इंग्रजी आमदानी 4
राम गणेश गडकरी हे कवी, नाटककार तसेच जबरे विनोदी लेखक. त्यांनी ‘ठकीचे लग्न’ म्हणून विनोदी लेखमाला लिहिली. मुलीचे लग्न मोडायला सतराशे विघ्ने कशी आड येतात, ते त्यांनी अती विनोदाने दाखवले आहे. कोठे मंगळ आड येतो, कोठे नाडी जमत नाही. कोठे गण विघ्न आणतो. तर कोठे हुंडयापायी जमत नाही. सत्रा प्रकार. मुलींची विटंबना थांबत नव्हती. त्यांच्या जिवाचा गुदमरा होत असेल. पूर्वी लहानपणी लग्ने करीत तेव्हा जाणीव तरी आलेली नसे परंतु आता शिक्षण मिळू लागले. थोडे फार वय वाढू लागले. पुस्तके वाचनात येऊ लागली. कधी कादंबरी हातात पडावी, कधी नाटक. प्रेम वगैरे शब्द कानांव येऊ लागले. भावना वाढू लागल्या. हृदय विकसू लागले. परंतु आईबापांची, समाजाची वृत्ती जुनाटच. वाढत्या परिस्थितीनुरुप वाढती दृष्टी नाही, वाढती सहानुभूती नाही. कधी कधी या लहान मुलीचा थेरडयापाशीही विवाह करीत. मुलीचे पैसे घेत. मुलाचे काय, मुलीचे काय पैसे घेणे पाप. काही जातींतून मुलामुलींचे लग्न होणे कठीण जाते. मुलाला मुलीच्या बापाला पैसे द्यावे लागतात. काही गुजराती जातींत ही अनिष्ट चाल आहे. चार मुली असल्या तर बाप म्हणतो, “ही माझी इस्टेट, चारी जणींचे दहाबारा हजार तर खरे !” मद्रासकडे मुलींचे सालंकृत कन्यादान करण्याची चाल म्हणून अडचण. विवाह म्हणजे वधूवरांनी एकमेकांस हृदय देणे, ही गोष्ट कधी होईल ? मराठीतील शारदा नाटकाने केवढी खळबळ माजवली ? देवलांचे हे अपूर्व नाटक. त्यांतील गाणी खेडयापाडयांपर्यंत गेली. ‘लग्ना अजून लहान । अवघे पाउणशे वयमान।।’ इत्यादी गाणी सर्वांच्या ओठांवर खेळू लागली. अशा रीतीने स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येत होती.
देश स्वतंत्र व्हावा म्हणून देशात बाँब आले, पिस्तुले आली. लोकमान्य काळ्या पाण्यावर चालले. खुदीराम फाशी गेला. क्रांतिकारक अंदमानात चालले. देश स्वतंत्र व्हावा म्हणून ना ही सारी बलिदाने ? परंतु देश स्वतंत्र व्हावा म्हणजे काय ? देशातील नरनारींची जीवने विकसित व्हावीत, हा ना स्वातंत्र्याचा अर्थ ? स्त्रियांच्या जीवनाचा विकास कधी होणार ? तरुण देशभक्तीच्या गोष्टी बोलत आहेत, स्वदेशीच्या शपथा घेत आहेत, परंतु लग्नाच्या वेळेस हुंडे घेत आहेत ! हे विचित्र नव्हे का ?
आणि म्हणून बंगालमधील मुलगी स्नेहलता बलिदानार्थ उभी राहते. ती पत्र लिहिते, “हुंडयाच्या चालीमुळे मुलींची दैना होते. आई बापांना मुलगी म्हणजे संकट वाटते. देशातील तरुणांना आपल्या भगिनींची विटंबना थांबावी असे नाही वाटत ? ही हुंडयाची चाल बंद व्हावी म्हणून मी स्वतःचे प्राण देत आहे.” स्नेहलतेने अशा आशयाचे पत्र लिहून ठेवले. तिने अंगावर रॉकेल ओतून काडी लावली. त्या दिव्य ज्वालेने क्षणभर भारतीय तरुणांच्या जीवनात प्रकाश आला. ठायी ठायी युवकांच्या सभा झाल्या. हुंडा न घेण्याच्या प्रतिज्ञा झाल्या.
स्त्रियांचे शिक्षण, साहित्यिकांचे प्रयत्न, आणि स्नेहलतेचे बलिदान अशा अनेक मार्गांनी स्त्रियांच्या जीवनात नवीन प्रकाश येऊ लागला. शिक्षण वाढू लागले. क्वचित पदवीधर भगिनी दिसू लागल्या आणि स्त्रियांचे शिक्षण हाती घ्यायला सेवासदन, सूतिकागृहे इत्यादी संस्था काढायला भगिनीच हिंमतीने पुढे येऊ लागल्या. महाराष्ट्रातील सेवासदन संस्थेचे या दृष्टीने फार थोर कार्य आहे. तो इतिहास पुढे पाहू.