धडपडणारी
ते वारे त्याला म्हणाले, ‘रघुनाथ, झोंप; तुझ्या आईचे अश्रू आम्ही पुसू; तू भारतमातेचे अश्रू पुसावयास जा. तू रजपूत आहेस. रजपूत कुळाची पर्वा करीत नाही. घरादाराची पर्वा करीत नाही. रजपूत देशासाठी मरतो! रघुनाथ ! शिसोंदे कुळांतील ना तू? राणा प्रताप आठव. बाप्पा रावळ आठव. घरच्या मोहांत पडू नकोस. मोहाशी झगड व भारताची हांक ऐकू.’
रघुनाथ अंथरुणावर पडला. परंतु अनेक विचाराचे वारे हृदयाकाशांत भावनांच्या उष्णतेमुळें उत्पन्न झाले होते. असें करतां करतां त्याला झोपं लागली.
स्वामींच्या विचारांचा, शिकवणीचा, उदाहरणाचा रघुनाथावर जसा विलक्षण परिणाम होई, तसाच नामदेवावरहि होई. नामदेवहि फार भावनाप्रधान होता. तो मुका कवि होता. तो फार बोलत नसे. तो आपल्या भावना संगीतांत प्रकट करी. रंगांत प्रकट करी. नामदेव कलावान होता. ईश्वराने त्याला सौदर्यांपासक बनविलें होतें. त्याची बोटें कलावानाचीं होतीं, ती लांब टोंकदार बोटे होतीं, ती बोटें सुंदर चित्रें काढीत, बांसरीवर सुंदर फिरत. सूर्यास्त झाला म्हणजे छात्रालयाच्या विहिरीवर जाऊन तो बसे व आकाशांतील रंगशोभा पाही. देवाची चित्रकला पाही. स्वामीजवळून त्यानें एक रामाची सुंदर तसबीर घेतली होती. त्या तसबिरीस तो फुलांचे हार घाली. तेथे उदबत्ती लावी. नामदेवाच्या खोलीत कधी घाण नसावयाची. सारें स्वच्छ, सुंदर, सुव्यवस्थित. सारें पवित्र व गोड. त्याच्या पुस्तकांवर नीट कव्हरें असत. वहीवर डाग नसे. त्याचा पोषाख साधाच परंतु स्वच्छ असे. खादीची पांढरी टोपी त्याला किती खुलून दिसे. त्यांचे केंस अगदी काळे कुळकुळीत होते. त्याचें कपाट निर्मळ व मोठें होतें, नाक सरळ, जरा बाकदार होतें. ओंठ लाल व पातळ होते. त्याची अंगकांति गोरी होती. अत्यंत प्रमाणबद्ध त्याचें शरीर होतें जणुं देवानें कलेचा नमुनाच त्याच्या रुपाने निर्माण केला होता.
नामदेवाचें घराणें प्रसिद्ध होतें. पूर्वज पराक्रमी सरदार होते. सुसंस्कृत घराणें होतें. नामदेवाच्या घरी सत्यशोधकी पंथ होता. त्याचे वडील वाचणारे होते. विजयी मराठा वगैरें पत्रें त्यांच्याकडे येत असत. मरठीतील किती तरी सुंदर पुस्तकें त्यांच्याकडे होती. गीतारहस्य होतें. विवेकानंदाचे खंड होते. गाथा होती. नामदेवांनें घरी पुष्कळ वाचलें होतें. विवेकानंदांच्या चरित्राचा त्याच्यावर फार परिणाम झाला होता. तो विवेकानंदांचा वेडा होता. विवेकानंदांचे कितीतरी निरनिराळे फोटो त्याच्या खोलींत टांगलेले असत.
नामदेवाची आई तो लहान असतानाच वारली होती. रायबांनीच त्याला वाढविलें. तळहाताच्या फोडाप्रमाणे म्हातारा नामदेवाला जपायला. नामदेवावर. वडिलांचे फार प्रेम होतें. बाप नामदेवाचा वेडा होता. दहाबारा वर्षांचा होईपर्यंत नामदेवाला ते आपल्याजवळच निजावयास घेत. मुलाला जरा कांही झालें तर रायबा घाबरून जात. नामदेव आजारी पडला तर रायबा आजारी पडायचे ! जणु मुलांचें दुखणें ते स्वत:वर घेत.
आईवेगळा नामदेव, सर्वांत लहान नामदेव, सुंदर गोरागोमटा! नामदेव रायबांचा प्राण होता. रायबा म्हणायाचे, ‘माझ्या नाम्याचें दांत मोत्यासारखे आहेत. माझ्या नाम्याच्या ओंठावरील हंसू देवाच्या मूर्तींच्या तोंडावरील हास्याप्रमाणे गोड व रमणीय आहे.’ ज्याला देवानें असें सुंदर रुप दिलें त्यानें त्याला सुंदर मनोबुद्धि नसेल का दिली?
नामदेव कधीं खेळायला जायचा नाही, व्यायाम करायचा नाही.
“नामदेव! चल रे तालमीत,” मुकुंदा त्याला हांक मारी.
“मुकुंदा ! त्या तेल लावलेल्या मलखांबावर तूच उड्या मार, मी बघेन,” असें तो म्हणे.
एखादे वेळेस स्वामी त्याला हात धरून खेळावयास नेत. बागेचें काम सुरु झाल्यापासून नामदेवाला व्यायाम होऊ लागला. त्याला बागेंत काम करणे आवडे तो फुलझाडांना माती घाली. विहिरीचें पाणी ओढून काढी व झाडांना नेऊन घाली. तो कलावानाचा आनंद होता. फुलें फुलविण्याचें तें काम होतें. तो निर्माण करणारा, कांही तरी नवीन सुंदर सुगंधी सृजन करणारा तो थम होता.