कावळ्यांची कैफियत 2
“नाही, लहानपणी तुमचे काळेभोर रूप पाहून मला आनंद वाटे. आई मला तुमचे रूप दाखवीत दाखवीत भरवी. म्हणून तर मी तुम्हांला जेवायला हाक मारली. लहाणपणाचे तुम्ही माझे मित्र. अगदी बाळपणापासूनचे मित्र. लहाणपणी आई मला अंगणात ठेवी. मी तुमच्याकडे पाहायचा. त्या चिमणुलीबाईकडे पाहायचा. मला तुला पुष्कळ विचारायचे आहे. विचारू? सांगशील गड्या?” मी विचारले.
“हो, मोठ्या आनंदाने. आम्ही तुमच्याशी बोलायला किती उत्सुक असतो. परंतु तुम्ही सारे आपल्याच मिजाशीत व ऐटीत. तुम्ही भाऊभाऊही एकमेकांजवळ नीट बोलत नाही, मग आमच्याजवळ कशाला बोलाल? आम्हांला वाटे, मानव हा किती विचित्र प्राणी आहे! त्याला स्वत:शिवाय जगात कोणी आवडत नाही, परंतु तुझ्यासारखे अपवाद आहेत म्हणायचे. ठीक, विचार. अगदी नि:संकोचपणे तुझ्या सा-या शंका विचार.” कावळा म्हणाला.
त्याचे सुंदर मार्मिक भाषण ऐकून मला आश्चर्य वाटले. आम्ही मग एकमेकांशी अगदी मनमोकळेपणाने गोष्टी केल्या.
“का रे कावळोबा, तुम्हाला आमचा-मानवांचा राग नाही का येत? आम्ही तुम्हाला नाना नावे ठेवली, तुम्हांला हीन, नीच, पतित मानले, त्याचे तुम्हांला कधी वाईट नाही वाटले? ह्या गोष्टी तुम्हांला माहीत नाहीत का? तुमच्या कानावर आल्या असतील तर तुम्ही इतके शांत कसे? तुमच्यातही कोणी शांतीचा संदेश देणारे संत झाले का? तुम्ही माणसांच्या डोक्यावर चोंची का नाही मारल्यात? अंगणात छोटी मुले ठेवलेली असतात, त्यांचे डोळे का नाही फोडलेत? या मानवाने आज हजारो वर्षे तुमची नालस्ती चालवली आहे. तिचा सूड तुम्ही का नाही घेत? तुमच्या मनात कधीच असा विचार नाही आला का? तुम्ही का मानापमानाच्या पलीकडे गेला आहात? ‘हाथी चलत है अपनी गतमो कुतर भुकत वाको भुकवा दे’ असे का तुम्ही मनात म्हणून मानवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता? माझ्या मनात अशा नाना शंका येतात. त्या सा-यांचे तू निवारण कर.” असे म्हणून मी थांबलो.
कावळ्याने चोच एकदा घासून पुसून साफ केली. पंख जरा चोचीने खाजवले. इकडे आपले बुबुळ फिरवून जरा नीट न्याहाळून पाहिले आणि मग तो म्हणाला, “ऐक गड्या तुला, सारी हकीकत सांगतो. थोडक्यात सांगतो: कारण मला लौकर घरी परत गेले पाहिजे. दोन वृद्ध कावळे आजारी आहेत. त्यांच्या सेवेसाठी मला गेले पाहिजे. त्यांच्यासाठीच तू टाकलेला हा तुकडा मी नेईन. म्हणून मी तो खाल्ला नाही. तुला वाटायचे आपण एवढ्या प्रेमाने आपल्या घासातला घास याला दिला आणि हा खात कसा नाही? म्हणून आपले सांगून टाकले.