प्रसंग:-२
( सायंकाळची वेळ असते. जवळपास सात वाजलेले असतात घरात शीतलचे आई-वडील आणि शीतल असते शितलचं स्वयंपाक करणं चालू असतं.)
शीतल:- (चुलीवरचा धूर डोळ्यात जात असतो) आई मला शाळेच्या नाटकात काम करायचयं.
शीतलची आई:- बरी हायंस नव्हं. काहीही काय बोलून राहिली.
शीतल:- आई मला आवडतं नाटक करायला.
शीतलची आई:- अगं त्यापरीस अभ्यासात डोकं जास्त लाव जरा.
शीतल:- आई एकदा बाबांना विचारून बघ ना.
(इतक्यात शीतलचे बाबा स्वयंपाक घरात प्रवेश करतात)
बाबा:- अयं, काय बोलणं चाललंय माय-लेकीचं?
आई:- काही नाही तिला म्हटलं जरा भाजीला मीठ निट टाक.
बाबा:- तुम्ही सांगायची गरज पडली व्हयं. शीतल तर भाजी छानच बनवती की.
शीतल:- बाबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय.
बाबा:- विचार की मंग.
शीतल:- बाबा शाळेतल्या नाटक स्पर्धेत मला भाग घ्यायचायं.
बाबा:- (दुर्लक्षित करून) ते ताट घ्या इकडं... (आई ताट पुढे करते.)
शीतल:- बाबा... (तिचं बोलणं अर्धवट तोडल्या जातं)
बाबा:- शीतले हे बघं पोरीन अभ्यास करावा फक्त. नाटकबिटक काय कामाच नाय.
शीतल:- पण बाबा ऐका तर....
बाबा:- हे बघं एकदा सांगितलं ना नाही म्हणून तर विषय इथेच संपला.
आई:- शीतले जा पाणी भरुन घे.
(शीतल मनातून पूर्णपणे नाराज होते. चेहर्यावर तशीच उदासीनता घेऊन ती नळावर पाणी भरायला जाते.)