मायमाखली नजर – प्रसाद वाखारे
चांदण्या रात्रीनंतराची सोनेरी पहाट, चिमण्यांचा चिवचिवाट ती कोंबड्याची बांग आणि नव्याने दिनचर्येला सुरुवात कुणाला आवडणार नाही. पण येणारी नवीन पहाट सोबत पूर्वेची लालीच नव्हे तर अनेक जबाबदाऱ्या सुद्धा आणते आणि त्यातलीच सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे टिचभर पोटाची खळगी भरण्याची, कदाचित म्हणूनच गणेश ला नवी पहाट जणू ओझं वाटते. गणेश तसा कष्टाळू मुलगा, मिळेल ते काम करायचा, मिळेल ते खायचा अंगभर कपडे नव्हते पण शरीर झाकेल एवढा मस्त सदरा होता ज्याला भोकं पडलेली अगदी त्याच्या नशीबासारखीच! अंगावर पळीभर मास नाही पण स्वाभिमान कधी वेशीला टांगला नाही. उगवता सूर्य सोबत भूक पण आणायचा म्हणून पुन्हा नव्याने दोन पायांची गाडी चालवत गावभर भटकायचा आणि हाती आलेले काम एवढा चोख पणे पार पाडायचा की कुणी तरी त्याला शिळ्या पोळी ऐवजी गरम पोळी भाजी देईल. पण त्या कवळ्या बुद्धीला कुठे कल्पना की भावनाशून्य माणसांच्या गर्दीत हरवलाय तो! आणि असाच त्याचा रोजचा कार्यक्रम अगदी आनंदात पार पडायचा.
एके दिवशी पोट दुखीने दार ठोठावलं आणि गणेश आळ्यापिळ्या देऊ लागला. असह्य झालं दुखणं म्हणून नरड्यात बोटं घालून उलट्या करू लागला. काही वेळात थोडं बरं वाटलं आणि भुक लगेच मांडी घालून पुढ्यात बसलीच होती. निघाला रस्त्याच्या कडे कडेने पुन्हा टिचभर पोटासाठी. आज नशिबाने त्याच्यासाठी वेगळीच मेजवानी तयार केली असावी म्हणून एक म्हातारी त्याला दिसते. आई बाळाला जशी कुरवाळते जणू तसच म्हातारी शेणाने घर सारवत होती. गणेश अगदी कुतूहलाने ते सर्व बघत होता आणि कुठे तरी तो सुखावला असावा म्हणून अलगद हसू त्याच्या चेहऱ्यावर आले. पाटी भर शेण आणून आणून म्हातारी थकलेली आहे याची चाहूल गणेश ला लागली म्हणून त्यानेच पाटी उचलली आणि घरापाशी आणून ठेवली. म्हातारीने आशीर्वाद दिला तोच गणेश च्या डोळ्यातला पहिला थेंब तिच्या हातावर पडला. गणेश ने क्षणभर विचार न करता 'आई' म्हणून तिला हाक मारली आणि तोच म्हातारीच्या डोळ्यातून अश्रू टपकले. कदाचित म्हातारीलाही आई म्हणणारं कुणी नव्हतं आणि गणेश तर आईविना पोर, एक अनाथ!
आई पण मिळायलाही भाग्य लागतं म्हणे, पण आई म्हणायलाही खूप पुण्य लागत असावं. आज गणेश ची भूक त्या म्हातारीच्या मायमखल्या नजरेने शांत झाली. म्हातारीने जवळ घेऊन अगदी लाडाने गणेश ला कवटाळले आणि पुन्हा एकदा आई म्हणून हाक मारायला लावली. गणेश जणू माळच जपू लागला आई...आई...आई...आणि म्हातारीचे डोळे अगदी ओसंडून वाहत होते. डोळ्यासमोर सर्व कसं धूसर होऊन गेलेलं कारण आज अश्रुंचे मेघ दाटले होते. चातकाप्रमाणे वाट बघत असावं त्या म्हातारीचं मन आई हे शब्द ऐकण्यासाठी आणि पहिलाच पावसात पिसारा फुलवून नाचणारा मोर जणू आज गणेश बनून गेला. क्षणभर उशीर नाही केला आणि "बाळ भूक लागली का रे तुला?" असे उदगार म्हातारीच्या तोंडून निघालेत. गणेश आता अगदी शांत होता बस न्याहळत होता त्या मायमखल्या नजरेला. "आज कुठे पोट भरलं बघ आई" एवढं म्हणून गणेश ने म्हातारीच्या कुशीत डोकं ठेवलं. सायंकाळची वेळ झालेली देवा पुढे दिवा लावायचा म्हणून म्हातारीने पणती मध्ये तेल ओतले आणि प्रकाश चहू बाजू पसरला. आज म्हातारीच्या तेजोमयी चेहरा या दिव्याच्या प्रकशालाही लाजवत होता.
आज गणेश ला झोपही नव्हती आणि येणाऱ्या उद्याची चिंता देखील नव्हती, जणू स्वर्गच गवसला होता त्याला. रात्र भर गणेश म्हातारीच्या मांडीवर डोकं ठेवून निपचित पडला आणि म्हातारीही त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. पहाटेला कोण बरे थांबवणार? आणि ती उगवलीच! आज गणेश साठी भूक हा प्रश्न मुळीच नव्हता बस ओढ होती ती त्याच मायमखल्या नजरेची. म्हातारीने गणेश ला आवाज दिला जवळ बोलावले आणि एक मुका घेतला. गणेश आज निशब्द होता. तेवढ्यात म्हातारी गणेश ला म्हटली "काय रे काट्या, किती वेळ बघणार अजून मलाच? कामाला लाग बघू, उचल ती पाटी आणि कर गोळा ते शेण". म्हातारीच्या या वाक्याने गणेश सुखावला आणि क्षणभर वाया न घालवता पाटी घेऊन म्हातारीच्या मागोमाग निघाला. शेणाने घर सारवून म्हातारी पोट भरायची आणि आता तिच्या हातांना बळ देणारा गणेश तिच्या सोबत होता. कदाचित म्हातारीने गणेश मध्ये आपलं पोटचं कुणी बघितलं असावं आणि गणेश ने म्हातारीत आई शोधली असावी. पुढे दोघी मिळून कामे करू लागलीत आणि गुण्यागोविंदाने राहू लागलीत. खरंच आईची किंमत काय असते हे एक अनाथ नक्कीच सांगू शकतो, तर आईपणाचं सुख काय असते हे देखील एक आईच सांगू शकते.
शेवटी निरोप घेतांना...
भूक त्या तुझ्या उबदार मायेची,
नाही त्या फाटक्या गुढघाभर चादरेची...
भूक तुझ्या त्या दोन गोड शब्दांची,
नाही त्या चित्र विचित्र भाषांची...
भूक तुझ्या हातच्या दोन घासांची,
नाही त्या शिळ्या कुजक्या तुकड्यांची...
भूक त्या मायमखल्या नजरेची,
नाही त्या तिरकस पेचाची...
-प्रसाद विवेक वाखारे.
सिंहस्थ नगर, सिडको, नाशिक-०९
मो.नं. ८६२५८२८३८७