अध्याय १४
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय वृंदावनविलासिनी ॥ आदिमाये तूं कुलस्वामिनी ॥ सनकादिकांच्या हृदयभुवनीं ॥ तूं भवानी राहसी ॥१॥
काम क्रोध अनिवार ॥ हेचि शुंभ निशुंभ दुष्ट असुर ॥ अहंकार हा महिषासुर ॥ करीं संहार तयांचा ॥२॥
ब्रह्मा विष्णु आणि रुद्र ॥ शेष वाचस्पति पुरंदर ॥ पुराणें शास्त्रें वेद समग्र ॥ तुझें गोंधळी नाचती ॥३॥
व्यास वाल्मीक वामदेव शुक ॥ प्रल्हाद नारद बली भीष्मादिक ॥ हेचि दिवटे प्रकाशक ॥ जनांसी मार्ग दाखविती ॥४॥
तूं कैवल्यपदकनकलतिका ॥ आनंदसरोवरमराळिका ॥ ब्रह्मानंदपददायका ॥ निजभक्तांसी सुख देसी तूं ॥५॥
मनमोहने गोकुळवासिनी ॥ दुष्टदैत्यसंहारिणी ॥ सांवळे मुरलीधरे जगन्मोहिनी ॥ नंदसदनीं खेळसी तूं ॥६॥
संगें घेऊनि गोपाळ ॥ निरंजनीं घालिसी गोंधळ ॥ दैत्य हे बस्त सबळ ॥ बळी घेसी तयांसी ॥७॥
तेचि तूं अंबे भीमातीरीं ॥ समपद समकर समनेत्रीं ॥ वाट पाहसी अहोरात्रीं ॥ निजभक्तांची पंढरीये ॥८॥
तेरावा अध्याय संपतां तेथें ॥ रामरुप धरिलें कृष्णनाथें ॥ असुरासुर प्रभंजनसुतें ॥ येवोनियां संहारिला ॥९॥
कंस अत्यंत भयेंकरुनी ॥ जें जें पाहों जाय नयनीं ॥ पंचभूतें चराचर प्राणी ॥ कृष्णरुप दिसती तया ॥१०॥
हडपी देती विडिये करुनी ॥ कंस पाहे विडा उकलोनी ॥ त्यामाजी दिसे चक्रपाणी ॥ हांक फोडोनि विडा टाकी ॥११॥
म्हणे तांबूलांत मेळवुन कृष्ण ॥ मज दिधला तुवां आणून ॥ घेऊं पाहतोसी माझा प्राण ॥ शत्रु पूर्ण जाहलासी ॥१२॥
असो इकडे गोकुळीं ॥ वनासी चालिला वनमाळी ॥ भोंवतीं गोपाळांची मंडळीं ॥ नाना वाद्यें वाजविती ॥१३॥
लागतां मुखवायूचें बळ ॥ पांवे वाजती अति रसाळ ॥ घुमरी मोहरी मृदंग टाळ ॥ गाती गोपाळ स्वानंदें ॥१४॥
पूर्वीं तप आचरला बहुवस ॥ धन्य धन्य तोचि वंश ॥ स्वअधरीं रमाविलास ॥ धरुनि वाजवी सर्वदा ॥१५॥
कमळेहूनि तप मोठें ॥ वेणु आचरला बहुत वाटे ॥ तरीच अधरीं धरिला वैकुंठपीठें ॥ सदा तयातें न विसंबे ॥१६॥
हरीच्या गळ्याची वनमाळा ॥ आपादलंबिनी मकरंद आगळा ॥ सदासर्वदा पडली गळां ॥ द्वेष उपजला कमळेसी ॥१७॥
म्हणे मी चरणींच राहिलें ॥ इनें आपाद हरीस आवरीलें ॥ हें न चुकेचि कदाकाळें ॥ भक्तिबळें बळावली ॥१८॥
हरि धरी नाना अवतार ॥ हे गळ्याची नव्हे दूर ॥ इचा किती करावा मत्सर ॥ जाहली प्रियकर कृष्णातें ॥१९॥
पडिली हे न सुटे गळां ॥ मग तिसीं स्नेह वाढवी कमळा ॥ गुणगंभीर सांवळां ॥ दोघी सेविती प्रीतीनें ॥२०॥
धन्य तो हातींचा वेत्र ॥ घेवोन हिंडे राजीवनेत्र ॥ धन्य ते शिखी साचार ॥ पिच्छें श्रीधर शिरीं वाहे ॥२१॥
असो ऐका मथुरेचें वर्तमान ॥ कंस चिंताक्रांत रात्रंदिन ॥ तों अघासुर बोले वचन ॥ म्हणे मी गिळीन शत्रु तुझा ॥२२॥
कंसें गौरविला दुराचार ॥ कानानाप्रति येत अघासुर ॥ होऊनि विशाळ अजगर ॥ असंभाव्य पसरला ॥२३॥
शत योजनें लंबायमान ॥ पर्वताकार दिसे दुरुन ॥ द्वादश गांवें मुख पसरोन ॥ पडिला असे उरग तो ॥२४॥
जैसीं नगश्रृंगे तीक्ष्ण बहुत ॥ तैसे ओळीनें भ्यासुर दंत ॥ गोगोप आंत प्रवेशत ॥ पर्वतदरी म्हणोनियां ॥२५॥
मागें दुरावला श्रीधर ॥ पुढें गेली गाईंची मोहर ॥ नव लक्ष गोपाळ समग्र ॥ मुखामाजी संचरले ॥२६॥
दूरी राहिला गोपाळ ॥ पुढें विघ्न ओढवलें सबळ ॥ भक्तवत्सल घननीळ ॥ जाणोनि आंत प्रवेशला ॥२७॥
पूर्वीं काळिया मर्दिला थोर ॥ त्याहूनि विशाळ हा अजगर ॥ गोगोपाळांसहित मुरहर ॥ मुखीं त्याच्या प्रवेशला ॥२८॥
प्रवेशले जाणोनि समग्र ॥ जाभाडें मिळवी अघासुर ॥ आक्रंदती गाईंचे भार ॥ प्रळय थोर मांडला ॥२९॥
गडी म्हणती नारायणा ॥ आतां रक्षीं आमुच्या प्राणां ॥ तुवां पूर्वीं उचलूनि गोवर्धना ॥ भक्तजनां रक्षिलें ॥३०॥
द्वादश गांवें दावाग्न ॥ तुवां गिळिला न लगतां क्षण ॥ येथेंही तूंचि रक्षिसि पूर्ण ॥ भरंवसा आहे आम्हांतें ॥३१॥
सिंह सखा जाहला पुरता ॥ मग भय काय काननीं हिंडतां ॥ घरीं येवोनि बैसला सविता ॥ कायसी चिंता दीपाची ॥३२॥
ऐसें बोलतां गोपाळ ॥ भक्तवत्सल तो तमाळनीळ ॥ कृपेनें द्रवला दयाळ ॥ जाहला विशाळ ते समयीं ॥३३॥
द्वादश योजनें त्याचें मुख ॥ त्याहून उंच जाहला रमानायक ॥ उभाचि अजगर देख ॥ चिरिला तेव्हां गोविंदें ॥३४॥
जैसा शुष्क वेणू कुठारें ॥ एकाचि घायीं उभा चिरे ॥ कीं पट फाडिताम निकरें ॥ वेळ कांहीं न लगेचि ॥३५॥
तैसा उभाचि फाडिला अघासुर ॥ सोडविले गोगोपांचें भार ॥ गगनांतूनि पुष्पवृष्टी सुरवर ॥ वारंवार करिताती ॥३६॥
अस्तास जातां चंडांश ॥ गोकुळा परतला परमपुरुष ॥ नंदादि गौळियां यशोदेस ॥ समाचार कळला हा ॥३७॥
आश्चर्य वाटे सकळांते ॥ म्हणती मनुष्य कोण म्हणे यातें ॥ समाचार कळला कंसातें ॥ अघासुर निमाला ॥३८॥
मग पाठविला धेनुकासुर ॥ महाक्रोधी दुराचार ॥ ताडवनांत असुर ॥ वृषभ होऊनि बैसला ॥३९॥
तें जाणोनि गोविंद ॥ तिकडे चालविला गोवृंद ॥ ताडवनांत मुकुंद ॥ नानाविध खेळ खेळे ॥४०॥
ताड लागले दात बहुत ॥ माजीं धेनुकासुर गर्जत ॥ गोप जाहले भयभीत ॥ हरिमुख तेव्हां विलोकिती ॥४१॥
दैत्याचा उत्कर्ष अद्भुत ॥ श्रॄंगें उंच जेवीं महापर्वत ॥ हांकें निराळ गाजत ॥ मग कृष्णनाथ काय करी ॥४२॥
प्रतापदिनकर घननीळें ॥ धेनुकासुरास पाचारिलें ॥ तंव तो श्रृंगें उभारोनि बळें ॥ हरीवरी धांविन्नला ॥४३॥
महिषासुर आरडत ॥ शक्तीवरी जैसा धांवत ॥ कीं हिरण्यकश्यप बळें बहुत ॥ नरहरीवरी कोसळे ॥४४॥
तैसा धेनुकासुर धांविन्नला ॥ श्रीहरीअंगीं मिसळला ॥ दोन्ही श्रृंगें ते वेळां ॥ रमानाथें धरियेलीं ॥४५॥
उलथोनि भूमीवरी पाडिला ॥ सवेंचि सरसावूनि धांवला ॥ मग श्रीकृष्णें चरणीं धरिला ॥ भोवंडिला गरगरां ॥४६॥
आफळिला सबळ बळें ॥ गतप्राण जाहला ते वेळे ॥ दिव्य सुमनें वर्षले ॥ वृंदारक तेधवां ॥४७॥
ऐसा अद्भुत करुनि पुरुषार्थ ॥ गोपांसहित परतला वैकुंठनाथ ॥ कंसासी कळला वृत्तांत ॥ धेनुकासूर निमाला ॥४८॥
मग परम प्रतापी केशी असुर ॥ उभा राहिला कंसासमोर ॥ म्हणे गोकुळाचा संहार ॥ क्षणमात्रें करीन मी ॥४९॥
माझिया प्रतापापुढें ॥ देव पळती होऊनि बापुडे ॥ श्रीकृष्णबळिराम केव्हडे ॥ मारावया अशक्य ॥५०॥
मी कोपतां वीर केशी ॥ पळती दिनमणि आणि शशी ॥ ऐकतां कंस मानसीं ॥ परम संतोष पावला ॥५१॥
वस्त्रें भूषणें दिधलीं तयासी ॥ गोकुळा चालिला दैत्य केशी ॥ अश्वरुप धरुनि वेगेंसीं ॥ घोषप्रदेशीं पातला ॥५२॥
तळवे वाजती तेव्हां सबळ ॥ दणाणिलें उर्वीमंडळ ॥ देवीं विमानें सकळ ॥ पळविलीं हो तेधवां ॥५३॥
पर्वताकार सबळ बळी ॥ गोकुळाभोंवते कावे घाली ॥ ऐसा कोणी नाहीं बळी ॥ जो दृष्टीं न्याहळी तयातें ॥५४॥
गोकुळीं जाहला हलकल्लोळ ॥ कपाटें लोक देती सकळ ॥ म्हणती आतां नुरे गोकुळ ॥ प्रळयकाळ पातला ॥५५॥
सिंहनाद जेंव्हा करी ॥ थरथरे सकळ धरित्री ॥ ऐसा कोण आहे क्षेत्री ॥ जो जाऊनि धरी तयातें ॥५६॥
एक हांक झाली गोकुळीं ॥ ऐसें देखोनि वनमाळी ॥ अभय दिधलें ते वेळीं ॥ म्हणे चिंता करुं नका ॥५७॥
ऐसें बोलोनि राजीवनयन ॥ मातंगावरी धांवे पंचानन ॥ कीं उरगांवरी विष्णुवहन ॥ न सांवरत झेंपावें ॥५८॥
कीं राक्षसांवरी निराळोद्भवसुत ॥ धावे जैसा अकस्मात ॥ त्याच प्रकारें दीननाथ ॥ केशियावरी धांविन्नला ॥५९॥
केशीनें देखिला श्यामसुंदर ॥ कोमलांग नवपंकजनेत्र ॥ म्हणे हाचि मुख्य शत्रु साचार ॥ दैत्यसंहार केला यानें ॥६०॥
कृष्णें धांवूनि ते वेळां ॥ अकस्मात चरणीं धरियेला ॥ भवंडूनि भिरकाविला ॥ येरु सरसावला सवेंचि ॥६१॥
विशाळ मुख पसरिलें ॥ हरीस म्हणे गिळीन सगळें ॥ चरणीं धरोनि ते वेळे ॥ पुढती कृष्णें टाकिला ॥६२॥
पर्वताकार सबळ घोडा ॥ क्रोधें कडकडां खाय दाढा ॥ अद्भुत हरीचा पवाडा ॥ त्रिदश नेत्रीं विलोकिती ॥६३॥
मागुती सरसावूनि धांविन्नला ॥ हरीनें रगडून मुंगा पिळिला ॥ सव्य हस्त ते वेळां ॥ मुखीं घातला यदुवीरें ॥६४॥
कुक्षीपर्यंत हात ॥ घाली तेव्हां जगन्नाथ ॥ जैसा लोहगोळा अतितप्त ॥ तैसा जाळीत अंतरीं ॥६५॥
जिव्हा तयाची पिळोनी ॥ बाहेर काढिली उपटोनी ॥ दैत्यें नेत्र वटारुनी ॥ त्यजिला प्राण तेथेंचि ॥६६॥
मुखींहूनि अशुद्धाचा पूर ॥ भडभडां वाहे अनिवार ॥ विमानीं आनंदले सुरवर ॥ सुमनें अपार वर्षती ॥६७॥
कळला कंसासी समाचार ॥ प्राणासी मुकला केशी वीर ॥ मग धरणीवरी शरीर ॥ कंसें घातलें तेधवां ॥६८॥
जैसा पडलिया घटश्रोत्र ॥ अत्यंत शोक करी दशवक्त्र ॥ तैसा व्याकुळ कंसासुर ॥ केशीदैत्याकारणें ॥६९॥
याउपरी एके दिवशीं ॥ गाई चारीत हृषीकेशी ॥ कंसें पाठविलें प्रलंबासी ॥ कपटवेषें दुरात्मया ॥७०॥
वृषभवेष धरुनी ॥ गाईंमाजी चरे वनीं ॥ परम द्वेषें जळे मनीं ॥ हरीकडे पाहोनियां ॥७१॥
श्रृंगें उभारुनि ते वेळां ॥ श्रीकृष्णावरी धांविन्नला ॥ दैत्य कपटवेषी कळला ॥ श्रीरंगासी तेधवां ॥७२॥
धरुनि दोन्ही श्रृंगें ॥ भवंडोनि आपटिला श्रीरंगें ॥ जैसें पक्व फळ चूर होय वेगें ॥ उर्वीवरी आपटितां ॥७३॥
तैसें चूर जाहलें शरीर ॥ प्राणास मुकला असुर ॥ कळला कंसास समाचार ॥ प्रलंब परत्र पावला ॥७४॥
याउपरी एके दिनीं ॥ निरभ्र चांदणें यामिनी ॥ बळिराम आणि चक्रपाणी ॥ वसंतवनीं खेळती ॥७५॥
गोपाललनांसमवेत ॥ काळियामर्दन वनीं खेळत ॥ तों शंखचूडदैत्य तेथ ॥ आला दुष्ट तेधवां ॥७६॥
महानिर्दय यक्ष पाखाणी ॥ गोवेष धरिला दोघांजणीं ॥ गाईंऐशी ध्वनीं ॥ दुरुनि वनीं करिती ते ॥७७॥
ते कुबेराचे सेवक ॥ महाकपटी दुष्ट देख ॥ क्षणक्षणां फोडिती हांक ॥ व्रजनायक ऐकतसे ॥७८॥
बळिभद्रासीं म्हणे मुरहर ॥ गाई धरोनि नेतो व्याघ्र ॥ तरीच वाहती वारंवार ॥ करुणास्वरेंकरुनियां ॥७९॥
ऐसें बोलोनि कमळानायकें ॥ गोब्राह्मणप्रतिपाळकें ॥ परमपुरुषें भक्ततारकें ॥ ताडवृक्ष उपडिला ॥८०॥
पाठिराखा भूधरअवतार ॥ तेणें उपडिला प्रचंड तरुवर ॥ त्वरें धांवले महावीर ॥ गोरक्षकारणें ॥८१॥
तों ते दोघे कपतवेषी ॥ पळते जाहले वेगेंसीं ॥ राम आणि हृषीकेशी ॥ मनोवेगेंसीं धांवले ॥८२॥
तों ते गोवेष टाकिती ॥ व्याघ्र होवोनि वेगें पळती ॥ शेष हरि न सोडिती ॥ पाठलाग तयांचा ॥८३॥
मावकर दोघे जण ॥ व्याघ्रवेषही टाकून ॥ महाभ्यासुर रुप धरोन ॥ उभे परतोन ठाकले ॥८४॥
नगमस्तकीं पडे व्रज ॥ तैसे दोघे मावकर ॥ तरुघातें केले चूर ॥ क्षणमात्र न लागतां ॥८५॥
दोघांचीं शिरें खुडूनी ॥ घेऊनि चालिले ते क्षणीं ॥ विजयी होऊनि रामचक्रपाणी ॥ पूर्वस्थळा पावले ॥८६॥
त्यावरी आली एकादशी ॥ जे परम प्रियकर भक्तांसी ॥ रुक्मांगद सत्त्वराशी ॥ पूर्वी उद्धरला जिचेनी ॥८७॥
हरिस्वरुप एकादशी ॥ नंद व्रतस्थ ते दिवशीं ॥ जागरण जाहलें सर्वांसी ॥ सरली निशा सत्वर ॥८८॥
मग दुसरे दिवशीं पाहीं ॥ नंद उठिला अरुणोदयीं ॥ यमुनातीरीं ते समयीं ॥ स्नानालागीं पातला ॥८९॥
तो जलपति मुख्य वरुण ॥ त्याचे दूत रक्षिती अनुदिन ॥ अकाळीं जळीं रिघती जे जन ॥ त्यांसी धरुन नेती ते ॥९०॥
आणि मनांत चिंती वरुण ॥ श्रीकृष्ण हा आदिनारायण ॥ कीं अंशरुपें जाहला सगुण ॥ पाहों लीला तयाची ॥९१॥
हरीचा पहावया अंत ॥ रसाधिपति होता टपत ॥ तों अरुणोदयीं नंद अकस्मात ॥ यमुनास्नाना पातला ॥९२॥
नंद करितां अघमर्षण ॥ वरुणहेरीं नेला ओढून ॥ गेले पाताळास घेऊन ॥ वरुणापाशीं तेधवां ॥९३॥
यावरी गोकुळी काय झाली करणी ॥ उदयाद्रीवरी आला वासरमणी ॥ यशोदा वाट पाहे सदनीं ॥ म्हणे गृहधनी न येती कां ॥९४॥
तों हांक गांवांत झाली ॥ नंद बुडाला यमुनाजळीं ॥ चोहोंकडोन धांवले गौळी ॥ यशोदा आली लवलाहें ॥९५॥
यमुनातीरीं येऊनी ॥ वक्षःस्थळ पिटी नंदराणी ॥ मूर्च्छागत पडली धरणीं ॥ शोकेंकरुनि विव्हळ ॥९६॥
गौळी संचरले जळीं ॥ एक परिसती आंत जळीं ॥ एक बुडिया देतीं जळीं ॥ शोध घेती नंदाचा ॥९७॥
यशोदा शोकें देत हांका ॥ म्हणे नंदजी व्रजपालका ॥ प्राणप्रिया सुखदायका ॥ कोठें आतां पाहों तुम्हां ॥९८॥
काल अष्टप्रहर एकादशी ॥ नंदजी तुम्हीं निर्वाण उपवासी ॥ आजि पारणें करावयासी ॥ कोठें गेलां न कळे तें ॥९९॥
ऐसी माया करितां शोक ॥ जवळी आला वैकुंठपालक ॥ जो भक्तवत्सल शोकहारक ॥ मातेप्रति बोलतसे ॥१००॥
शोक न करावा तत्त्वतां ॥ येचि क्षणीं आणीन पिता ॥ कृतांतासी शिक्षा लावीन आतां ॥ करणी करितां विपरीत ॥१॥
ऐसें बोलोनि तांतडी ॥ यमुनाजीवनीं घातली उडी ॥ चतुर्दश लोकांचा कडोविकडी ॥ झाडा घेतला श्रीरंगें ॥२॥
पूर्वीं केलें गोवर्धनोद्धारण ॥ द्वादश गांवें गिळला अग्न ॥ तो पुरुषार्थ संपूर्ण ॥ मायेनें मनीं आठविला ॥३॥
आलिया महासर्प अघासुर ॥ केशिया मारिला कृष्णें साचार ॥ नंदासी आणील हा दृढ विचार ॥ मनीं वाटे मायेतें ॥४॥
सकळ गोकुळींचे जन येती ॥ कालिंदीतीरीं तटस्थ बैसती ॥ कृष्णमायेभोंवत्या मिळती ॥ नितंबिनी गोकुळींच्या ॥५॥
म्हणती यमुनेनें घेतली आहुती ॥ लोक कृतांत भगिनी इजप्रती ॥ जे म्हणती ते साच वदती ॥ ऐसें बोलती व्रजजन ॥६॥
असो इकडे वरुणलोकाप्रती ॥ सत्वर गेला क्षीराब्धिजापती ॥ दूत सांगाती रसाधिपती ॥ श्रीकृष्ण पूर्ण कोपला ॥७॥
जो पूर्णब्रह्मानंद अखंड ॥ काळाचा हा महाकाळ प्रचंड ॥ यासी करील कोण दंड ॥ सर्वात्मया हरीतें ॥८॥
क्षणें जाळील ब्रह्मांड ॥ श्रीकृष्ण प्रतापसूर्य प्रचंड ॥ जो पूर्णब्रह्मानंद अखंड ॥ करी दंड काळातें ॥९॥
भयभीत जाहला वरुण ॥ बाहेर आला धांवोन ॥ घातलें श्रीकृष्णासी लोटांगण ॥ म्हणे शरण अनन्य मी ॥११०॥
तूं पूर्णब्रह्म दीननाथ ॥ म्यां नेणोनि पाहिला अंत ॥ तूं कृपाळु लक्ष्मीकांत ॥ क्षमा करीं अन्याय हा ॥११॥
पुराणपुरुषोत्तमा भुवनचालका ॥ तूं अगोचर ब्रह्मादिकां ॥ येणें व्याजें गोकुलपालका ॥ दर्शन मज दीधलें ॥१२॥
अर्पूनि सोळाही उपचार ॥ आवडीं पूजिला श्रीकरधर ॥ नमस्कार घाली वारंवार ॥ मग यदुवीर बोलत ॥१३॥
अविद्यायोगें भुलोनी ॥ गेलासीं निजस्वरुप विसरोनी ॥ आतां देहाभिमान टाकोनी ॥ सदा स्मरणीं राहिंजे ॥१४॥
आज्ञा वंदूनि ते वेळां ॥ नंद हरीस आणूनि दिधला ॥ वेगें श्रीरंग परतला ॥ येता जाहला गोकुळा ॥१५॥
निशी संपतां उगवे चंडांश ॥ तैसा यमुनाजळांतूनि परमपुरुष ॥ नंदासमवेत आला हर्ष ॥ परम जाहला व्रजातें ॥१६॥
परम वेगें धांवली माया ॥ म्हणे हरि प्राणसखया ॥ श्रीरंगा माझिया विसांविया ॥ काय होऊं उतराई ॥१७॥
हरि हें शरीर ओंवाळूनी ॥ कुरवंडी करीन तुजवरोनी ॥ बहुतां संकटीं रक्षिलें चक्रपाणी ॥ काय म्हणोनि आठवूं ॥१८॥
असो नंदासी भेटले गौळी ॥ प्रेमें आलिंगिला वनमाळी ॥ वाद्यें वाजूं लागलीं ते वेळीं ॥ वेगें आले मंदिरा ॥१९॥
नंदें उत्साह केला थोर ॥ भूसुरां दिधलीं वस्त्रें अलंकार ॥ आनंदलें गोकुळ समग्र ॥ रमावरप्रसादें ॥१२०॥
सांगातें घेऊनि जगदानंदकंद ॥ भोजनविधि सारी नंद ॥ ते समयींचा ब्रह्म नंद ॥ कवण वर्णूं शके पैं ॥२१॥
याउपरी एके दिवसीं ॥ नंद निघे शक्तिवनासी ॥ देवीची यात्रा ते दिवसीं ॥ सर्व व्रजवासी निघाले ॥२२॥
यशोदेसहित गौळणी ॥ दहीं दूध घृत लोणी ॥ यांचे गाडे भरोनी ॥ तेच क्षणीं निघाले ॥२३॥
षड्रस अन्नें सुंदर ॥ त्यांचेही शकट भरल समग्र ॥ यात्रा चालली अपार ॥ वाद्यगजर होतसे ॥२४॥
मनोहर शक्तिवन ॥ जेथें विश्राम पावे शक्राचें मन ॥ वृक्ष भेदीत गेले गगन ॥ न दिसे किरण सूर्याचें ॥२५॥
आम्र कदंब औदुंबर ॥ केळी नारळी अंजिर ॥ पोफळी डाळिंबी कृष्णागर ॥ मलयागर चंदन ॥२६॥
चांफे मोगरे कंचन ॥ जाई जुई रातांजन ॥ बकुळ शतपत्रकमलें पूर्ण ॥ विकासलीं साजिरीं ॥२७॥
असो ऐशा वनीं शक्ती ॥ सकळ जन तेव्हां पूजिती ॥ लोकीं ते दिवसीं केली वस्ती ॥ तेचि स्थळीं प्रीतीनें ॥२८॥
रजनी दोन प्रहर जाहली ॥ निद्रार्णवीं अवधीं बुडालीं ॥ तों महासर्प ते वेळीं ॥ नंदाजवळी पातला ॥२९॥
कमलापति ते वेळां ॥ यशोदेपुढें पहुडला ॥ तंव तो अजगर धांविन्नला ॥ गिळों लागला नंदातें ॥१३०॥
नंद आक्रोशें हांका फोडीत ॥ म्हणे धांवा धांवा रे समस्त ॥ सर्पें गिळिलें कंठपर्यंत ॥ कृष्णनाथ दावा मज ॥३१॥
अट्टहासें नंद आरडत ॥ कैवारिया हरि घांवें म्हणत ॥ तों गौळी धांवले समस्त ॥ जळत भितळे घेवोनियां ॥३२॥
धबधबां घालिती उचलोन ॥ परी न सोडीच सर्प दारुण ॥ मग नंद बोले वचन ॥ कृष्णवदन दावा मज ॥३३॥
माझे जाताती प्राण ॥ अंतकाळीं दावा मनमोहन ॥ ऐसें जाणोनि रमाजीवन ॥ न लागतां क्षण धांविन्नला ॥३४॥
नंदें देखिला कैंवल्यदानी ॥ म्हणे सोडवीं या काळापासोनी ॥ हरि पदघातें हाणीं ते क्षणीं ॥ परी न सोडीच सर्प तो ॥३५॥
मग उभाचि सर्प चिरिला ॥ पिता तत्काळ सोडविला ॥ कृपाकटाक्षें अवलोकिला ॥ शुद्ध जाहला सर्वांगें ॥३६॥
ज्याचें नाम घेतां पतित ॥ भवसर्पाचें विष उतरत ॥ त्याच्या कृपावलोकनें तेथ ॥ सर्पविष तें केवढें ॥३७॥
असो सर्पदेहामधूनी ॥ दिव्य पुरुष तेचि क्षणीं ॥ निघाला श्रीरंगाचे चरणीं ॥ अनन्यभावें लागला ॥३८॥
उभा राहिला जोडोनि कर ॥ म्हणे मी सुदर्शन नामें विद्याधर ॥ मी गर्वें माजलों अपार ॥ याहीं आपपर ओळखिले ॥३९॥
स्त्रियांशीं मी जलक्रीडा खेळत ॥ परम विषयांध उन्मत्त ॥ तों ऋषींचीं मांदी अकस्मात ॥ त्याचि पंथें पातली ॥१४०॥
त्यांसी केला नाहीं नमस्कार ॥ स्वमुखें निंदिले समग्र ॥ मग ते कोपले ऋषीश्वर ॥ शाप दिधला तेधवाम ॥४१॥
म्हणती दुष्टा तूं उन्मत्त ॥ सर्प होवोनि पडें वनांत ॥ मग मी झालों भयभीत ॥ केला प्रणिपात सर्वांतें ॥४२॥
उभा ठाकलों बद्धांजली ॥ मज उश्श्याप दीजे सकळीं ॥ मग तिंहीं कृपा केली ॥ अमृतवचन बोलिले ॥४३॥
तिंहीं सांगितलें मजलागोनी ॥ श्रीकृष्ण येईल शक्तिवनीं ॥ त्याच्या चरणस्पर्शेंकरुनी ॥ मुक्त होसील तत्काळ ॥४४॥
तें आजिच्या दिनीं सत्य जाहलें ॥ माझें पूर्वपुण्य फळासी आलें ॥ म्हणोनि श्रीपतीचीं पाउलें ॥ प्रेमें धरिलीं विद्याधरें ॥४५॥
वंदोनि पूतनाप्राणहरणा ॥ सुदर्शन गेला निजस्थाना ॥ गौळी वाजविती वाद्यें नाना ॥ निजसदना परतले ॥४६॥
हरि आला निजसदनीं ॥ निंबलोण करी जननी ॥ नंद धांविन्नला तेच क्षणीं ॥ म्हणे लागेन चरणीं कृष्णाच्या ॥४७॥
माया म्हणे तूं आमुचा देव ॥ पडलीं संकटें हरिसी सर्व ॥ तूं पूर्णब्रह्म स्वयमेव ॥ आम्हांस आतां समजलें ॥४८॥
ऐसें बोलतां माता ते ॥ लोळणी घातली कृपानाथें ॥ गडबडां लोळत तेथें ॥ रडे सर्वथा समजेना ॥४९॥
मातापितयांसी म्हणे ऐका ॥ मज सर्वथा देव म्हणों नका ॥ म्हणोनि प्रेमळांचा सखा ॥ स्फुंदस्फुंदोनि रडतसे ॥१५०॥
माता म्हणे न म्हणों तुज देव ॥ म्हणोनि आलिंगिला माधव ॥ धन्य यशोदेचा भाव ॥ असंभाव्य पुण्य तियेचें ॥५१॥
हा क्षीरसागरविलासी ॥ लीला दावी निजभक्तांसी ॥ न दावी आपल्या थोरवीसी ॥ अपार कर्तृत्व करोनियां ॥५२॥
अद्भुत करुन चरित्रांतें ॥ खेळे गोवळ्यासांगातें ॥ श्रेष्ठपण ठेविलें परतें ॥ मानवी वेषा धरुनियां ॥५३॥
यावरी मथुरापुरींत जाण ॥ काय जाहलेम वर्तमान ॥ अकस्मात ब्रह्मनंदन ॥ कंससभेसी प्रकटला ॥५४॥
कंसें नारदासी पूजिलें ॥ सकल वर्तमान निवेदिलें ॥ येरु म्हणे तुज नाहीं समजलें ॥ वर्तमान पैं एक ॥५५॥
दोघे पुत्र आणि रोहिणी ॥ वसुदेवें गोकुळीं ठेविलीं चोरुनी ॥ ते थोर जाहले नंदसदनीं ॥ कृष्ण आणि बळिभद्र ॥५६॥
तुझे दैत्य दुर्धर ॥ त्रिदशांत जे अनिवार ॥ त्यांचा केला संहार ॥ कृष्णें आणि बळिरामें ॥५७॥
ऐकतां हें वर्तमान ॥ कंस क्रोधें फिरवी नयन ॥ म्हणे वसुदेवदेवकींस मारीन ॥ शस्त्र घेवोनि धांविन्नला ॥५८॥
आला बंदिशाळेजवळी ॥ मग नारद म्हणे ते वेळीं ॥ हीं वृद्धें जरि तुवां वधिलीं ॥ तरी अपकीर्ति लोकांत ॥५९॥
शोधूनि मारीं रामकृष्णांसी ॥ हीं दोघें कासया वधिसी ॥ ऐसें बोलोनि कंसासी ॥ नारदें त्याची परतविलें ॥१६०॥
जैसा मंदिरा लावूनि अग्न ॥ आपणचि विझवी धांवून ॥ कीं पूरीं दिधलें लोटून ॥ तें आपणचि काढिलें ॥६१॥
जेणें विष पाजिलें दुर्धर ॥ तोचि करुं धांवे उतार ॥ आपणचि पाठविले तस्कर ॥ धावणें काढिलें आपणचि ॥६२॥
तैसी नारदें लावूनि कळी ॥ सवेंचि दोघें सोडविलीं ॥ कंस सभेसी तत्काळीं ॥ येऊनिया बैसला ॥६३॥
कंस क्रोधें व्याप्त पूर्ण ॥ म्हणे उग्रसेन आणा धरोन ॥ चुलता देवक आणून ॥ श्रृंखळा घाला दोघांतें ॥६४॥
म्हणे यादव तितुके जीवें मारा ॥ विष्णुभक्तां आधीं धरा ॥ गाई ब्राह्मण संहारा ॥ शोधूनियां सत्वर ॥६५॥
टाका अवघे यज्ञ मोडून ॥ कोणास करुं न द्यावें अनुष्ठान ॥ आणा अवघे ऋषी धरुन ॥ मी संहारीन निजहस्तें ॥६६॥
माझे सखेजरासंधादिक ॥ काळयवन माझा आवश्यक ॥ शिशुपाळ वक्रदंत देख ॥ बाणासुर भौमासुर ॥६७॥
गर्जोनि कंस हांक फोडी ॥ म्हणे यादवां करा देशधडी ॥ कंसें शस्त्र घेवोनि तांतडीं ॥ उर्वीवरी आपटिलें ॥६८॥
यादव मथुरा सोडूनी ॥ राहिले गिरिकंदरीं लपोनी ॥ ऋषी पळती आश्रम टाकूनी ॥ म्हणती अवनी ठाव देईं ॥६९॥
वनोवनीं हिंडती कंसदूत ॥ गोब्राह्मणांचा करिती घात ॥ असो नारदमुनि त्वरित ॥ गोकुळासी पातला ॥१७०॥
केलें श्रीकृष्णासी नमन ॥ म्हणे लौकरी टाकीं कंस वधून ॥ गांजिले गाई आणि ब्राह्मण ॥ करीं सोडवण विश्वेशा ॥७१॥
दुर्धर दैत्य मारिला केशी ॥ आतां सत्वर वधीं कंसासी ॥ ऐसें बोलोनि नारदऋषी ॥ उर्ध्वपंथें पैं गेला ॥७२॥
असो वनीं खेळतां लक्ष्मीवर ॥ कंसे पाठविला वत्सासुर ॥ वत्सवेष धरुनि साचार ॥ गाईंमध्यें चरतसे ॥७३॥
गाई विलोकितां सर्वेश्वर ॥ त्यांमाजी चरे वत्सासुर ॥ पायीं धरोनि सत्वर ॥ आपटोनियां मारिला ॥७४॥
तांदुळांमाजी हरळ ॥ डोळस निवडी तत्काळ ॥ कीं सुवर्णामाजी पितळ ॥ निवडे जैसें वेगळें ॥७५॥
कीं रत्नांमाजी गार ॥ कीं पंडितांमाजी पामर ॥ कीं विप्रांमाजी महार ॥ आपोआप निवडे पैं ॥७६॥
कीं साधूंमाजी निंदक कुटिल ॥ की चंदनामाजी बाभुळ ॥ कीं कर्पूरामाजी ढेंकुळ ॥ आपणचि निवडे पैं ॥७७॥
तैसें चतुरें श्रीकरधरें ॥ दैत्य निवडूनिया मारिला स्वकरे ॥ जैसा सुरपंक्तींत राहु त्वरें ॥ निवडोनि वधी मोहिनी ॥७८॥
असो एके दिवसीं घननीळ ॥ गवळी मिळाले सकल ॥ त्यांसी म्हणे गोकुळ ॥ ओस करा पैं आतां ॥७९॥
कंस बहुत विघ्नें करी ॥ दैत्य धाडितो गोकुळावरी ॥ वृंदावनीं सहपरिवारीं जाऊनियां रहावें ॥१८०॥
मनांत इच्छी श्रीवर ॥ वृंदावनी दैत्य दुर्धर ॥ येणें मिषें समग्र ॥ वधोनियां टाकावे ॥८१॥
यालागीं गौळियां सांगे श्रीपती ॥ परी गौळी कदा न निघती ॥ न सुटे गृहाची गृहगती ॥ मग यदुपति काय करी ॥८२॥
बळिराम आणि जगज्जीवन ॥ बोलती स्वर्गींचें गीर्वाण ॥ भोंवते ऐकती गौळीजन ॥ परी कोणा न कळे तें ॥८३॥
संकर्षंणासी म्हणे हरी ॥ कौतुक दावावें क्षणभरी ॥ धाक लाविल्याविण निर्धारीं ॥ गोकुळ ओस न करिती ॥८४॥
गोकुळाबाहेर गेले दोघे जण ॥ संगें बहुत मुलें घेऊन ॥ शेष आणि मधुसूदन ॥ कास विंदान मांडिलें ॥८५॥
आपल्या शिरींचे केंश कुरळ ॥ दोघे हातें तोडिती तत्काळ ॥ काननांत विखुरले सकळ ॥ करणी न कळे ब्रह्मादिकां ॥८६॥
एकैक केंसापासूनि देख ॥ शतांचीं शतें निघाले वृक ॥ मुलांसहित यदुनायक ॥ आला गोकुळांत पळोनी ॥८७॥
म्हणती असंख्य आले वृक ॥ गोकुळ ओस करा सकळिक ॥ बिदोबिदीं पळती लोक ॥ एक द्वारें झांकिती ॥८८॥
कृष्ण बळिराम घरा आले ॥ नंदासी म्हणती विघ्न ओढवलें ॥ वृक मागुती कानना गेले ॥ कृष्णइच्छेंकरुनियां ॥८९॥
मग नंदादि गौळी मिळोनी ॥ निघते जाहले तेचि क्षणीं ॥ गोकुळ ओस टाकूनी ॥ वृंदावनीं राहती सुखें ॥१९०॥
बाडे घालूनि अरण्यांत ॥ परिवारेंसीं राहिले समस्त ॥ यमुनातीरीं रामकृष्णनाथ ॥ गोपांसमवेत खेळती ॥९१॥
कंसें प्रलंब दैत्य पाठविला ॥ तेणें गोपाळवेष धरिला ॥ कृष्णदासांमाजी मिसळला ॥ कापट्य कोणा न कळेचि ॥९२॥
पूर्वीं समीरात्मजा वधावयालागून ॥ काळनेमि विप्रवेष धरुन ॥ बैसला त्या प्रकारेंकरुन ॥ प्रलंब झाला गोपाळ ॥९३॥
रामकृष्ण जाहले भिडती ॥ गडी समान दों ठायीं वांटिती ॥ तों डाव परतला निश्चितीं ॥ प्रलंबावरी तेधवां ॥९४॥
त्यावरी बैसला संकर्षण ॥ चालिला अरण्यांत घेऊन ॥ गोप आणि जगज्जीवन ॥ दूर राहिले ते वेळां ॥९५॥
बळिभद्र पुसे तयासी ॥ अरे तूं कोठें मज नेतोसी ॥ तंव तो कांहींच वचनासी ॥ न बोलेचि सर्वथा ॥९६॥
नीट चालिला मथुरापंथें ॥ तों वोळखिला रोहिणीसुतें ॥ मस्तक त्याचा मुष्टिघातें ॥ बळिभद्रें त्वरेनें फोडिला ॥९७॥
तंव तो होऊनि विशाळ दैत्य ॥ गतप्राण झाला पडिलें प्रेत ॥ हरीपासीं बळिराम येत ॥ झाला वृत्तांत सांगितला ॥९८॥
कंसासी कळला वृत्तांत ॥ प्रलंब दैत्य पावला मृत्य ॥ मनामाजी भयभीत ॥ परम होत तो दुरात्मा ॥९९॥
दुःखें विव्हळ जाहला थोर ॥ तंव तो बोलिला बकासुर ॥ म्हणे मी मारीन साचार ॥ राया शत्रु तुझे पैं ॥२००॥
ऐसें ऐकोनि बकासुर ॥ पाठविला परम नष्ट अनिवार ॥ तो बक होऊनि पर्वताकार ॥ मित्रजातीरीं बैसला ॥१॥
बकें धरिलें बकध्यान॥ इच्छित कृष्णाचें आगमन ॥ रात्रंदिवस चिंतन ॥ हरीवांचोनि तया नाहीं ॥२॥
जलप्राशना आले गोपाळ ॥ तों पर्वताकार बैसला सबळ ॥ गोप भ्याले तत्काळ ॥ गेले हरीस सांगावया ॥३॥
कृष्णासी सांगती ते वेळीं ॥ एक पक्षी आला महाबळी ॥ आम्ही देखोनि तत्काळीं ॥ भिवोनियां पळालों ॥४॥
गडियांसहित सांवला ॥ बक पहावया धांविन्नला ॥ तंव तो बैसलासे बगळा ॥ वाटे न जाय कोणाच्या ॥५॥
जैसा वैरियाचा आदर ॥ वरिवरीच अवघा उपचार ॥ तैसी क्षमा धरुनि असुर ॥ उगाच तीरीं बैसला ॥६॥
कृष्ण जवळी येतांचि दुष्टें ॥ असंभाव्य पसरिलीं चंचुपुटें ॥ उचलोनि कृष्ण गिळिला नेटे ॥ क्षणमात्र न लागतां ॥७॥
बकें गिळिला घननीळ ॥ भोंवतें आकांत करिती गोपाळ ॥ एक पिटिती वक्षःस्थळ ॥ प्रळयकाळ ओढवला ॥८॥
म्हणती विसांविया हृषीकेशी ॥ काय सांगावें तुझे मातेसी ॥ कां उपेक्षिलें आम्हांसी ॥ परम वेधका गोंविंदा ॥९॥
बकासुरें गिळिला सांवळा ॥ परीं अंतरीं जाळी ते वेळां ॥ जैशा प्रळयाग्नीच्या ज्वाळा ॥ पोळे गळा त्याच रीतीं ॥२१०॥
जैसा लोहगोळा तप्त आरक्त ॥ जिकडे तिकडे जाळीत ॥ तैसें बकासुरासी होत ॥ उगळोनि टाकीत कृष्णातें ॥११॥
बाहेर येतांचि मुरारी ॥ आपुलें सामर्थ्य प्रकट करी ॥ दोनी चंचुपटें ते अवसरीं ॥ धरी स्वकरीं कमलावर ॥१२॥
परम बळी यादवेंद्र ॥ उभाच चिरिला बकासुर ॥ त्रिविष्टप वर्षती सुमनभार ॥ विजयी श्रीधर सर्वदा ॥१३॥
कंसासी समाचार कळला ॥ सवेंचि अरिष्टासुर पाठविला ॥ तो शक्तिरुपें धांवला ॥ विशाळ मुख पसरुनि ॥१४॥
भयभीत गोपाळ होती ॥ हरीस म्हणती आली महाशक्ती ॥ गोप चळवळां कांपती ॥ मग यदुपति काय करी ॥१५॥
अवलोकितां ऊर्ध्वपंथे ॥ महाशक्ति प्रकटली तेथें ॥ ती योगमाया जगन्नाथें ॥ आपुलें अंगींची प्रकटविली ॥१६॥
जे ब्रह्मादिकां न ये ठाया ॥ पूर्वीं कंस गेला आपटावया ॥ तंव ते गेली निसटोनियां ॥ हे योगमाया हरीची ॥१७॥
त्या महामायेनें तेंचि क्षणीं ॥ कपटशक्ति गिळिली मुख पसरोनी ॥ मागुती गुप्त झाली गगनीं ॥ कृष्णइच्छेंकरुनियां ॥१८॥
गडी कौतुक पहाती ॥ म्हणती अगाध माया तुझी श्रीपती ॥ तूं पाठिराखा निश्चितीं ॥ भय कल्पांतीं नाहीं आम्हां ॥१९॥
कागासुर म्हणे कंसातें ॥ मज मृत्यु वीरभद्राचे हस्तें ॥ तो कासया येईल येथें ॥ मी कृष्णातें मारीन ॥२२०॥
कागासुर निघाला वेगें ॥ दुरुनियां देखिला श्रीरंगें ॥ कोण त्याचा मृत्यु भक्तभवभंगें ॥ अंतरीं तेव्हां अवलोकिला ॥२१॥
करितां वीरभद्राचें स्मरण ॥ अकस्मात प्रकटला येऊन ॥ करुनि श्रीहरीसी नमन ॥ दैत्यावरी धांविन्नला ॥२२॥
कागासुराचें शिरकमळ ॥ वीरभद्रें छेदिलें तत्काळ ॥ कृष्णासी स्तवोनि निराळ-मार्गें गेला तेधवां ॥२३॥
खरासुर खररुप धरुनी ॥ भुंकत हिंडे काननीं ॥ कृष्णें तो पायीं धरोनी ॥ आपटिला क्षणार्धें ॥२४॥
तोही झाला गतप्राण ॥ तों खगासुर आला धांवोन ॥ जैसा पतंग देखोनि अग्न ॥ उडी घाली प्राणांतीं ॥२५॥
पसरोनियां विशाळ सुख ॥ धांवे जगन्नाथासन्मुख ॥ कृष्णें आपटोनि तो निःशंक ॥ मृत्युपुरासी पाठविला ॥२६॥
विठयासुर त्यापाठीं ॥ धांवत आला उठाउठीं ॥ मायालाघवी जगजेठी ॥ धांवे पुढें तेधवां ॥२७॥
उभा चिरिला विठयासुर ॥ तोही पाहूं गेला मृत्युनगर ॥ केला सर्व दैत्यांचा संहार ॥ कंसासुर चडफडी ॥२८॥
स्वहस्तें पिती वक्षःस्थळ ॥ म्हणे राज्य बुडालें सकळ ॥ भरंवशाचे वीर सबळ ॥ गेले टाकूनि मजलागीं ॥२९॥
म्हणे माझे दृष्टी पडता वैरी ॥ तरी मी त्यासी वधितों क्षणाभीतरी ॥ मग बुद्धि एक अंतरीं ॥ आठविली असुरेंद्रें ॥२३०॥
घागरी आणि कोहळे ॥ कंसें गोकुळा पाठविले ॥ घटांमाजी कूष्मां सगळे ॥ घालोनियां पाठवावे ॥३१॥
आणि सिकतेचे वेंट वळूनि हातें ॥ तेही पाठवा त्याचे सांगातें ॥ हें जरी कोडें नुगवे तुम्हांतें ॥ तरी रामकृष्णांतें धाडिजे ॥३२॥
नाहीं तरी गोकुळ सकळ ॥ निर्दाळीन मी कंस काळ ॥ म्हणोनि दोघे दैत्य सबळ ॥ पाठविले व्रजातें ॥३३॥
दूत धांविन्नले त्वरित ॥ नंदाजवळी आले अकस्मात ॥ म्हणती तुम्हांवरी कोपलासे मथुरानाथ ॥ कोडें समस्त उगवा हें ॥३४॥
तुम्हांस न उगवे जरी ये वेळीं ॥ तरी पाठवावे रामवनमाळी ॥ नाहीं तरी मराल सकळी ॥ कंसहस्तेंकरुनियां ॥३५॥
तुम्ही गोरस पिऊन जाहलेती मस्त ॥ परी तुम्हांसी जवळी आला मृत्य ॥ गौळी भ्याले समस्त ॥ म्हणती अनर्थ ओढवला ॥३६॥
गौळी वृंदावनीं राहिले होते ॥ ते पुढती आले गोकुळातें ॥ तों हें विघ्न अवचितें ॥ पुढें वाढूनि ठेविलें ॥३७॥
कंसदूत राहविले ते वेळीं ॥ एकांतीं बैसले सकळ गौळी ॥ एक म्हणती लपवा वनमाळी ॥ कोठेंतरी नेऊनियां ॥३८॥
एक म्हणती रामकृष्ण बरवे ॥ वरराज्यामाजी पळवावे ॥ नंदादि गौळी आघवे ॥ चिंताग्नीनें आहाळले ॥३९॥
वनास गेले होते रामवनमाळी ॥ ते परतोनि आले सायंकाळीं ॥ तो अधोवदन सकळ गौळी ॥ चिंतार्णवीं बुडाले ॥२४०॥
चिंता आणि चिता ॥ दोन्ही समानचि पाहतां ॥ असो ऐसें हरीनें देखतां ॥ नंदाप्रति बोलतसे ॥४१॥
काय जाहला समाचार ॥ कां चिंताग्रस्त समग्र ॥ नंद म्हणे कंस दुराचार ॥ अपाय चिंतितो तुम्हांसी ॥४२॥
सांगितलें सकळ वर्तमान ॥ गदगदां हांसे जगज्जीवन ॥ म्हणे हें कोडें आतांचि उगवीन ॥ उठा भोजन करा तुम्ही ॥४३॥
मग बोले बळिभद्र ॥ पडल्या आकाशा देऊं धीर ॥ तेथें मशक काय कंसासुर ॥ करुं संहार क्षणमात्रें ॥४४॥
कौतुक केलें गोपाळें ॥ जवळी घेतले घट कोहळे ॥ क्षणामात्रें सूक्ष्म केले ॥ घटीं घातले तेचि क्षणीं ॥४५॥
मागुती आंत जाहले स्थूल ॥ भृधरें वाळू आणिली तत्काळ ॥ चपलत्वें वेंटी सबळ ॥ वळोनियां टाकिल्या ॥४६॥
वाळूचे दोरे जे वळिले ॥ घटांभोंवते ते गुंडळिले ॥ नंदादि गौळी तटस्थ जाहले ॥ नवल दाविलें अद्भुत ॥४७॥
तो अघटित घडवी हरी ॥ उदकावरी धरिली धरित्री ॥ पंचभूतांसी मैत्री ॥ परस्परें चालवी जो ॥४८॥
असो कंसदूतांसी नंद बोले ॥ म्हणे कोडें तुमचें उगवलें ॥ घेऊनि जा रे वहिलें ॥ कंसालागीं दाबावया ॥४९॥
दूत म्हणती तुम्हांतें ॥ बोलाविलें मथुरानाथें ॥ तों कोप आला बळिभद्रातें ॥ म्हणे दूतांतें मारीन मी ॥२५०॥
दूत भयभीत जाहले ॥ नंदासी काकुळती आले ॥ आम्हांसी सोडवीं ये वेळे ॥ जातों वहिले मथुरेसी ॥५१॥
कोडें घेवोनियां दूत ॥ गेले मथुरेसी पळत ॥ नंदें बळिभद्र केला शांत ॥ म्हणे यांतें न मारावें ॥५२॥
मोठें अरिष्ट टळलें ॥ व्रजवासी सर्व आनंदले ॥ कंसाजवळी दूत आले ॥ कोडें निवडिलें सांगती ॥५३॥
कृष्णें कोहळे घातले घटीं ॥ बळिभद्रें वळिल्या वेंटी ॥ ऐकतां कंसाचें पोटीं ॥ भय बहुत संचरलें ॥५४॥
असो याउपरी एके दिवशीं ॥ उष्णकाळीं हृषीकेशी ॥ चंडांश आला माध्यान्हासी ॥ तृणें वाळलीं समस्त ॥५५॥
गोवर्धनपर्वताचे शिरीं ॥ गाई चारीत मुरारी ॥ कंसें जाणोनि ते अवसरीं ॥ दूत धाडिले सवेग ॥५६॥
चहूंकडे एकेचि वेळां ॥ पेटविल्या अग्निज्वाळा ॥ नव लक्ष गोपाळमेळा ॥ सांपडला हरीसहित पैं ॥५७॥
नाना द्विजांचिया जाती ॥ आहाळोनि अग्नीमाजी पडती ॥ गोपाळ चहूंकडोनि धांवती ॥ मिळाले श्रीपतीभोंवतें ॥५८॥
अनिवार देखोनि ज्वाळा ॥ गाई धांवती हरीजवळा ॥ गोप आक्रंदती ते वेळा ॥ बहु वर्तला प्रलयकाल ॥५९॥
गोप धांवोनि हरीवरी पडती ॥ निजांगाखालीं कृष्ण झांकिती ॥ गाई वरी माना टाकिती ॥ आहळेल यदुपति म्हणवोनियां ॥२६०॥
आमचे देह जावोत जळोनी ॥ परी वांचो हा चक्रपाणी ॥ जवळी जाळीत आला अग्नी ॥ करुणार्णव पाहातसे ॥६१॥
गोपाळ आक्रोशें रडती ॥ आहा सांपडला कीं श्रीपती ॥ मनमोहन वेधकमूर्ती ॥ पुन्हां दृष्टीं पडेना ॥६२॥
निर्वाणींचे जे कां भक्त ॥ जाणोनियां इंदिराकांत ॥ नाभी नाभीं ऐसें म्हणत ॥ नेत्र समस्त झांका रे ॥६३॥
ऐकतांचि हरीचें वचन ॥ समस्तीं झांकिले तेव्हां नयन ॥ विशाळ मुख पसरुन ॥ गिळिला अग्नि ते वेळां ॥६४॥
गोपाळ उघडिती नेत्र ॥ तों जातवेद न दिसे आणुमात्र ॥ ब्रह्मानंद झाला थोर ॥ नाचती निर्भर सवंगडे ॥६५॥
मोहरी पांवे घुमरी ॥ मृदंग वाजती कुसरी ॥ गोपाळ गाती नानापरी ॥ हरिलीला अपार ॥६६॥
वृंदारक सुमनांचा भार ॥ हरीवरी वर्षती अपार ॥ झाला एकचि जयजयकार ॥ सुख थार न वणर्व ॥६७॥
दव करिती मनीं असोशी ॥ कधीं हरि वधील कंसासी ॥ सुखी होतील समस्त ऋषी ॥ चिंता सर्व टाकोनियां ॥६८॥
असो गोकुळी आला गोपाळ ॥ हर्षभरित गोपी सकळ ॥ आरत्या घेऊनि घननीळ ॥ पाहों येती सामोर्या ॥६९॥
श्रीकृष्ण केवळ वासरमणी ॥ देखतां गोपी विकासल्या कमळिणी ॥ श्रीकृष्णशशांक देखोनी ॥ गोपी चकोरी जाहल्या ॥२७०॥
कीं घननीळ मेघ केवळ ॥ गोपी चातकी सकळ ॥ कीं श्रीकृष्ण सुवास नीलोत्पल ॥ गोपी भ्रमरी वेधल्या ॥७१॥
हरिविजयग्रंथ क्षेत्र ॥ साहित्यरसें पिकलें अपार ॥ नाना दृष्टांत नागर ॥ कणसें हींचि सधन पैं ॥७२॥
हें पीक समस्त लागे हाता ॥ ऐसा उपाय काय आतां ॥ तरी आवडीच्या ढोळियां समस्तां ॥ सावध सर्वही बैसावें ॥७३॥
भक्तीचा पांगोरा वाजवूनी ॥ कुतर्क पांखरें टाका उडवोनी ॥ तरीच धान्य समूळींहूनी ॥ हाता लागेल सर्वही ॥७४॥
ब्रह्मानंद यतिराज ॥ जो ज्ञाजार्क तेजःपुंज ॥ श्रीधर तयाचें चरणरज ॥ सेवितां सहज संतुष्ट पैं ॥७५॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ संतजन परिसोत पंडित ॥ चतुर्दशाध्याय गोड हा ॥२७६॥
॥अध्याय॥१४॥ओंव्या॥२७६॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥