Get it on Google Play
Download on the App Store

दुर्दैवी मानव 1

यमराज, त्याचा महिष आणि हे कावळ्यांचे शिष्टमंडळ देवलोकात येऊन दाखल झाले. तो त्यांना कोलाहल व आरडाओरडा ऐकू आला. मानवांची अफाट गर्दी दिसू लागली. ईश्वराचे दूत त्यांना भराभर खाली लोटत होते. तो पहा एक गयावया करीत आहे. “अहो माझ्या मालकीच्या 30 गिरण्या आहेत. हजारोंना मी पोटास दिले. मला घ्या आत.”

“फेका याला; म्हणे हजारोंना खायला दिले. परंतु लाखोंना बेकार केलेस ते? त्यांना खेड्यापाड्यांतील हवेतून दूर शहरात आणून त्यांचे आरोग्य बिघडवलेस. देवाने दिलेली शरीरे लौकर विशीर्ण केलीस. त्यांना व्यसनांत पाडलेस. तू चैनीत लोळलास, पोटाला नको असता खाल्लेस, लोक उपाशी मरत होते आणि तू लाडू-जिलब्या झोडीत होतास. लोक थंडीने कुडकुडत मरत होते आणि तू हजारो रुपये कपड्यांत दडवीत होतास. फेका, पाप्याला फेका. हजारो, लाखो मुलाबाळांच्या ‘हाय! हाय!’ यांच्यावर आहेत. दुर्भिक्ष्य, चो-या, अनीती याला हा जबाबदार आहे. फेका.” तो लक्षाधीश चेंडूसारखा फेकला गेला. इतरांची तीच दशा.

ते कोणी मुत्सद्दी आहेत वाटते. ते म्हणत आहेत –‘मी तर राष्ट्राचा फायदा केला. आमच्या व्यापाराला दुस-या देशांत सवलती मिळवल्या. मला देशभक्ताला आत सोडा. मला देवाजवळ जाऊ दे.”

“फेका खाली या करंट्याला. देशभक्ता ही येथे शिवी आहे. दुस-या राष्ट्रांच्या माना मुरगळल्या, त्यांचे धंदे बसवले, त्यांना गुलाम केले! आपल्या लोकांचे गगनचुंबी बंगले उठवलेस आणि गरिबांच्या झोपड्यांना आग लावलीस! ही तुझी देशभक्ती! हजारोंना मरायला पाठवलेस आणि तू चोरा, मागे राहिलास. देशभक्त म्हणे! ठेचा याला आधी. अनेक जन्म हा लायक व्हायचा नाही.”

“अहो मी प्रोफेसर होतो. माझा सात्विक धंदा. मला घ्या आत.” एक प्रोफेसर म्हणाले.