कावळ्यांची कैफियत 3
आता थोडा पूर्ववृत्तान्त तुला सांगतो. पूर्वीपासून आमची जात आपली अल्पसंतोषी; कोणाच्या आगीत नाही, दुगीत नाही. जे मिळेल ते आनंदाने खावे व सृष्टीत दोन दिवस आनंदाने नांदावे, अशी आमच्या जातीची वृत्ती. मनुष्याने आमच्या जातीविरूद्ध चालवलेली नालस्ती आमच्या कानांवर येत असे. मनुष्यप्राणी सर्वात श्रेष्ठ, तो देवाची प्रतिमा, ती भगवंताने निर्माण केलेली सर्वोत्तम कलाकृती. त्याला बुद्धी, हृदय, मन आहेत. त्याचा आकार सर्वांगसुंदर,- वगैरे मनुष्याची आत्मप्रौढी आम्ही ऐकत होतो व मनात हसत होतो! परंतु मनुष्याला वाटे की, इतरांची निंदा केल्याशिवाय स्वत:चे श्रेष्ठपण सिद्ध होत नाही. म्हणून मानव सर्व मानवेतर पशुपक्ष्यांची निंदा करू लागला. जो कोणी पशू, जो कोणी पक्षी थोडे त्याचे अनुकरण करील, त्याच्या इच्छेप्रमाणे वागेल, त्याची स्तुतीही करी. काही कवी वगैरे वेडे लोक त्यांच्यात झाले. त्यांनी पशुपक्ष्यांची, मानवेतर सृष्टीची रसाळ वर्णने केली. आमचे गुणगान गाइले, परंतु आमची बेअब्रू त्यांनी केली आहे. विशेषत: कावळ्याची फार बेअब्रू तुम्ही केलेली आहे. आम्ही हे सारे सहन करीत होतो, परंतु थोड्या वर्षांपूर्वी काही तरूण बहाद्दर मंडळी आमच्यांत निघाली. ते बंडाची भाषा बोलू लागले. मानवजातीविरुद्ध बंड करु या, असे ते म्हणू लागले. शेवटी सर्व कावळ्यांची एकदा एक प्रचंड सभा घ्यावयाचे आम्ही ठरवले.”
“मग तुमचे हे संमेलन झाले का?” मी अत्यंत उत्सुकतेने विचारले.
“हो, हो झाले तर, त्याची हकिकत मी तुला पुढे सांगणारच आहे, पण आता मला उशीर होईल.” असे म्हणून तो कावळा मला आश्वासन देऊन उडून गेला.