प्रसंग-३
( रात्रीचे आता जवळपास आठ वाजत आलेले असतात. अभय ज्याला शीतल आवडत असते, तोदेखील पाणी भरायला नळावर मित्रांसोबत आलेला असतो.)
अभयचा मित्र:- ए अभ्या शीतली आली बघं शीतली...
दुसरा मित्र:- ए शीतली नायं वहिनी बोल वहिनी....
अभय:- (जरा लाजत) शांत बसा रे जरा. (नळावर पाणी भरायला इतर फारशी गर्दी नसल्याने अभयला शीतलसोबत बोलण्याची संधी मिळते)
अभय:- शीतल काय झालं? जरा नाराज दिसतेस?
शीतल:- अरे मला नाटकात काम करायला नकार दिला आहे घरून.
अभय:- अगं मग तू एवढ्यासाठी तुझा मूड का खराब करतेस?
शीतल:- तुला माहित आहे ना, नाटक मला किती जवळचयं.
अभय:- हो.
शीतल:- आणि त्यात मी घरातून गेली तीन वर्षे नाटकासाठी परवानगी काढण्याचा प्रयत्न करतीये.
अभय:- हे बघं मी लपून तीन-चार वेळा तुझा सराव शाळेत पाहिला आहे. तू छान नाटकात काम करू शकशील पुढे चालून.
शीतल:- हो रे पण.....
अभय:- सध्या पण बिन सोड आणि निश्चिंत हो. पुढचं पुढे बघता येईल.
शीतल:- ठीक आहे. जाते मी.
(शीतल घरी निघून जाते)