इंग्रजी आमदानी 3
पुण्याची हुजूरपागा फार जुनी मुलींची शाळा. बोर्डिंगही होते. आरंभी हिंदुधर्मी मुलींसाठी निराळे, ज्यू मुलींसाठी निराळे अशी तेथे बोर्डिंगे होती. तिकडे एक पंचहौद मिशन शाळा होती. परंतु तेथे चार इयत्तांपर्यंतच शिक्षण मिळे. तेथे ख्रिश्चन झालेल्या मुलीच बहुधा शिकत. त्या पाचवीपासून मग हुजूरपागेत येत. हुजूरपागा इंग्रजी शिक्षण देऊ लागली. तिकडे महर्षी कर्वे यांनी पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम स्थापिला. तेथे मुलींची
मराठी शाळा होती.प्रथम तर चार इयत्तापर्यंतचे शिक्षण मिळू लागले व पुढे फायनलला मुली बसू लागल्या. इंग्रजी तीन इयत्तांपर्यंतही तेथे शिक्षण मिळू लागले. कर्व्यांच्या पत्नी बाया याच तेथे व्यवस्था बघत. तेथील काही मुली हुजूरपागेत जात, काही न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत. असे हे प्रयत्न शहरांतून होऊ लागले. मोठया शहरांतून जिल्ह्याच्या, तालुक्याच्या गावांपर्यंत शिक्षणाचे लोण थोडे थोडे जाऊ लागले.
श्रीमंत सयाजीराव महाराज हे पुढारलेल्या विचारांचे. स्त्रियांचे शिक्षण व्हावे, हरिजन पुढे यावेत, म्हणून त्यांना तळमळ. श्री. काशीबाई हेर्लेकर या बडोद्यास त्या वेळेस पुढे आल्या. बडोद्यास स्त्रियांचे ट्रेनिंग कॉलेज व मुलींचे हायस्कूल या संस्था प्रथम एकत्रच होत्या. मिस् मेरी भोर या बडोद्याच्या ट्रेनिंग स्कूलच्या काही दिवस मुख्य होत्या. श्री. काशीबाई हेर्लेकर तेथील ट्रेनिंग कॉलेजात शिक्षक होत्या. त्या शिक्षकच राहिल्या. त्यांच्या विद्यार्थिनी येऊन तेथे मुख्य झाल्या. काशीबाईंच्या आई सगुणाबाई देव याही चांगल्या सुशिक्षीत होत्या. मराठी तर त्यांना येईच परंतु इंग्रजीही त्या शिकल्या. काशीबाईंना विद्येची गोडी आईपासून मिळाली. अगदी आरंभीच्या अर्वाचीन मराठी लेखिकात काशीबाईंचे स्थान आहे.स्त्री-स्वातंत्र्यासाठी त्यांना घरीही त्रास सोसावा लागे. परंतु सहनशीलपणाने त्यांनी सारे सहन केले. स्त्रिया स्वातंत्र्यास योग्य आहेत, असे पुरुषांना पटवले. तो संक्रमणावस्थेचा काळ होता, सुशिक्षित स्त्रियांवर जबाबदारी होती, आणि काशीबाई हेर्लेकर म्हणजे एक असे आदर्श उदाहरण. श्री.शांताबाई कशाळकर, सौ. गीता रानडे या त्यांच्याच सुविद्य मुली.
मुलींच्या शिक्षणाला थोडीफार सुरुवात झाली. मराठी श्रीगणेशा तरी येऊ लागला. शिक्षणाला आरंभ होणे म्हणजे विवाहकाळ पुढे जाणे, कारण चार इयत्ता व्हायच्या म्हटल्या तरी दहा बारा वर्षांची मुलगी होणार ; आणि इंग्रजी शिकायचे म्हटले तर वयाची मर्यादा आणखीच पुढे जायची. त्या प्रश्नांवर खडाजंगी माजली. केसरी आणि सुधारक यांतून स्तंभच्या स्तंभ लेख येऊ लागले. मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा काय असावी, हाच जणू महान राष्ट्रीय पश्न होऊन बसला.
मुलीच्या वयाचे प्रश्न, त्याचप्रमाणे हुंड्यासारख्या घातुक चालीही होत्या. मुलींना सतरा ठिकाणी दाखवायला न्यायचे ! ज्या वेळेस शिक्षणच नसेल त्या वेळेस नाकडोळे बघून, चालते कशी, बोलते कशी बघून, लग्न करीत असावेत. मुली शिकल्या, परंतु मुलीची प्रतिष्ठा वाढली नाही. महर्षी सेनापती नेहमी म्हणतात ; “मुलगी ही देण्याघेण्याची वस्तू नाही. मुलगेमुली आपापले अनुकूल वधूवर निवडून विवाह करतील. आईबापांनी, पालकांनी आशीर्वाद द्यावा. इतर काही अडचणी असतील तर दूर कराव्या.” परंतु मुलीच्या आत्म्याला ही प्रतिष्ठा अजून यावयाची आहे.