दुर्दैवी मानव 2
“प्रोफेसर होतास? मग ज्ञानात काय भर घातलीस? ज्ञानात किती रंगलास? ज्ञानासाठी किती वेडा झालास? नोट्स लिहून दिडक्या मिळवणारा तू. ज्ञानाची विक्री करणारा तू का आचार्य? विद्यार्थ्याला उदात्त ध्येय दाखवलेस? ज्ञान म्हणूजे काय थट्टा? ज्ञान म्हणजे जीवनाचे दान आहे. तू काय केलेस? फेका, फेका या करंट्याला. विद्यार्थ्यांना गुलाम करणारा. ‘दुस-याच्या नोक-या करा, मिंधे व्हा’ सांगणारा! जा किड्या. हजारो जन्म खितपत पड. रड. जा.”
“मी वकील होतो. मी न्यायाच्या कामी मदत केली.” एक वकील म्हणाले.
“फेका याला. न्याय म्हणजे काय रे? पैसेखाऊ चोरा! भांडणे तू लावलीस. ख-याचं खोटे नि खोट्याचे खरे तू केलेस. सदसद्विवेक बुद्धि गुंडाळून ठेवलीस. असत्याची पूजा सुरू केलीस. हा काय न्याय? गरिबांना लुटून बंगले उभारलेस, त्यांना रडवून पुन्हा त्यांचा हितकर्ता म्हणून मिरवलास. कर तोंड काळे!”
“हे कोण? यांचे तोंड सांगत आहे हे कोण ते. यांनी स्त्रियांना छळले, रडवले. त्यांना मारले. तोडा याचे हात; फेका खाली!”
अशा रीतीने पंड्ये, भटजी, व्यापारी, जागीरदार भरभर खाली फेकले जात होते. ते पहा एक गलेलठ्ठ संन्यासी येत आहेत. “अरे, त्यांना इकडे नका आणू. त्यांना डाग द्या. विषयात रंगलेला, घृतकुल्या मधुकुल्या करणारा! हा संन्यासी फेका त्याला.”
“मी गरीब कारकून. मी काय करू?” एक कारकून म्हणाला.
“कारकून ना? पाप्याला साहाय्य करतो तोही पापीच. फेका यालाही.” देव म्हणाला.