Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग-४

(अंजली, शीतल आणि प्रगती सकाळी तिघी सोबत शाळेत जात असतात, तेव्हा त्या तिघींचा संवाद घडत असतो.)

शीतल:- परत यावर्षी बी नाटक नायं करायं मिळणार.... 

अंजली:- तुझा खडूस बाप नायंच  बोलला ना परत. 

प्रगती:- आपले आई वडील विरोधातच जातात दरवेळेस आपल्या. कधीकधी ना प्रश्न पडतो, जन्मच काहून दिला यांनी आपल्याला?

अंजली:- आपण नसतो तर हाताखालच मांजर कोण बनणार?

शीतल:- आपण मांजर अन् बंधू म्हणजे वाघ. पण असं का?

अंजली:- मार्क तर चांगलेच पडतात आपल्याला. तरी टोमणे ऐकावे लागतात. 

शीतल:- पोरीच्या जातीला हे शोभत नाय, ते शोभत नाय.

अंजली:- शिळं खान जणू पाचवीला पुजलेलयं आपल्या.

शीतल:- काल पोटात खड्डा पडायचा उकुत आलता तरी मायनं बापालाच आधी जेवण दिलं.

अंजली:- माझी आजी लय खडूस. अभ्यास असला तरी मुद्दाम मला काम लावणार.

शीतल:- त्या थेरडीचे अर्धे लाकडं मसणात गेले ना... मग तरी बी अकड हायच का....??

अंजली:- हो ना. काय करणार?

(प्रगती त्या दोघींच बोलणं ऐकत गुपचुप चालत असते. तिच्या डोक्यात भविष्यात पुढे उभे राहणाऱ्या गुलामगिरीच्या चित्राच संकट वेध घेत असतं.)

अंजली:- प्रगती काय झालं? अचानक शांत झालीस. 

प्रगती:- काही नाही गं. दुरून डोंगर साजरे असतात ना अगदी तसं झालयं आपलं. 

शीतल:- म्हणजे?

प्रगती:- म्हणजे बाहेरची दुनिया आपल्याकडे केवळ याच नजरेने पाहते की; मुली चांगल्या सुसंस्कृत आहेत, शिकतायेत. पण त्यांना काय कल्पना की इथे आमच्या इच्छांना वाटच मिळू दिली जात नाही.

अंजली:- खरयं स्वातंत्र्य असून पारतंत्र्यात जगावं लागतयं आपल्याला.

शीतल:- जाऊ दे. आता सोडा हा विषय. शाळा आली आपली.
(तिघी शाळेत त्यांच्या वर्गात जाऊन बसतात आणि हा प्रसंग इथेच संपतो.)