मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर
शरीराकडे संकोचूनच पाहण्याची सवय/संस्कार असलेल्या भारतीय मनाला न पेलवणारा 'ब्राझीलियन' आविष्कार.
रिओमध्ये 'सिनोरिता' हा शब्द इतक्या वेळेस माङया कानावर पडला की मीसुद्धा अनोळखी स्त्रीला संबोधताना 'सिनोरिता पोर फावर (प्लीज)' म्हणायला लागले.
सिनोरिता म्हटले की उगीच झग्यासारखे सुळसुळीत पायघोळ फ्रॉक घालून कतरिनासारखे दिसण्याची गरज नसते हे सुद्धा इथेच समजले.
म्हणजे बाईला हाक मारताना आपण जसे बाई, ताई किंवा मॅडम म्हणतो तसेच इथे 'सिनोरिता' म्हणतात. दुसरा एक लोकप्रिय शब्द म्हणजे 'दोन्ना'. म्हणजे दोन्ना करोलिना, दोन्ना इझाबेला, दोन्ना सुलक्षणा. अर्थात माझ्या अवघड नावाचे इथे दोन्ना सुला हे सोपे रूपांतर होते. मीही मनातल्या मनात हे नाव नाशिकच्या जगप्रसिद्ध वाइनच्या गावाशी नाते जोडते म्हणून खूश असते.
लग्न झालेल्या मध्यमवयीन स्त्रियांना त्यांच्या नावापुढे दोन्ना हे प्रिफिक्स लावले जाते. ते अतिशय प्रचलित आहे. एकदा एका ब्राझीलियन मैत्रिणीच्या घरी गेले असता तिच्या किचनमध्ये हातरुमालांवर सात वारांची नावे भरतकाम केलेली दिसली. अगदी पायपुसणोसुद्धा हाताने बनवलेले.
शाळेत स्पोर्ट्स टीचर असलेली ही मैत्रीण तशी टॉम बॉय. तिच्याकडे तिच्या चार मुलांना सांभाळण्यासाठी पूर्णवेळ सेविका. ही मैत्रीण एकतर शाळेत किंवा जिममध्ये जास्त. घरी असली की मुलांना, नव-याला आणि कुत्र्याला बरोबर घेऊन समुद्रकिना-यावर. तिला हे सर्व करायला वेळ कधी मिळतो, माहीत नाही.
मी आश्चर्य व्यक्त करीत तिला तसे म्हटले. त्यावर ती म्हणाली, तिची आई 'मुल्हेर प्रिन्दादा' होती. म्हणजे आपण मराठीत जिला गृहकृत्यदक्ष म्हणतो अशी. घराची, नव-याची, मुलांची काळजी करणारी, घर सजविणारी, गिफ्टेड वूमन.
अशा स्त्रिया बायको म्हणून चांगल्या असतात. आजच्या काळात मात्र त्या थोडय़ा दुर्मीळ आहेत. या देशात अशा बाईचा शोध घेणो वनवासाला निघण्यासारखे आहे. वाटेत तिच्या वाटय़ाला काय काय भोग येतील त्यावरून तिची परीक्षा ठरते आणि विशेषणसुद्धा. ब्राझीलच्या नावामध्ये ब्रा हा शब्द आहे. इथे स्त्रिया अत्यंत सेक्सी कपडे घालतात. पण म्हणून त्यावरून या स्त्रियांना लेबल्स लावण्याची गरज नाही. त्यांचेही काही सामाजिक प्रश्न आहेतच. इथल्या स्त्रियांचे जगासमोर आलेले रूप खूप दर्शनी आहे, हे मात्र खरे!
फक्त आणि फक्त बिकिनीमध्ये समुद्रकिना-यावर फिरणा-या सुडौल बांध्याच्या भरगच्च देहाच्या स्त्रिया थेट खजुराहोच्या शिल्पातून उतरून आपल्यासमोर उभ्या राहिल्यासारख्या दिसतात. म्हणजे हे चित्र शुक्रवारी संध्याकाळपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत समुद्रकिनारी दिसतेच. कधीकधी तीच बिकिनी घालून यच्चयावत वयोगटातील स्त्रिया रस्त्याने फिरताना दिसतात. पाहणा-याला त्याचे काही वाटत नाही. एखादा चुकलामाकला भारतीय जो त्याच्या बायकोला 'थ्री फोर्थ' घालण्यास मोठय़ा मनाने परवानगी देतो, त्याची टिप्पणी सोडली तर बाकी सगळे ठीक असते. कुणी नैतिकतेचा बाऊ करीत नाही, की बलात्काराच्या घटना होताना दिसत नाहीत. समुद्रकिनारी खा-या शेंगदाण्याच्या जोडीला बिकिनी विकणारा, फुगेवाल्यासारख्या काठीवर तां ना पि हि रंगाच्या तलम बिकिन्या घेऊन मुक्त विहार करीत असतो. घेणारेसुद्धा रंग, पोत, फिटिंग, फील तिथल्या तिथे तपासून घेतात. खरंतर एक वरचा भाग किमान 5क् सेमी कपडय़ामध्ये बसतो परंतु खालचा भाग तर चिंधीपासूनच बनवला जात असावा यात शंका नाही.
तर अशा या मुक्त देशात बाईचा पाश्र्वभाग म्हणजे सौंदर्याचा निकष मानला जातो. इथे रिओत काही समुद्रकिनारे फक्त दिगंबर अवस्थेत फिरण्यासाठीच आहेत. देहाचे सगुण साकार रूप सजवून मिरवण्यापेक्षा जसे आहे तसे दाखवणो इथे महत्त्वाचे मानले जाते. यात कोणतीही दांभिकता नाही. ताकाला जाऊन भांडे लपविणे नाही.
'साडीतच बाई सुंदर दिसते' असे मानणारे आणि त्यातून समाधान शोधणारे माझे भारतीय मराठी मन ब्राझील देशी येऊन बरेचसे हलून गेलेय. सतत काही ना काही इथे घडत असते, इतके धक्के बसतात. चिंधीपासून बनविलेल्या बिकीनीज कमी की काय म्हणून आता ही मिस बुम्बुम स्पर्धा. म्हणजे आज नाही सुरू झाली ही. अर्थात माझ्या ब्राझीलियन मैत्रिणी मला त्याबद्दल माहिती देत असतात. २७ परगण्यातील २७ सुंदर बुम्बुम असणा-या ललनांचा नामघोष केला जातो. यात एक पोर्नस्टारसुद्धा होती जी तिच्या भरभक्कम उरोजांसाठी प्रसिद्ध आहे. आणि इतर जणी त्यांच्या जन्मजात हत्त्यारांबद्दल खात्री बाळगून आहेत. प्रमोशनचा भाग म्हणून साओ पावलोमधील रस्त्यावर भर ट्रॅफिकमध्ये या बुम्बुम्स सिग्नल नियंत्रणाचे काम करीत होत्या, म्हणजे पाहा!
सौंदर्य स्पर्धा म्हटले की आपल्याला चेहरा दिसतो, फिगर दिसते. फार फार तर रंग. इथे स्पर्धेचे निकष अजून ठाशीव आहेत. म्हणजे या सर्वाबरोबर पाश्र्वभाग गोलाकार, मोठ्ठा, भरीव आणि शिल्पाप्रमाणो असला पाहिजे. असाध्य ते साध्य असा. याच्या जोडीला उरोजही तसेच असतील तर जिंकण्याची संधी मिळणारच.
साधारण सहा वर्षापूर्वी ही स्पर्धा सुरू झाली. खूप गाजावाजा झाला. अनेक कारणांसाठी स्पर्धा गाजली. कधी परीक्षकांना लाच दिल्याचा आरोप झाला. कधी कुणी कौमार्य टिकविण्यासाठी सर्जरी केल्याचा दावा केला.
३९ वर्षीय स्पर्धक ही इथे विजेती ठरली आहे.
अन्द्रेसा नावाच्या एका स्पर्धक तरुणीची शोकांतिका इथे फार प्रसिद्ध आहे. अन्द्रेसाचे बुम्बुम दुस-या क्रमांकावर आले होते. २७ वर्षाची ही तरुणी एक महिनाभर आयसीयूमध्ये होती. कारण तिने तिच्या मांडय़ांमध्ये कॉस्मेटिक जेल फिलर्स इंजेक्ट केले होते. त्यामुळे तिच्या स्नायूवर त्याचा परिणाम झाला. हे हायड्रोजेल फिलर्स बाहेर काढल्यावर तिला सेप्टिक झाले. विशिष्ट अवयवांना उठाव देण्यासाठी टोचलेल्या कृत्रीम रसायनांचा तिच्या शरीराने स्वीकार केला नाही आणि तिचा पाय कापून काढावा लागेल अशी वेळ आली. सुदैवाने थोडक्यात निभावले.
ब्राझीलला जगाची कॉस्मेटिक राजधानी म्हणतात. इथे सर्वात जास्त ब्रेस्ट इम्प्लांट आणि बटक ऑगमेन्टेशन्स केली जातात. कलिंगडाला इथे 'मेलन्सिया' म्हणतात आणि अशा स्त्रियांनासुद्धा. यावर एक गाणेसुद्धा प्रसिद्ध आहे. सांगण्याचा उद्देश, एकीकडे माझ्या मायदेशात पोर्नवर बंदी येत आहे आणि मी ज्या देशात राहतेय तिथे कित्ती काही घडतेय. जगाच्या शाळेत शिकणे काय असते हे असे समजते आहे मला. सौंदर्याचे आकार ऊकार जपणाऱ्या ह्या देशात माझी समज थोडी उपरीच ठरतेय.