कावळ्यांची परिषद 3
पण आपण एकमेकांना छळणार नाही. एकट्याने पोट भरणे आपल्याला आवडत नाही. आपण दुस-यांना हाक मारतो. स्वत:च्या सख्ख्या भावाशी लढणारा, स्वजातीशी भांडणारा, शेकडो भेदभाव पाडणारा हा द्विपाद बडबड्या पशू, रक्ताचा तहानलेला, चराचरांस लुबाडणारा हा लफंग्या, याचे पोट कधी भरत नाही, तृप्ती ज्याला माहीत नाही, आकाशातही जो उडायला येतो व आम्हांला त्रास देतो, पाण्यात माश्यांना त्रास देतो, जमिनीवर इतरांना हुसकून देतो, गोळ्या घालतो. असा जगघाण्या हा माणूस आणि ह्याने आमची बदनामी करावी?
याचे कवी ज्या कोकिळेची स्तुती करतात, तिला आम्ही पोसतो. ही भेदातीत निरपेक्ष दया व प्रेम. पण त्याबद्दल आमचे कौतुक करणे दूर राहिले. शिवाय मानव त्याबद्दल आम्हांला दुष्ट व लबाड म्हणतात. आम्ही किती अल्पसंतुष्ट! सडकेनासके खाऊन जगातील घाण दूर करतो. घरात उंदीर मेला, देतो हा मनुष्य फेकून. काही सडले कुजले की फेकतो हा बाहेर. त्याच्या उष्टेखळीजवळ, मोरीजवळ किती घाण. त्याचे उकिरडे जंतुकिड्यांनी बुजबुजलेले. ही सारी घाण आम्ही दूर करू पाहतो; तर उलट हा आम्हांलाच दोष देतो. याच्या गायी-गुरांच्या जखमा आम्ही स्वच्छ करतो. यांच्या गुरांचे आम्ही डॉक्टर, पण ‘व्रणावर बसणारे,’ म्हणून हा आमचा उपहास करतो. मृतांचे आत्मे आमच्यामध्ये येऊन वास करतात, म्हणून रोज काकबळी द्यावा, असे ऋषींनी पूर्वी ठरवले, पण नव्या मानवाने पूर्वीच्या चांगल्या चालीरीती सोडून दिल्या. “काकोपि जीवती चिरंच, बलिंच भुङ्क्ते” असे हा तुच्छचेने आपले वर्णन करतो. जणू याच्या काकबळीवरच आपण जगतो! पोट भरण्यासाठी का आम्ही ते दोन शीतकण खातो? पितरांच्यातर्फे आम्ही अन्नग्रहण करतो. तर हा हपापलेले समजतो आम्हांला! हा मनुष्यच चहाच्या पेल्यासाठी, विडीच्या थोटकासाठी, सुपारीच्या खांडासाठी वाटेल ते करील. या माणसांच्या तुरुंगांत सुशिक्षित देशभक्त तरुण आले. ते भाकरीच्या तुकड्यासाठी, डाळीच्या दाण्यासाठी कसे भांडत, ते आम्ही पाहिले आहे. जेलमधल्या पोपया चोरून खात. कधी शिपायाने पकडले तर त्याला लाच देत. तंबाकू, विडी, कांदा, मिरची, हरभ-याची डाळ, रताळी ह्या सगळ्यांचा तुरुंगात संग्रह करीत. बागेत गाजरे, रताळी, टमाटे, बीट दिसले की त्यांचा फन्ना पाडीत. भेंडी दिसते ना दिसते तोच त्यांच्या पोटात जाई. चुका, चाकवत, कोथिंबीर, चिंचेचा पाला सगळे यांच्या थाळीत जाई. आणि हा असा मानव कावळ्याला अधाशी म्हणतो! त्याच्यापेक्षा काटेरी पाला खाणारी शेळी बरी. निंबाची पिवळी रसरशीत फळे आपल्याला आवडतात; पण याचा त्या लिंबोळ्यांवरही डोळा.