स्वर्गाकडे कूच 1
अध्यक्ष व इतर पाच असे सहाजण ईश्वराकडे निघाले. शिष्टमंडळात तरुणालाही घेतले. कावळ्यांची व यमाची मैत्री. पितरांच्या मध्यस्थीने, मृतात्म्यांच्या वशिल्याने कावळे यमदेवापर्यंत जाऊन पोचले. “आम्हांला त्या राजाधिराजाकडे, जगदीश्वराकडे घेऊन चल.” अशी अध्यक्षांनी यमराजाला विनंती केली व ती त्याने मान्य केली.
यम आपल्या महिषावर आरुढ झाला. सहा कावळे त्याच्या आवतीभोवती उडत चालले. अध्यक्ष जरा वृद्घ. त्यांना यमधर्माने महिषाच्या मस्तकावर बसावयास सांगितले. प्रथम ते बसत ना. सर्वांनी आग्रह केला. “तुम्ही बसा. तुम्ही वृद्घ आहात. वृद्घांचा मान मानव ठेवीत नसला तरी आम्ही ठेवू.” असे ते पाच कावळेही म्हणाले. शेवटी आग्रहास्तव ते महिषावर बसले. यमाचा रंग काळा, महिषाचा काळा, ते कावळे काळे. एकरुपी, एकरंगी ते होते.
यमधर्म म्हणाला, “पूर्वी भरतखंड पितृपूजा, वृद्धपूजा, यांबद्दल प्रसिद्घ होता. पण आज तेथे वृद्धांना मान नाही. चीन देशात अजून थोडा आहे म्हणतात.”
“यमधर्मा, मानव फार बहकत चालले. आम्ही त्याच्याविरुद्घ बंड करणार आहोत.” तरुणांचा नायक म्हणाला.
यमधर्म म्हणाले, “तुम्ही पद्धतीप्रमाणे वागा. दुसरा वाईट वागला तरी तुम्ही वाईट नका वागू. मानवांना आज देवाच्या राज्यात किंमत नाही. सारे देवाच्या राज्याबाहेर अंधारात रडत आहेत. त्यांच्यातील मोठेमोठे धनिक, सत्ताधीश, अहंकारी लोक दुस-याला छळणारे, नावे ठेवणारे, स्वत:ची पोटे भरणारे, दुस-यांना रडवणारे, गुलाम करणारे, दुस-याच्या गुलामीत आनंदाने राहणारे, आळशी व परावलंबी सारे बाहेर रडत पडले आहेत. त्यांच्यातल्या थोड्या थोर व्यक्ती देवाजवळ जाऊ शकल्या. त्यानी पुष्कळ रदबदली केली. देव त्यांना म्हणाला, “त्यांना शुद्ध होऊ दे. त्या भाईबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुम्ही पुन्हा जन्म घ्या, पुन्हा आपली बलिदाने द्या, देव त्यांना पुन्हा पुन्हा खाली लोटून देतो. तुम्ही पहाल मजा.”
कावळ्यांना हे ऐकून आश्चर्य वाटले.
देवाचे राज्य जवळ येऊ लागले. दूर उंच कळस झळकत होते. त्यावर एक दिव्य ध्वजा होती. ‘सत्यं-शिवं-सुंदरं’ अशी त्यावर अक्षरे होती.