Android app on Google Play

 

आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर

 

'बिनधास्त' नावाचा मराठी मूव्ही आठवतोय का? मी कॉलेजच्या फस्ट इयरला असताना रिलीज झाला होता. त्यात एक डायलॉग होता, दोन पुरुषांची मैत्री आयुष्यभर टिकते, पण अशी मैत्री मुलींची टिकत नाही'... मग त्यातल्या वैजू आणि मयू आणाभाका घेतात की लग्नानंतरही आपण आपली मैत्री टिकवायची...

माझा स्वभाव तसा एकलकोंडा, त्यामुळे माझ्या मैत्रिणी कमी होत्या. पण ज्या होत्या त्या मात्र फार जिवलग होत्या. मात्र आपले लंगोटीयार असतातच ना, अशी माझी मैत्रीण स्नेहल. आता अशा आणाभाका घ्यायचा फिल्मी प्रकार काही आम्ही केला नव्हता... पण आमची मैत्री टिकली, नव्हे तर बहरली.

एकतर आम्ही शाळेपासूनचे सोबती. मला तर आठवतही नाही की पहिल्यांदा आम्ही कधी भेटलो ते? दोघीही ज्युनिअर केजी पासून एकाच वर्गात... वसईमधल्या आगाशीतील 'काशिदास घेलाभाई' असं भारदस्त नाव असलेली आमची शाळा. स्नेहलबाई शाळेच्या जवळच रहायच्या... इतक्या की मी चाळपेठ नाक्यावर बसची वाट बघत असताना स्वारी घरी जाऊन, कपडे बदलून सायकल वरून फिरायची... मला फार हेवा वाटायचा तिचा तेव्हां. वाटायचं, आपलं घर का जवळ नाही असं?... असो...  तर तिसरीत असतानाची गोष्ट, मला काहीही करून 'तीन पायाची शर्यत' अशा वियर्ड नाव असलेल्या एका रेस मध्ये भाग घ्यायचाच होता. एका मैत्रिणीने मला, पडल्यावर गुडघ्यातून वाटीभर रक्त निघतं असं सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण ऐकेन ती मी कसली? मग मी स्नेहलला विचारलं, तर ती हो म्हणाली आणि आम्ही दोघी एकेका पायाला रुमाल बांधून अश्या धावलो म्हणता ना, की दोघीही पहिल्याच आलो.... करून दाखवलं!!

सातवीत असताना, आम्ही दोघी जणी एका बेंचवर बसायचो. मात्र, अखंड बडबड करत असल्यामुळे आमच्या बाईंनी माझी उचलबांगडी करून आमची युती फोडली. त्यादिवशी नेमकी मी शाळेत गेले नव्हते... आजच्या सारखे मोबाईल नसल्यामुळे ती ब्रेकिंग न्युज मला दुसऱ्या दिवशी मिळाली... आणि ती सांगताना, अजून एका मैत्रिणीने शेरा मारला, आता स्नेहलच्या मनाची स्थिती यावर एक निबंध लिहायला पाहिजे.

मात्र असं असलं तरी आम्ही काही तोपर्यंत एकमेकांच्या बेस्ट फ़्रेंड, ट्रू फ्रेंड वगैरे नव्हतो... तिचं वेगळं विश्व होतं, माझं वेगळं होतं. आमची मैत्री जास्त बहरली जेव्हा आम्हांला एकाच कॉलेजात ऍडमिशन मिळाली...

बांद्रा ईस्टला, आमचं इंजिनीअरिंग कॉलेज होतं... १९९९-२००० मधलं बांद्रा ईस्ट आणि वेस्ट म्हणजे लॉरेल आणि हार्डीची वेगवेगळी रूपं... ग्लॅमरस बांद्रा वेस्टला गावठी ईस्ट अगदी खेटून होतं... त्यावेळी अजून BKCची भुताटकी अवतरली नव्हती. आमच्या दुर्दैवाने आमचं कॉलेज नॉन-ग्लॅमरस ईस्टला होतं. खरंतर वयाने आम्ही तशा लहानच पण, तेव्हापासून ट्रेनचा प्रवास आमचा सुरू झाला... आजही इतकी वर्षे झाली तरी मला अजूनही बांद्रा- विरार ट्रेनच्या वेळा मात्र लक्षात आहेत.

शाळेत आमच्याबरोबर बऱ्याच मैत्रिणी होत्या... को-एड शाळा असतानाही मुलांशी मात्र आमची मैत्री  नव्हती... आम्ही चक्क लाजायचो तेव्हा... तेच कॉलेजमध्येही सुरू झालं. खरंतर 'कोणीतरी' आहे याच  एका पॉईंटवर तिथे ऍडमिशन झाली होती. घरच्यांना वाटायचं की आधार आहे चला... मात्र आम्ही दोघीजणी खरंच एकमेकांचा आधार झालो... आमचे कॉलेज मधले तर इतके किस्से आहेत ना... शेवटपर्यंत तशा दोघीच राहिलो... अजूनही शाळेतले कित्येकजण चांगल्या संपर्कात आहेत मात्र कॉलेजमधले कोणीही नाहीत... आणि त्याची गरजही वाटत नाही.

सकाळची आमची ८:२९ची चर्चगेट ट्रेन असायची... या मॅडम, आठ पासून विरार स्टेशनवर असायच्या. आणि मी धावत पळत ८:२० नंतर यायचे. कधी कधी तर दोघींनी जीव खावून धावून ट्रेन पकडली आहे. पण मी आल्याशिवाय ती ट्रेनमध्ये बसायची नाही. मोबाईल नसताना असा आमचा संवाद कसा चालत असे असा मला कधी कधी प्रश्न पडतो. ठरलेल्या ठिकाणी आम्ही एकमेकींची वाट बघत बसायचो. बांद्रा स्टेशनवरून कॉलेजला जायला दोन रस्ते होते. एकूण वीस मिनिटांच्या अंतरावर कॉलेज होतं. मात्र गर्दीचं वावडं असल्याने शॉर्टकटवरून आम्ही कधीही गेलो नाही. वेस्टन एक्सप्रेस वे वरून चालत जायचो. मात्र कधीही रिक्षा केली नाही. तेव्हां रिक्षेचं कमीत कमी भाडं ७/८ रुपये होतं... आणि तेव्हा ती भलतीच उधळपट्टी वाटायची. भाईंदरवरून येणाऱ्या दोन मुली होत्या. ज्या नेहेमी फर्स्ट क्लास मधून यायच्या आणि दोन्ही वेळेला रिक्षेने प्रवास करायच्या... त्यांना बघून आम्ही आश्चर्य व्यक्त करायचो... पण त्यामुळे खरंच एक चांगली सवय लागली... कसलीच तक्रार न करता, असेल त्या परिस्थितीत रहायची. असं नाही, की घरी काही प्रॉब्लेम्स होते... पण पैसे जपून वापरण्याची सवय त्यावयात लागणं हे फार फार गरजेचं असतं. तोच टिनएज संपायचा काळ मुख्यतः तुमचं भविष्य घडवत असतो. व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा आम्ही फार पर्टीक्यूलर होतो. अगदी चार आण्याचेही हिशोब केले आहेत आम्ही.

आमचं कॉलेज सकाळी दहा ते पाच असायचं. तेव्हाचं आमचं लक्ष्य असायचं ते म्हणजे ५:३५ ची डाऊन ट्रेन पकडणं. जी बांद्रा वरून दादरला जायची, आणि पाच मिनिटांनी तिच ट्रेन दादर- विरार होऊन परत विरारला जायची. कारण तेव्हा बांद्राला 'बांद्रा- विरार' ट्रेन पकडणं म्हणजे पायाच्या चवड्यांवर उभं राहून प्रवास करणं... त्यामुळे आम्ही जिवाच्या करारावर डाऊन ट्रेन सोडत नसू. एकदाची सीट मिळाल्यावर 'अडीच रुपयाचा' वडापाव आठवड्यातून एक/दोन वेळेला खाणं म्हणजे आमची सर्वोच्च चैन.

आमचं कॉलेज ईस्टला असल्याचा आम्हांला अगदी जळफळाट व्हायचा. एकदा आम्ही दोघी जणी बांद्रा वेस्टच्या बाहेर असलेल्या साईश्रद्धा नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. थोडेसे पैसे होते जवळ. पण तिथे गेलो आणि जास्त खायची चटक लागली... आणि आम्ही सत्तर रुपयाचं बिल केलं... तोपर्यंत आम्ही तिथेच राहून भांडी घासण्याचे वगैरे जोक केले. मात्र बिल आल्यावर आमची गाळण उडाली, दोघींच्या बॅगेचा कप्पा न कप्पा परत परत तपासून झाला. आणि हाताशी येतील तसे एकेक रुपया, दोन रुपये गोळा करून सत्तर रुपये वेटरला दिले. त्यानंतर आमच्याकडे मला विरार स्टेशन वरून घरी जायला रिक्षेचे तीन रुपये तर तिला घरी जायला पाच रुपये एवढेच उरले... वेटरने स्पष्ट शब्दात 'कौनसे स्टेशन पे बैठे थे' असं बोलून आमचा अपमानही केला. टोचून बोलण्याचा मक्ता काही फक्त पुणेकरांनी घेतला नाही आहे... उगा आम्हां पुणेकरांना नावं नका ठेवू यापुढे...

कॉलेजचं थर्ड इयर एक वेगळी जबाबदारी घेऊन आलं. आमचं प्रोजेक्ट चालू झालं. त्यासाठी आम्ही नेरुळला जायचो. मजा म्हणजे, तेव्हा नेरुळ आता सारखं अफाट मोठं झालं नव्हतं. त्यासाठी आम्हांला नेहेमी नेरुळला जावं लागायचं. तिथे रात्री अपरात्री फिरायलाही आम्हांला भीती नाही वाटली. एके दिवशी, प्रोजेक्टची फाईल आम्ही ट्रेनच्या वरच्या रॅकवर ठेवली आणि आम्ही विरार आल्यावर उतरून निघून गेलो. लक्षात आल्यावर आम्हांला स्वर्ग आठवला... मात्र मी लगेच माझ्या मावसभावाला फोन केला. तिच सेम ट्रेन परत दादर स्टेशनला जाणार होती. तो घाईघाईने दादरला आला. आम्ही ज्या ट्रेनच्या 'डब्यामध्ये' बसलो होतो तिथे तो येऊन पोहोचला. दादरला ट्रेन आल्याबरोबर डब्यातल्या लेडीज 'बायकांच्या' हातापाया पडून त्याने फाईल मिळवली. संध्याकाळच्या वेळी खच्चून भरलेल्या लेडीज डब्यात एखाद्या पुरुषाने चढणे म्हणजे काय आक्रीत त्याच्यावर ह्याची फक्त कल्पना करा. Anurag बंटी, आठवतेय का? त्या आमच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आमची नागपूरला सुद्धा वारी झाली. कॉलेजचा काळ खरंच आम्ही जगलो... जबाबदारी शिकवणारा... आमच्या पंखात बळ येण्याचा तो काळ होता...

आम्ही बऱ्याच वेळी एकमेकांकडे जायचो. क्वच्चीतकधी रात्री पण राहायचो. त्यांच्याघरची 'वांगी- बटाट्याची' भाजी माझी विशेष आवडीची. तिची मोठी बहिण, माझी पण बेन झाली. तिचे आई- बाबा मला त्यांचीच मुलगी असल्याप्रमाणे वागवायचे. माझ्या घरी सुद्धा तिला तशीच ट्रीटमेंट मिळायची. त्यांचा लँडलाईन नंबरसुद्धा अजूनही माझ्या लक्षात आहे. ****40 बरोबर ना गं स्नेहल? आणि तो प्लाझा ला जाऊन बघितलेला 'चिमणी पाखरं' आठवतोय का? काय रडलो होतो आपण. काय दिवस होते ते... निरागस... आता बघू का, तो चिमणी पाखरं परत?

कॉलेज नंतर आमच्या गाठीभेटी कमी झाल्या. फोन वरून कॉन्टॅक्ट व्हायला लागले. दोघी नंतर आपापल्या व्यापात व्यस्त झालो. यथावकाश आमची लग्नही झाली... मुलं झाली. मात्र तिच्या सासूबाईंबद्दल मला सांगावसं वाटतं, त्यांचा माझ्यावर फार जीव. त्या मूळच्या कोल्हापूरच्या. एकदा मी स्नेहलकडे गेले होते, तेव्हां चविष्ट अशी कोल्हापूरी मिसळ त्यांनी माझ्यासाठी केली होती. फोनवर सुद्धा त्या नेहेमी बोलतात. त्यांना खास माझं घर बघायचं होतं. त्यासाठी त्या आमच्या पुण्याच्या घरीसुद्धा आल्या होत्या. निघताना माझ्या नवऱ्याला म्हणाल्या, 'रश्मी माझी मुलगी आहे. तिला जपा.'.... खरंच कोण कुठल्या त्या... तर कोण कुठली मी...मैत्रिणीची सासू... दोन- तीन वेळेला भेटले फक्त... पण कसे ऋणानुबंध असतात ना?

आमच्या भेटी आता जास्त होत नसल्या तरी आमची मैत्री ही निरंतर आहे... जसं कॉलेजच्या दिवसांमध्ये आमच्या घरातल्यांना वाटायचं की बरोबर 'कोणीतरी' आहे आज तीच फीलिंग आम्हांला एकमेकींबद्दल वाटते... अजूनही!!

 

आरंभ : मार्च २०२०

संपादक
Chapters
आरंभ अंक
संपादकीय (निमिष सोनार)
संपादकीय (मैत्रेयी पंडित)
बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर
अमेरिकेतील मराठी माणूस – नीला पाटणकर
मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले
शॉर्ट फिल्म: अँरेंज्ड मॅरेज: लग्नाकडे नेणारा एक सुंदर प्रवास - मिलिंद कोलटकर
रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा
अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा
२०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार
नागराज मंजुळे: माणूसपण बहाल करणारी दृष्टी - निखील शेलार
द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई
टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई
|| प्रवासवर्णन ||
हम्पी: एका साम्राज्याची अखेर – अजित मुठे
गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित
मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर
|| लेख विभाग ||
माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर
स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे
सकारात्मक विचार - सविता कारंजकर
मायमाखली नजर – प्रसाद वाखारे
आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार
आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर
एक स्त्री – प्रिया भांबुरे
वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर
|| कथा ||
आगंतुक – सविता कारंजकर
|| कविता विभाग ||
तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे
भाव अंतरीचा – छाया पवार
स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर
आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड
सून माझी लाडाची – नीला पाटणकर
शोध – मंगल बिरारी
लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर
सुख – भरत उपासनी
चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे
|| आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||