाहेर गोपाळा ॥ खेळ खेळों विचित्र ॥३३॥
ऐकतांचि ऐसें वचन ॥ गदागदां हांसे जगज्जीवन ॥ कडेखालीं उतरोन ॥ हात धरी बळिरामाचा ॥३४॥
दोघे दुडदुडां धांवती ॥ राजबिदीस उभे राहती ॥ धाकटे गोपाळ मिळती ॥ रामकृष्णांभोंवते ॥३५॥
लपंडाई चेंडू चक्रें विचित्र ॥ खेळ खेळे पंकजनेत्र ॥ जो पद्माक्षीवल्लभ उदार ॥ जलजनाभ श्रीहरी ॥३६॥
जो अनंतब्रह्मांडनायक ॥ जो निजमोक्षाचा परिपाळक ॥ जो अनंतवेषधारक ॥ जगव्यापक जगगुद्रु ॥३७॥
जो भक्तवत्सल भयहारक ॥ जो भवहृदय भवभयनाशक ॥ जो भगवंत निजभाग्यदायक ॥ अभंग अक्षय पद ज्याचें ॥३८॥
सवें गोपाळांची मांदी ॥ खेळत जात ते राजबिदीं ॥ शचीनायक भर्ग वा विधी ॥ लीला न कळे तयांतें ॥३९॥
खेळ खेळतां श्रीहरी ॥ रिघे एके गोपीचें मंदिरीं ॥ दधि दूध क्षणाभीतरीं ॥ चोरोनियां भक्षिलें ॥४०॥
घृत नवनीत साय ॥ गोपाळांस देत लवलाहें ॥ तेथूनि नकळत जाय ॥ आणिकीचे गृहाप्रती ॥४१॥
घरोघरींचें संचलें लोणी ॥ हरी परी नेणेचि कोणी ॥ अद्भुत तयाची करणी ॥ वेदशास्त्रांसी अगम्य ॥४२॥
तें नंदयशोदेचें तप पूर्ण ॥ कीं कमलोद्भवाचें देवतार्चन ॥ कीं तें नीलग्रीवाचें ध्यान ॥ कृष्णरुप प्रकटलें ॥४३॥
तें इंदिरेचें निजजीवन ॥ तें वैकुंठपीठींचें निधान ॥ कीं गौळियांचें पूर्वपुण्य ॥ फळा आलें एकदांचि ॥४४॥
कीं तें निगमागमांचें सार ॥ कीं तें भक्तांचें निजमंदिर ॥ कीं तें संतांचें प्रियकर ॥ निजधन ठेवणें ॥४५॥
कीं तें योगियांचेम विश्रामधाम ॥ कीं निजजनमंगलपूर्णकाम ॥ तो ब्रह्मानंद मेघश्याम ॥ चोरी करी गोकुळीं ॥४६॥
एके गोपीच्या मंदिरांत ॥ गडियांसमवेत जगन्नाथा ॥ रिघतां बोले मात ॥ गोपाळांसी तेधवां ॥४७॥
म्हणे सखे हो एक ऐका ॥ पाउलें वाजूं देऊं नका ॥ सांचोळ ऐकोनि गोपिका ॥ जाग्या होतील निर्धारें ॥४८॥
गडी म्हणती पूतनारी ॥ वाळे नेपुरें वाजती गजरीं ॥ चरणींची आंवरी मुरारी ॥ ऐकती सुंदरी मंदिरींच्या ॥४९॥
आम्हांसी म्हणसी न वाजवा पाऊल ॥ तव पदींच्या वांक्या करिती कोल्हाळ ॥ हें ऐकोनि घननीळ ॥ कर्णीं घाली आंगोळिया ॥५०॥
कर्णीं बोटे घालितां गोपाळें ॥ बैसली त्रैलोक्याचीं टाळें ॥ कृष्ण झांकी जेव्हां डोळे ॥ तरी त्रिभुवन आंधळें होय पैं ॥५१॥
एकाचि सूत्रमेळें ॥ नाचवी ब्रह्मांडींचे पुतळे ॥ जो अक्षय अभंग न चळे ॥ काळ वेळ नाहीं जया ॥५२॥
जैसी अनेक जलचरें एक समुद्र ॥ अनेक पक्षी परी एक अंबर ॥ अनेक रस परी एक नीर ॥ व्यापक श्रीवर तैसा हा॥५३॥
नाना अलंकार एक सुवर्ण ॥ नाना घट एक मृतिका जाण ॥ नाना पट परी एक तंतु पूर्ण ॥ तैसा श्रीकृष्ण व्यापक ॥५४॥
नाना दीप एक अग्नी ॥ नाना किरण परी एक वासरमणी ॥ नाना तरंग एक पाणी ॥ शारंगपाणी तेवीं दिसे ॥५५॥
ऐसा श्रीकृष्ण चाळक ॥ जगद्वंद्य जगव्यापक ॥ तेणें गोपीचें घृत लोणी सकळिक ॥ भक्षिलें तीस न कळतां ॥५६॥
सवें घेऊनि गोपाळां ॥ आणिक गृहीं प्रवेशला ॥ कोणासही न कळे लीला ॥ श्रीकृष्णाची अगम्य ॥५७॥
एके दिवशीं माध्यान्हकाळीं ॥ एके गोपीचें घरीं वनमाळी ॥ रिघाला तंव ते वेल्हाळी ॥ उदका गेली यमुनेतें ॥५८॥
उदक घेऊनि आली सुंदरी ॥ प्रवेशली जों निजमंदिरीं ॥ तों एकलाचि पूतनारी ॥ नवनीत भक्षीतसे ॥५९॥
म्हणे कोण रे तूं येथें ॥ चोरुनि भक्षिसी नवनीतातें ॥ तों बोलिलेम वैकुंठनाथें ॥ चोरटीं निश्चित तूंच पैं ॥६०॥
माझें मी भक्षीत नवनीत ॥ तूं कोणी पुसावया येथ ॥ गोपी गदगदा हांसत ॥ घर माझें कीं चोरटिया ॥६१॥
कृष्ण म्हणे माझें म्हणतीस घर ॥ परी बरवा करी विचार ॥ आपुलें नव्हे शरीर ॥ मग घरदार कोणाचें ॥६२॥
ऐसें बोले चक्रपाणी ॥ गोपी विचार करी मनीं ॥ कृष्ण बोलिला सत्य वाणी ॥ नाशवंत सर्वही ॥६३॥
जें जें दिसे तें तें नाशवंत ॥ माझें म्हणावया मी कोण येथ ॥ अविनाश एक भगवंत ॥ अज अव्यय अढळ जो ॥६४॥
नाशवंत अविद्यामय पिंड ॥ क्षणिक सकळ ब्रह्मांड ॥ अवघें मायामय वितंड ॥ स्वप्नवत् क्षणिक हें ॥६५॥
शुक्तिकेचें रुपें काढिलेम ॥ वंध्यासुतेम पात्र घडिलें ॥ मृगजळींचे मासे भरिले ॥ निशीमाजी जाऊनि ॥६६॥
अंवसेचे अंधारे काळें ॥ दिवा दोप्रहरां वाळों घातलें ॥ सिकतां कांतोनि सूत केलें ॥ पाय बांधिले रज्जुसर्पाचे ॥६७॥
जितुकें दिसतें तितुकी कल्पना ॥ अवघी मायिक दृश्यरचना ॥ अविनाश वैकुंठराणा ॥ नित्य नूतन अक्षयीं ॥६८॥
ऐसा गोपी करितां विचार ॥ वृत्ति झाली तदाकार ॥ इकडे गोरस समग्र ॥ भक्षूनि सिद्ध पळावया ॥६९॥
सावध होऊनि गोपी बोले ॥ माझें गृह नव्हे कळलें ॥ तरी हें कोणाचें गृह वहिलें ॥ सांग मज गोपाळा ॥७०॥
श्रीहरि म्हणे माझें सदन ॥ गोपी बोले कासयावरुन ॥ सांग कांहीं घराची खूण ॥ आपुलें जरी म्हणतोसी ॥७१॥
हरि म्हणे ऐक सुंदरे ॥ आकाशें व्यापिली जितुकीं घरें ॥ तितुकीं माझीं समग्रें ॥ चराचर सर्वही ॥७२॥
हांसोनि बोले नितंबिनी ॥ बरवी जाणतोसी संपादणी ॥ घृतघट पुढां घेऊनी ॥ हात कां माजी घातला ॥७३॥
मग बोले भक्तसखा ॥ माजी बहुत पडल्या पिपीलिका ॥ त्या वेंचूनियां देखा ॥ टाकीतसें जाण पां ॥७४॥
गोपी म्हणे शेजेसीं ॥ बाळें निजलीं सावकासीं ॥ त्यांसी चिमटे कां घेतोसी ॥ हृषीकेशी सांग पां ॥७५॥
उद्यां प्रातःकाळीं उठोनियां ॥ म्हणतों वत्सें नेऊं चरावया ॥ कोणत्या वनासी पुसावया ॥ जागें करीं मी तयांतें ॥७६॥
ऐसें बोलोन लवलाह्या ॥ कृष्ण पळाला उठोनियां ॥ गोपी म्हणे रे लाघविया ॥ ठकवूनियां गेलासी ॥७७॥
गार्हाणें सांगावया तेचि क्षणीं ॥ येत्या झाल्या नितंबिनी ॥ परमा लालसा कृष्णदर्शनीं ॥ यशोदेसी बोलती ॥७८॥
मग हांसोनि बोलिल्या युवती ॥ खोडी करितो तुझा श्रीपती ॥ काय सांगों तुजप्रती ॥ लिहितां क्षिती पुरेना ॥७९॥
गार्हाणें सांगता सुंदरी ॥ त्यांचे डाव मनीं धरी ॥ चित्तीं विचारी मुरारी ॥ करीन बोहरी गोरसाची ॥८०॥
एक सांगे कामिनी ॥ हरि प्रवेशला आमुचें सदनीं ॥ तों शिंकीं बांधिलीं उंच स्थानीं ॥ मग चक्रपाणी काय करी ॥८१॥
पाटावरी पाट रचुनी ॥ त्यावरी तिवई दृढ ठेवूनी ॥ त्यावरी गडी उभा करोनी ॥ त्याच्या खांदा कृष्ण बैसे ॥८२॥
तरी शिंके नपवेचि करीं ॥ मग रविदंड उभा करी ॥ छिद्र पाडूनी घागरी ॥ धारा लावी अखंड ॥८३॥
औट मातृका निरसूनि विशेष ॥ संत सेविती स्वानंदरस ॥ तैसाचि वैकुंठविलास ॥ प्रेमें गोरस सेवीतसे ॥८४॥
कां सत्रावीचें स्वानंदनीर ॥ सेविती जैसे योगेश्वर ॥ त्याचपरी यादवेंद्र ॥ गोरस सुरस सेवीतसे ॥८५॥
गडियांस म्हणे अवधारा ॥ माझ्या कोंपरांच्या दुग्धधारा ॥ अवघे तुम्ही प्राशन करा ॥ द्वैतविचारा टाकोनि ॥८६॥
ज्यावरी बैसला भगवंत ॥ तो कृष्णचरणासी चिमटे घेत ॥ म्हणे अवघे तूंचि खासी निश्चित ॥ आम्हांस देईं सांवळिया ॥८७॥
मग भरोनि गोरस अंजुळी ॥ सखयांस पाजी वनमाळी ॥ वरी मुख करोनि ते वेळीं ॥ विलोकिती हरिवदन ॥८८॥
चकोर पाहती जैसा चंद्र ॥ कीं चक्रवाकें लक्षिती दिनकर ॥ कीं भूचरीमुद्रा योगेश्वर ॥ ऊर्ध्वदृष्टीं पाहती ॥८९॥
गोपाळांचे नेत्र तेचि षट्पद ॥ सेविती रविमुखकमलमकरंद ॥ कीं स्वरुप देखोनि स्तब्ध ॥ वेदश्रुती ज्यापरी ॥९०॥
ऐसें अवलोकितां कृष्णवदन ॥ जैसा चातकां वर्षें घन ॥ तैशा दुग्धधारा पूर्ण ॥ गडियांलागीं वर्षतसे ॥९१॥
गडी बोलती हर्षेंकरुन ॥ कृष्णा घट दिसतो कीं लहान ॥ सर्वांची दुग्धें तृप्ति होऊन ॥ धार चाले अखंड ॥९२॥
असो आतां तेचि क्षणीं ॥ जागी जाहली गौळिणी ॥ गडियांसी म्हणे चक्रपाणी ॥ पळा वेगें येथोनि आतां ॥९३॥
अवघे पळाले गोपाळ ॥ एकला सांपडला वैकुंठपाळ ॥ गौळिणीनें द्वार तत्काळ ॥ जाऊनियां धरियेलें ॥९४॥
गौळण म्हणे रे चित्तचोरा ॥ गडी पळविले सत्वरा ॥ परी तूं सांपडलासी सुंदरा ॥ आतां कैसा जासील ॥९५॥
काय वरकडांसी कारण ॥ तूं मुख्य सांपडलासी जगज्जीवन ॥ जैसें जिंकिलिया निजमन ॥ करणें सहज आकळसी ॥९६॥
हातीं लागल्या मुख्य धुर ॥ सहजचि सांपडला परिवार ॥ कीं घरांत आलिया दिनकर ॥ किरणें कोठे पळती पा ॥९७॥
झालिया स्वरुपप्राप्ती ॥ शांति दया क्षमा उपरती ॥ सहजीं सहज सांपडती ॥ सायास न करितां सत्वर ॥९८॥
मुख्य तूं सांपडलासी मज ॥ आतां सकळांसी काय काज ॥ हाता आलिया स्वरुप निज ॥ नाना साधनें कासया ॥९९॥
हृदयीं बिंबला नारायण ॥ मग क्षुद्रदैवतांचें काय कारण ॥ सुधारस समुद्रीं होतां निमग्न ॥ थिल्लरीं मन कां धांवें ॥१००॥
जो झाला वेदांतज्ञानी ॥ त्यास काय कारण क्षुद्रसाधनीं ॥ साधलिया अमृतसंजीवनी ॥ मग औषधी कां व्यर्थचि ॥१॥
हातीं सांपडतां हिरा ॥ मग कां वेंचाव्या अरण्यगारा ॥ कल्पतरु आलिया घरा ॥ मग बाभुळा कां भजावें ॥२॥
तैसा कृष्णा तूं सांपडलासी ॥ तुज नेईन यशोदेपासीं ॥ शिक्षा लावीन निश्चयेंसी ॥ हृषीकेशी तुज आताम ॥३॥
ऐसें बोलतां गौळिणी ॥ गदगदां हांसे मोक्षदानी ॥ दुग्धगुळणी मुखीं धरोनी ॥ कामिनीपासी पातला ॥४॥
गदगदां हांसे अबला ॥ तुज जावों नेदीं गोपाळा ॥ कृष्णगुळणी घातली डोळां ॥ क्षणमात्र नलगतां ॥५॥
येरी जंव नेत्र चोळी ॥ तो पळाला वेगें वनमाळी ॥ ऐसा गोपी ते वेळीं ॥ गार्हाणें सांगे मायेतें ॥६॥
तों एक बोले गजगामिनी ॥ परवां कृष्ण आला आमुचें सदनीं ॥ मी करीत होतें मंथनी ॥ हरि अंगणांत उभा असे ॥७॥
मग मी म्हणे हृषीकेशी ॥ चोरा काय पाळती पहातोसी ॥ येरु म्हणे वत्सें पाहावयासी ॥ सहज आलों मी येथें ॥८॥
तान्ह्या वत्सांचे कळप ते क्षणीं ॥ बांधिले होते गोष्ठांगणीं ॥ त्यांत जावोनि चक्रपाणी ॥ वासरें करें कुरवाळी ॥९॥
कोणत्या गाईचें वासरुं कोण ॥ म्हणोनि पुसे मजलागून ॥ तों मी करीत होतें मंथन ॥ पुढें पाहूनि यशोदे ॥११०॥
तों श्रीकृष्णें काय केलें ॥ कळप वत्सांचे सोडिले ॥ द्वाराबाहेर लावूनि दिधले ॥ क्षणमात्र न लागतां ॥११॥
पुच्छें वाहोनि हुंकारे ॥ आळोआळीं पळती वासरें ॥ ऐसें करुनि सर्वेश्वरें ॥ मजयेऊनि सांगतसे ॥१२॥
म्हणे तुझीं वत्सें सुटलीं ॥ काननाप्रति पळोन गेलीं ॥ ऐसें ऐकतां म्यां ते वेळीं ॥ मंथन तैसेंचि टाकिलें ॥१३॥
ग्रामाबाहेर वासुरें गेलीं ॥ तीं मज न वळती ते वेळीं ॥ तों घरामध्यें वनमाळी ॥ दधि नवनीत भक्षीत ॥१४॥
दूधही सकळ प्याला ॥ डेरा मंथनाचा फोडिला ॥ गोरस वाहत गेला ॥ ओसरीखालता यशोदे ॥१५॥
केला दुधाणियाचा चूर ॥ गोरस न उरे आणुमात्र ॥ ऐसें करोनिया पंकजनेत्र ॥ पळोनि गेला क्षणमात्रें ॥१६॥
धृत नवनीत दधि दुग्ध ॥ खाऊनि केलें शुद्धबुद्ध ॥ ऐसें करोनि मुकुंद ॥ पळोनि आला तुजजवळी ॥१७॥
वासुरें घेऊनि तिसरे प्रहरा ॥ मी आलें वो निजमंदिरा ॥ तों खापरांचा चुरा ॥ ओसरीवर झालासे ॥१८॥
ऐसें पीडिलें येणें माये ॥ आतां मी बांधीन याचे पाये ॥ कदा न सोडीं जननीये ॥ बोलों काय बहुत आतां ॥१९॥
बाहेर कळों नेदीं कोणा ॥ हृदयमंदिरीं वैकुंठराणा ॥ दृढ बांधीन याचिया चरणा ॥ कोणाकारणें कळो नेदीं ॥१२०॥
मायेस कळों नेदीं मात ॥ लोकांस बोलों नेदीं निश्चित ॥ काया वाचा मनें सत्य ॥ माये यातें न सोडीं ॥२१॥
हा घडामोडी दावूनि वदन ॥ सवेंच पळतो नलगतां क्षण ॥ ऐकोनि गोपीचें वचन ॥ खदखदां हांसे श्रीरंग ॥२२॥
मग बोले प्रेमळ सखा ॥ मी न सांपडें ब्रह्मादिकां ॥ चतुरे तुज कैंचा आवांका ॥ कोंडावया मजलागीं ॥२३॥
कृष्णवचन ऐकोनियां ॥ गदगदां हांसतसे माया ॥ तों आणिक गार्हाणें सांगावया ॥ दुजी गोपी सरसावली ॥२४॥
तंव ते म्हणे यशोदे सुंदरी ॥ कृष्ण प्रवेशला एके मंदिरीं ॥ तों ते गवळण गेली बाहेरी ॥ सून घरीं एकलीच ॥२५॥
तीस म्हणे वो नवनीत ॥ कोठें ठेविलें सांग सत्य ॥ तंव ते जाहली भयभीत ॥ कृष्ण प्रवेशे अंतरि ॥२६॥
घृत नवनीत भक्षिलें ॥ थोडेंसें निजकरीं घेतलें ॥ तें सुनेच्या मुखीं गिडबिडीलें ॥ आपण पळाला ते क्षणीं ॥२७॥
सासू आली बाहेरुनी ॥ तों सून मुख पुसी देखे नयनीं ॥ म्हणे गे चोरटे लोणी ॥ नित्य तूंचि भक्षिसी ॥२८॥
आम्ही म्हणों भक्षितो कृष्ण ॥ परी आज कळलें तुझें विंदान ॥ दोघींत झोटधरणी होत दारुण ॥ बाहेर कृष्ण पाहतसे ॥२९॥
सून म्हणे मामीसे ऐका ॥ लोणी कृष्णें लाविलें मुखा ॥ तो परम नष्ट देखा ॥ करोनि करणी पळाला ॥१३०॥
गौळण पाहे बाहेरी ॥ तों उभा असे श्रीहरी ॥ तंव ते म्हणे मुरारी ॥ बरी चोरी करितोसी ॥३१॥
सुनेच्या मुखीं लावूनि नवनीत ॥ पळालासी हरि त्वरित ॥ येरु म्हणे वो तिनें निश्चित ॥ माझ्या मुखीं लाविलें ॥३२॥
हे खात होती चोरुनि लोणी ॥ मी खेळावया आलों आंगणीं ॥ माझ्या मुखीं लावूनि लोणी ॥ हेच पळाली घरांत ॥३३॥
मजवरी आळ घालिती वृथा ॥ बोलतां हांसें आलें जगन्नाथा ॥ येरी म्हणे हे गोष्टी यथार्थान॥ भक्षिलें इनेंच साच पैं ॥३४॥
पुढती कोपली सुनेवरी ॥ कां गे ऐसी करितेस चोरी ॥ आळ घालिसी बाळावरी ॥ कुडी खरी तूंचि पैं ॥३५॥
ऐसी लावूनि कळी ॥ पळोनि आला वनमाळी ॥ तों आणिक एक गौळण उठिली ॥ गार्हाणें सांगावया ॥३६॥
म्हणे ऐक यशोदे सुंदरी ॥ परवां बिदीस खेळतां मुरारी ॥ एक गोपी देखोनि ते अवसरीं ॥ काय हरि पुसतसे ॥३७॥
म्हणे तुझ्या वक्षःस्थळीं ॥ हिंगुरडें कां वाढलीं ॥ कीं आमुचे चेंडू चोरुनि वेल्हाळी ॥ चोळीमाजी लपविले ॥३८॥
आमुचा चेंडू दे झडकरी ॥ म्हणोनि रळी करी हरी ॥ तिनें झिडकारितां मुरारी ॥ पळोनियां गेला हो ॥३९॥
एकीचें घरीं गोरस खाऊनी ॥ शिंकीं आणि रितीं दुधाणीं ॥ नेऊनि बांधी दुसरें सदनीं ॥ न कळतांचि अकस्मात ॥१४०॥
तंव ते गोपी प्रातःकाळीं शेजारणीच्या गृहा आली ॥ म्हणे आमुचीं शिंकीं गुप्त जाहलीं ॥ दुधाणियांसमवेत ॥४१॥
जों वरतें पाहे सुंदरी ॥ तों आपुली शिंकीं तिचें घरीं ॥ मग म्हणे गे चतुर नारी ॥ माझी शिंकीं येथें कां ॥४२॥
तुमचा बरा गे शेजार ॥ आम्हांसी फळला साचार ॥ आम्ही कृष्णावरी चोरी समग्र ॥ मूर्ख व्यर्थचि घालितों ॥४३॥
परब्रह्म केवळ गे श्रीहरी ॥ त्यावरी कोण घालील चोरी ॥ तो ब्रह्मानंद निर्विकारि ॥ चराचरीं व्यापक ॥४४॥
आम्ही म्हणों कृष्ण बाळ ॥ परी तो परब्रह्म निर्मळ ॥ त्यावरी कोण घालील आळ ॥ निर्मळा मळ न लागे ॥४५॥
शेजारी झाले चोर ॥ मग काय राखील राखणार ॥ कुंपणें शेत खादलें समग्र ॥ तरी मग कोणें राखावें ॥४६॥
माझीं शिंकीं आणि दुधाणीं ॥ कैशीं प्रवेशलीं तुझ्या सदनीं ॥ दोघींसीं मांडली झोटधरणीं ॥ हरीची करणी ऐसी हे ॥४७॥
एके गौळिणीची सून ॥ परसांत आंग धुताम नग्न ॥ तों एकाएकीं मनमोहन ॥ गृहामाजी पातला ॥४८॥
म्हणे आमुचा चेंडू अकस्मात ॥ उडोनि आला तुमचें परसांत ॥ म्हणोनि गेला धांवत ॥ आंग धूत कामिनी ते ॥४९॥
तीस हरि म्हणे ते समयीं ॥ ऊठ वेगें चेंडू देईं ॥ आमुचे कंदुक धरुनि हृदयीं ॥ बैसलीस गे चोरटे ॥१५०॥
तीस हातीं धरुनि उठवीत ॥ तों सासू आली परसांत ॥ ते म्हणे तूं नष्ट बहुत ॥ तुज शिक्षा लावीन मी ॥५१॥
धरावया धांवली म्हातारी ॥ तों वेगें पळाला पूतनारी ॥ तो वैकुंठपीठविहारी ॥ निर्विकार जगदात्मा ॥५२॥
एक गोपी म्हणे हरीसी ॥ जरी तूं आमुच्या गृहा येसी ॥ मी तुज बांधीन रे खांबासीं ॥ हृषीकेशी जाण पां ॥५३॥
तिचा डाव धरिला मनीं ॥ रात्रीं तिच्या गृहांत जाऊनी ॥ तिच्या वस्त्रांत नेऊनी ॥ वृश्चिक सोडिले गोपाळें ॥५४॥
नग्न गौळण करी कोल्हाळ ॥ वस्त्रें टाकिलीं तत्काळ ॥ सवेंचि जवळी येऊनि घननीळ ॥ पुसतसे तिजलागीं ॥५५॥
म्हणे काय गे वर्तमान ॥ हरि झालें रे वृश्चिकदंशन ॥ कृष्ण म्हणे आतां मी उतरीन ॥ क्षणमात्र न लागतां ॥५६॥
तूं नगन बिदीस येईं ॥ विंचू उतरीन लवलाहीं ॥ येरी म्हने परता होईं ॥ चक्रचाळका गौळिया ॥५७॥
हरि म्हणे मज खांबासी ॥ बांधीन गौळिणी तूं म्हणसी ॥ तुज प्रचीत निश्चयेंसी ॥ देवें दाविली जाण पां ॥५८॥
ते म्हणे जगज्जीवना ॥ सर्वांगा चढल्या वेदना ॥ प्राण जाती मनमोहना ॥ उतरीं वेगें वृश्चिक ॥५९॥
मग कृष्ण येऊनि जवळी ॥ कृपादृष्टीं तीस न्याहाळी ॥ वेदना राहिल्या सकळी ॥ क्षणमात्र न लागताम ॥१६०॥
जो अहंकाराविंचू उतरिता ॥ काळब्याळभय दूर करिता ॥ जो ब्रह्मादिकांचा नियंता ॥ मायेपरता सर्वसाक्षी ॥६१॥
जो भवसागरजलतारक ॥ जो सकळसृष्टिसंहारक ॥ जो विश्वजनकजनक ॥ नामरुपातीत जो ॥६२॥
असो यशोदा ऐके सादर ॥ गार्हाणियांचे चपेटे थोर ॥ गौळिणी सांगती समग्र ॥ नाना चरित्रें हरीचीं ॥६३॥
एक म्हणे येणें सर्प नेला ॥ एक दंपत्यांत सोडिला ॥ तीं बाहेर येऊनि सकळां ॥ लोकांलागीं सांगती ॥६४॥
धांवा धांवा म्हणती ते क्षणीं ॥ सर्प निघाला अंथरुणीं ॥ एक म्हणती मघां चक्रपाणी ॥ सर्प घेऊनि जात होता ॥६५॥
ही त्याचीच वो करणी ॥ कैंचा सर्प येईल सदनीं ॥ त्या म्हणती गोकुळा टाकूनी ॥ कृष्णभेणें जाऊं पैं ॥६६॥
जित सर्प काखे घेऊन ॥ बिदोबिदीं पळे तुझा नंदन ॥ विंचू मुष्टीमाजी धरुन ॥ भेडसावी बाळांतें ॥६७॥
एक गौळण देखोनि गरोदर ॥ तिजजवळी येऊनि यादवेंद्र ॥ म्हणे कां गे तुझें उदर ॥ येवढें वाढलें सांग पां ॥६८॥
ते म्हणे गर्भिणी मी हृषीकेशी ॥ कृष्ण म्हणे कैसी जाहलीसी ॥ येरी म्हणे भलतेंच पुससी ॥ चावट होसी बहुत तूं ॥६९॥
हरि म्हणे नवल देवाची करणी ॥ जाहलीस वो गर्भिणी ॥ येरी झिडकावी ते क्षणीं ॥ परता होईं गोवळ्या ॥१७०॥
तूं आतां दिसतोसी लहान ॥ पुढें बहुत शिकसी शहाणपण ॥ तुझे मातेस सांगोन ॥ शिक्षा करवीन तुज आतां ॥७१॥
एक गौळण पुरुषार्थें ॥ राखी आपुल्या गोरसातें ॥ म्हणे मी बिंदुमात्र कृष्णातें ॥ लागों नेदीं घरीं माझ्या ॥७२॥
गोरस सांचवूनि कावडी भरली ॥ बरी कसूनि दृढ बांधिली ॥ उद्यां मथुरेसी नेऊनि सकाळीं ॥ विकूनि येईन क्षणमांत्रें ॥७३॥
कृष्णमुखीं गोरस जाण ॥ पडों नेदीं मी वाघीण ॥ कृष्णासी शिक्षा लावीन ॥ जरी येईल गृहा माझ्या ॥७४॥
ऐसी अभिमानें ती गौळणी ॥ निजे उशा कावडी घेऊनी ॥ तों रजनीमाजी चक्रपाणी ॥ करी करणी विपरीत ॥७५॥
जो सकळ देहींचा साक्षी एक ॥ जो सकळ चित्तपरीक्षक ॥ जो सच्चिदानंद निष्कलंक ॥ दावी कौतुक भक्तांसी ॥७६॥
रजनीमाजी कृष्णनाथ ॥ प्रवेशला तिच्या गृहांत ॥ तीस निद्रा लागली अद्भुत ॥ हरि सोडी कावडीतें ॥७७॥
गोरस सर्वही भक्षूनी ॥ रितीं केलीं दुधाणीं ॥ त्यांमाजी सर्प विंचू भरुनी ॥ पुढती बांधिलीं तैसींच ॥७८॥
पाली सरड बेडूक ॥ अवघीं मडकीं भरलीं देख ॥ खूणगांठ तैसीच निष्टंक ॥ जगदुद्धारें बांधिली ॥७९॥
घरा गेला वनमाळी ॥ गौळण उठली प्रातःकाळीं ॥ कावडी खांदां घेतली ॥ मथुरेसी गेली तेधवां ॥१८०॥
गांवचे लोक आले ते क्षणीं ॥ गोरस पुसती गौळणी ॥ येरी म्हणे दहीं दूध लोणी ॥ चारी जिन्नसा आहेती ॥८१॥
एक म्हणती गोरस कैसा आहे ॥ येरी म्हणे द्रव्य आणा लवलाहें ॥ कावडी सोडूनियां पाहे ॥ मडकीं जंव उघडोनि ॥८२॥
तों सर्प विंचू ते वेळे ॥ भरभरां आंतून निघाले ॥ लोकांवरी धांवले ॥ डंखावया तेधवां ॥८३॥
सरड पाली चहूंकडे धांवती ॥ लोक बिदोबिदीं पळती ॥ एक म्हणती कुडी पापमती ॥ गौळण आहे दुष्ट हें ॥८४॥
आमच्या गांवावरी विघ्न ॥ विंचू सर्प कावडी भरोन ॥ इणें सोडिले आणून ॥ कौटालीण मोठी हे ॥८५॥
महाचांडाळीण गौळिणी ॥ ईस ताडण करावें धरुनी ॥ तंव ती कावडी टाकूनी ॥ पळे उठोनी सत्वर ॥८६॥
लोक धांवती क्रोधेंकरोनी ॥ कावडी टाकिली फोडोनी ॥ सर्प विंचू धरोनी ॥ लोक मारिती ठायीं ठायीं ॥८७॥
एक म्हणती गौळिणीस धरा वेगें ॥ येरी पळे गोकुळमार्गें ॥ ते निस्तेज होवोनि सर्वांगें ॥ वाटे पडे अडखळोनि ॥८८॥
धांपा दाटे वाटे रडे ॥ उलथोनि चिखलामाजी पडे ॥ लोक मारिती धोंडे खडे ॥ एक शेण हाणिती ॥८९॥
यमुना उतरोनि गोपी गेली ॥ गोकुळामाजी प्रवेशली ॥ तीस पुन्हां मथुरा वर्ज्य जाहली ॥ लोक टपती मारावया ॥१९०॥
कृष्णास जरी देती गोरस ॥ तरी शतगुणें वाढे विशेष ॥ ते गृहीं दशा न ये आसमास ॥ गोरस हरीस अर्पितां ॥९१॥
हरिमुखीं बिंदुमात्र पडे ॥ शतगुण तत्काळ वाढे ॥ जरी कृष्ण न ये घराकडे ॥ तरी गौळिणी कष्टी होती ॥९२॥
कृष्ण आजि आला नाहीं घरा ॥ म्हणोनि चिंताक्रांत गोपदारा ॥ बिंदुमात्र अर्पितां श्रीवरा ॥ गोरस वाढे असंभाव्य ॥९३॥
वटबीज मोहरीयेवढें ॥ परी पर्वताकार वृक्ष वाढे ॥ तैसा हरिमुखीं गोरस पडे ॥ दशा चढे गृहासी त्या ॥९४॥
गार्हाणें सांगती गौळिणी ॥ त्या उग्याच कौतुकेंकरोनी ॥ परी मनामाजी चक्रपाणी ॥ नित्य यावा गृहातें ॥९५॥
भलत्या कार्यमिषेंकरोनी ॥ यशोदेच्या गृहा कामिनी ॥ क्षणक्षणां येती फिरोनी ॥ कृष्ण नयनीं पाहावया ॥९६॥
पूर्णब्रह्म वैकुंठनायक ॥ त्यासी ते गौळण जाहली विन्मुख ॥ गोरस न देऊनियां दुःख ॥ मथुरेमाजी पावली ॥९७॥
प्रपंच ना परमार्थ ॥ गौळण श्रमली व्यर्थ ॥ जैसा निर्भागी उदिमा जात ॥ त्यास नागवीत तस्कर पैं ॥९८॥
भगवंतीं पडलें अंतर ॥ वर्ज्य जाहलें मथुरापुर ॥ खुंटला प्रपंचव्यवहार ॥ द्रव्य अणुमात्र लाभेना ॥९९॥
तेंच कृष्णमुखीं अर्पित ॥ तरी सहस्त्रगुणें वाढत ॥ कृपा न करितां भगवंत ॥ विघ्नें बहुत येती हो ॥२००॥
भगवंत झालिया पाठमोरा ॥ नसतींच विघ्नें येतीं घरा ॥ महारत्नें होती गारा ॥ कोणी न पुसे तयांतें ॥१॥
आपुलें द्रव्य लोकांवरी ॥ तें बुडोनि जाय न लाभे करीं ॥ ज्यांचें घ्यावें ते द्वारीं ॥ बैसती आण घालूनियां ॥२॥
वैरियां करीं सांपडे वर्म ॥ अवदशा येऊनि बुडे धर्म ॥ विशेष वाढले क्रोधकाम ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥३॥
आपुले जे का शत्रु पूर्ण ॥ ज्यांसी आपण पीडिले दारुण ॥ अडल्या धरणें त्यांचे चरण ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥४॥
लाभाकारणें निघे उदिमास ॥ तो हानीच होय दिवसेंदिवस ॥ पूज्यस्थानीं अपमान विशेष ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥५॥
सुहृद आप्त द्वेष करिती ॥ नसते व्यवहार येऊनि पडती ॥ सदा तळमळ वाटे चित्तीं ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥६॥
आपुलें राज्य संपत्ति धन ॥ शत्रु भोगूं पाहे आपण ॥ देह पीडे व्याधीविण ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥७॥
विद्या बहुत जवळी असे ॥ परी कोणीच तयासी न पुसे ॥ बोलो जातां मति भ्रंशे ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥८॥
ठेविला ठेवा न सांपडे ॥ नसतीच व्याधि अंगा जडे ॥ सदा भय वाटे चहूंकडे ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥९॥
असो गौळण सर्वस्वें ठाकली ॥ भगवंतीं ते अंतरली ॥ प्रपंचपरमार्थां मुकली ॥ ते पडली भवसागरीं ॥२१०॥
पुरुष अथवा नारी ॥ कृपा न करितां श्रीहरी ॥ व्यर्थ कष्टती संसारीं ॥ नाना दुःखें भोगिती ॥११॥
असो मग तेच गौळणी ॥ यशोदेच्या गृहा येऊनी ॥ लागली कृष्णाचे चरणीं ॥ म्हणे हरि दया करीं काम ॥१२॥
तुजसी अंतर पडतां ॥ मुकलें इहपरत्र स्वार्था ॥ कृपा करीं कृष्णनाथा ॥ निरसीं चिंता सर्वही ॥१३॥
कृष्ण म्हणे राहेम स्वस्थ ॥ भगवंतीं ठेवीं चित्त ॥ तेणें प्रपंच आणि परमार्थ ॥ ब्रह्मरुप भासे हो ॥१४॥
ऐसा निजभक्तमानसविहारी ॥ नाना लीला दावी मुरारी ॥ तो ब्रह्मानंद निर्विकारी ॥ दावी चरित्र दासांतें ॥१५॥
पाहतां हरिविजयग्रंथ ॥ ग्रंथरुपें श्रीभगवंत ॥ हृदयीं राहे अखंडित ॥ नाठवत दुजें कांहीं ॥१६॥
पाहीन म्हणतां हा ग्रंथ ॥ पापें होती भयभीत ॥ आधींच पळती समस्त ॥ पुढती न येत फिरोनी ॥१७॥
जन्मोजन्मींचीं पापें बहुतें ॥ लिहिलीं होतीं चित्रगुप्तें ॥ तो तटस्थ राहे तेथें ॥ लेखणी न चले पां ॥१८॥
हें म्हणतां हरिचरित्र ॥ परम सुखावे विष्णुपुत्र ॥ तो पूजा घेऊनि सत्वर ॥ सामोरा येत तयातें ॥१९॥
अवलोकिताम हरिविजय ॥ सर्वकाळ पावे जय ॥ कळिकाळाचें नाहीं भय ॥ रक्षी स्वयें हरि त्यातें ॥२२०॥
या ग्रंथरुपें गोदावरी ॥ वाहे निरंतर भक्तांवरी ॥ सत्यवतीसुत ब्रह्मगिरी ॥ येथूनि इचा उगम ॥२१॥
वैराग्य आणि भक्ती ॥ या दोन्ही थडया शोभती ॥ ज्ञानरुपें गोदा निश्चितीं ॥ वाहे अभय निर्मळ ॥२२॥
वरकड नदियांमाजी जीवन ॥ या ग्रंथगोदेमाजी जगज्जीवन ॥ प्रेमपूर येती भरोन ॥ नाहीं वोसाण दूषणाचें ॥२३॥
वरकड नद्यांचें डहुळ पाणी ॥ येथें निर्मळ सदा चक्रपाणी ॥ भक्तराज बैसले श्रवणीं ॥ अनुष्ठानीं सादर ॥२४॥
ते गंगेमाजी बुडतां मरिजे ॥ हे गंगेमाजी बुडतां तरिजे ॥ वृत्ति जळसावजें ॥ माजी निमग्न तळपती ॥२५॥
श्रीकृष्ण जगदानंदकंद ॥ तोचि स्वामी ब्रह्मानंद ॥ त्याचे चरणलक्षणमृगमद ॥ श्रीधरमिलिंद सेवींत ॥२६॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ समंत हरिवंशभागवत ॥ चतुर परिसोत प्रेमळ भक्त ॥ षष्ठाध्याय गोड हा ॥२२७॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥अध्याय॥६॥ ॥ओंव्या २२७॥