Get it on Google Play
Download on the App Store

कावळ्यांची परिषद 4

तुळशीचे झाड पवित्र म्हणून त्याचा पाला खाईल. हरभरा तर पानांसकट कोंबील. वृक्ष, तृण, वनस्पती, पशू, पक्षी, मासे याने काय खायचे ठेवले आहे? हा बकरा खातो, बोकड खातो, कोंबडी खातो, बदके खातो, गाय खातो, बैल खातो, याला वाघाची चरबी, डुकरांचे मांदे, माशाचे तेल सारे पाहिजे!  आहे तरी कसला ह्या बेट्याचा देह! पक्षी आनंदाने आकाशात फिरावयास जातो तर हा बाण मारतो, गोळी मारतो, छर्रे मारतो. गमतीसाठी हा शिकार करतो. मधमाश्यांनी श्रमाने मिळवलेला मध हा लुटतो. गाई-म्हशींचे दूध वासरांनाही न ठेवता हा घटाघटा पितो. इतके करून वर स्वत: देव म्हणून मिरवतो. वाहवा रे देव! असल्या देवाला चोचीने फाडून फाडून खावा, असे मला वाटते. सर्व मानवेतर प्राण्यांनी कट केला तर चटणी उडवू याची चटणी! कावळ्याने पुढारीपण घेऊन बंडाचे विचार फैलावले पाहिजेत. माणसाची ही प्राणघेणी संस्कृती, जगननाशक संस्कृती, खाबू पोटोबा संस्कृती, तिचा नायनाट करू. चला! एकच घोषणा करा व उडवा त्याची सत्ता! स्वतंत्र व्हा, स्वतंत्र व्हा.” असे म्हणून हा तरुणांचा नेता खाली बसला. बहुतेकांचे विचार त्याने बोलून दाखवले होते.

इतक्यात अध्यक्षांची परवानगी घेऊन तो पहा एक पोक्त कावळा उठला. तो म्हणाला, “कावळ्याचा रंग पूर्वी निळा होता. पण मागे एकदा मानवाचे पाप फार झाले. आपल्या पापांचा कलंक जर इतर कोणी घेईल तर आपण यापुढे पुण्यवान राहू, असा त्याने संकल्प केला. जसे जगाच्या कल्याणासाठी शंकर विष प्यायले त्याचप्रमाणे कावळ्यांनी मानवाच्या पापांचा स्वीकार केला. आकाशाच्या बाळाप्रमाणे निळे निळे दिसणारे कावळे तेव्हापासून काळे दिसू लागले! माणसाने आपले वचन पाळले नाही. तो एकसारखा पापांतच बुडत चालला आहे. मोकाट, स्वैर, स्वच्छंद, बेछूट वागत आहे. वागू दे. पण आपल्या काळ्या रंगाचा हा उज्ज्वल इतिहास सर्वांनी ध्यानी घ्यावा. जगाचे दु:ख दूर करणे हे आपले ध्येय, ते आपण विसरु नये. मानव बिघडला असला तरी आपण बिघडू नये. नाहीतर हळूहळू सारी दुनिया बिघडेल. एकटा मनुष्य बिघडला म्हणून काय झाले? मानवेतर सृष्टीचे निर्मळ जीवन सृष्टीला सांभाळील. आपापले स्वधर्म आपण चालू ठेवू. त्यांतच आपला विकास, आपला उद्घार!”

या प्रौढ काकाच्या भाषणानंतर निरनिराळ्या सूचना पुढे आल्या. कोणी म्हणाले, “आपण मानवाकडे आधी शिष्टाई करू. सूचनेशिवाय लढणे बरे नव्हे.” ‘सशस्त्र लढा की नि:शस्त्र असहकार’ हाही प्रश्न पुढे आला. कोणी म्हणाले, “त्यांना चोचीने फाडा.” कोणी म्हणाले, “त्यांच्या घराभोवतीची सफाई आपण केली नाही की आपोआप तो निरनिराळ्या रोगांनी मरेल.” दुसरे म्हणाले, “माणसांबरोबर घुबडाला शत्रू मानून त्याचाही नायनाट करावा.” काही जहाल कावळे म्हणाले, “शिष्टाई शिष्टाजवळ करावी. दुष्टाजवळ कसली शिष्टाई! तो आपली टर उडवील. आपल्याला दगडाने मारील.” काहींनी सूचना केली की “ईश्वराच्या घरी जाऊन आपले गा-हाणे मांडावे.” तेव्हा काही म्हणाले, “देवाच्या कानी कशाला घालायला हवे? त्याला सारे दिसते, समजते. त्या सर्वज्ञ सर्वव्यापी, परमेश्वराला सारे समजते. त्याला आपले दु:ख माहीत आहे. तो म्हणेल तुम्हांला मन, बुद्धी, शक्ती सारे दिले आहे.”

अखेर अध्यक्ष म्हणाले, “परमेश्वराला सर्व माहीत असले तरी आपण एकवार त्याच्याकडे
गा-हाणे न्यावे. तो आपला पिता. इतके दिवस आपण त्याच्या नियमांप्रमाणे वागलो. पण आता हे जिणे असह्य झाले म्हणून त्या नियमाबाहेर वागावे लागेल, हे त्याच्या कानी घालावे. त्या विश्वंभराकडे आपल्यातील पाच सहा मंडळींचे शिष्टमंडळ पाठवावे. जरा वेळ लागला म्हणून काय बिघडले?” त्यांचे म्हणणे सर्वांना पटले.