इस्लामाच्या आगमनानंतर 4
महाराष्ट्रीय भगिनी राजकारणातही सरसावत. सरदारांच्या, प्रतिष्ठितांच्या मुली घोडयावर बसणे, नेमबाजी, यात तरबेज होत असत. छत्रपतींची माता श्रीजिजाई ही शहाजी दक्षिणेकडे असता इकडे हिमतीने जहागिरी बघत होती. शिवछत्रपतीस रामायणमहाभारतातील धडे देत होती. तो कोंडाणा मला घेऊन दे, असे सांगत होती. आणि संभाजी महाराजांची पत्नी
येसूबाई ! ती किती थोर नि हिमतीची ! ताराबाईची तेजस्विता इतिहास प्रसिद्धच आहे. गोपिकाबाई, आनंदीबाई यांची राजकारणे चालतच. उमाबाई दाभाडे कशी तेजस्विनी नारी ! आणि देवी अहल्याबाई. ती जमाखर्च उत्कृष्ट ठेवी. सासरा तिला मुलाप्रमाणे मानीत आणि पुढे दौलतीचा कारभार तिने चालवला. हिंदुस्थानात विख्यात झाली. दरबारात बसे, न्याय देई. हिंदूस्थानभर अन्नछत्रे, घाट, अनेक राजे आपसांतला तंटा तो़डायला अहिल्याबाईंकडे जात, अशा अख्यायिका आहेत. रघुनाथराव चालून आले तर घोड्यावर बसून सेना घेऊन निघाली, पत्रात लिहितेः “घाबरु नये. मी डेरेदाखल होते.” राजवाडा सोडून ती छावणीत येते. रघुनाथराव शरमून जातात. आणि ती भारतभूषण झाशीची राणी ! ते धैर्य, ते शौर्य, त्याला तुलना नाही. तटावरुन घोडा फेकून फळी फोडून ती जाते. शत्रूंशी झुंजते. मारता मारता मरते. महाराष्ट्रीय भगिनींचा असा हा इतिहास आहे.
कवी मोरोपंत यांच्या सुना पंडिता होत्या. महाकाव्ये पढलेल्या. पंतांच्या आर्यांचा कोणाला अर्थ न कळला तर त्यांच्या सुनांकडे कीर्तनकार वा दुसरे अर्थजिज्ञासू येत. मोरोपंत उदार विचारांचे. त्यांनी आपल्या मुलांचा हुंडा घेतला नाही. हुंडा घेणे पाप, असे म्हणाले. ते ज्या बारामतीकरांकडे राहत, त्यांच्या मुलीसाठीच त्यांनी सीतागीत, सावित्रीगीत वगैरे गीते करुन दिली. त्या मुली झोपाळ्यावर बसून ती गीते म्हणत. लोकमान्य टिळकांनी आपल्या मुलींना हीच गीते पाठ करायला सांगितली म्हणतात.
समर्थांचे आश्रम कोठे कोठे भगिनी चालवीत, हे आपण पाहिले. वारकरी पंथानेही स्त्रियांना स्फूर्ती दिली. या सर्वांमुळे महाराष्ट्रात कीर्तनकार स्त्रिया झाल्या. रामशास्त्रांच्या वेळेस तुळशीबागेत स्त्रिया कीर्तन करीत, असे उल्लेख आहेत. एकदा एका स्त्री-कीर्तन- कारिणीच्या कीर्तनाला स्वतः रामशास्त्री गेले होते. ती भगिनी पूर्वरंग रंगवीत होती. विवेचन करता करता ती भगिनी शास्त्रीबोवांस भर कीर्तनात प्रश्न करते !